मोदींचा बर्थ डे : गुजरातेत ३७० कलम साजरा करण्याचे शाळांना आदेश

मोदींचा बर्थ डे : गुजरातेत ३७० कलम साजरा करण्याचे शाळांना आदेश

जयपूर : जम्मू व काश्मीर विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्याची घटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या १७ सप्टेंबर रोजी असलेला वाढदिवस असे औच

मुंबईत ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द
जॉर्ज फर्नांडिस आणि काश्मीर
भारत सरकारची व्हॉट्सॅपकडे सविस्तर उत्तराची मागणी

जयपूर : जम्मू व काश्मीर विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्याची घटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या १७ सप्टेंबर रोजी असलेला वाढदिवस असे औचित्य साधून त्या दिवशी ३७० कलमावर विशेष भाषणे, वादविवाद स्पर्धा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश अहमदाबाद जिल्हा शिक्षण खात्याने आपल्या सर्व शाळांना दिले आहेत.

राज्यघटनेतील ३७० व ३५ अ ही कलमे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गात असलेल्या मुलांसाठी सामाजिक शास्त्राचा अभ्यास असून हा विषय शिकवण्याचाही होऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दिवसभर कलम ३७०वर मुलांच्या वादविवाद स्पर्धा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, गटसमूह चर्चा व मान्यवरांची भाषणे ठेवावीत. त्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडेल, असे परिपत्रक अहमदाबाद जिल्हा शिक्षण खात्याने काढले आहे.

या परिपत्रकात, ३७० कलम रद्द केल्याने भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावल्याचे नमूद केले असून भारतीय संसदेने असा अत्यंत योग्य व जनताभिमुख निर्णय घेतल्याने या निर्णयाचे सर्वथरातून मोठ्या प्रमाणात स्वागत झाल्याचे म्हटले आहे. या परिपत्रकात काश्मीरमधल्या सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख मात्र केलेला नाही.

या निर्णयाबाबत ‘द वायर’शी बोलताना अहमदाबाद जिल्हा शिक्षणाधिकारी राकेश आर. व्यास यांनी, ‘३७० कलम रद्द करण्याचा निर्णय ना राज्य सरकार घेऊ शकते ना महानगरपालिका, हा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकत असल्याने व तो पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतला असल्याने त्यांच्या वाढदिवसाएवढा क्षण मुलांचे शैक्षणिक प्रबोधन करण्यासाठी कोणता असू शकतो?’ अशी प्रतिक्रिया दिली.

३७० कलमाला कायदेशीर आव्हान देण्यात आलेले असून त्याबद्दल न्यायालयीन सुनावण्या होणे बाकी आहे. त्याचबरोबर काश्मीरमधील दैनंदिन जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेले नाही व तेथील जनतेचा मूलभूत लोकशाही अधिकारांवर निर्बंध असल्याचे राकेश व्यास यांच्या, लक्षात आणून दिल्यावर ते म्हणाले, ‘प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांमधून काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आली असे दिसते. काश्मीर प्रश्न वादग्रस्त असला तरी मुलांना वस्तुस्थिती सांगण्यासाठी व त्यांच्या अभ्यासक्रमात सामाजिक शास्त्रांचा अभ्यास असल्याने आम्ही त्यांची तयारी करत आहे.’

३७० कलमाबाबत मुलांना सविस्तर माहिती आम्ही देणार नाही पण आमचे शिक्षक हे कलम संसदेत कसे रद्द केले गेले याची माहिती सकाळच्या असेंब्लीमध्ये ५ ते १० मिनिटांत देण्याचा प्रयत्न करतील, असे व्यास यांनी सांगितले.

मेहसाणा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आर. एच. जुनकिया यांनी ‘द वायर’ला सांगितले की, आम्ही दरवर्षी मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून विविध कार्यक्रम आखत असतो. भाजपचे सदस्य शाळेत येतात व ते आम्हाला कार्यक्रम आयोजित करण्यात मदत करतात. यंदा मोदींचा वाढदिवस ३७० कलम रद्द केल्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आम्ही साजरा करत आहोत.’ अशी प्रतिक्रिया दिली

गुजरात शिक्षण खात्याच्या वेबसाईटनुसार अहमदाबाद जिल्ह्यात १,२४५ प्राथमिक व माध्यमिक शाळा असून त्या शाळांमध्ये सुमारे सव्वा तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर संपूर्ण गुजरात राज्यात ३३ जिल्ह्यांत ११, ९५८ शाळांमध्ये २८ लाखांहून अधिक मुलं शिक्षण घेत आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0