हिजाब प्रकरणाची सुनावणी सोमवारी

हिजाब प्रकरणाची सुनावणी सोमवारी

नवी दिल्लीः हिजाब वादप्रकरणात न्यायालय अंतिम निर्णय देईपर्यंत कोणत्याही प्रकारचे धार्मिक पोशाख घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी आग्रह धरू नये असे अंतरिम आदेश देत राज्यातील महाविद्यालये सुरू करावी, असे निर्देश गुरुवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले. आता हिजाब प्रकरणाची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.

बुधवारी हिजाब घातल्या प्रकरणी विद्यार्थीनींना वर्गात प्रवेशबंदी घातल्याच्या एका महाविद्यालयाच्या निर्णयाचा विषय तीन सदस्यीय पीठाकडे पाठवण्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्या. कृष्णा एस. दीक्षित यांनी घेतला होता. त्यानंतर न्यायालयाकडून मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, न्या. कृष्णा दीक्षित व न्या. झेबुन्निसा काझी या तिघांचे पीठ स्थापन करण्यात आले होते. या पीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली.

न्यायालयाने अंतरिम आदेश दिल्यानंतर याचिकाकर्त्यांनी या आदेशाला हरकत घेत अंतरिम आदेशामुळे आमचे अधिकार निलंबित राहतात असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने हा मुद्दा काही दिवसांचा असल्याचे सांगितले.

दरम्यान हे प्रकरण गुरूवारी सर्वोच्च न्यायालयातही पोहचले. त्यावर सरन्यायाधीशांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालय त्यात लक्ष घालेल असे स्पष्ट केले.

बुधवारी हिजाब घालण्याचे प्रकरण हे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मोठ्या पीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयावर व्यापक भूमिका न्यायालयाकडून घेता यावी म्हणून आपण हे प्रकरण मोठ्या पीठाकडे वर्ग करत असल्याचे न्या. दीक्षित यांनी म्हटले होते.

COMMENTS