बिल्कीस बानो प्रकरणातील सर्व ११ आरोपींची सुटका

बिल्कीस बानो प्रकरणातील सर्व ११ आरोपींची सुटका

गोधराः गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेले बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण व तिच्या कुटुंबातील ७ जणांची झालेली हत्या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व ११ आरो

काश्मीरातील पर्यटन व्यवसाय ठप्प
दिल्ली दंगलीत पत्रकारांवर हल्ले
येत्या एप्रिलपासून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला सुरूवात

गोधराः गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेले बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण व तिच्या कुटुंबातील ७ जणांची झालेली हत्या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व ११ आरोपींची सोमवारी तुरुंगातून सुटका झाली. ही सुटका गुजरात सरकारने राज्याच्या माफी धोरणातून दिली आहे.

२१ जानेवारी २००८मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिल्कीस बानोवर झालेला सामूहिक बलात्कार व नंतर तिच्या घरातील ७ जणांची हत्या या प्रकरणात ११ जणांना दोषी ठरवले होते व त्यांना आजन्म तुरुंगवास ठोठावला होता. सीबीआयच्या या निर्णयावर नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते. आता या प्रकरणातील ११ दोषींनी १५ वर्षापेक्षाही अधिक काळ तुरुंगवासात काढला असून त्यांच्यापैकी एकाने आपली सुटका व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

बानो प्रकरणातील ११ दोषींनी आपली सुटका व्हावी अशी मागणी गुजरात उच्च न्यायालयात केली असता न्यायालयाने या दोषींच्या मागणीवर गुजरात सरकारने विचार करावा असे निर्देश दिले. त्यानंतर गुजरात सरकारने या संदर्भात एक समिती नेमली. या समितीचे प्रमुख सुजल मायत्रा हे प्रशासकीय अधिकारी होते. या समितीने सर्वसंमतीने ११ दोषींची सुटका करण्याची शिफारस गुजरात सरकारला पाठवल्यानंतर सोमवारी या सर्वांची सुटका करावी असे आदेश जारी झाले.

हे आरोपी सुटल्यानंतर त्यांचे पेढे वाटून स्वागत केल्याची व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. या व्हीडिओंची सत्यता तपासलेली नाही.

हे प्रकरण नेमके काय आहे?

२७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यांना आग लागून ५९ कारसेवक मरण पावले होते. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल पसरली होती. सुमारे महिनाभर चाललेल्या दंगलीत २ हजाराहून अधिक मुस्लिम मारले गेले होते. या दंगलीत जमावापासून लपण्यासाठी पाच महिन्यांची गर्भवती असलेली बिल्कीस बानो आपली मुलगी व १५ सदस्य असलेल्या कुटुंबासह दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यात गेली असता २०-३० संख्येच्या जमावाने त्यांच्या कुटुंबाला रोखले. आणि बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार केला व नंतर जमावाने बानोच्या मुलीसह कुटुंबातील ७ जणांना ठार मारले.

या घटनेनंतर २००४मध्ये बिल्कीस बानोने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचे सीबीआय आदेश देत सर्व आरोपींना पकडले. या सर्व आरोपींना २१ जानेवारी २००८मध्ये बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी व तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची हत्या केल्या प्रकरणी दोषी ठरवले गेले व त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

आपल्या निकालपत्रात विशेष सीबीआय न्यायालयाने एका अल्पवयीनने दिलेला जबाब व मृत झालेल्यांच्या फोटोंचाही (मृतांच्या फोटोत चप्पल/बूटही नव्हते) विचार करून बानोवर केलेला बलात्कार व तिच्या कुटुंबियांची केलेली हत्या हा सुनियोजित कट होता असे निरीक्षण दिले. न्यायालयाने बिल्कीस बानोच्या हिमतीलाही दाद दिले. बिल्कीसने सर्व आरोपींना ओळखले होते कारण हेच आरोपी बिल्कीसच्या कुटुंबाकडून दूध खरेदी करणारे होते.

आरोपींनी बिल्कीसवर सामूहिक बलात्कार केला व तिच्या कुटुंबियांनाही मारले होते त्या घटनास्थळापासून केवळ स्कर्ट घातलेल्या बिल्कीसचे संपूर्ण शरीर रक्ताळलेले होते, तशा परिस्थितीत ती मदत मागण्यास निघाली असताना एका आदिवासी महिलेने बिल्कीसला कपडे दिले. त्यानंतर बिल्कीस एका होमगार्डला भेटली व नंतर तिने लिमखेडा येथे तक्रार नोंद केली.

सीबीआय विशेष न्यायालयाने या प्रकरणात काही पोलिसांनाही दोषी ठरवले. हवालदार सोमाभाई गोरी याने आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये कपात करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.

गुजरात पोलिसांनी जुलै २००२पर्यंत कोणताही तपास केला नव्हता. आरोपी सापडत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे होते व ही केसही खोटी असल्याचा त्यांचा दावा होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने गुजरात पोलिसांच्या या वर्तनावर बोट ठेवत हे पोलिस कर्मचाऱी असंवेदनशील व क्रूर असल्याचे म्हटले होते.

विशेष बाब अशी की सीबीआयच्या विशेष न्यायालयानेही ७ आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडले होते. पण २०१८मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सर्व ७ आरोपींना दोषी ठरवले होते.

एप्रिल २०१९मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बिल्कीस बानोला नुकसान भरपाई म्हणून ५० लाख रु., सरकारी नोकरी व घर देण्याचे गुजरात सरकारला आदेश दिले होते.

गुजरात दंगलीत बानोच्या कुटुंबातील अन्य ८ जणही बेपत्ता झाले होते. त्यांचा ठावठिकाणा आजही लागलेला नाही.

सोमवारी ज्या दोषींना सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यांची नावे जसवंतभाई नाई, गोविंदभाई नाई, शैलेष भट्ट, राधेश्याम शाह, बिपिन चंद्र जोशी, केसरभाई वोहानिया, प्रदीप मोरधिया, बाकाभाई वोहानिया, राजूभाई सोनी, मितेश भट्ट  व रमेश चंदाना अशी आहेत.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0