ट्रम्प यांना झोपडपट्‌टी दिसू नये म्हणून भिंत बांधली

ट्रम्प यांना झोपडपट्‌टी दिसू नये म्हणून भिंत बांधली

नवी दिल्ली : येत्या २४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारतभेटीवर येत असून ते गुजरातेत अहमदाबाद येथे १० किमीचा रोड शो

एमी बँरेटच्या नियुक्तीने मूलतत्ववाद्यांना बळ
ट्रंप यांचा ट्वीटखेळ
सरकारी शाळेतील कार्यक्रमात केजरीवाल, सिसोदियांना निमंत्रण नाही

नवी दिल्ली : येत्या २४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारतभेटीवर येत असून ते गुजरातेत अहमदाबाद येथे १० किमीचा रोड शो करणार आहेत. या रोड शो दरम्यान ट्रम्प यांचा ताफा अहमदाबाद विमानतळ ते गांधीनगर असा जाणार असून या रस्त्यावरील देव सरन किंवा सरनीयावास झोपडपट्‌टी त्यांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून सुमारे अर्धा किमी लांब व सात फूट उंचीची भिंत अहमदाबाद महानगरपालिकेकडून बांधण्यात येत आहे.

ट्रम्प अहमदाबादेतील मोटेरा या क्रीडांगणावर हजारो उपस्थितांच्या सभेला संबोधित करणार असून या सभेचे नाव ‘केम छो ट्रम्प’ असे ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अमेरिकेत ‘हाऊ डी मोदी’ असा एक सोहळा आयोजित केला होता. त्या सोहळ्याचीच ही नक्कल आहे.

अहमदाबादेत ट्रम्प पहिल्यांदात येत असल्याने संपूर्ण अहमदाबादेचे सुशोभिकरण करण्याची युद्धस्तरावर तयारी महापालिकेने सुरू केली आहे. ज्या झोपडपट्‌टीच्या लगत भिंत बांधण्यात येत आहे ती झोपडपट्‌टी अनेक वर्षे त्या ठिकाणी आहे. तिथे सुमारे ५०० हून अधिक झोपड्या असून अडीच हजाराहून अधिक नागरिक तेथे राहतात.

अहमदाबादेत मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून संशयित वाहनांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे.

यापूर्वी २०१७मध्ये जपानचे पंतप्रधान शिंझो अबे त्यांच्या पत्नीसह अहमदाबादेत आले होते. त्यावेळीही अहमदाबादेचे सुशोभिकरण करण्यात आले होते पण त्यावेळी शहरातील झोपडपट्‌टी दिसू नये म्हणून भिंत बांधण्यात आली नव्हती.

ट्रम्प येणार म्हणून अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकलली

डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादेत येणार म्हणून गुजरात सरकारने त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकलली आहे आणि हा अर्थसंकल्प आता २६ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: