थोरोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने..

थोरोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने..

कोरोनाने आपल्याला या भोगवादी आयुष्याकडे बळजबरीने पाठ फिरवायला लावली आणि खूप गोष्टींकडे स्वच्छ नजरेने बघायला शिकवलं. दोन- तीन महिन्यात शो-बाजी न करता जगता येत याचा धडा मिळाला.

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे
केंद्रीय मंत्री अजय मिश्रांची पत्रकारांवर दादागिरी
२००८चा अहमदाबाद बॉम्बस्फोट खटला; ३८ जणांना फाशी

ऋतूपर्ण घोष यांच्या ‘ रेनकोट ‘ चित्रपटातील दृश्य.
कोलकाता येथील एक पावसाळी दुपार. गावाकडून आलेला मन्नू (अजय देवगण) आपल्या एकेकाळच्या प्रेयसीची हालहवाल विचारण्यासाठी तिच्या घरी जातो. निरु (ऐश्वर्या राय) आणि मन्नू सात-आठ वर्षांनंतर एकमेकांच्या सामोरे आलेले असतात. मन्नूकडे कामधंदा नसल्याकारणाने निरुचे लग्न एका पैसेवाल्याबरोबर करून दिले जाते. मन्नू आयुष्यात फारशी प्रगती करू शकलेला नसतो आणि इकडे निरुची परिस्थिती चांगली राहिलेली नसते. पण दोघेही एकमेकांसमोर आपल्या सुखासीन आयुष्याचे गोडवे गातात. दोघे मोठं मोठ्या बढाया मारतात.

रेनकोट

रेनकोट

मागे गाण्याचे शब्द ऐकू येत असतात.

‘पिया तोरा कैसा अभिमान…’
जगतांना या ओळीचा प्रत्यय आपल्याला पावलोपावली येत असतो..

जुन्या काळी प्रत्येक घरात एक लोखंडी कॉट असायची. त्या कॉटखाली घरातील अडगळ लपवली जायची. ती दिसू नये म्हणून कॉटवर सुशोभित चादर अंथरलेली जायची किंवा खाली एक पडदा शिवलेला असायचा. अडगळ झाकली की घर कसे नीटनेटके, सुरेख दिसायचे. काळाच्या ओघात कॉट नाहीशी झाली, तरी अदृश्य सुशोभित चादर मात्र अजून अस्तित्वात आहे.
त्या खाली आपण खूप काही लपवून ठेवत असतो..

समाजामध्ये वावरतांना भौतिकवादी मोजपट्टीने एखाद्याची प्रतिष्ठा मोजली जाते. शोबाजीचा हा खेळ मोठ्या शिताफीने खेळला जात असतो. सध्याचे जग चंगळवाद, प्रसिद्धी, पैसा यांच्या मागे वेड्यासारखे धावत आहे, असे सर्वजण म्हणत असतात. मग प्रश्न पडतो, नक्की धावतंय तरी कोण?

१२ जुलै हा हेन्री थोरो या विचारवंतांचा जन्मदिवस अमेरिकेत National Simplicity Day म्हणून साजरा केला जातो. थोरोने जगतांना कमीत कमी गोष्टींचा वापर करून जगणे अधिक सुसह्य करता येते, याचा परिपाठ घालून दिला आहे. जितका जास्त साधेपणा अंगी असेल तितका जगण्यातला गुंता कमी असतो, हे त्यांच्या जगण्यातून दाखवले.
‘थोरोचा दगड’ ही कथा तर भौतिकवादी लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी. (मागील एका लेखात ही कथा लिहिली होती.)

जंगलात फिरत असतांना थोरोला एक आकर्षक दगड दिसला. आपल्या मेजावर ठेवायला म्हणून तो दगड आपल्या झोपडीत घेऊन आला. पुढे निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी थोरो जंगलात वास्तव्यासाठी गेला. काही काळानंतर झोपडीत परतल्यावर, त्याच्या लक्षात आले की दगडावर बरीच धूळ जमल्यामुळे तो पूर्वीसारखा चमकत नाहीये. त्याक्षणी त्याला जाणवलं की जितक्या अनावश्यक गोष्टीचा संचय आपल्या अवती-भवती असेल तितकी त्यांची निगा राखण्यात आपला वेळ जाईल. या निर्जीव गोष्टींमध्ये वेळ दवडण्यापेक्षा निसर्गाची विविध रूपे बघणे जास्त महत्त्वांचे आहे. त्यांनी तो दगड दूर जाऊन फेकून दिला. भौतिक गोष्टींच्या मोहातून वेळीच स्वतःची सुटका थोरोने केली.

सर्वसामान्य माणसांकडे नजर वळवली, तर काय दिसून येते? निर्व्याज साधेपणा आपल्या जीवनात कितपत राहिला आहे? आपल्या अवती-भवती चंगळवादी आरसे महालात ग्राहकांना मोठ्या हुशारीने प्रवेश करायला भाग पाडणारी कुशल यंत्रणा कार्यरत असते. सुंदर, आकर्षक जाहिरातीतून एक लोभस जग आपल्यावर आदळत असते. ते बघून आपणही असे आयुष्य जगायला हवे, हे आयुष्य म्हणजेच सफलता, हाच धरतीवरचा स्वर्ग.. वगैरे धारणा लोकांच्यात निर्माण होते. त्यामुळे सतत वस्तू विकत घेणे, नाविन्याच्या अट्टाहासातून गाडी, घर, मोबाईल हे अस्मितेची प्रतीकं बनली आहेत.

कोरोनाने आपल्याला या भोगवादी आयुष्याकडे बळजबरीने पाठ फिरवायला लावली आणि खूप गोष्टींकडे स्वच्छ नजरेने बघायला शिकवलं. दोन- तीन महिन्यात शो-बाजी न करता जगता येत याचा धडा मिळाला. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टी सोडून इतर व्यवसाय जे मूठभर लोकांच्या फायद्यावर आधारलेले आहेत, त्यांची अर्थव्यवस्था लॉकडाऊनच्या काळात ठप्प झाली. तो तोटा भरून काढण्यासाठी सेल, डिस्काउंटचा मारा करून परत ग्राहकाला आपल्याकडे खेचत आहे. इतका मोठा धडा मिळूनही काही लोक परत त्या दुष्टचक्रात अडकायला तयार आहेत. कोव्हिड-१९मुळे जीवनाकडे बघण्याचे दोन परस्परविरोधी दृष्टिकोन समोर आले. एक साध्या जगण्याचे मर्म पटलेले आणि दुसरे ‘कल हो ना हो’ म्हणत अधिक चंगळवादी झालेले.

“जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेली गोष्ट विकत घेत असला तर तुम्हाला तुमच्या गरजेच्या वस्तू विकण्याची लवकच वेळ येणार आहे, हे समजा.” असे वॉरेन बफे बजावतात. जगातील श्रीमंताच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असणारे वॉरेन बफे हे भाड्याच्या घरात राहतात व आपला पैसा अत्यंत काळजीपूर्वक खर्च करतात.

एकदा थोरोला कपाटात लक्षात न राहिलेले काही पैसे सापडले. काही जरुरीचे सामान खरेदी करण्यासाठी ते पैसे खर्च केले. तेव्हा त्याला उमजलं की पैसे जवळ नव्हते, तो पर्यंत त्या वस्तूची गरज भासली नव्हती. जेव्हा पैसे आले तर खर्च करावेसे वाटले. खर्च केल्यावर ते खर्च झाल्याबद्दल वाईट वाटलं, त्यापेक्षा पैसा जवळ बाळगणं नको.

साध्या राहाणीमानाचे महत्त्व लक्षात घेऊन साधं जगणं आणि पैसा नसतांना साध्या राहणीचा पुरस्कार करणे यात खूप मोठी गफलत आहे. पुढे जाऊन पैसा मिळाल्यावर अशा लोकांचे ‘स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग’ बदलते.

विचारपूर्वक पैसा बाळगायचा नाही हे ठरवणारा थोरो आणि गर्भश्रीमंत असून, संपत्तीतला अगदी थोडा भाग स्वतःच्या उपजीविकेसाठी ठेवून, बाकी संपत्तीचा समाजासाठी विनियोग करणारे जॉन रॅस्किन ही दोघेही सुखी माणसाचा सदरा घालणारी माणसं!
जॉन रस्किन यांचे ‘अन टू धिस लास्ट ‘ नावाचे प्रसिद्ध पुस्तक आहे. महात्मा गांधींनी सर्वोदयाची कल्पना यांच्या या पुस्तकांतून घेतली होती. थोरो हे देखील गांधीजींचे आदर्श.
जॉन रस्किन यांनी आपली जवळजवळ सर्व संपत्ती ही जनकल्याणासाठी वापरली. गरीब युवक-युवतींना शिक्षणाचे मार्ग मोकळे केले. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला धावले. त्यांच्या भल्यासाठी योजना राबवल्या. गरीब होतकरू चित्रकारांकडून भरपूर मोबदला देऊन चित्र विकत घेतली. ती चित्र स्वतःच्या घरात न लावता, शाळा- शाळांमध्ये लावली. त्यामुळे विद्यार्थ्यांची सौंदर्यदृष्टी वाढीस लागेल, हा उद्देश. साधे जगतांना त्यांना जी प्रसन्नता, शांतता लाभली, ती त्याच्या संपत्तीच्या कैकपटीने जास्त होती.

सर्व त्यागा, मौजमज्जा करू नका म्हणजे साधं जगणे! इतका ढोबळ अर्थ कोणी लावू नये. काही उपकरणांमुळे आपले जीवन सुसह्य निश्चितच झाले आहे. फक्त आवश्यक आणि अनावश्यक यातील फरक समजून घेणं जरूरीचे. खूपशा गोष्टी फारशा न वापरता, जुन्या होण्याच्या आधीच त्या टाकून देण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे.
दरवर्षी जगात २ ते ५ कोटी मेट्रिक टन ई -कचरा तयार होतो. यावरून चंगळवादाची तीव्रता लक्षात येते. या प्रवृत्तीला आवर घालणे का जरुरीचे आहे ? ते सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे काही क्षेत्रात पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळायला लागले.

नवश्रीमंत लोकांचे राहणीमान बघून, या शो-बाजीच्या शर्यतीत मागे पडलेल्या लोकांच्या मानसिकतेवर होतो. अनेक मनोविकाराची कारण या ‘मटीरिॲलिस्टिक लाईफस्टाईल’ मधून आलेली आहेत, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. टीव्ही बघू दिला नाही, मोबाईल घेतला नाही, टिकटॉक, पब्जी यामुळे कुमारवयीन मुलामुलींच्या होणाऱ्या आत्महत्या या भयवाहक आहे.

सिटी लाईट्स

सिटी लाईट्स

खरा आनंद कशात आहे ? हे समजण्यात आणि समजून सांगण्यात आपण कमी पडतो आहे. आनंदी, सुखी राहण्याचे वर्ग, पुस्तकं त्यांना सर्वात जास्त मागणी आहे. याचा सुद्धा व्यापार मांडला गेला आहे. पैशामुळे हव्या त्या वस्तू विकत घेऊनही, एकाकी पडलेले लोक मनःशांती शोधत हिंडत असतात.
‘सिटी लाईट्स’मध्ये भटक्याला (ट्रम्पला) एका रात्री, आत्महत्या करायला निघालेला धनिक भेटतो. गळ्यात दगड बांधून पाण्यात उडी मारणार असतो. भटक्या त्याला अडवतो. तेव्हा तो धनिक म्हणतो, “मी जीवनाला कंटाळलो आहे. मला मरू दे.” भटक्या त्याला आत्महत्येपासून परावृत्त करतो. जगणं किती सुंदर आहे ते समजवतो. धनिक भटक्याला आपला मित्र मानतो. हा धनिक रात्री दारूच्या नशेत अतिशय भावनाप्रधान, संवेदनशील व्यक्ती बनत असतो, तेव्हा तो भटक्याला जिवलग मित्र मानत असतो, दिवसा दारूची नशा उतरल्यावर तो अत्यंत व्यवहारी, कठोर बनत असतो. दिवसा तो भटक्याला ओळखतही नसतो. रात्री परत भटक्यांच्या गळ्यात गळे घालत असतो.

बऱ्याचदा काय धरावे, काय सोडावे अशी द्विधा परिस्थिती माणसांची होत असते.
‘चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा’ हे गाणं अनेकांच्या पसंतीचे. अगदी डोळ्यात पाणी वगैरे येत, भावुक होतो, अर्थही समजलेला असत पण प्रत्यक्ष जीवनात उतरवणे कठीण असते. साधी राहणी, उच्च विचारसरणी ही भारतीय संस्कृती.

ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ।।  हा सुविचार फक्त बोलण्या – लिहिण्यापुरता ठरतो.

‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे?’ ही मानसिकता मेंदूला झिणझिण्या आणणारी. मग ‘सफेदी की चमकदार’ शो-बाजीला उधाण आणते. समाजात ‘स्नॉब’ लोकांचा एक वर्ग असतो. ते सतत कशा ना कशाचे प्रदर्शन करण्यात मश्गुल असतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एके ठिकाणी सुसंस्कृतपणची व्याख्या करताना म्हटले आहे : ‘तुमच्या सहवासात आलेल्या कुठल्याही माणसाला अवघडल्यासारखे वाटता कामा नये, तरच तुम्ही खरे सुसंस्कृत.’

शांताबाई शेळक्यांच्या लेखात एक अशीच सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवणारी कथा सापडली. एका श्रीमंत दांपत्याला लोकांना बोलावून पार्टी देण्याची आवड असते. एका संध्याकाळच्या पार्टीच्या वेळी यजमानीणबाई साधा पोशाख परिधान करतात. कोणताच दागिना नाही की कोणता साजशृंगार करत नाही. आलेले सर्व पाहुणे आश्चर्यचकित होतात, कुजबुजायला लागतात, तर्क-वितर्काला उधाण येत. थोड्यावेळाने एक मोठ्या विदुषीबाई तिथे येतात, गावात भाषण देण्यासाठी त्या आलेल्या असतात. त्याचे कपडे साधे असतात. त्यांना अवघडलेपण वाटू नये, म्हणून यजमानीणबाई स्वतः साध्या वेषात राहून, आपला सुसंस्कृतपणा दाखवतात. दाखवेगिरी पण कोठे आणि कधी करावी याचे भान ठेवायला लावणारी ही गोष्ट.

ई- कचरा

ई- कचरा

मानववंशशास्त्र अभ्यासक व मानसशास्त्रज्ञ एरीक फ्रॉमने गंभीर विधान केले आहे. ते म्हणतात, ‘माणसाच्या अस्तित्वाचे दोन प्रकार एकमेकांशी सतत स्पर्धा करत असतात. एक अल्पसंतुष्ट आणि संतुष्ट. त्यातील अल्पसंतुष्ट हे नेहमी भौतिक सुखाच्या मागे लागले असतात. त्यांची हाव कधी न संपणारी असते. ते कुठल्याही गोष्टीचा खरा आनंद न घेता, केवळ त्यावरील मालकी हक्क असण्यात आणि तिचा साठा करून ठेवण्यात त्यांना जास्त आनंद मिळतो. संतुष्ट माणूस समाधानी, प्रेमळ असतो, तो वस्तूचा योग्य उपभोग घेतो. त्याचा शेअरिंगवर जास्त विश्वास असतो. पण दुर्दैवाने अल्पसंतुष्ट लोकांची संख्या जास्त असल्याने संतुष्टांपेक्षा वरचढ ठरतात. त्यामुळे मानव आर्थिक, सामाजिक, मानसिक विनाशाच्या टोकावर उभा आहे. त्यातील अल्पसंतुष्टांपेक्षा संतुष्ट वरचढ ठरले तरच हा विनाशाकडचा हा प्रवास थांबवणे शक्य आहे. निसर्गापासून तुटलेल्या मानवाचा अधोगतीबद्दल त्यांनी चिंता दर्शवली आहे.

एकदा वॉल्ट व्हिटमन हे सुप्रसिद्ध कवी गंभीर आजारी पडले. शहराच्या कृत्रिम आयुष्याला ते कंटाळून गेले होते. निदान मरण तरी सुखाने, समाधानाने यावं म्हणून आपल्या गावी गेले. गावात वीज नव्हती, नळ नव्हता की कोणत्याच सुखसोयी नव्हत्या. पण तिथल्या निसर्गाने त्यांचा कायापालट केला. ते मोकळ्या हवेत, रानात जाऊ लागले, सूर्यप्रकाशात न्हाऊ लागले, पक्षांचे मधुर कूजन ऐकू लागले. पिटुकल्या खारीचे खेळ बघू लागले. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यावर ते सुदृढ झाले. पुढे १२ वर्षे ते तिथेच राहिले.

प्रसन्नता आणि समाधान हे निसर्गचक्र चालवणारी दोन मुख्य चाक आहेत. तुकारामांनी म्हटलेच आहे, ‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धींचे कारण।’

थोरो म्हणाला होता की रोज उगवणारी सकाळ म्हणजे मला निसर्गाकडून आलेलं आमंत्रणचं असते. त्यांच्या सारखं साधं आयुष्य जगण्याची ती हाक असते. निसर्गातील साधेपणाला मी ‘निरागसता’ ही उपमा देईन, जी माणसाच्या साधेपणासाठी वापरण्याची आगळीक करणार नाही. निसर्ग हा सर्वांसाठी समान आहे.. मात्र त्याच्याकडे बघणाऱ्या माणसाची दृष्टी वेगवेगळी आहे. जितका माणूस निसर्गाच्या जवळ जाईल, तितका साधेपणा माणसाच्या अंगी उतरेल. तितकं त्याच जीवन आनंदी, सुसह्य होईल.

थोरोचा दगड आपल्यासाठी दिशादर्शक आहे. नाहीतर ‘पिया तोरा कैसा अभिमान’ या ओळी आपल्याही मागे वाजायला लागतील…

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0