परदेशी पाहुणे आणि त्यांचा कायापालट!

परदेशी पाहुणे आणि त्यांचा कायापालट!

महाराष्ट्राला ७२० किमी. एवढ्या लांबीची समृद्ध किनारपट्टी लाभली आहे. दरवर्षी हिवाळ्यात अनेक विदेशी पक्षी या किनारपट्टीला भेट देत असतात. याच किनारपट्टीव

#aareyAiKaNa – आरे आयका ना!
मान्सून केरळमध्ये, राज्यात आठवडाभरात पावसाची शक्यता
राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र, ३ अभयारण्य घोषित

महाराष्ट्राला ७२० किमी. एवढ्या लांबीची समृद्ध किनारपट्टी लाभली आहे. दरवर्षी हिवाळ्यात अनेक विदेशी पक्षी या किनारपट्टीला भेट देत असतात. याच किनारपट्टीवर असलेल्या वसई शहरात राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. अरबी समुद्राच्या कुशीत वसलेल्या वसईच्या किनारपट्टीवर देखील हे विदेशी पाहुणे हजारोंच्या संख्येने दरवर्षी स्थलांतर करून येतात आणि पूर्ण हिवाळा यांचं निरीक्षण करण्याची संधी मला मिळते. पावसाळ्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्यापासून हे पक्षी आपल्याकडे येऊ लागतात.

या पाहुण्यांमध्ये प्रामुख्याने चिखले (Waders) परिवारातील वेगवेगळ्या प्रजाती असतात. हे पक्षी आकाराने छोटे असतात आणि एकत्र दाटीवाटी करून राहतात. स्वभावाने अतिशय लाजरे असल्यामुळे आपण जवळ जाण्याचा थोडा जरी प्रयत्न केला तर हे सर्व उडून लांब जाऊन बसतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वांचा रंग किनाऱ्याच्या वाळूशी मिळताजुळता असतो त्यामुळे या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींची ओळख करणे म्हणजे यक्षप्रश्न. अहो अगदी दुर्बीणीनेही हे पक्षी नीट ओळखता येत नाहीत. एक चांगला स्पॉटिंग स्कोपच त्यांची ओळख नीट पटवून देऊ शकतो पण तो प्रत्येकवेळी जवळ बाळगणे शक्य नसते.

नियमित हंगामातील पक्षी [डावीकडून : ‘मोठा चिखल्या’ (Greater Sand Plover),‘केंटीश चिखल्या’ (Kentish plover), ‘करडा टिलवा’ (Dunlin), ‘बाकचोच तुतारी’ (Curlew sandpiper),‘कवड्या टिलवा’ (Sanderling)] छायाचित्र रमेश शेणाई

नियमित हंगामातील पक्षी [डावीकडून : ‘मोठा चिखल्या’ (Greater Sand Plover),‘केंटीश चिखल्या’ (Kentish plover), ‘करडा टिलवा’ (Dunlin), ‘बाकचोच तुतारी’ (Curlew sandpiper),‘कवड्या टिलवा’ (Sanderling)] छायाचित्र रमेश शेणाई

पण असं म्हणतात ना की निसर्ग आपल्याशी बोलतो फक्त त्याची भाषा समजून घेणे गरजेचे आहे. तसेच काही संवाद या पक्ष्यांच्या बाबतीत निसर्ग आपल्यासोबत करतो. साधारण मार्च-एप्रिल महिन्यांदरम्यान या पक्ष्यांचा विणीचा हंगाम जवळ येऊ लागतो आणि त्याचसोबत त्यांच्यात आमूलाग्र बदल होऊ लागतात. जणू काही आपल्या गावी जाऊन विणीचा उत्सव साजरा करण्यासाठी हे सर्व नटूनथटून तयार होतात. जसा आपल्या प्रत्येक संस्कृतीचा वेगळा पोशाख असतो तसाच या काळात या चिखले परिवाराची प्रत्येक प्रजाती वेगवेगळे रूप परिधान करते. आणि पक्ष्यांमध्ये होणाऱ्या ह्याच बदलांमूळे त्यांना ओळखणे सोपे होऊन जाते.

पक्ष्यांच्या या थव्यात प्रामुख्याने ‘छोटा चिखल्या’ (Lesser Sand Plover) आणि ‘मोठा चिखल्या’ (Greater Sand Plover) या दोन प्रजातींची संख्या जास्त असते. विणीचा हंगाम जवळ येऊ लागताच यांची छाती, मान आणि डोकं लालसर तपकिरी होऊ लागतं आणि डोळ्याला गडद काळी पट्टी येते. असे नवीन रूप घेऊन ते चालतात तेव्हा असे वाटते की जणू काही टोपीवाला सदरा घालून एखाद्या हिरोसारखे काळा चष्मा घालून ऐटीत मिरवत आहेत. या दोन्ही प्रजाती जरी सारख्या वाटत असल्या तरी त्यांच्या पायांचा रंग आणि चोचीचा आकार हे वेगळे असतात. ह्यांचाच छोटा भाऊ ‘केंटीश चिखल्या’ (Kentish plover) ही चांगल्या संख्येत आढळतो. विणीच्या हंगामात त्याच्या कपाळाचा रंग लालसर तपकिरी होतो आणि त्याला काळी कडा येते, जणू त्याने एखादा मुकुटच परिधान केला आहे. त्याच्या खांद्यावर येणाऱ्या काळ्या पट्ट्यांमुळे त्याने कॉलरवाला सदरा घातला आहे असे जाणवते. या गर्दीत अजून जे पक्षी मोठ्या संख्येने वावरतात ते म्हणजे पिटुकले ‘छोटा टिलवा’ (Little Stint). या काळात त्यांचे पोट सोडून इतर सर्व शरीर नारिंगी तपकिरी होते आणि पंखावर खवल्यांसारखी नक्षी दिसू लागते. यांनी आपल्या कुर्त्याला झालर लावून घेतलीय असेच वाटते.

आता येतात थोडी लांब चोच असणारे पाहुणे. ‘बाकचोच तुतारी’ (Curlew sandpiper) एरवी करड्या पांढऱ्या रंगाचा असणारा हा पक्षी. पण विणीच्या हंगामात तो पूर्णपणे तांबूस होऊन जातो. मला तर असा भास होतो की एखादी वीटच आपल्यासमोर चालत येत आहे. ‘करडा टिलवा’ (Dunlin) हा बराचसा ‘बाकचोच तुतारी’ सारखा दिसत असल्याने या दोघांमध्ये माझा नेहेमी गोंधळ होतो. पण विणीच्या हंगामात याची पाठ आणि डोकं लालसर तपकिरी होतं आणि पोटाकडचा भाग काळा होतो. कदाचित परतीच्या प्रवासासाठी तो एखादं बिनबाह्यांचं जाकीट घालून तयार होत असेल. या सर्वात मला मजेशीर वाटणारा पक्षी म्हणजे ‘कवड्या टिलवा’ (Sanderling). समुद्राच्या लाटांचा पाठलाग करणारा खेळकर स्वभावाचा हा पक्षी डिटर्जेन्टने धुतल्यासारखा पांढरा शुभ्र असतो पण या हंगामात त्याच्या पोटाचा भाग सोडून इतर सर्व शरीर गडद लालसर तांबूस होतं. समुद्राच्या खाऱ्या लाटांमध्ये खेळून जणू गंज चढतो त्याच्या अंगावर.

विणीच्या हंगामातील पक्षी [डावीकडून : ‘मोठा चिखल्या’ (Greater Sand Plover),‘केंटीश चिखल्या’ (Kentish plover), ‘करडा टिलवा’ (Dunlin), ‘बाकचोच तुतारी’ (Curlew sandpiper),‘कवड्या टिलवा’ (Sanderling)] छायाचित्र रमेश शेणाई

विणीच्या हंगामातील पक्षी [डावीकडून : ‘मोठा चिखल्या’ (Greater Sand Plover),‘केंटीश चिखल्या’ (Kentish plover), ‘करडा टिलवा’ (Dunlin), ‘बाकचोच तुतारी’ (Curlew sandpiper),‘कवड्या टिलवा’ (Sanderling)] छायाचित्र रमेश शेणाई

या चिखल्यांमध्ये आकाराने बरेच मोठे असलेले ‘राखी चिखल्या’ (Grey Plover) आणि ‘सोन चिखल्या (Pacific Golden Plover)’ या दोघांतही आपला गोंधळ होऊ शकतो. एरवी दोघांचे रंग फिके असल्याने ते सारखेच भासतात पण विणीच्या हंगामात नावाप्रमाणे त्यांचे रंग गडद दिसू लागतात. राखी चिखल्याच्या पाठीवर ठळक पांढरा-राखाडी रंग येतो आणि पोट, चेहरा आणि गळ्याला गडद काळा रंग येतो. सोन चिखल्याच्या पाठीवर पिवळा रंग उठून दिसू लागतो आणि पोट, चेहरा आणि गळा गडद काळा होतो. या काळ्या आणि पिवळ्या रंगांना एक पांढरी रेष स्पष्टपणे विभागत जाते. कोळश्यावर सोनं तापवत ठेवलं की कसं दिसेल, अगदी तसंच. ह्या दोघांमधील फरक ओळखण्याची एक महत्वाची खूण म्हणजे, राखी चिखल्याच्या पंखाखाली असलेले काळे डाग, जे सोन चिखल्यात आढळून नाही येत.

या समुद्रकिनाऱ्यावर चिखले परिवारातील अजूनही काही पक्षी आपल्याकडे येतात. त्यात ‘यूरेशिअन कोरल’ (Eurasian Curlew), ‘लहान कोरल’ (Eurasian Whimbrel), ‘उलटचोच तुतारी’ (Terek Sandpiper), ‘रंगीत तुतारी’ (Ruddy Turnstone) ‘सामान्य हिरवा टिलवा’ (Common Greenshank) इत्यादी पक्ष्यांचा समावेश असतो. पण त्यांच्या विशिष्ट आकार, रंग आणि ठेवणीमुळे ते लगेच उठून दिसतात आणि त्यांची ओळख सहज करता येते.

विणीच्या हंगामातील पक्ष्यांच्या पिसाऱ्यात होणारे हे सुंदर बदल म्हणजे निसर्गाचा एक सुखद चमत्कारच म्हणावा लागेल. समुद्रकिनारी वावरणारे हे पक्षी एरवी दुरूनच काय जवळून सुद्धा एकसारखे दिसतात आणि किनाऱ्यावरच्या त्या थव्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रजाती असतील असे कधी समजून पण येणार नाही इतके त्यांच्यामध्ये साम्य असते. पण प्रत्येक प्रजातीचा विणीचा पिसारा अनोखा असल्याने त्यांची ओळख सहज पटवता येते. त्यामुळे या प्रजातींची वैशिष्ट्ये व्यवस्थित समजतात व ऋतुमानानुसार त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करण्यात एक वेगळीच मजा येते. बदलता निसर्ग आणि त्यासोबत या पक्ष्यांचे आधीचे रूप आणि त्यांचा होणारा कायापालट अनुभवणे म्हणजे पर्वणीच. हा फरक अनुभवायचा असेल तर साधारण सप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्यांत एकदा आणि मार्च ते एप्रिल महिन्यांत एकदा अश्या किमान दोन फेऱ्या समुद्रकिनारी मारणं गरजेचं आहे.

पण निसर्गाची ही सर्व गंमत अनुभवताना मनाला एका गोष्टीचा चटका नेहेमी बसतो, तो म्हणजे किनाऱ्यांवर आपण मागे सोडलेला कचरा. हजारो किलोमीटर प्रवास करून येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत आपण ह्या प्रचंड कचऱ्याने करतो. आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर आपण घर आवरून नीटनेटकं करतो. पाहुण्यांना रहायला घरातील सर्वात स्वच्छ खोली देतो. तसाच हा निसर्गही आपले घर नाही का? आपण थोडं जवाबदारीने वागून किनाऱ्यावर कचरा न टाकल्यास ह्या परदेशी पाहुण्यांना आपण स्वच्छ आणि पोषक वातावरण देऊ शकतो. तर मग या पाहुण्यांचे स्वागत यापुढे चांगल्या पद्धतीने करण्याचा निश्चय करून निवडा एखादा समुद्रकिनारा आणि लवकरच भेटून या, या विदेशी पाहुण्यांना.

(लेखाचे  छायाचित्र : वसईच्या किनार्यावरील चिखल्यांचा थवा. छायाचित्र रमेश शेणाई)

रमेश वसंत शेणाई, हे व्यवसायाने निसर्ग अभ्यासक असून, पक्षीनिरिक्षक, वन्यजीव छायाचित्रकार आणि ब्लॉगर आहेत. NatureNotes

(ही मालिका ‘नेचर कंजर्वेशन फाउंडेशन’द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतुन निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0