हनुमान, भोंगा आणि महाभारत

हनुमान, भोंगा आणि महाभारत

रामायण आणि महाभारताशिवाय आताच्या राजकारण्यांचे पान हलत नाही. मात्र संदर्भहिन टिप्पणी, दिशाहिन वक्तव्ये करून आपण ज्याचा अभिमान बाळगतो किंवा जे आपल्याला ललामभूत आहे, अशा पुराणग्रंथांची आपणच नालस्ती करीत असतो, याचे भानही ही मंडळी राखत नाही. पुराणग्रंथांचा योग्य अर्थ लावणे, हीतर त्याहून दूरची गोष्ट. सध्या मशिदीवरील भोंग्यांचे निमित्त करून हनुमान चालिसा, शिखंडी, धृतराष्ट्र असे बरेच काही आपापल्या आकलनानुसार जतनेच्या मनावर ठसवण्याची स्पर्धा लागली आहे. या पार्श्वभूमीवर आकलनातील गोंधळ दूर करणारे हे विवेचन...

राष्ट्रवादीची अनिल देशमुख यांना क्लीनचिट
ट्रम्प यांची २० पावले, घडला इतिहास
म्यानमारः लष्करशाहीचा थयथयाट

मशिदींवरचे भोंगे  पुन्हा एकदा राजकारण्यांच्या हातातले शस्त्र बनले आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत आणि हुबेहूब त्याच देहबोलीत मनसे नेते राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे हटवण्याची अंतिम तारीखही सांगून टाकली. ३मे २०२२ हा तो दिवस. अक्षय्य तृतिया, परशुराम जयंती आणि रमजान ईद असा हा जणू त्रिवेणी संगम! हे भोंगे न उतरवल्यास मशिदींसमोर महाभोंगे लावून हनुमान चालिसा पठण केली  जाईल, अशी  घणाघाती घोषणा त्यांनी केली. झाले!

मशिदींवरून दिली जाणारी बांग फार जोरात वाजते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. म्हणून आम्ही “हनुमान चालिसा” त्याहूनही मोठ्या

आवाजात लावून अधिक ध्वनिप्रदूषण करणार अशी ही चढाओढ आहे.

मुळात, संपूर्ण देशात भोंग्यांसंबंधी सर्वोच्य न्यायालयाचा नेमका निर्णय काय आहे? तर असे भोंगे लावणे हा घटनेने बहाल केलेला मूलभूत अधिकार नाही, रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत हे ध्वनिप्रदूषण होता कामा नये, धार्मिक प्रार्थना स्थळातून एका मर्यादेपर्यंतच या ध्वनिवर्धकातून आवाज नियंत्रित केला जावा इत्यादी गोष्टी त्या नियमांचा भाग आहेत. हे ध्वनिवर्धक लावण्यासाठी पूर्व संमतीची गरज आहे असेही बंधन आहे. इतके करूनही जर या मर्यादांचे उल्लंघन होत असेल किंवा कायदे तोडले जात असतील तर प्रशासन जबाबदार आहे. रस्त्यावर येऊन रहदारी अडवून नमाज पडणे जसे चूक तसेच रस्त्यांवर मंडप बांधून वाहतूकीस अडथळे आणणेही चूकच. हा साधा विवेकाचा मुद्दा आहे. धार्मिक रंग भरून चिखलफेक करणे हे कुणालाही भूषणावह नाही. 

राजकारण चालिसा

हनुमान जयंती ही मुख्यतः मारुती मंदिरांपुरती मर्यादित असायची. महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामींच्या” भीमरुपी महारुद्रा”चे पठण किंवा मारुतीची ‘सत्राणे उड्डाणे..” ही आरती म्हणण्याची परंपरा आहे. “हनुमान चालिसा” हे १६व्या शतकातील गोस्वामी तुलसीदास रचित अवधी बोलीतील (हिंदी भाषिक राज्यात) हनुमान स्तोत्र आहे. मनसे नेते राज ठाकरेंनी “भीमरूपी” ऐवजी हनुमान चालिसाचे आयोजन हे भक्तीभावातून केले की भारतीय राजकारणातील एक खेळी म्हणून? पुण्यातील कार्यक्रमात त्यांनी “भगवी” शाल परिधान करुन हनुमान चालिसा श्रवण केले. (तोंड पाठ म्हणणारे अत्य अत्य अल्प) पाच जूनला उत्तरेकडे झेप घेणार असे जाहीरही केले आहे. हनुमान जयंती मिरवणुकीत चिपळ्या, झांज टाळ, मृदंगाऐवजी, लाठ्या, तलवारी, बंदूक वापरणारे शस्त्राधारी जहांगीरपुरीत थैमान घालताना जगाने पाहिले. जहांगीरपुरीचे कुरुक्षेत्रच झाले. त्यानंतर बुलडोझर हे प्रशासनाचे लक्ष्यवेधी प्रतीक बनले. त्यानंतर महाभारताचा उल्लेख सुरू झाला.

काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी बाळासाहेबांना “भीष्म” संबोधले होते. भीष्मांनी युवराजपदी असताना राज्यत्याग आणि पाठोपाठ ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली होती. तीही ऐन तारुण्यात! कुणीही प्रभावी व्यक्ती वयोवृद्ध झाली की त्या व्यक्तीला ‘भीष्म पितामह’ ही उपाधी देण्याचा मोह तरुण नेत्यांना आवरत नाही. अयोध्या रथ यात्रेनंतर लालकृष्ण अडवानींनाही भीष्म पितामह बनवले होते. अशा उपाध्या देणारे आपले महाभारतासंबंधीचे अज्ञान प्रकट करीत असतात. भीष्म हा हस्तिनापूरच्या राजघराण्यात जन्मलेला राजपुत्र होता. जन्हुसुता देवकन्या गंगेने शंतनूशी विवाह केला होता. गंगेचा तो आठवा पुत्र होता. वसिष्ठ, बृहस्पती, शुक्राचार्य, परशुराम इ. गुरुंचा तो शिष्योत्तम होता. असा सर्व विद्यासंपन्न पुत्र गंगेने शंतनुच्या हाती सोपवून स्वतः स्वर्गात निघून गेली होती. महाभारताच्या युद्धात ते कौरवांचे पहिले सेनापती होते. परंतु ते ‘राजभृत्य’ म्हणजे जन्मांध राजा धृतराष्ट्राचे सेवक होते. (अर्थस्य पुरुषो दास:) 

जहांगीरपुरीचे महाभारत

महाभारत ही एका राज्यकर्त्या कुटुंबातील सत्तासंघर्षाची कथा किंवा महाकाव्यरुपी इतिहास आहे. कुटुंब कलह नको म्हणून भीष्म पितामहांनी हस्तिनापूरचे विभाजन केले. इंद्रप्रस्थ पांडवांना दिले.

भारतीय समाज जीवनात एखादा तीव्र संघर्ष सुरू झाला की महाभारतातील प्रसंग व अनेक व्यक्तींचे संदर्भ दिले जातात. दिल्लीच्या जहांगीरपुरीत प्रशासनाच्या बुलडोझरने अनेक घरे दुकाने उध्वस्त झाली. त्यानंतर महाभारत असा उल्लेख केला तो एका मौलाना तौकीर रझा खान नावाच्या (इत्तेहाद इ-मिल्लत कौन्सिल अध्यक्ष)व्यक्तीने. त्यांनी एका दमात महाभारत, अंध धृतराष्ट्र आणि पंतप्रधान मोदींचे नाव घेतले. रमझाननंतर जेलभरो आंदोलन सुरू होईल असा कार्यक्रमही जाहीर केला. पंतप्रधान मोदी हे कौरव पक्षाचे आहेत, हेच त्यांनी सूचित केले. नंतर थोडी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले त्या मुहुर्तावर दिल्लीच्या भाजप कार्यालयात “राजसूय” यज्ञाचे आयोजन झाले होते. महाभारतात युधिष्ठिर धर्मराजाने असा राजसूय संपन्न केला होता. म्हणजे नरेंद्र मोदी हे धर्मराजा आहेत, हेच भाजपाने शिक्कामोर्तब केले होते. मौलवींनी बुलडोझर चालवणारे राज्यकर्ते अंध धृतराष्ट्र आहेत असेच सुचवले आहे.

दिल्लीत एक तर, महाराष्ट्रात वेगळेच महाभारत घडत होते. श्रीकृष्ण पत्नी रुक्मिणी ही विदर्भातील अमरावतीची. अमरावतीच्या राणा दांपत्याने या युद्धात एकदम उडी मारली. पती रवी हे आमदार, तर पत्नी नवनीत राणा या खासदार. राज ठाकरेंच्या हनुमान चालिसाचा भोंगा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. महाराष्ट्र राज्य संकटात सापडले आहे. त्यावरचा एकमेव उपाय त्यांना सापडला असा त्या दांपत्याला साक्षात्कार झाला. महाराष्ट्राला महाविकास आघाडी सरकाररूपी साडेसाती सुरू आहे. तिचे निवारण व्हावे म्हणून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्री समोर जाऊन संकटमोचन हनुमानाचे स्तोत्र (हनुमान चालिसा) पठण करण्याची घोषणा केली. राणा विरुद्ध सेना असे महाभारत रंगले. खासदार संजय राऊत यांनी या महाभारतात उडी घेतली. त्यांनी राणा दांपत्याला भाजपाचे “शिखंडी” संबोधून परत आपले अज्ञान प्रकट केले. 

महारथी शिखंडी

शिखंडी कुणी भ्याड वा तृतीयपंथी नव्हता. द्रुपदाला प्राप्त झालेले ते कन्यारत्न होते. द्रुपदपत्नीने आपल्याला पुत्र झाल्याचे खोटे सांगितले. शिखंडिनी असूनही ती कन्या पुत्र म्हणून वाढवली गेली. गुरुद्रोणाकडे या कन्येने राजपुत्रांसमवेत धनुर्विद्येचे शिक्षण घेतले. अद्भूत कथेप्रमाणे शिखंडिनीला यक्षाकडून आपले संपूर्ण पौरुषत्व मिळाले. शिखंडी कुणी पुचाट किंवा पळपुटा योद्धा नव्हता. तो भगवद्गीतेतला महारथी आहे. (काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महाराथः| धृष्टद्द्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः || भ. गीता पहिला अध्याय, श्लोक १७).

भीष्माने स्त्री किंवा स्त्री म्हणून जन्मलेल्या व्यक्तीसमोर हाती शस्त्र घेणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. शिखंडीला पुढे करून भीष्म पतन घडवले गेले. पुढून शिखंडी, शिखंडीच्या मागून गांडीवधारी अर्जुन असे दोघेही शरसंधान करीत होते. भीष्माने समोर ठाकलेल्या शिखंडीचे शरसंधान सहन केले, शिखंडीचा प्रतिकार केला नाही. म्हणून भीष्मपतन शक्य झाले. असो.

मुद्दा असा की संजय राऊतांना शिखंडी हा “महारथी” होता हे माहीत असते तर त्यांनी राणा दांपत्याला शिखंडी म्हटले नसते. अजाणता त्यांनी भाजपला पार्थ धनुर्धर ठरवले आहे. राणा दांपत्याने केलेला अट्टाहास ही हनुमान भक्ती नव्हती. सवंग ढोंग किंवा नौटंकीच होती. भाजप प्रवेश लांबू नये म्हणून केलेला फार्स असावा. महाराष्ट्रात अराजक निर्माण झाल्याने राणा दांपत्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महाराष्ट्र वाचवा असा धावा केला आहे. आपल्यापाठी मागे कोण आहे हे त्यांनी स्पष्टच केलेले आहे.

धर्मराजाचे प्रायश्चित्त

संसदेतील भाजपचे प्रचंड बहुमत व अनेक राज्यातली सत्ता ही नरेंद्र मोदींमुळेच आहे हे भाजपचे सर्व आमदार, खासदार, कार्यकर्ते जाणून आहेत. काही वर्षांपूर्वी उत्साही भाजप राज्यप्रमुखांनी योगेश्वर श्रीकृष्ण व पार्थ धनुर्धराचे रथावर आरूढ असलेली पोस्टर्स छापली होती. कुणी स्वतःला कृष्ण तर मोदींना अर्जुनाच्या रुपात दाखवले होते. एकाने स्वतःला धनुर्धारी तर नरेंद्र मोदींच्या हाती लगाम दिले होते. आता पंतप्रधान मोदींना विश्वगुरु किताब बहाल केल्यामुळे ते अवतारी पुरुषच झाल्याचे अनेकांचे मत झाले आहे. महाभारत युद्ध समाप्तीनंतर धर्मराजाने बंधु कर्णाच्या हत्येस स्वतःला जबाबदार धरून राज्यत्याग करून हिमालयात तपश्चर्या करायला जातो म्हणून आग्रह धरला होता. (नरेंद्र मोदींनीही वेळ आल्यास झोळी घेऊन हिमालयात जाईन असे वक्तव्य केले होते.) कृष्ण व्यास नारद आदींनी भीष्मांकडून सर्वज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी युधिष्ठिराचे मन वळवले. त्यातून धर्मराजाला राजधर्माची शिकवण भीष्मांकडून मिळाली. “राजाने गर्भवती स्त्रीचा आदर्श मानायला हवा. गर्भाच्या भल्यासाठी स्वत:च्या‌ इच्छा आकांक्षा दूर ठेऊन गर्भाचे हितच जपायचे असते. गर्भ म्हणजेच प्रजा.” आजच्या भाषेतली जनता!

महाभारत युद्धात श्रीकृष्ण सारथ्य करीत असलेला अर्जुनाचा दिव्यरथ त्याला साक्षात अग्नीने खांडव वन दहनावेळी दिला होता. वरुणाचे गांडीव धनुष्यही अर्जुनाला त्याचवेळी प्राप्त झाले होते. पांडवांच्या १२ वर्ष वनवास काळात गंधर्वराजा चित्रसेनाचा पराभव करून अर्जुनाने दुर्योधनाला सोडवले होते. (वयं पंचाधिकं शतम्)) पराभूत चित्रसेनाला धर्मराजासमोर अर्जुनाने हजर केले. धर्मराजाने गंधर्वराजाला मुक्त केले. अर्जुनाच्या पराक्रमाने प्रभावित झालेल्या गंधर्वराजा चित्रसेनाने अर्जुनाला त्याचे चार अश्व दिले. शैब्य पोपटी, सुग्रीव सोनेरी, मेघपुष्प किंवा मेघपुरुष रुपेरी (किंवा काळा) आणि चौथा बलाहक पांढराशुभ्र. अशा या अर्जुनाच्या दिव्य रथाचा ध्वजही कपि (वानर रुपी हनुमान) चिन्हांकित होता. म्हणून तो कपिध्वज. श्रीकृष्णाला श्रीरामाचा अवतार मानल्यानंतर हनुमान सेवकही येणारच. कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य पत्करले आणि हनुमान रथावर आरुढ झाला. युद्ध काळात तो भुभु:कारही करीत असे. युद्ध समाप्तीनंतर अर्जुनाला रथातून प्रथम खाली उतरायची आज्ञा दिली. श्रीकृष्ण स्वतः त्यानंतर उतरला. अखेरीस हनुमान खाली येताच तो दिव्य रथ क्षणार्धात पेटला. अग्नीने दिलेला रथ अग्नीनेच भक्षण केला. अर्जुनाने आश्चर्याने कृष्णाकडे पाहिले. “पार्था, या हनुमानाने अनेक दिव्यास्त्रांचे निवारण केले होते. तसेच तुझे चारही घोडे, तुझे गांडीव कधी भंग पावले नाही. तुझा रथ-ध्वजही कुणी कापू शकला नाही. याचे श्रेय त्या महाबळी प्रभंजन हनुमानाचे आहे.”

म्हणून त्याची स्तोत्रे आजही लोक मुखोद्गत करतात. परंतु, हनुमानाच्या नावाने आज चाललेले राजकारण हे अत्यंत घृणास्पद आहे, हे वेगळे सांगायला नको.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींना अटलबिहारींनी महाभारतातील राजधर्माची आठवण करून दिली होती. एकेकाळच्या भीष्माचार्य अडवानींनी तर पंतप्रधान पद हुकल्यापासून मौनच स्वीकारलेले आहे. ही जबाबदारी आता भारतीय जनतेलाच पार पाडायची आहे.

राजा पटवर्धन यांनी ‘पुनर्शोध महाभारताचा’ हे पुस्तक लिहिले आहे.

(१ मे २०२२ च्या ‘मुक्तसंवाद’ या अंकातून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0