देशभरात आक्रोश : जंतर मंतरवर निदर्शने

देशभरात आक्रोश : जंतर मंतरवर निदर्शने

नवी दिल्लीः उ. प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात योगी आदित्यनाथ सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलचा निषेध करण्यासाठी व मृत तरुणीच्या कुटुंबियांना

काश्मीरमधील परिस्थिती : अमित शहांच्या गृहमंत्रालयाकडे माहिती नाही
मुंबई : मरणाच्या दारात उभे असलेले शहर
चन्नी हेच पंजाब मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

नवी दिल्लीः उ. प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात योगी आदित्यनाथ सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलचा निषेध करण्यासाठी व मृत तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. यात अनेक सिविल सोसायट्या, महिला चळवळीच्या कार्यकर्त्या, विद्यार्थी, राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. हाथरस प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.

वास्तविक हाथरस प्रकरणात आंदोलनासाठी इंडिया गेटचा परिसर निवडण्यात आला होता. पण पोलिसांनी सकाळीच तेथे १४४ जमावबंदी कलम लावल्याने सर्व रस्ते बंद होते. त्यामुळे आंदोलकांनी जंतर मंतरवर जमण्याचा निर्णय घेतला.

या निदर्शनांमध्ये संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर झाले. त्यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. दोषींना इतकी कडक शिक्षा द्यावी की अशा घटनांना कायमचा पायबंद बसेल. अत्यंत दुःख व वेदना देणारी ही घटना असून आमच्या मुलीच्या आत्म्याला परमेश्वराने शांती द्यावी अशी प्रार्थना त्यांनी केली. योगी सरकारने दोषींना कडक शिक्षा द्यावी, अशी मी हात जोडून विनंती करतो व त्यांना फाशी द्यावी, या घटनेचे राजकारण करता कामा नये, असे केजरीवाल म्हणाले.

या आधी गुरुवारी भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी इंडिया गेटवर योगी सरकारच्या विरोधात निदर्शने करणार असल्याचा इशारा दिला होता. पण पोलिसांनी या परिसरात जमावबंदी पुकारल्याने आझाद आपल्या कार्यकर्त्यांसह जंतर मंतरवर पोहचले.

 प्रियंका गांधी यांची वाल्मिकी मंदिरास भेट   

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी सकाळी वाल्मिकी मंदिरास जाऊन तेथे आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत हजेरी लावली. हाथरस बलात्कार प्रकरणातील दुर्दैवी तरुणीच्या कुटुंबियांना अद्याप उ. प्रदेश सरकारकडून मदत मिळालेली नाही. हे कुटुंब अत्यंत एकाकी पडले आहे. आम्ही राजकीय दबाव आणण्याचा सरकारवर प्रयत्न करू. आमच्या बहिणीला न्याय मिळालेला नाही, आम्ही तिला न्याय देण्याचा प्रयत्न करू. तिला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी उ. प्रदेश सरकारला दिला.

भाजप व सरकारची प्रतिमा डागाळली – उमा भारती

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरण उ. प्रदेश सरकारने ज्या पद्धतीने हाताळले त्यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एका ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, आज मी कोरोना पॉझिटिव्ह नसते तर पीडित मृत तरुणीच्या कुटुंबियांसोबत आपण तेथे ठाण मांडून बसलो असतो. आपण राम मंदिराचा शिलान्यास केला आहे, राम राज्याचे आश्वासन आपण जनतेला दिले आहे. अशा प्रसंगी विरोधी पक्षांना व प्रसार माध्यमांना घटनास्थळी जाण्यास परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना केली आहे.

हाथरस घटनेने भाजप पक्ष व सरकारची प्रतिमा डागाळली आहे, असेही त्या म्हणाल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: