गुरांच्या छावणीत साताऱ्यातील गावांचे स्थलांतर

गुरांच्या छावणीत साताऱ्यातील गावांचे स्थलांतर

गावे कोरडी झालेली असूनही सरकारने अजून कुठलीही मदत पुरविलेली नाही. छावणीसमोरही लोंढ्यांना सांभाळण्याचे आव्हान!

युती ही भाजपा – सेनेची मजबुरी
करोनाच्या लढाईत चमकलेले मुख्यमंत्री
पोलिसांचा कर्णबधिरांवर निष्ठुर लाठीमार

महाराष्ट्रातील गंगोटी हे गाव कोरडे व शुष्क झाले आहे. या परिसरातील शेतांमधील मका, बाजरी व डाळींसारखी पिके सुकून गेली आहेत. गावाजवळील तळ्यामध्ये पाण्याचा थेंबही नाही; विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नळांना पाणी नाही. हे गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये येते. तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी (ब्लॉक डिव्हिजन ऑफिसर/बीडीओ) वर्षाच्या सुरुवातीला आश्वासन दिले होते की दर तीन दिवसांनी गावामध्ये पिण्यायोग्य पाण्यासाठी टँकर मागवला जाईल. परंतु जानेवारीच्या शेवटापर्यंत याबाबत काहीही झाले नाही व गावकऱ्यांना थोड्याशा पाण्यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागतो आहे.

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले होते. यातील बरेच तालुके मराठवाडा व विदर्भातील असले, तरी पश्चिम महाराष्ट्रातील माण तालुक्याचाही या यादीमध्ये समावेश आहे.

या वर्षीचा दुष्काळ अतिशय भीषण असल्याचे वर्तविण्यात आले आहे. गंगोटीचे ७३ वर्षीय रहिवासी रामहरी झिम्मर यांच्या म्हणण्यानुसार, १९७२च्या दुष्काळापेक्षाही वाईट परिस्थिती यावर्षी आहे. “जानेवारी महिना हा कापणीचा असतो. पण यावर्षी आमच्याकडे उत्पादनच झालेले नाही,” ते सांगतात. २०१७ पासून बऱ्याचशा शेतजमिनी पडून आहेत. “काही लोकांनी त्यांच्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यांवर कशीबशी मक्याची पेरणी केली होती. पण पाणी नसल्याने पीक करपून गेले व त्यांचे नुकसान झाले,” झिम्मर यांनी माहिती दिली.

शेवटचा उपाय म्हणून, झिम्मर यांनी त्यांच्या दोन म्हशी व एक गाय गावापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुरांच्या छावणीवर पाठविल्या आहेत. गावातील इतरांनीसुद्धा हेच केले आहे. गंगोटीतील ४००पैकी जवळजवळ सगळ्याच घरांना कुलूप आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रियांच्या आर्थिक सबलीकरणासाठी काम करणाऱ्या ‘माण देशी फाउंडेशन’द्वारे चालविण्यात येणाऱ्या गुरांच्या छावणीत गावातील लोक त्यांच्या गाईंसह स्थलांतरित झाले आहेत.

साताऱ्यातील गंगोटी गावामध्ये रामहरी झिम्मर (लाल कपड्यांमध्ये). या गावातील जवळजवळ सर्व प्रौढ व्यक्ती त्यांच्या गुरांसह चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुरांच्या छावणीमध्ये स्थलांतरीत झाल्या आहेत. फोटो: सुकन्या शांता

साताऱ्यातील गंगोटी गावामध्ये रामहरी झिम्मर (लाल कपड्यांमध्ये). या गावातील जवळजवळ सर्व प्रौढ व्यक्ती त्यांच्या गुरांसह चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुरांच्या छावणीमध्ये स्थलांतरीत झाल्या आहेत. फोटो: सुकन्या शांता

“गावात एक फेरफटका मारला तर दिसेल की सगळ्या घरांना कुलूप आहे. माझ्यासारखी मुठभर अशक्त, म्हातारी माणसे आणि काही शालेय विद्यार्थी मागे शिल्लक आहोत. बाकी सगळी प्रौढ माणसे गुरांच्या छावणीमध्ये राहायला गेली आहेत,” ८० वर्षीय आनंदराव वीरकर म्हणाले. व्यवसायाने शेतकरी असलेल्या वीरकरांकडे चार एकर नापीक जमीन, दोन खिल्लारी बैल व एक जर्सी दुभती गाय आहे. ही गुरांसाठीची छावणी ‘माण देशी फाउंडेशन’ने ‘बजाज फाउंडेशन’ व इतर दोन संस्थांच्या मदतीने जानेवारीमध्ये उभारली आहे. शंभर एकर परिसरामध्ये पसरलेल्या या छावणीमध्ये ७,८००हून जास्त गुरांना आश्रय देण्यात आला आहे व यामध्ये रोज गुरांची भर पडते आहे. ही गुरे व्यवस्थित रांगांमध्ये ठेवण्यात आली आहेत व प्रत्येक रांगेमध्ये ४० ते ५० गुरे आहेत. गोठ्याबरोबरच, ताडपत्रीचे तंबू बनविण्यात आले आहेत, जिथे लोकांनी त्यांच्या परिवारासह आश्रय घेतला आहे. लोक दिवसभर ऊसाचे तुकडे करून गुरांसाठी चारा निर्माण करतात व इतरही अशाच स्वरूपाची कामे करताना दिसतात.

रोज सकाळी व संध्याकाळी खाजगी डेअरी-मालक छावणीजवळ उभारलेल्या दूध संकलन केंद्रामध्ये दूध संकलनासाठी येतात. लोक दुधाच्या छोट्या कॅन घेऊन रांगेत उभी असलेली दिसतात. “सगळे काही नेहमीसारखे सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. गावाप्रमाणेच इथेही दिवसातून दोनदा दूध जमा केले जाते,” हिंगणी गावाहून आलेल्या रेखाबाईंनी सांगितले. हे गाव छावणीपासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. संकलित होणाऱ्या दुधाची संख्या कमी झाली आहे. “ही नवीन जागा आहे. आमच्याप्रमाणेच, गुरांनाही जागेतील बदल जाणवतो. माझ्या चार जर्सी गाई दिवसाला जवळपास २०-२२ लिटर दूध द्यायच्या. आता हे प्रमाण १४ लिटर इतके झाले आहे. पण मला आनंद आहे, की त्या अजूनही माझ्याजवळ आहेत व जिवंत आहेत,” एका गावकऱ्याने द वायरला सांगितले.

सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यातील आणि शेजारच्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एकूण ५८ गावांमधील गुरे या छावणीमध्ये आणण्यात आली आहेत. औरंगाबाद आणि बीड अशा दूरवरच्या जिल्ह्यांमधील शेतकरी आणि ज्यांची फक्त गुरेढोरे आहेत अशांनीही छावणीमध्ये येऊन मदतीची मागणी केली आहे. छावणीच्या व्यवस्थापकांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे साधारण २०,००० गुरांना ठेवण्याची सोय आहे. परंतु ज्या गतीने शेतकरी छावणीमध्ये येत आहेत, छावणी लवकरच भरेल आणि इतरांना सामावून घेण्यासाठी अपुरी पडेल.

वीरकरवाडीच्या शेतकरी शांताबाई वीरकर छावणीमध्ये तीन आठवड्यांपासून राहत आहेत. त्या म्हणाल्या, “आम्ही संकटात आहोत. गुरांना द्यायला चारा, पाणी काहीच आमच्याकडे नाही. सरकार अजूनही मदतीला आलेले नाही.” जानेवारीला सरकारने (एक ‘जीआर’ काढून) दुष्काळग्रस्त भागांमध्ये छावण्या उभारण्याचा निर्धार व्यक्त केला होता. साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल द वायरशी बोलताना म्हणाल्या की “प्रशासन अजूनही दुष्काळग्रस्त भागांचे सर्वेक्षण करीत आहे. कुठल्या भागांना सरकारच्या मदतीची गरज आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. ‘जीआर’ दहा दिवसांपूर्वीच काढण्यात आलेला आहे.”

‘माण देशी फाउंडेशन’च्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा यांनी सांगितले, “एप्रिल व मे महिन्यांमध्ये उन्हाळा तीव्र झाल्यावर आमच्यासमोर खरे आव्हान उभे राहील. येत्या काही महिन्यांमध्ये बरेचसे गावकरी स्थलांतरित होतील, अशी आम्हाला भीती आहे.”

विविध उपाय करूनही, गुरे छावणीत आल्यापासून दुधाचे उत्पादन कमी झाले आहे. फोटो: सुकन्या शांता.

विविध उपाय करूनही, गुरे छावणीत आल्यापासून दुधाचे उत्पादन कमी झाले आहे. फोटो: सुकन्या शांता.

विस्थापनाची समस्या

माण तालुक्यातील १५६ गावे व शेजारील खटाव तालुक्यातील ६० गावे सातारा जिल्हाच्या पूर्व भागामध्ये आहेत. हा भाग सह्याद्री पर्वतरांगेपासून बऱ्याच अंतरावर स्थित आहे व पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये येतो. या कारणाने हा भाग बारमाही दुष्काळप्रवण असतो.  या तालुक्यांमधील एक पंचमांश लोकसंख्या ही भटक्या जमितींची आहे. यामध्ये सर्वात मोठी संख्या धनगर समाजाची आहे. त्यामागोमाग निम्न-भटक्या व विमुक्त जमातींची संख्या आहे. या प्रदेशामध्ये जमिनीची मालकी असणार्‍यांची संख्या कमी आहे. बहुतांशी परिवारांचा उदरनिर्वाह गुरांवर अवलंबून आहे. मेंढीपालक वर्षातील बराच काळ शेजारच्या जिल्ह्यांमध्ये जातात. ज्यांच्याकडे गाई-म्हशी आहेत, तेच केवळ मागे उरतात.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की गेल्या काही वर्षांमध्ये विस्थापनाच्या पद्धतीमध्ये मोठा बदल झाला आहे. “आधी आम्ही मार्चमध्ये होळीनंतर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये राहायला जायचो आणि ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीच्या काळामध्ये परत यायचो. आता तुम्हाला असे दिसेल की मेंढीपालन करणारी कुटुंबे जानेवारीमध्येच जातात व वर्षाच्या शेवटीच परत येतात.” मोतेवाडी गावातील मंगल मोळे यांनी माहिती दिली. मोळे यांच्यानुसार, याचे कारण कमी पाऊस व त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान, हे आहे. मोतेवाडीतील अनेक लोक कर्नाटक हद्दीकडे विस्थापित झाले आहेत तर साधारण ८० कुटुंबे या गुरांच्या छावणीमध्ये राहत आहेत.

गुरांच्या छावणीतील जीवन

गुरांची ही छावणी एका मोठ्या भूखंडावर उभारण्यात आली आहे. व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी, छोटे विभाग किंवा वॉर्ड बनवून त्यांना क्रमांक देण्यात आले आहेत. छावणीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मसईवाडीहून, पंचवीस-वर्षीय सुनीता वीरकर त्यांच्या दोन म्हशींसह येथे आल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा दोन वर्षांचा मुलगा, सहा महिन्यांची मुलगी आणि त्यांच्या सासूबाईसुद्धा आल्या आहेत. सुनीता यांनी सांगितले की, त्यांचा नवरा त्यांच्या १२ मेंढ्या घेऊन गावातील इतर पुरूषांसह बेळगावला स्थलांतरित झाला आहे. सुनिताच्या मुलांसाठी, ताडपत्रीचा एक तुकडा डोक्यावरचं छप्पर आहे. तीच खेळण्याची जागाही आहे. संध्याकाळी तापमान कमी झाल्यावर, सुनिताला मुलांना उब देणे अवघड होऊन बसते. “घरी असताना त्यांच्या खाण्यापिण्याची व तब्येतीची काळजी करावी लागत नसे. गावातील अंगणवाडी त्यांची काळजी घेत असे. इथे आल्यापासून माझ्या मुलीला सारखी सर्दी होते. पण माझ्याकडे पर्याय नाही,” सुनिता यांनी द वायरला सांगितले.

छावणीमध्ये दुधाचे संकलन दिवसातून दोन वेळा होते. फोटो: सुकन्या शांता.

छावणीमध्ये दुधाचे संकलन दिवसातून दोन वेळा होते. फोटो: सुकन्या शांता.

सुनिता यांच्याप्रमाणेच, अनेक स्त्रिया त्यांच्या लहान मुलांसोबत छावणीमध्ये राहायला आल्या आहेत. स्थलांतर आणि दुष्काळ या दोन्हीचा थेट परिणाम लहान मुलांच्या स्वास्थ्यावर व शिक्षणावर झाला आहे. हंगामी स्थलांतर आणि अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीचा गंभीर परिणाम या भागातील शेतकऱ्यांवर, विशेषतः भटक्या पशुचारक जमातींवर आणि खेडूतांवर  झाला आहे. काही गावातील पालकांनी मुलांची शाळा बंद पडू नये यासाठी मुलांना घरातील वृद्धांकडे किंवा शेजाऱ्यांकडे ठेवले आहे. पण ज्यांच्याकडे अशी सोय नव्हती ते मुलांना घेऊन छावणीमध्ये आले आहेत.

“आम्ही काय करू शकतो? मुलांची शाळा बुडू नये असे आम्हालाही वाटते पण गावामध्ये त्यांना खाऊपिऊ घालणारे कोणी नाही,” ललिताबाई झिम्मल यांनी द वायरला सांगितले. ललिताबाईंना सातवी, पाचवी व तिसरीत शिकणारी तीन मुले आहेत. ती त्यांच्या आईबरोबर छावणीमध्ये राहतात व जमेल तेव्हा अधूनमधून शाळेत जातात. “गावामध्ये पाणी नाही. इथे निदान आम्हाला प्यायला पाणी मिळते,” ललिताबाईंच्या सर्वात मोठा मुलगा म्हणाला.

छावणीमध्ये शेतकरी चारा संकलित करताना. फोटो: सचिन मेनकुदळे.

छावणीमध्ये शेतकरी चारा संकलित करताना. फोटो: सचिन मेनकुदळे.

छावणीची व्यवस्था पाहणारे ओमकार म्हणाले की सहा पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील चार टाक्यांमध्ये प्रत्येकी २०,००० लिटर पाणी साठविण्याची तर दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी १०,००० लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. स्थानिक नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. एक जनावरांचे डॉक्टर २४ तास उपलब्ध आहेत.

प्रत्येक गुराला त्याच्या जातीनुसार १५ ते २० किलो चारा दिला जातो. सर्व कुटुंबे सोबत काम करतात, त्यांच्या हिश्श्याचा चारा घेतात व आपापल्या गुरांना खायला घालतात. भानगर्दवाडीहून आलेले आनंदराव नामदास म्हणतात, “चारा पुरत नाही. पण निदान माझ्या दोन गाई जिवंत राहतील हे नक्की.” महिनाभरापूर्वीच, नामदास यांनी परिस्थितीने गांजून त्यांची जर्सी म्हैस गावाच्या जत्रेमध्ये विकली. “माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. परिस्थिती कठीण होत चालली होती. छावणीचा आधार मिळाला नसता तर या गाईसुद्धा मी विकल्या असत्या.” नामदास यांनी सांगितले.

अशीच छावणी २०१२मध्ये उभारण्यात आली होती. पण त्यावेळी हा उपक्रम मार्चमध्ये सुरु झाला होता. “बरीच कुटुंबे १८ ते २० महिने छावणीमध्ये राहिली होती. यावेळी लोक ३ महिने आधीच आली आहेत. एकूण पावसाळ्याची स्थिती बघता, बरीच कुटुंबे यावेळी जास्त काळ छावणीमध्ये राहतील, असा आमचा अंदाज आहे,” छावणीच्या संस्थापक सिन्हा म्हणाल्या.

अनुवाद: प्रवीण लुलेकर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: