महाराष्ट्रातला वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे वळवला

महाराष्ट्रातला वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे वळवला

मुंबईः पुण्यानजीक तळेगाव येथील नियोजित वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातकडे वळवला गेला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाड

इराणींच्या कंपनीचा पत्ता, जीएसटी क्रमांक वादग्रस्त गोवा रेस्टॉरंटचाच
‘सिरीयस’, ‘कॅज्युअल’ आणि जातीची जाणीव
कोर्टाचा आदेश डावलून खलीदला हातकड्या

मुंबईः पुण्यानजीक तळेगाव येथील नियोजित वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातकडे वळवला गेला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडीकडून कंपनीशी सर्व वाटाघाटी झाल्या होत्या. पण मंगळवारी वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी एक ट्विट करत वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये आकारास येईल असे जाहीर केले.

अग्रवाल यांच्या ट्विटनंतर शिवसेनेचे नेते व माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातल्या एकनाथ शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली असून नवे सरकार स्थापन झाल्यानंतर एका महिन्यात असे काय घडले की महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला गेला असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मंगळवारी आदित्य ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राजकीय अस्थिरतेत हा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच कसा असा सवाल केला. या पत्रकार परिषदेत माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही वेदांतचे प्रमुख अग्रवाल यांना हा प्रकल्प महाराष्ट्रात हवा होता असा खुलासा केला.

आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात सोशल मीडियातही सरकारवर टीका करणारा मजकूर लिहिला आहे. ते म्हणतातः

वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो.

तेच पुढे नेत असताना मागच्याच महिन्यात आम्ही पाहिले, या खोके सरकारने आमच्याच कामावर ट्विट पुढे करून जनतेला आश्वासित केले होते की हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येईल. मात्र आज हा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याची बातमी वाचून धक्का बसला.

हा प्रोजेक्ट इतर राज्यात गेला त्याचे दुःख नाही, पण आपल्या राज्यात का आला नाही, याचे आश्चर्य आहे. ज्या प्रोजेक्टवर एवढं काम करून मविआ सरकारने एवढं पाठबळ देऊनही हा प्रोजेक्ट तिथे जाणे, याचा अर्थ हाच आहे की नवीन गुंतवणुकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही.

खोके सरकार राजकारणात व घराघरात फिरण्यात व्यस्त आहे. प्रशासनावर, कायदा सुव्यवस्थेवर कोणाचाच अंकुश नाही. खोके सरकारला माझी विनंती आहे, पिस्तुल काढणं, धक्काबुक्की करणं, गुंडगिरीची भाषा करणं सोडून द्या आणि अशा मोठ्या इंडस्ट्रीजना राज्यात आणावं जेणेकरून तरुण बेरोजगारांना रोजगार मिळेल.

सुभाष देसाई यांनीही वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले, वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासंदर्भाच्या सर्व वाटाघाटी झाल्या होत्या. दाव्होस परिषदेत अनिल अग्रवाल, आदित्य ठाकरे व आपण यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली होती. या चर्चेनंतर अग्रवाल यांच्या शंकांचे समाधान झाले होते. त्यांनी महाराष्ट्रात हा प्रकल्प उभा राहील अशी ग्वाहीही दिली होती. तीन महिन्यांपूर्वी दिल्लीत फॉक्सकॉनचे अध्यक्ष तैवानवरून आले होते, त्यांच्याशीही चर्चा झाल्या. या चर्चेत प्रकल्पाच्या अटी, सवलती, सुविधा यावर एकमत झाल्यानंतर हा प्रकल्प तळेगावमध्ये येईल यावरही सहमती झाली होती. केवळ कागद व्यवहार बाकी होता. पण महाराष्ट्रात सरकार बदलल्याने व केंद्रातील सरकार समर्थ असल्याने महाराष्ट्रातले अनेक उद्योग बाहेर जाणार असल्याची भीती देसाई यांनी व्यक्त केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0