‘आजीवली देवराई’चा अपूर्व इतिहास

‘आजीवली देवराई’चा अपूर्व इतिहास

माणसाच्या अमर्याद स्वार्थापासून देवाच्या राईच्या रक्षणाची गोष्ट...

लेह काश्मीरमध्ये दाखवल्याप्रकरणी ट्विटरला नोटिस
टेक सम्राटांच्या साम्राज्यावर अंकुश
डिसायपलमध्ये सद्यस्थितीचे चित्रण – अनीश प्रधान
पुण्याहून दोन तासांच्या अंतरावर, पवना धरणाजवळ असलेल्या आजीवली देवराईत आकाशाला भिडणारे भेरली माड आणि जैवविविधतेचा खजिना आहे. छाया: विवेक काळे

पुण्याहून दोन तासांच्या अंतरावर, पवना धरणाजवळ असलेल्या आजीवली देवराईत आकाशाला भिडणारे भेरली माड आणि जैवविविधतेचा खजिना आहे. छाया: विवेक काळे

राखी रानकोंबड्यांचा एक थवा एका पडित शेतातून घाईघाईने बाहेर आला, थोडा पळत, थोडा जोरात चालत शेजारच्या जंगलात नाहीसा झाला. नुकतीच पहाट सरून दिवस वर येत होता. याच वेळी हे पक्षी जंगलाच्या कडेला चरण्यासाठी येत असल्यामुळे त्यांना पाहण्याची ती आदर्श वेळ होती. मी आणि माझा गाईड, अनिल महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेली, पुण्याहून दोन तासांच्या अंतरावर असलेली – आजीवली देवराई पाहायला चाललो होतो. देवराई म्हणजे साधारणपणे एक छोटे जंगल ज्यातील एकूण एक वृक्षवल्ली ही वनदेवतेच्या मालकीची मानली जाते. देवराईतून कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेण्यास बंदी असते आणि यामुळेच देवराईत वनौषधींच्या खजिन्यासह अनेक दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पती प्रजातीही आढळून येतात.

देवराया या बऱ्याचदा नदी किंवा ओढ्याच्या उगमस्थानी असतात. अनिलनेही यापूर्वी ही देवराई कधी पाहिली नव्हती, परंतु या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आजीवली गावापर्यंत पर्यटकांना घेऊन येत असल्यामुळे त्याला या क्षेत्राची ओळख होती.

पुढच्या ३० मिनिटात आम्ही एक उभा रस्ता ओलांडला, तिथली झाडे तोडून तो नुकताच मोकळा केला गेला असावा. पुढे काही झाडा-झुडूपांतून वाट काढत, एका गाडीवाटेवरून चालत शेवटी, दगडफुलांनी आच्छादलेल्या एका जुन्या दगडी भिंतीसमोर येऊन आम्ही उभे राहिलो. ती सकाळची वेळ होती, वातारणात थंडी असली तरी सभोवतालच्या मनमोहक सौंदर्याकडे पाहिल्यावर ती अजिबात जाणवत नव्हती – तो पश्चिम घाटाचा वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश होता, दुय्यम तसेच अबाधित जंगलांनी वेढलेली छोटी-छोटी शेते सर्वत्र दिसत होती. तांदळाचे पीक काही दिवसांपूर्वी काढून झाले होते आणि आता शेतात पीकाचे अवशेष जाळल्याने राब (खत म्हणून वापरली जाणारी राख) पसरलेली होती.

जवळच एक काटेसावराचे झाड (हिंदीत सेमल) आपला वार्षिक पुष्पसंभार धारण करत होते. झाड माथ्यांवर सूर्यप्रकाश पसरत होता आणि पक्ष्यांची लगबग सुरू झाली होती. राखी कोतवाल आणि राघू न्याहारीला कीटक पकडण्यासाठी उड्डाणे भरत होती. एक कापशी घार ऊन खात बसली होती. संतुलन साधण्यासाठी शेपटी वर करून बसल्यामुळे ती मोठी मजेशीर दिसत होती.

आणखी पक्षी पाहत, त्यांचे आवाज ऐकत शेते संपून जंगल दाट होईपर्यंत आम्ही चालत राहिलो. आता देवराई सुरू झाली होती. लवकरच आम्ही चारचाकी सहज चालू शकेल अशा एका खडबडीत रस्त्यावर आलो, सुदैव एवढेच की तेथे ती नव्हती. उताराच्या वरच्या टोकाला, पर्वत रांगेच्या माथ्यापर्यंत जाणाऱ्या एका उंच कड्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि सभोवती नजर टाकली. अतिउंच अशा भेरली माडांनी (Caryota urens) आम्हाला वेढा घातला होता. भेरली माड मी या आधीही पाहिले होते, मुख्यत्त्वे शहरांत, परंतु येथे त्यांची उंची काहीतरीच होती. माडांच्या तळाशी तुरळक झाडेझुडुपे होती, केवळ काही काष्ठ लता होत्या ज्या, त्या ज्या झाडांवर होत्या त्यांच्यापेक्षा जुन्या वाटत होत्या!

ही देवराई माडीचा स्त्रोत असलेल्या भेरली माडांसाठी ओळखली जाते. माडाच्या फुलोऱ्याच्या अर्क आंबवून त्यापासून माडी तयार करतात. यासाठी फुलोऱ्याजवळ एक खाच पाडली जाते. जी पाडण्यासाठीही खास कौशल्य लागते. त्या खाचेतून निघणारा रस हा माडाच्या फांद्यांना बांधलेल्या मातीच्या भांड्यात जमा केला जातो.

जमिनीपासून जवळपास शंभर फूट उंचावर आलेल्या माडाच्या फुलोऱ्यापर्यंत पोहोचायला बांबूच्या काठ्या वेलींनी बांधून शिडी तयार केली जाते. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य या जंगलातूनच मिळते. फुलोऱ्याचा अर्क गोळा करण्याची प्रक्रिया दिवसातून दोन घडते, एकदा सकाळी लवकर आणि दुसऱ्यांदा चार वाजेच्या आसपास. यानंतर थोडा आंबलेला अर्क व्यापाऱ्यांना विकला जातो.

आम्ही एक वळण घेतले आणि उभ्या कड्यातून बाहेर आलेल्या एका भल्या मोठ्या, सिमेंटच्या इमारतीजवळ येउन पोहोचलो. येथे आम्हाला फुल बाह्यांचा शर्ट, सफेद पायजमा आणि नेहरू टोपी घातलेले एक मध्यमवयीन गृहस्थ भेटले. त्यांच्या हातात पूजेसाठी वापरतात तसे पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे होते. आम्ही एकमेकांना नमस्कार केला, बूट काढले आणि पायऱ्या चढून एका गुहेसारख्या खोलीत गेलो. हे वनदेवीचे मंदिर होते. गोलाकार दगडावर डोळे म्हणून जवळपास सारख्या आकाराच्या दोन खाचा असे वनदेवीचे रूप होते.

वाघजाई या आजीवलीच्या वनदेवीचे मंदिर एका नैसर्गिक गुहेत आहे. परंतु मागील काही वर्षांपूर्वी येथे सिमेंटचे मोठे मंदिर बांधण्यात आले. छाया: विवेक काळे

वाघजाई या आजीवलीच्या वनदेवीचे मंदिर एका नैसर्गिक गुहेत आहे. परंतु मागील काही वर्षांपूर्वी येथे सिमेंटचे मोठे मंदिर बांधण्यात आले. छाया: विवेक काळे

मागील काही वर्षांत देवीच्या शरीरावर शेंदुराचे अनेक पुट लिंपले गेले होते, परंतु पूर्वी तिच्या मूळ दगडी अंगावर शेवाळ उगवत असेल याची मला खात्री होती. या देवळातच आम्हाला दुसरा एक गावकरी भेटला. मागील तीन वर्षांपासून कोर्ट केसमुळे हा भाग प्रतिबंधित होता, त्यामुळे देवीकडे दुर्लक्ष झाले आणि काही समाज कंटकांनी या जागेचा ताबा घेतला असे त्याने आम्हाला सांगितले.

आजीवली देवराईचे हृदयस्थान म्हणेज माडी. या माडांची माडी उतरवण्यासाठी खूप पूर्वीपासून लिलावाची पद्धत आहे. साधारणपणे एका वेळी ४० माडाच्या झाडांना फुलोरा येतो आणि त्यातून माडी काढता येते. काही दशकांपूर्वी या ३९-एकरावर पसरलेल्या देवराईतील माडांचा लिलाव फक्त ८०० रुपयात झाला होता. लवकरच ही रक्कम १८,००० रुपयांवर गेली आणि मागील काही वर्षांपूर्वी ती १८ लाखा रु.वर पोहोचली. हा पैसा गावाच्या विकासासाठी वापरला गेला.

या जंगलात इतरही दुर्लभ वनस्पती आहेत जसे गुलाबी दांडे अमरी किंवा वसंत अमरी (Dendrobium barbatulum), हिलाच इंग्रजीत तिच्या खालच्या पाकळीवर येणाऱ्या केसासारख्या वाढीमुळे बिअर्डेड लीप ऑर्किड असेही म्हणतात. छाया: पियुष सेखसरीया

या जंगलात इतरही दुर्लभ वनस्पती आहेत जसे गुलाबी दांडे अमरी किंवा वसंत अमरी (Dendrobium barbatulum), हिलाच इंग्रजीत तिच्या खालच्या पाकळीवर येणाऱ्या केसासारख्या वाढीमुळे बिअर्डेड लीप ऑर्किड असेही म्हणतात. छाया: पियुष सेखसरीया

माडीच्या विक्रीवरील करांसंबंधीची केस कोर्टात दाखल करण्यात आली होती आणि त्यामुळे लिलावावर स्थगिती आली होती. देवळातली माणसे यामुळे व्यथित होती, त्यांच्या मते गावातली अंतर्गत बाब उगाचच कोर्टात नेली गेली. कोर्ट केसचा निकाल लागला की नाही हे मला समजू शकले नाही, परंतु तीन वर्षांच्या खंडानंतर, २०१९ साली पुन्हा लिलाव झाला. यावेळी माडाच्या झाडांनी १३ लाख रुपये मिळवून दिले आणि गावकऱ्यांना पुन्हा मंदिरात प्रवेशही मिळाला.

माडीचा हंगाम दरवर्षी पावसाळा संपल्यावर साधारण ऑक्टोबर दरम्यान येतो. या काळात माडी उतरवणारे माडाच्या झाडांमध्ये मोठ-मोठे तंबू लावतात आणि हंगाम संपेपर्यत तेथेच राहतात. आम्ही परतत असतांना आम्हाला एक स्थानिक माडी ठेकेदार भेटला. त्याने आम्हाला गप्पा मारायला बोलावले. त्याच्यासोबत अर्ध्या विजारी घातलेले आणि कमरेला कोयता लटकवलेले, माडी उतरवणारेही होते. ते सुधागड पालीहून आले होते. “या भूतलावर त्यांच्यासारखी माडी कोणीच काढू शकत नसल्याचे” मला सांगण्यात आले.

आजीवलीत भेरली माडांची अनेक झाडे असली तरी माडी उतरवण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यामुळे मर्यादित प्रमाणातच माडी काढता येते. छाया: पियुष सेखसरीया

आजीवलीत भेरली माडांची अनेक झाडे असली तरी माडी उतरवण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यामुळे मर्यादित प्रमाणातच माडी काढता येते.
छाया: पियुष सेखसरीया

सर्व प्रकारच्या वन्य गोष्टीमधील माझ्या रुचीविषयी मी जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा त्यांच्यातल्या एकाने मला माडी गोळा करण्यासाठी वापरले जाणारे मातीचे भांडे दाखवले. माडी काढण्याच्या व्यवसायाचे रुपांतर आता ओल्या पार्ट्यात झाले असल्याचेही मला कळले. या पार्ट्यांत शेजारच्या गाव-शहरांबरोबरच पुण्यासारख्या लांबच्या ठिकाणाहूनही पुरुष मंडळी येतात. अशावेळी जंगलात मोठ्याप्रमाणावर स्वयंपाकही केला जातो आणि त्यासाठी देवराईतीलच लाकूड वापरले जाते.

परंतु हा ठेकेदार आल्यापासून आधीचे नियम पुन्हा लागू करण्यात आले होते. देवराईत शिकार करायला, झाडे तोडायला बंदी घालण्यात आली होती. लोकांना माडी घेण्यासाठी जंगलात येण्याची परवानगी होती, परंतु तेथे पिण्याची परवानगी नव्हती. याला केवळ काही जवळचे लोक अपवाद होते, जे एक ग्लासभर माडी पिऊ शकत होते, त्यापेक्षा जास्त पिण्याची परवानगी मात्र त्यांनाही नव्हती. प्रत्येकाला स्वतःची माडी खाली गावात नेऊन मगच पिता येत होती.

आपण जेथे आहोत ती सह्याद्री पर्वतरांग जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या आठ ठिकाणांपैकी एक असून जगात इतरत्र कुठेही न सापडणाऱ्या अनेक प्रजाती येथे असल्याचे जेव्हा मी त्यांना सांगितले तेव्हा मंडळीला खूप आनंद झाला. आधी येथे बऱ्याच देवराया होत्या पण आता सगळ्या नामशेष झाल्याचे ते म्हणाले. “काही दशकांपूर्वी लाकडी कोळशाचा व्यापार प्रचंड जोरात होता.” त्यांच्यातला एक जण सांगत होता, “गावकरी लिलावाद्वारे आपल्या देवराया कोळसा ठेकेदारांना विकत असत. हे लोक येत, झाडे कापत आणि कोळसा करण्यासाठी त्यांना जाळून टाकत.”

नुकत्याच तयार करण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यामुळे या देवराईपर्यंत वाहनाने जाता येते परंतु आपले वाहन पायथ्याशी असलेल्या गावातच लावून डोंगर चढून वर जाणेच चांगले. चालतांना परिसरातील सौंदर्य तर न्याहाळता येतेच त्याचबरोबर तेथील पर्यावरणाचे नुकसानही टाळता येते. छाया: विवेक काळे.

नुकत्याच तयार करण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यामुळे या देवराईपर्यंत वाहनाने जाता येते परंतु आपले वाहन पायथ्याशी असलेल्या गावातच लावून डोंगर चढून वर जाणेच चांगले. चालतांना परिसरातील सौंदर्य तर न्याहाळता येतेच त्याचबरोबर तेथील पर्यावरणाचे नुकसानही टाळता येते. छाया: विवेक काळे.

आजीवलीपासून जवळच असलेल्या तळेगाव देवराईत आधी जीवन ओसंडून वाहत होते, परंतु आता तेथे फक्त ओसाड जमीन उरल्याचे एक जण म्हणाला. “आम्ही, आजीवलीच्या गावकऱ्यांनी, सुद्धा आपली देवराई कोळसा ठेकेदारांना विकली होती,” तो पुढे बोलत होता आणि माझ्यासकट ठेकेदार, माडी उतरवणारे आणि गावकरी सगळे तल्लीन होऊन ऐकत होते. “ही बातमी कशीतरी आमच्या गावातील शाळेचे शिक्षक, थोरवे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी आजीवली देवराईबाबत असे घडू देण्यास नकार दिला. ते साधे गावच्या शाळेतील शिक्षक होते, पण त्यांनी एकट्याने हे जंगल वाचवले.”

त्याची गोष्ट संपत असतांनाच माडी उतरवणारा एक जण सकाळची खेप घेऊन आला आणि आमची गप्पांची तंद्री तुटली. आम्ही निघायच्या तयारीत असतांना ठेकेदाराने आम्हाला एक पेला घ्यायचा आग्रह केला. “ही ताजी आहे, आम्ही यात काहीही मिसळत नाही.” तो म्हाणाला. “तुम्ही आमच्यातीलच एक आहात, आमच्यासोबत एक पेला घेतला पाहिजे.” म्हणून मग त्या ताज्या, थोड्याश्या उग्र वासाच्या आणि गोडसर चवीच्या माडीचा एक पेला आम्ही शांतपणे बसून घेतला.  आणि आजीवलीचे सौंदर्य मनात साठवत परतीच्या वाटेला लागलो.

हा लेख प्रथम RoundGlass Sustain या भारतातील जैवविविधता आणि संवर्धनाला वाहिलेल्या संकेतस्थळावर इंग्रजीतून प्रकाशित झाला आहे. 

पीयूष सेखसरीया, हे सामाजिक विकास क्षेत्रात कार्यरत आहेत.

अनुवाद: परीक्षित सूर्यवंशी

(लेखाचे छायाचित्र – सह्याद्री हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटाचा उत्तरी भाग आहे. कृष्णा आणि गोदावरीसारख्या महत्त्वाच्या पठारी नद्यांचा उगम येथूनच होतो. छायाचित्र : विवेक काळे)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0