हेही नसे थोडके…

हेही नसे थोडके…

'अच्छे दिन’ सारख्या घोषणा अशा फॅसिस्ट प्रचाराचा भाग म्हणून समोर आला; तो इतका आदळला गेला की ‘अती झाले आणि हसू आले’ या उक्तीप्रमाणे त्यातून विरोधाभासी चित्र उभं करणारी कलात्मक अभिव्यक्ती जन्म घेत राहिली.

‘कुणालचे वर्तन उपद्रवी नव्हते’
ट्विट्स मागे घेण्यास कुणाल कामराचा नकार
कुणाल कामरा, रचिता तनेजाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

मराठीत एक यथार्थ म्हण आहे ‘अती झाले आणि हसू आले’! त्याची प्रचिती आपल्याला सातत्याने गेले दोन-तीन वर्षं येत आहे. ‘अच्छे दिन’चा घणाघाती नारा नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन करण्याआधी आणि केल्यानंतर ज्या पद्धतीने केला, त्याचाच बुमरॅंग/ उलटलेला परिणाम म्हणून व्यंगचित्रकारांना, हास्यकलाकारांच्या सर्जनशीलतेला विलक्षण धुमारे फुटले आहेत. मोदी सरकारने दाखवलेली दिवास्वप्नं, आश्वासनं यातला फोलपणा, गरीब-सामान्य जनतेची झालेली दिशाभूल इ. बीजसूत्राभोवती ही सगळी व्यंगचित्रं गुंफलेली दिसतात. विषण्ण/कारुण्य ते हास्यास्पद असा प्रवास  दाखवणारी निराळी व्यंगचित्र आम्ही इथे एकत्र केली आहेत. (ज्या त्या व्यंगचित्रकाराचा हक्क अबाधित ठेवून आणि ते प्रकाशित केलेल्या माध्यमाच्या सौजन्याने हे करत असताना त्या दोघांचेही अभिनंदन करावे तेवढे थोडेच!)

या व्यंगचित्रकारांसारखेच, कुणाल कामरा, वरूण ग्रोव्हर, राजीव निगम इ.‘स्टँड अप कॉमेडियनस्’च्या हास्यरंजकतेला आणि कल्पकतेलाही उधाण आले आहे. मोदी सरकारच्या अतिरंजित, आभासी दुनियेतून वास्तवाचे भान देऊन समाजाला सजग बनवण्याचे मोठे योगदान ही सगळी मंडळी करत आहेत. वास्तविक पाहता विरोधी पक्षनेत्यांनी सत्तारूढ सरकारच्या अकार्यक्षमतेवर आणि खोटेपणावर आसूड ओढणे अपेक्षित होते; त्यांना जे जमले नाही ते काम ही मंडळी करत आहेत.

सामान्य जनतेच्या बाजूने उभा राहून, मदोन्मत्त सत्ताधीशांच्या विरोधात आपल्या नाटकांमधून आवाज उठवणारा अरिस्टोफीनीस हा या सगळ्यांचा आद्यबाप म्हटला पाहिजे. त्याच्या ख्रिस्तपूर्व ४२६ मध्ये लिहिलेल्या ‘बॅबिलोनियन’ नाटकावर ‘युद्धाची खिल्ली उडवली’ अशी टीका होऊन खटला भरण्यात आला. पाचव्या शतकातील राजकारणावर बेतलेल्या त्याच्या नाटकांनी ‘कॉमेडी’ या नाट्यप्रकाराला जन्म दिला. ‘युद्ध नको शांतता हवी’ असा संदेश देणाऱ्या ‘लिसिस्ट्राटा’ या ख्रिस्तपूर्व ४११ मध्ये लिहिलेल्या नाटकामधून, अथेन्सच्या युद्धखोरीला कंटाळलेल्या बायका ‘युद्ध थांबवले नाही तर आम्ही स्पार्टन्स बरोबर संभोग करू’ अशी तंबी नवर्‍यांना देतात. जवळ जवळ चाळीसहून अधिक विडंबनात्मक कलाकृती लिहिलेला अरिस्टोफीनीस या शतकात असता तर काय काय भन्नाट कथासूत्र घेऊन आला असता याचे नवल करावे तेवढेच थोडे!

१९६०च्या अमेरिकेतील मानवी हक्कांच्या चळवळीमधील एक खंदा कार्यकर्ता डिक ग्रेगरी याने त्याच्या राजकीय उपरोधिक व उपहासात्मक भाषेतून वंशभेद आणि धर्मांधता यावर सातत्याने कडाडून हल्ले केले. अगदी दीड वर्षांपूर्वी मरेपर्यंत त्याने ट्रम्पविरोधीही खडास्त्र चालूच ठेवले. कृष्णवंशी असलेल्या ग्रेगरीने ‘कु क्लक्स क्लान’च्या सनातनी गोऱ्या मंडळींना किती जहाल पद्धतीने समज दिली हे खालील एका उदाहरणावरून कळेल.

आम्ही एका गोऱ्या खानावळ मालकाचे मन परिवर्तन करून चळवळीत सामावून घ्यायला बघितले. तो म्हणाला, “रंगीत माणसांची आम्ही सेवा करत नाही.”
मी म्हणालो, “मी रंगीत माणसं खातच नाही. डुकराचे तुकडे खायला देता का?”
त्यावर त्या सनातनी मंडळीतील एक बाई म्हणाली, “आमच्याकडे डुक्कर नाही.”
मी म्हणालो, “हरकत नाही, एक संपूर्ण कोंबडी भाजून आणा.”
त्यांनी एक अख्खी भाजलेली कोंबडी माझ्या समोर ठेवून ते म्हणाले, “तू या कोंबडीचे जे काही करशील ते आम्ही तुझ्या सोबत करू!”
त्यावर मी त्या कोंबडीचे दोन पाय फाकवून मधे पापी घेतली आणि म्हणाला, “या, तुमचे स्वागत आहे!”

अमेरिकेमध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर आल्यापासून ‘ज्या पद्धतीने त्याच्यावर आणि त्याच्या कारभारावर सातत्याने आणि चौफेर टीका केली जात आहे, तशी भारतामध्ये सहन केली जाईल का?’ ह्या प्रश्नाचे उत्तर एकमुखाने “नाही” असेच दिले जाईल.

अतिशयोक्ती करून वा उपहासाने वास्तवावर झोत टाकून जनमताला/सत्तेला हलवण्याचे सामर्थ्य व्यंगचित्रांमध्ये वा हास्यकलाकारांमध्ये असते. त्यातील गौप्यस्फोट वा उघडकीस आणलेले गैरसोयीचे तपशील दडपण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न होतात. त्याविरोधात दहशतवादी हल्ले होतात.  जानेवारी २०१५ मध्ये फ्रान्समध्ये झालेला चार्ली हेबडू वरील हल्ला, तुर्कस्तानमधील लेमान या मासिकाच्या ऑफिसचे केलेले नुकसान, वा जगभरातील १५ कोटी प्रेक्षकांच्या आवडीचा, बासेम योसेफचा ‘अल बर्नामेग’ हा इजिप्तमधला १०४ खेळांनंतर बंद पाडला गेलेला अफाट कार्यक्रम… अशी जागतिक, किंवा भारतामधलीही उदाहरणे आपल्याला माहितीच आहेत. कुणाल कामराच्या बडोदा विश्वविद्यालयामधील कार्यक्रमाला काही लोकांनी ‘विद्यार्थ्यांचे मन भाजपविरोधात कलुषित करण्याच्या’ कारणावरून आक्षेप घेऊन तो कार्यक्रम रद्द करायला लावला. ऑक्टोबर २०१८ मध्ये श्याम रंगीला नावाच्या कलाकाराची टीव्ही वाहिनीवर केलेली मोदींची नक्कल कापली गेली आणि त्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झाले नाही. ध्रुव राठी नावाच्या हास्यकलाकाराला यु-ट्युबवर ११ लाख आणि ट्विटरवर २२ लाख व्यक्ती फॉलो करतात. त्याची विलक्षण ख्याती लक्षात घेता, मोदींच्या विरोधातील त्याच्या भूमिकेविरुद्ध पाऊल म्हणून फेसबुकने त्याचे खाते काही दिवस बंद केले होते. सत्तेतील नेत्यांच्या अन्याय्य निर्णयांविरुद्ध वा कृतींविरुद्ध जनमत तयार करण्याचे सामर्थ्य या मंडळींच्या उपहासगर्भित हास्यविनोदात असते. हया कलाकारांच्या कलेतील ताकदीची भीती सत्तारूढ मंडळींना वाटते हे या सगळ्या प्रसंगांवरून लक्षात येते.

स्वातंत्र्य-सहिष्णुता-उदारमतवाद-आधुनिकता-विविधता इ. जोपासणारे, एकटे पाडले गेलेले, पुरोगामी कलावंत-विचारवंत विरुद्ध त्यांच्या अभिव्यक्तीला विरोध करणा-या अतिरेकी-माथेफिरू-कट्टरपंथी-फॅसिस्ट जथे असे जणू द्वीवादी समाजसमूह तयार झाले आहेत. हा जरी पूर्वापार चालू असलेला लढा असला तरी त्याची प्रचिती जेव्हा जेव्हा येते त्यावेळी नव्याने सामाजिक-राजकीय पेचाला आपण, समाज म्हणून सामोरे जातो. अतिरेकी राष्ट्रवाद आणि त्याला पोषक व पूरक असा भांडवलशाही साम्राज्यवाद या पार्श्वभूमीवर रूढ झालेली फॅसिस्ट प्रवृत्ती, बेरोजगारी, राजकीय अस्थिरता, सामूहिक भ्रमनिरासामुळे आलेला परात्मभाव, अशा सामाजिक परिस्थितीची मुळे खरं तर पहिल्या महायुद्धापासूनच रुजली गेली. अतिभव्य पुतळे आणि फलक, मिथके, गाय-राष्ट्रध्वज-राष्ट्रगीत-सैन्याविषयीच्या आदराचे अतिगौरवीकरण अशी प्रतीके, प्रचारी घोषणा इत्यादींचा वापर करून फॅसिस्ट मूल्य सर्वसामान्य जनतेला गिळून टाकू शकतात याचाही तडाखा आपल्याला मिळतो आहेच. ती एका प्रकारची सामाजिक हिंसाच आहे/असते. तीच परिस्थिती गेली पाच वर्ष आपण भोगत आहोत.

‘अच्छे दिन’ सारख्या घोषणा अशा फॅसिस्ट प्रचाराचा भाग म्हणून समोर आला; तो इतका आदळला गेला की ‘अती झाले आणि हसू आले’ या उक्तीप्रमाणे त्यातून विरोधाभासी चित्र उभं करणारी कलात्मक अभिव्यक्ती जन्म घेत राहिली. खरं तर वास्तवातील चित्र रंगवण्याचा असा उपहासात्मक, वास्तवभेदी प्रकार विशिष्ठ शैलीमुळे रंजक वाटू लागतो. रस्त्यावरील मोठमोठे फलक-जाहिराती, रेडिओ, टेलिव्हिजन, वृत्तपत्रे वेठीला धरून प्रचार कानावर आदळत ठेवणे हे काही आपल्याला नवीन नाही. लोकांचाच पैसा वापरुन लोकांवरच स्व-प्रचार थोपत राहण्याचे अस्त्र इतके वापरले गेले आहे की त्याचा प्रतिकार तितकाच तीव्र असणे स्वाभाविक आहे. तसे होत नाही हे क्लेशदाई आहे.

फेसबुक-ट्विटर इत्यादी समाज माध्यमं, मोबाईल ही तर एकविसाव्या शतकातली सर्वात प्रभावी शस्त्रं ठरली आहेत. खोट्या बातम्या, अपप्रचार, धार्मिक तेढ, शाब्दिक हिंसा, जातीय द्वेष, मत्सर हे सगळं पसरवत राहणारी ही माध्यमेच, दुसऱ्या बाजूला त्या सगळ्या वारांविरोधात प्रत्युत्तरे देत राहिली याने मात्र जरा दिलासा मिळाला. फ्रॉइड म्हणाला त्याप्रमाणे हास्यकला / व्यंगचित्रकला ही एक सामाजिक (social process) आहे ज्यामुळे नकारात्मक प्रवृत्तींचा दाह शमन करण्याचा प्रयत्न होतो. या कलेमुळे थेट कोणताच आमूलाग्र किंवा क्रांतिकारी बदल होत नाही, पण त्या बदलाचे बीज रुजवण्याचे काम मात्र नक्कीच होते.

निवडणुकीचे वादळ घोंगावत असताना वरच्या पट्टीतल्या विखारी प्रचाराला तोंड देणे सह्य व्हावे यासाठी सोबतच्या व्यंगचित्रांतला हास्याभाव कामी यावा !

(लेखातील मुख्य छायाचित्र – (डावीकडून उजवीकडे) कुणाल कामरा, ध्रुव राठी, राजीव निगम, वरुण ग्रोवर.)

संध्या गोखले, फिल्ममेकर, लेखिका, घटनात्मक हक्कांसाठी लढणार्‍या वकील असून, काही महिन्यांसाठी ‘द वायर मराठी’च्या संपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0