तो हिरो नव्हताच…..!

तो हिरो नव्हताच…..!

नाव इरफान खान पण कुठल्याही स्टारडमची झूल न पांघरता सर्वसामान्य माणसाला तो आपला हिरो वाटतो. त्याच्या जाण्याचा दुःखाचा आवेग इतका असतो की हरएक माणसाला जण

‘जय भीम’: जागर संविधानाचा
साधा आणि प्रामाणिक: उतरंडी मोडून टाकणारा ‘झुंड’
बॉलिवुड आणि राजकारण : मोदींच्या आंबाप्रेमाच्या पलिकडे

नाव इरफान खान पण कुठल्याही स्टारडमची झूल न पांघरता सर्वसामान्य माणसाला तो आपला हिरो वाटतो. त्याच्या जाण्याचा दुःखाचा आवेग इतका असतो की हरएक माणसाला जणूकाही आपल्याच घरातील व्यक्ती काळाने ओढून नेली अशा दुःखाने काळवंडून टाकले होते. सोशल मीडिया पूर्ण इरफारनमय झालेला,प्रत्येकाचा प्रोफाइल फोटो, व्हाट्सअपच्या स्टेट्सच्या जागी इरफान जाऊन बसला होता. त्याच्या सिनेमातील संवाद कित्येकांच्या तोंडीं फिरत होते. माझ्या कित्येक मैत्रिणी जणू काही आमचा प्रियकर हरवला आहे, म्हणून शोक करत होत्या. ज्याच्याशी प्रत्यक्ष आयुष्यात कधीच संबंध आलेला नाही असा प्रत्येकजण त्याच्या जाण्याने व्याकुळ झालेला होता. त्याच्या सिनेमातली त्याच्या संवादाची जागा जीवनाच्या तत्वज्ञानाने घेतली होती. तो हिरो कधी नव्हताच तर तो होता सर्वसामान्य पुरुषाचे ७० एमएम स्क्रीनवर दिसणारे रूप, तो होता हरऐक स्त्रीला हवा असणारा तिचा पुरुष.तिला चांद तारे नकोच असतात तिला हवं असतो ते तिला तिच्या स्त्रीत्वासकट समजून घेणारा स्वीकारणारा पुरुष..

इरफान खान यांनी त्यांच्या सिनेमात त्यांचा हा सर्वसामान्य माणसाचा आब आणि रुबाब राखत कित्येक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मला प्रामुख्याने त्यांच्या स्त्रियांचा खऱ्या अर्थाने मित्र, प्रियकर, नवरा असलेल्या भूमिकांचा इथे उल्लेख करावासा वाटतो.  ‘लाईफ इन अ मेट्रो’ मधील लग्नाचे वय उलटून चाललेल्या श्रुती आणि मॉन्टी यांच्या लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावरून झालेल्या भेटीतून सुरू झालेल्या या कहाणीचा धागा कित्येक खऱ्या आयुष्यातील श्रुतींनी आपल्या जीवनाशी जोडला होता. अगदी सर्वसामान्य वाटणाऱ्या मॉन्टीला डावलणारी श्रुती तिच्याही नकळत त्याच्या अस्सल माणुसपणावर जीव लावून बसते. मॉन्टी  स्वत:च्या मर्यादा ओळखून श्रुतीला तिच्या जगण्याचं हरवलेले मर्म शोधून देतो तिच्या प्रेमाची जाणीव झालेला मॉन्टी आपले लग्न सोडून तिचा पाठलाग करत थेट लोकल ट्रेनमधील लेडीज डब्यामध्ये चढतो आणि सगळया बायकांच्या गर्दीला बाजूला सरत तिला प्रेमाची कबुली देतो. हे वरकरणी इतकं साधं असत, की प्रत्येक सामान्य रंगरूपाच्या श्रुतीला आपल्यासाठी असाच सामान्य असणाऱ्या मॉन्टीने करून दाखवावं. ती तिच्यासाठी अशा मॉन्टीला तिच्याही नकळत शोधत राहते.

इरफानचा ‘मकबुल’ सिनेमा आणि त्याने साकारलेला मकबूल मियां. नको असलेल्या संसारात अडकून पडलेल्या कित्येक निम्मीचा इरफान, हा मियाँ बनुन जातो. तब्बू त्याला म्हणते,  ‘तुम मेरे लिये मर भी सकते हो और मार भी सकते हो,’ स्त्रीला तिचा पुरुष हवा असतो, मग तो कोणी का असेना, फक्त आयुष्याच्या निर्णायक क्षणी त्याने तिचा पुरुष व्हावं, बस्स! . असाच पुरुष गवसतो ते ‘हैदर’मधील रुहदारच्या रूपात..

इरफान खानला शंभर कोटीच्या गल्ल्यात रस नसतो, ना हिरोंच्या शर्यतीत त्याचा पाय कुठे फसतो. तो लक्षात राहतो ‘दृष्टी’च्या सगळ्या तगड्या नावांमध्येही. तो येत राहतो समोर त्याच्या अनोख्या संवादफेकीच्या शैलीतून, तो सांडत राहतो त्याची स्वप्ने त्याच्या मोठाल्या डोळ्यांतुन. तो समोर येतो ‘पिकू’ मध्ये राणा बनून. त्याला फरक पडत नाही, की समोर अभिनयाचा डोंगर उभा आहे, की मूर्तीमंत सौन्दर्य. तो केवळ सहज वावरत असतो. जणू काही आपल्या शेजारच्या घरातला कोणीतरी. तो परफेक्ट नसतो, तो सिक्स पॅक अॅब्स घेऊन मिरवत नाही. तो चुकतो, तो माफी मागतो..तो मित्र असतो, हवं तेव्हा उपलब्ध होणारा.

‘लंचबॉक्स’ मधील साजन फर्नांडिस आपल्याच सभोवताली असणारा एखादा एकटा राहणार प्रौढ वाटून जातो. आपले प्रेम एखाद्या मसालेदार भाजीत आणि चपातीत शोधणारा. चिठ्ठीच्या अक्षरात हरवून स्वतःचा शोध घेणारा. आपल्या सभोवताली असणाऱ्या कित्येक चेहऱ्यांना ओळख देणारा हा सिनेमा. एकमेकांच्या समोर न येताही प्रेमाचा बहर प्रौढपणी जपणारा हा. ‘लंचबॉक्स’च्या साजनवर जीव जडवून बसलेल्या माझ्या कित्येक मैत्रिणी आहेत. रोजच्या रोज रांधा वाढा उष्टी काढा, या चक्रातून कित्येकीनी स्वतःला ‘लंचबॉक्स’मध्ये पॅक करून मन रमंवलय.

‘करिब करीब सिंगल’मधील योगी! हा त्याच्या स्वतःच्या टर्मस आणि कंडिशनवर जगणारा मस्तमौला माणूस.. He isn’t the kind of person you’d fall in love with at first sight. But he is surely someone you could end up falling for.  त्याला कसली घाई नाही, प्रेमात पडायची अथवा पाडायची! पण त्याच्या नुसत्या तिच्या अवतीभवती असण्याने तो जयाला प्रेमात पाडतो. ही लव्हस्टोरी परिपक्वता आलेल्या दोन प्रौढांची आहे. त्यामुळेच ती जगण्याच्या या परिप्रेक्षात कित्येक एकल जीवन जगणाऱ्यांना आपली वाटून जाते.

तो बाप असतो, ’हिंदी मिडीयम, ‘अन्ग्रेजी मिडीयम आणि ‘मदारी’मध्ये. राज बत्रा, चंपक, घसिटाराम, निर्मल यादव. तो बापासारखाच बाप असतो, त्याच्या मर्यादांसकट! तो मान्य करतो त्याचे खुजेपण त्याच्या मुलांसमोर..त्याला बाप म्हणून वावरतानाही अभिनय करावा लागत नाही.

हा मकबूल मध्ये सापडला, हा हैदरमध्ये गवसला, हा सात खून माफमधून डोक्यांत गेला, लचंबॉक्समधून काळजात शिरला.  करीब करीब सिंगल मधून भोवताली महसुस होत राहिला. तो हिरो नव्हताच आमच्यासाठी. तो पुरुष होता आम्हाला हवा असलेला!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: