केरळमध्ये मुसळधार पाऊस :मृतांची संख्या २१

केरळमध्ये मुसळधार पाऊस :मृतांची संख्या २१

केरळमध्ये परतीच्या मुसळधार पावसाने रविवारी २१ लोकांचे बळी घेतले आहेत. कोट्टायम जिल्ह्यात जास्त नुकसान झाले असून, इडुकीमध्येही मृत्यू झाले आहेत. केर

डॉ. दाभोलकर हत्या : पिस्तुल सापडले
आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सोमवारी
२७.११ टक्के बेरोजगारी, संघटित क्षेत्रावरही नोकर कपातीचा दबाव

केरळमध्ये परतीच्या मुसळधार पावसाने रविवारी २१ लोकांचे बळी घेतले आहेत. कोट्टायम जिल्ह्यात जास्त नुकसान झाले असून, इडुकीमध्येही मृत्यू झाले आहेत.

केरळमध्ये रविवारी सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पाऊस आणि भूस्खलनामुळे १३ लोकांचा कोट्टायममध्ये, तर ८ लोकांचा इडुक्कीमध्ये मृत्यू झाला. भूस्खलन ग्रस्त भागात सातत्याने बचावकार्य सुरू आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पोलीस आणि अग्निशमन दल तसेच स्थानिक लोकांनी रविवारी सकाळी कूट्टीकल आणि कोक्कायार पंचायत भागात बचाव कार्य सुरू केले आहे. शनिवारपासून मुसळधार पावसासह भूस्खलनामुळे १२ पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. राज्य सरकारने ही माहिती दिली आहे.

कोट्टायम, इडुक्की. पथनमथिट्टा इथल्या डोंगराळ भागात पूर आला असून मीनाचल आणि मणिमाला या नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. परिस्थिती भीषण असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हंटले आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या घरातच किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी थांबावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पावसामुळे सध्या दक्षिण आणि मध्य भागातल्या जिल्ह्यांना फटका बसलेला आहे. संध्याकाळपर्यंत पावसाची तीव्रता अधिक वाढून उत्तरेकडच्या जिल्ह्यांनाही फटका बसण्याची शक्यता असल्याचे  विजयन यांनी सांगितले.

राज्यातल्या काही नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार असून काही धरणांचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. धरण आणि नदीपात्राच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. आहे.

शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. जे लोक ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना मदतीसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. १०५ मदत शिबिरांची स्थापना करण्यात आली आहे आणि आणखी उभारण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एर्नाकुलम, इडुक्की, पथनमथिट्टा, कोट्टायम आणि थ्रिसूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मलप्पुरम, कोझिकोडे, थिरुवनंतपुरम, कोल्लम, अलापुझा, पलक्कड आणि वायनाड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केंद्र सरकार केरळ सरकारला सर्व शक्य मदत करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

पावसामुळे सबरीमाला तीर्थयात्राही मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: