जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत एकपक्षीय हुकुमशाहीची चाहूल लागत असतांना महाराष्ट्रात अभूतपूर्व सत्तांतर घडून आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेत फुट
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत एकपक्षीय हुकुमशाहीची चाहूल लागत असतांना महाराष्ट्रात अभूतपूर्व सत्तांतर घडून आले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेत फुट पडली. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. त्यांची जागा त्यांच्याच पक्षातील एकनाथ शिंदे यांनी भा.ज.प.च्या देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन आणि सक्रीय सहकार्याने घेतली. शिंदे आणि कंपूचा ठाकरे यांच्या नेतृत्वावर हिंदुत्व त्यागल्याचा आरोप होता. तर याउलट उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मदतीने शिवसेनेची ‘सुधारक हिंदुत्ववादी’ अशी प्रतिमा घडवतांना दिसत होते. हिंदुत्वाच्या जहाल आणि मवाळ गटातील ही रस्सीखेच वरवरची असल्याचे राजकीय जाणकारांनी वेळीच ओळखून ई.डी.ला हिंदुत्व-जागृतीचे कारण म्हणून जाहीर केले. शिवसेनेच्या शिंदे गटाला भा.ज.प.ने काही आमिषे दाखवत आणि ई.डी.चा धाक कायम राखत सत्तांतर घडविले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे. महाराष्ट्राच्या आजी- माजी मुख्यमंत्र्यामधील तुलना प्रसारमाध्यमे आणि अभ्यासाकांतही होतांना दिसते. साहित्यिक, कवी, कलाकारांमधील सामाजिक जाणीव असणारा गट २०१४मधील केंद्रीय सत्ताबदलापासुनच अस्वस्थ होताना आपण पाहत आहोत. त्याच्या दाहक प्रतिक्रिया आता महाराष्ट्रातसुद्धा पाहायला मिळत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सेलिब्रिटीज ते सामान्य जनता, चाकरमाने लोक, कामगार या सर्व थरांत ‘दोस्तियाँ टूट गयी’ प्रकारातील मतभेद-वैरभाव आपण अनुभवत आहोत. हिंदुत्वाची विचारधारा-तिची बहुजन-हिंदू पुरोगामी जीवनपद्धतीवर मात-इतर धर्मांध विचारधारांच्या तुलनेत तिचे सामाजिक ऐक्य व संघटन म्हणून अपुरेपण-परंतु राजकीय पटलावर फॅसिझम म्हणून व्यापकता आणि अनन्यता यांचा परामर्श घेणे त्यासाठीच अत्यंत आवश्यक आहे. हिंदुत्वाची संसदीय चौकट समजून घेणे म्हणूनच गरजेचे ठरते.
१.बहुदेवतावादी हिंदुत्व आणि लोकशाहीचे यशापयश :
हिंदुत्वाचे समर्थक असा दावा करतात, कि ‘हिंदू धर्मातील बहुदेवतावाद आणि सर्व जाती-पंथांच्या देवी-देवतांना मानाचे स्थान या तत्वामुळे हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे. ही सर्वसमावेशकता आणि परमताचा आदर ही तत्वे भारतीयांना पर्यायाने हिंदू मतपेढीला परमतसहिष्णू आणि राजकीयदृष्ट्या लोकशाही प्रक्रियेचे ’उपजत’ आदर्श देणारी आहेत. म्हणजेच, भारतीय राष्ट्राची लोकशाही ही हिंदूंच्या सहिष्णूतेवर आणि सर्वसमावेशकतेवर टिकलेली आहे.’ मात्र, जातीव्यवस्थेचे अभ्यासक हा दावा खोडून काढतात. बहुसंख्यांकांची लोकशाही, जातीय बळावर प्रतिनिधित्व, राष्ट्रीय प्रतीकांमध्ये हिंदुत्वाचेच आक्रमक रूप, जातीय वादविवाद आणि आरक्षणाच्या अनुषेशावर चालणारे हिंदुत्वाचे राजकारण, दलित-आदिवासी आणि स्त्रियांचे जातीय-पितृसत्ताक शोषण आणि यामुद्द्यांचे संसदीय-जातीय आधार अभ्यासल्यास हिंदुत्वाचा बहुदेवतावाद आणि लोकशाहीच्या परस्परसंबंधांतील नकारात्मकता-शोषणाची व्यवस्था दृग्गोचर होते.
हिंदुत्वाची संसदीय कार्यप्रणाली जात-जमातीय आणि लैंगिक आधारांवर कार्यरत आहे. ब्राह्मण्यकेंद्री जात-वर्गीय प्रभुत्व हा तिचा अंतिम उद्देश असल्याने अल्पसंख्यांकांना शत्रू ठरवत हिंदू विभाजित-बंदिस्त जाती घटकांचे तात्पुरते जमातीय ऐक्य घडविले जाते. हे ऐक्य घडवतांना बहुदेवतावादाचा उपयोग केला जातो. हिंदूंच्या देवी-देवतांना आणि प्रतीकांनाही जातनिहाय विभाजन लागू आहे. उच्चजातीयांच्या देवतांचे सेवक-सेनापती म्हणून निम्नजातीयांचे देव उभे केले जातात. या देवांचे ‘भक्त’, भक्तांचे नेतृत्व एक आभासी शत्रू समोर ठेवून जमातीय ऐक्य सत्तासंपादनासाठी साधत असते. त्याचे दूरगामी परिणाम सामाजिक प्रभुत्वात आणि भक्तांच्याही शोषणात होतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, श्रीरामाचे प्रतिक हे सवर्ण आणि उच्चजातवर्गीय समूहाचे राहिले आहे. भा.ज.प.याब्राह्मण-बनिया पक्षाने ते बहुदेवतावादाद्वारे जमातीय धृविकरणासाठी वापरले. राम-त्याचा सेवक आदिवासी आणि निम्न जातीयांचा देव असलेला हनुमान- आदिवासींचे दुसरे प्रतिक आणि रामाची सेवक-गरीब अशी शबरी- रामकथेच्या आणि तुलसीरामायणाच्या उत्तर भारतीय आणि मुख्यत्वे ओ.बी.सी. घटकांमधील लोकप्रियतेचा जमातीय-मुस्लिमविरोधी वापर मुस्लिमांना ‘रावण-अत्याचारी’ ठरवून केला गेला. हिंदुत्वाची जमातीय-जातीयवादी चौकट-देवी-देवतांची जातीय उतरंड-जातनिहाय रामभक्तांची मंडळे-हनुमान आणि उत्तरेतील व्यायाम आखाड्यांचे युवा संघटन यांचा वापर १९९२चा बाबरी विध्वंस आणि त्यानंतरच्या जमातीय दंगलींत केला गेला. ओ.बी.सी. जात समूहाच्या काही नेत्यांचे ‘समावेशन’ सत्तेच्या निम्न घटकांमध्ये भा.ज.प.ने केले. परंतु, हिंदू जनसंख्येतही बहुसंख्यांक असलेल्या ओ.बी.सी. जात समूहाचे आरक्षण आणि त्यासाठीचा मंडल आयोग यांचे ‘सिमांतीकरण’(Marginalization)धर्म आणि बहुदेवतावादाच्या आवरणाखाली केले गेले. भा.ज.प.चे तत्कालीन नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी एक ऐतिहासिक वक्तव्य याबाबत केले होते, ‘उन्होंने मंडल निकाला, तो हमने कमंडल निकाला’.( https://www.youtube.com/watch?v=xErzOzGQNF8)
हिच राजकीय-सामाजिक प्रक्रिया महाराष्ट्राच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. मुस्लिम राजवटीचा आभासी शत्रू समोर करत महाराष्ट्र शिवसेनेने ओ.बी.सी. जनसंघटन बांधले. प्रादेशिक हिंदुत्व-त्याची बहुजन –ओ.बी.सी. प्रतिके मुस्लिमविरोधी सांगड घालत मंडल आयोग आणि महाराष्ट्रातील कम्युनिस्ट-जात्यंतक राजकीय शक्तींना रोखले गेले. (Deshpande, Haima; Sena-Congress ‘Friendship’ Goes Back 50 Years: Story of Helping Each Other Grow In Mumbai, The Print, 14th November, 2019)
जातीव्यवस्था आणि त्याआधारे चालणारे शोषण हे भारतीय परिप्रेक्ष्यात जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत अबाधित आणि नव्या वर्गीय-भांडवली स्वरुपात कायम आहे. त्याची तीव्रता वाढती आहे. या कमतरतेवर मात करण्यासाठी राज्यघटना जातीय आरक्षणाची अंमलबजावणी सुचवते. मात्र, आरक्षणाची पूर्तता न करता अनुशेष बाकी ठेवणे, संसाधनांच्या अपुरेपणामुळे जाती-जातींमध्ये आरक्षणासाठी स्पर्धा निर्माण करणे आणि ती स्पर्धा सत्तापक्षाच्या विरोधात जाताच पुन्हा हिंदुत्व-आभासी शत्रू व दंगली ही मालिका कायम राखणे, यात बहुदेवतावाद आणि हिंदुत्वाची जातीय उतरंड हे मुख्य सूत्र आहे. उत्तर भारतातील गुज्जर आरक्षणाचे आंदोलन, जाट खाप पंचायतींचा प्रतिक्रियावाद आणि त्यानंतर उसळलेल्या मुझफ्फरनगरमधील मुस्लिमविरोधी दंगली, दलितांची हत्याकांडे ही मालिका राहिली आहे. हिंदू बहुदेवतावादाचा वापर हा ‘सत्तेसाठी समावेशन’ (Inclusion for power) आणि ‘लाभांशाच्या वेळी वगळणे’ (Exclusion at the time of power sharing) या राजकीय-सामाजिक कार्यपद्धतीने होतो. जयंत लेले या राजकीय प्रक्रियेसाठी ‘बहुस्तरसत्ताक राजकीय लोकशाही’ अशी संकल्पना वापरतात.तर शरद पाटील जातवर्गीय लोकशाहीची संकल्पना मांडत त्याला दाता-आश्रित संबंधांची जोड असल्याची मांडणी करतात.निम्नजातवर्गीय घटकांचे मूठभर प्रतिनिधी सत्ता उपभोगतात. मात्र, बहुसंख्य शोषित जात-वर्गीय जनता आरक्षणहीन, मुलभूत सुविधांविना आयुष्य काढतांना दिसते. या समाजघटकांना शोषित आणि उपयुक्त (Usable) ठेवण्यात हिंदुत्व आणि बहुदेवतावाद यांचा वापर असतो.
२.हिंदुत्वाचे राजकीय अस्मिताकरण :
जहाल, मवाळ, छुपे, सर्वसमावेशक, आक्रमक, वैज्ञानिक अशा अनेक विशेषणांनी हिंदुत्वाला परिभाषित केले गेलेले आहे. हिंदुत्वाचे अनेक पैलू राजकीय-सामाजिक आवश्यकतेनुसार वेळोवेळी उपयोगात आणले जातात. परंतु १९९०च्या दशकात आणि त्यानंतरही प्रादेशिक हिंदुत्वाची चर्चा सातत्याने राहिली आहे. केंद्रीय सत्ताकारण आणि प्रादेशिकवाद यात हिंदुत्वाचा कमी-अधिक जहालपणा, राजकीय तडजोडवाद आणि उपद्रवक्षमता हा अभ्यासविषय म्हणून केंद्रीय सत्तेत नरेंद्र मोदी आणि भा.ज.प आरूढ झाल्यानंतर प्रकर्षाने पुढे येतांना दिसतो. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी असलेल्या राज्यात २०१९मध्ये शिवसेनेने भा.ज.प.या परंपरागत हिंदुत्ववादी मित्र पक्षाशी असलेली युती तोडून ‘पुरोगामी हिंदुत्वाच्या’ नावाखाली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘शिवसेना शेंडी-जानव्याचे हिंदुत्व मानत नाही’, असे जाहीर करत भा.ज.प.चे आक्रमक हिंदुत्वाला लक्ष्यकेले (लोकसत्ता, ८ जून, २०२२, मुंबई).
मात्र, शिवसेनेच्या या नव्या आघाडीबाबत महाराष्ट्रातील हिंदुत्ववाद्यांमध्ये एक नाराजी होती. महाराष्ट्रातील उच्चजातवर्गीय अभिजनांनी तसा राजकीय अभिप्रायही दिला. प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे बाबरीचा विध्वंस आणि त्यानंतरच्या जमातीय दंगलीतील मुस्लिमांच्या कत्तलीबद्दल दिलगीरही न राहता बाबरी पाडण्यातील शिवसेनेच्या भूमिकेचे गर्वाने समर्थन करतांना दिसले. (https://www.youtube.com/watch?v=LcRvTv8NrLI).
केंद्रातील हिंदुत्ववादी सत्ताधारी शक्तींनी आमिषे आणि हिंदुत्वाचे कार्ड खेळत एकनाथ शिंदेंना आणि बाबुसंख्य आमदारांना शिवसेनेतून फोडत शिवसेना आणि आघाडीचे राज्य सरकार पाडले. राजकीय अभ्यासकांत चर्चा हिंदुत्वाच्या आक्रमकतेची आणि शिवसेनेच्या सौम्यपणाची राहिली. परंतु, केंद्रातील सत्ताधारी हिंदुत्ववादी शक्ती, तिची राज्य म्हणून असलेली दमन यंत्रणा, त्यामागील ब्राह्मण-बनिया अर्थकारण आणि मुख्यतः हिंदुत्ववाद राज्ययंत्रणेचे प्रेरक-पूरक घटक यांची चर्चा झाली नाही. २०१४पासून केंद्रीय सत्तांतरानंतर राजकीय अस्मिता म्हणून आक्रमक हिंदुत्वाची व्याप्ती वाढली. प्रबळ विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस आणि त्याचे नेतृत्वसुद्धा हिंदू अस्मितेची भाषा आणि प्रचार बचावात्मक रणनीतीच्या अंतर्गत करताना आपण सातत्याने पहात आहोत. राहुल गांधींची जयपूर आणि कर्नाटकातील भाषणे, मंदिरांच्या फेऱ्या याची महत्वाची उदाहरणे म्हणून आपण पाहू शकतो.(The Indian Express, 30th November, 2018 ).
हिंदुत्वाच्या अंतर्गत राजकीय सत्तास्पर्धा नवीन नाही. पंजाबात हिंदीविरुद्ध पंजाबी भाषाविवाद आणि स्वायत्ततेच्या प्रश्नावर रा.स्व.संघाने सातत्याने बदलती भूमिका घेतली होती. प्रसंगी आर्य समाजाच्या विरुद्ध जात पंजाबी भाषेच्या समर्थनाची आणि हिंदीच्या विरोधाची भूमिका संघाने घेतली होती (Brass, Paul R.; Language, Religion and Politics in North India, 1st Published in India, Vikas Publishing House PVT. LTD., Kanpur, 1975, pages 338 to 335).
काश्मीर प्रश्नाबाबतही संघ हरीसिंगकेंद्री आणि भारतविरोधी राहिला होता. संघाचे समर्थन भारतविरोधी डोग्रा राजवटीला होते (महाले, कु.ल.; मनूचा मासा,लोकवाङमय गृह प्रकाशन, मुंबई, १९८०, पृष्ठ, २७, २८ ). संसदीय राजकारणात महत्वपूर्ण बाब म्हणजे अयोध्या-बाबरीविवादात या संवेदनशील क्षेत्र असलेल्यावाराणसीत राजकीय संख्याबळ भा.ज.प.च्या बाजूने लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानात १९९०च्या पूर्वार्धात दिसले नाही. स्थानिक महंत आणि हिंदू जनता धार्मिक धृवीकृत झालेली नव्हती. जनमताने लोकसभेच्या मतदानातधर्माऐवजी जातीलाच पसंती दिली होती. हिंदू मतपेढी ही जातीजातींत विभाजित होती. (The Times of India, 13th May, 1991,page 20, Delhi). काशी, मथुरा, प्रयाग, ज्ञानवापी या प्रकरणांनाही अंतर्गत सत्तास्पर्धा आणि भिन्न-भिन्न महंतांच्या आखाड्यांच्या राजकीय भूमिकेचे पैलू आहेत. महंत आणि आखाडे यांचा विशिष्ट भक्त समुदाय असून त्यांची राजकीय भूमिका तडजोडवादी राहिल्याचे चित्र सातत्याने दिसते.
भा.ज.प.च्या हिंदुत्ववादी प्रचारासाठी तुलनेने पुरोगामी-मवाळ हिंदू अस्मितानिर्माणासाठी वाजपेयींची कवी-साहित्यिक-मध्यमवर्गीय प्रतिमा वापरली गेली. आक्रमक चेहरा अडवाणींचा राहिला. या अस्मितानिर्माण प्रक्रियेने क्रमशः हिंदू नोकरदार मध्यमजातवर्गीय आणि असंतुष्ट निम्नजातवर्गीय समाजघटकांना अस्मिता बहाल केली. तसेच राजकीय नेतृत्वही उपलब्ध करून दिले.
हा भूमिकाबदल हिंदुत्वाच्या राजकीय आक्रमक अस्मिताकरणातून घडून आला. अविकास आणि सुशासनाचा अभाव असलेल्या जनतेवर कॉंग्रेस शासनात संसाधन आणि संधीच्या कमतरतेचा दबाव राहिला होता. आर्थिकदृष्ट्या कसोटीच्या काळात आणि जातीय आरक्षणाचे प्रश्न निरनिराळ्या राज्यांत तीव्रतम स्तरावर असतांना भा.ज.प. आणि त्याचे नवनेतृत्व असलेल्या मोदींनी आक्रमक हिंदू अस्मिता आणि त्याला स्वदेशीच्या अर्थकारणाची जोड देत सत्ता हस्तगत केली. स्वदेशीचे अर्थकारण ब्राह्मण-बनिया मक्तेदारीचे राहिले आहे. अदानी-अंबानींच्या आर्थिक मक्तेदारीचे आधार आणि उद्दिष्ट हे हिंदुत्ववादी भा.ज.प. या जातपितृसत्तासमर्थक पक्षाच्या समर्थनाचे आहे. त्याचे परिणाम जात-जमातीय तणावासोबतच बहुसंख्य निम्नजातवर्गीय हिंदूंची बेरोजगारी, त्यांना मुलभूत सुविधा आणि आर्थिक सुरक्षेचा अभाव यांत होतांना दिसतो. हिंदुत्वाच्या स्वदेशी पैलूने दिलेले अस्मिताकारण हे एकीकडे हिंदुत्ववादी आरोग्य अर्थकारण, राष्ट्रीय उद्योगांचे विक्रीकरण, मुस्लिमद्वेष आणि मध्यम जातवर्गात अध्यात्म-जमातवाद पेरणारे आहे. पतंजली आणि जिओने दिलेली अस्मिता हे योग ते दीड जी.बी. डेटाच्या माध्यमातून गोरक्षा, मुस्लिमहत्या, लव-जिहाद, जमातीय अधिक लैंगिक डेटा प्रसारित करणारी ठरली. व्हाटसअप युनिव्हर्सिटीचा हिंदुत्ववादी अस्मितानिर्माणात मोठा वाटा आहे. हिंदू जनसमुदायांवर स्वधर्मीय उच्चजातवर्गीय अभिजनांनी लादलेली पराकोटीची विषमता, परात्मता आणि ती विसरायला दिलेली परधर्मद्वेषाची टेक्नो-फासीस्ट अस्मिता हिंदुत्व आणि जात-पितृसत्ता-लैंगिकता यांना वाढवणारी आहे.
३. हिंदुत्व: अस्मिताकारणाचे समाजशास्त्रीय पैलू
समाजशास्त्रीयदृष्ट्या हिंदू ही ऐतिहासिक संकल्पना आहे. मात्र, धर्मशास्त्रीयदृष्ट्या ती धर्म या संकल्पनेच्या कसोटीवर अपूर्ण ठरते. तसेच जातीव्यवस्थेने विभाजित हिंदू समुदाय हा सामाजिक संघटन आणि जीवनशैली म्हणूनही इतर धर्म समुदायांच्या तुलनेने शक्तिहीन ठरतो. हिंदूंना धर्म म्हणून संस्थापक नसणे, एकच धर्मग्रंथ नसणे, एकच प्रार्थना आणि उपासना पद्धती नसणे, एकच ईश्वर नसणे या बाबी अलाहिदा करूनही जातिव्यवस्थेची बंदिस्त आणि अनन्य रचना, जातीव्यवस्थेने लादलेली शोषणाची उतरंड आणि तिला अनुसरून येणारी सूडभावाची हिंदू समुदायांतर्गत क्रिया-प्रतिक्रिया या बाबी समाज आणि त्या बहुसंख्यांक समाजाचे राष्ट्र म्हणून भारत आणि त्याच्या राजकीय प्रणालीलाही कमकुवत बनवतात. डॉ. आंबेडकर म्हणतात कि,‘Hindu Society as such does not exist. It is only a collection of castes. Each caste is conscious of its existence. Its survival is the be-all and end-all of its existence. Castes do not even form a federation. A caste has no feeling that it is affiliated to other castes, except when there is a Hindu-Muslim riot. On all other occasions each caste endeavors to segregate itself and to distinguish itself from other castes. Each caste not only dines among itself and marries among itself, but each caste prescribes its own distinct.’
( Ambedkar B. R. Annihilationof Caste, Originally published in May, 1936, page 19 ) .जातीव्यवस्थेवर हल्ला करतांना डॉ. आंबेडकर हिंदू समाजातील विभाजनावर भाष्य करतात आणि जातीव्यवस्थाग्रस्त स्वराज्याला नवे दास्य म्हणून संबोधतात. शतखंडित हिंदू समाज आणि त्याचे विभाजित राष्ट्र याची वास्तविकता ते व्यक्त करतात.
‘हिंदू’ संकल्पना हि ब्रिटीश वसाहतवादाची देणगी असून तो एक प्रशासकीय कामकाजासाठी केलेला शब्दप्रयोग आहे. मध्ययुगात आणि त्यापूर्वीही भारतभूमीतील लोकांचा उल्लेख ‘हिंदू’ म्हणून केला गेलेला असला, तरी ती धार्मिक संकल्पना नाही. भारत भूमीत राहणारे शैव, वैष्णव, बौद्ध, जैन, लिंगायत इ. सर्व भौगोलिकदृष्ट्या अरब,फारसी इ.साठी ‘हिंदू’ होते. पण धर्म म्हणून ते हिंदू नसून भिन्न-भिन्न अस्मिता आणि ओळख घेऊन होते. ब्रिटीश राजवटीतील भारतीय उच्चजातवर्गीय अभिजनांच्या सत्तास्पर्धेत-नव्यानेच सुरु झालेल्या प्रशासकीय स्पर्धेसाठी-राजकीय प्रतिनिधित्वाच्या स्पर्धेसाठी जातीय अस्मितांमधील भिन्नत्व धूसर करत ‘हिंदू’ अस्मितानिर्माणाचा प्रयोग झाला. त्याचे प्रारंभिक ध्येय मुस्लिम अभिजनवादी अशरफ स्पर्धकांना प्रतिकार करणे व प्रशासकीय आणि राजकीय प्रतिनिधित्व मिळविणे हे होते. संख्याबळासाठी हिंदू अस्मितेच्या प्रयोगामध्ये मुस्लिमांना शत्रू लेखत हिंदू समुदायातील जातीय शोषण आणि पर्यायाने जातीनिहाय प्रतिनिधित्वाने होणारे सत्तेचे विभाजन टाळले गेले.
‘हिंदू हा धर्मच नसून सनातन धर्म हाच खरा धर्म आहे’, अशी जाहीर भूमिका काही वर्षांपूर्वी शंकराचार्य देवानंद सरस्वती यांनी घेतली होती(https://www.youtube.com/watch?v=M96p7LypDek).
सनातन धर्म हे नावही अपूर्ण असून तो श्रौत-स्मार्त-धर्म आहे. त्याच्या शब्दावलीतच जातीव्यवस्था आणि पितृसत्तेची उतरंड अधोरेखीत झालेली आहे (वंशसंहाराचे राजकारण, दुसरी आवृत्ती, ६ डिसेंबर,२००६,मा.फु.आ. कोओर्डीनेशन कमिटी, महाराष्ट्र, मलपृष्ठ).
हिंदुत्वाची वैचारिक जडणघडण हे मूलतः सनातनी-ब्राह्मण्य-जाती-पितृसत्तापोषक असून हिंदू धर्म आणि हिंदू धर्मीय हे त्यात सेवक आणि शोषित आहेत. म्हणूनच त्यांना हिंदुत्वाची जमातीय अस्मिता बहाल करतांना आभासी शत्रू आणि त्याचे सततचे अस्तित्व दाखवावे लागते. कारण, प्रतिक्रियावादी पर्यायी धर्मजाणिवेशिवाय शतखंडित-विभाजित हिंदू जनसमुदायाचे संघटन-मतपेढी शक्य नाही.
वासाहतिक हिंदुत्वाच्या अस्मिताकारणात ब्राह्मण्यकेंद्री राजकारणाने महत्वाची भूमिका पार पाडली. टिळकपुरस्कृत गणेशोत्सव आणि शिवजयंतीचा राजकीय उद्देश सत्यशोधक समाजाच्या बहुजनवादी राजकारणाला-सुधारणावादाला मागे खेचत मुस्लिमविरोधी सक्रीय कार्यक्रमपत्रिका देणारा राहिला होता. ((Rege, Understanding popular Culture : Satyashodhak and Ganesh Mela in Maharashtra, Sociological bulletin, Vol. 49, No.2, September, 2000, page 200). त्यातून ब्राह्मण्यसमर्थक राजकीय नेतृत्वाची ब्रिटीश राज्यकर्त्यांशी तडजोड करण्याची शक्ती वाढली. ही शक्ती हिंदू संघटन जातीविभाजित असल्याने खचितच शक्य नव्हती. त्यामुळेच ती मुस्लिमद्वेषाच्या सक्रीय उपक्रमशीलतेवर प्राप्त केली गेली. सत्यशोधक समाजकृत सुधारणावादी जात्यंतक-स्त्रीदास्यविरोधी हिंदू अस्मिता टिळकांच्या राजकारणाने आक्रमक आर्यन हिंदुत्वाकडे नेली. संसदीय सत्ताकारणात सत्यशोधक प्रभावातील ब्राह्मणेतर हिंदू अस्मितादेखील काहीशी मुस्लिमविरोधी झाल्याचे दिनकरराव जवळकरकृत ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकात निदर्शनास येते. हिंदू समुदायातील फुटीवर भाष्य करतांना ब्राह्मण पुरोहितशाहीवर हल्ला करतांना जवळकर इस्लामी धर्मांतरांवरही प्रखर टिका करतात (सत्यशोधक दिनकरराव जवळकर, देशाचे दुश्मन, सुमेध प्रकाशन, पुणे, पुनर्मुद्रण ऑक्टोबर २००५,पृष्ठ ११,१२).
४.राष्ट्रवाद आणि जमातवाद :
फाळणीची जमातीय दाहकता अनुभवत राष्ट्र म्हणून प्रशासन, न्याययंत्रणा आणि मुख्यत्वे संसदीय राजकारण निर्माण करतांना भारताची राष्ट्रीय प्रतीके आणि राष्ट्र म्हणून अस्मितानिर्मितीवर हिंदुत्वाचा प्रभाव राहिला. शासकीय कार्यालयांतील हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा, दिपप्रज्वलनाची शासकीय परंपरा, शाळा-कॉलेजांतील वैदिक प्रार्थना, शासकीय सुट्या, वंदे मातरम् ते हिंदीचाच आग्रह, उर्दू आणि अब्राह्मणी दाक्षिणात्य भाषांना डावलले जाणे, समान नागरी कायद्याचे राजकारण या घटकांनी राष्ट्र म्हणून हिंदू अस्मितेलाच उत्तेजन दिले. प्रतिनिधित्व आणि राष्ट्रप्रतिमा हि हिंदुत्वकेंद्री राहिली. संसदीय राजकारणात ती प्रतिमा जातीय शोषण सातत्याने सुरु राखण्यासाठी मुस्लिमविरोधी हिंदुत्वाची अस्मिता प्रसारित करणारी राहिली आहे. कॉंग्रेस या धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या पक्षाचीही प्रतिमा छुपी जमातवादी राहिली. कॉंग्रेस राजवटीत असंख्य दंगली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घडल्या. कॉंग्रेसचे उच्चजातवर्गीय सरंजामी नेतृत्व जातीय आणि त्यानंतर जमातीय -परधर्मविरोधी हिंसेतही अग्रेसर राहिले. कॉंग्रेसपुरस्कृत राष्ट्रीय अस्मितेच्या नावाखाली चालणाऱ्या हिंदुत्वाचा प्रभाव कॉंग्रेसच्याच नेतृत्वाने वेळोवेळी दाखविला आहे. कलेच्या क्षेत्रात कॉंग्रेसची प्रतिनिधी असणारी व्यक्तिमत्वे उघडपणे २०१४च्या सुमारास भा.ज.प.चे समर्थन करतांना दिसली. त्यातील सर्वाधिक धक्कादायक आणि चर्चिले गेलेले वक्तव्य हे तत्कालीन कॉंग्रेस शासनात राज्यसभेवर नियुक्त खासदार गायिका लता मंगेशकर यांचे होते. त्या टेलिव्हिजनवर जाहीररित्या म्हणाल्या, ‘अगर नरेंद्र भाई प्रधानमंत्री बनेंगे, तो मुझे ख़ुशी होगी’ (https://www.opindia.com/2022/02/lata-mangeshkar-narendra-modi-mutual-respect/). हा कार्यक्रम इंडिया टी.व्ही. वर २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी आयोजित केला गेलेला होता.
कॉंग्रेसपुरस्कृत अपूर्ण राष्ट्रीय अस्मिता निर्माणाच्या आणि हिंदुत्वापुढील शरणागतीचे हे द्योतक होते. त्यांनतर कलाकार, साहित्यिक,बुद्धिजीवींनी केलेल्या ‘पुरस्कार वापसी ‘ चळवळीने हिंदुत्वाच्या अस्मितेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु, समाजजीवनातील हिंदुत्वाच्या दाहक समीकरणांना बांध घालणे अशक्य ठरले. डाव्या चळवळीतील नेतृत्वानेही हिंदुत्व आणि त्याचा श्स्क्तीस्रोत असलेल्या जात-पितृसत्तेविरुद्ध उघड भूमिका घेतली नाही. पश्चिम बंगाल याएकेकाळी कम्युनिस्टशासित असलेल्या राज्याच्या सुभाश चक्रवर्ती या क्रिडा आणि परिवहन मंत्र्याने जाहीरपणे सांगितले होते कि, ‘मी आधी हिंदू आहे आणि नंतर ब्राह्मण आहे’ (https://www.news18.com/news/india/bengal-minister-revolts-with-worship-246773.html, NEWS18, 16th September, 2006 , 12:19 IST). नंदीग्राम आणि सिंगूरमधील कम्युनिस्ट शासनाच्या अत्याचारांना मुस्लिमद्वेषाची मोठी बाजू होती. जात्यंतक आणि आंबेडकरवादी म्हणविणाऱ्या लढाऊ शक्तींतील मोठ्या गटांनी शिव शक्ती-भीम शक्ती आणि जय भीम-जय मीम (MIM) हे राजकीय प्रयोग केले. त्यातून हिंदुत्वाची राजकीय शक्ती तर वाढलीच. शिवाय जात्यंतक-आंबेडकरवादी राजकीय पक्षांना फुटीचे ग्रहण लागले. दलित आणि ओ.बी.सी जनसमुहांत हिंदुत्वाची राजकीय अपरिहार्यता जोपासली जाऊन राजकीय-हिंदुत्ववादी उपक्रम बहाल केले गेले. विरोधी पक्षांची दुर्बलता हिंदुत्वाच्या सर्वांगीण अस्मितेला पोषक ठरली.
हिंदुत्वाच्याफॅसीझमला प्रचंड जनसमर्थन आणि व्याप्ती मिळण्याची काही कारणे आहेत. त्याची मुळे भारतीय समाजव्यवस्थेसोबतच भारतीय राज्य यंत्रणेच्या आणि धर्मनिरपेक्ष शक्तींच्या अपुरेपणातआहेत. परंतु, हिंदुत्वाचा फॅसिझम इतर सर्व फॅसिझमपेक्षा तुलनेने अधिक तीव्र आणि अधिक स्वसमूहभेदी, स्वराष्ट्रविघातक आहे.
५.हिंदुत्ववादीफॅसीझमची अनन्यता :
युरोपातील आणि जपानमधील फॅसीझमहा जातव्यवस्थाहीन होता. शतखंडित हिंदुत्वापेक्षा वर्गीय-वंशश्रेष्ठत्वाचा नॉर्डिक-शिंटो फॅसिझमराष्ट्रीय अस्मिता आणि निर्माणाच्या आघाडीवर अत्युच्च औद्योगिक प्रगती गाठणारा, विस्तारवादी आणि साम्राज्यवादी, वाढती व्यापारी व्याप्ती आणि मक्तेदारी ठेवणारा, सुदृढ नागरी जीवन आणि आरोग्याची हमी देणारा होता. त्यातील वर्गीय पितृसत्ता ही सुदृढ पुरुष अपत्यकेंद्री आणि स्त्रियांना माता-सैनिकांच्या सेवक-परिचारिका-डॉक्टर म्हणून किमान संधी देणारी होती. कालांतराने वर्गीय फॅसिझमने स्वराष्ट्रातील स्त्रियांना भांडवली स्पर्धेत लैंगिकतेच्या दृष्टीनेही उपयोगात आणले. अर्थातच, जाहिरातबाजीतील आणि सैन्यसेवांतील स्त्रिया या निम्नवर्गातील आणि बहुतांशी अल्पसंख्यांक समुदायांतील होत्या. तत्पूर्वी, वर्गीय फॅसिझमनेही या वर्ग-समूहांतील स्त्रियांवर लैंगिक हिंसा आणि मृत्यू लादले.
याउलट, हिंदुत्वाचा फॅसीझमब्राह्मण्यकेंद्री राहिल्याने आणि त्याला सनातन-श्रौत-स्मार्त धर्माच्या वर्जीततेचे (Exclusion) अधिष्ठान असल्याने हिंदुत्व फॅसिझम जातीय शोषणावर आणि निम्नजातीय समूहांच्या परात्मतेवर संवर्धित होतांना दिसतो. ब्राह्मण्यामध्ये स्वधर्मीय निम्नजातीयांवर शोषण लादत धर्मप्रसाराविना बंदिस्त जातीय चौकटी राखत सामाजिक प्रभुत्व कायम ठेवण्याची परंपरा आहे. सनातन ब्राह्मण्याला सिंधूभूमीतच मुबलक आणि हजारो वर्षे उपभोग्य अशी सुपीक जमीन, वेठबिगार (दास), अन्न, पाणी, दुधाल पशु, मांस, सुवर्ण आणि संसाधने सहज उपलब्ध असल्याने धर्मप्रसार-साम्राज्यविस्तार-समुद्रगमन हे वर्ज्य राहिले आहे. तसे केल्यास नव्या प्रदेशातील जनसमूहाचे समावेशन आणि अंकीतता टिकविण्याचे, तसेच नव्या जातीय समीकरणांचे प्रश्न निर्माण होतात. नव्या प्रदेशातील नवे जनसमूह स्पर्धक म्हणून उभे राहण्याचा धोकाही कायम राहतो. ब्राह्मणी धर्म हे टाळतो. म्हणूनच ‘जुने ते मोडू नये आणि नवे ते करू नये’, असा शिरस्ता ब्राह्मणी धर्मात दिसतो. ब्राह्मणी धर्माची पितृसत्ता हि जातीय असल्याने स्त्रीला फक्त मादी म्हणून तर बघितलेच जाते; याशिवाय पुरुष अपत्यांचा जन्मही योद्धे म्हणून नव्हे, तर जातीय सेवक म्हणून घडविला जातो. परिणामतः, स्त्रीला माता आणि पुरुष योद्धे देणारी जननी म्हणत गौरवान्वित करण्याचा अजेंडा रा.स्व.संघाला नाझी जर्मन फॅसिझमकडून आयात करावा लागतो. याव्यतिरिक्त, हिंदुत्व फॅसिझम नाझी विरुद्ध ज्यू या ऐतिहासिक संघर्षालाही विचारात न घेता इस्राइलचा अरबविरोधी आशय लक्षात घेत स्वदेशीसाठी त्याचा वापर करतो. हिंदुत्ववादीफॅसिझम राजकीय सत्ताकारण हे सामाजिक प्रभुत्वाचे साधन मानतो. हे प्रभुत्व सनातन ब्राह्मण्याच्या जातवर्गीय-पितृसत्ताक अधिसत्तेसाठी कार्यरत राहते.
६.हिंदुत्वाची सामाजिक पोकळी आणि तिची संसदीय पूर्तता :
इस्लामोफोबिया (Islamophobia)चा पुरेपूर राजकीय वापर करत जातीय प्रतीकांची उतरंड हिंदुत्वाच्या आक्रमक आशयाशी जोडली जाते. या राजकीय प्रक्रियेत ऐतिहासिक टप्पे आहेत. भ्रष्ट आणि हुकुमशाही समकक्ष असलेल्या कॉंग्रेस राजवटीविरुद्ध आणीबाणीत समाजवादी पक्षांनी जनसंघ या हिंदुत्ववादी पक्षाला राजकीय क्षितिजावर जागा करून दिल्याचे निरीक्षण ख्रिस्तोफे जाफरलॉट नोंदवतात (Jaffrelot, Chrostophe; Who Mainstreamed BJP ? The Indian Express, July 22, 2015). कालांतराने जनसंघ विकासमान होऊन आणि भा.ज.प.च्या विस्तारानंतर प्रादेशिक हिंदुत्वाशी आघाडी झाली. त्यात शिवसेना, बजरंग दल, कर्णी सेना, रणवीर सेना या प्रादेशिक हिंदुत्ववादी पक्ष-संघटनांचा सहभाग होता. या संघटना प्रादेशिक आणि उच्चजातवर्गीय अभिजनांच्या आहेत. या अभिजनांचे दलित, आदिवासी आणि निम्नजातीय समूहांशी शोषक-शोषित असे सामाजिक संबंध राहिले आहेत. या संबंधांना आरक्षणाच्या स्पर्धेची जोड आहे. या स्पर्धेची पूर्तता मुस्लिमविरोधातून जातीय प्रभुत्व टिकविण्यासाठी केली जाते.
७. हिंदू शतखंडित जनमानसाची ‘अगतिकता’ आणि ‘भक्त’ करणाची प्रक्रिया :
ब्राह्मण्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापत निम्नजातवर्गीय हिंदूंचे अपरिमित शोषण घडविले आहे. त्याचे पैलू आरक्षणाचा प्रश्न, जमातीय दंगली, अनारोग्य, शेतकरी आत्महत्यांचे जातीय पैलू, युद्ध , तसेच कोव्हिड काळातील मृत्यूचे थैमान या सर्वच बाबतीत दिसले आहे. जातीयवादाने आरोग्य यंत्रणा, सैन्यदले यांनाही ग्रस्त केले आहे. आरोग्यसेवेविना मरणाऱ्यांची आकडेवारी आणि शवांनी भरलेली गंगा जातीय-वर्गीय विषमतेची सांख्यिकी मांडत होती. समाजाच्या एका उच्चजातवर्गाला सर्व स्वातंत्र्य, सुरक्षा, सेवा आणि बहुसंख्यांक निम्नजातवर्गाला सक्तीचे सेवकत्व, उपेक्षितता, असुरक्षा, परात्मता यांतून निम्नजातवर्गीय हिंदूंची अगतिकता ठळकपणे दिसून येईल. या शोषणाला दृग्गोचर करू शकणाऱ्या शक्ती अब्राह्मणी सांस्कृतिक आशयापासून दूर आहेत. हिंदू जनमानसाचे प्रबोधन आणि विकासवादी राजकीय पर्याय या प्रक्रिया न झाल्याने शोषणग्रस्त हिंदू समुदाय असंतोष हा आभासी शत्रूविरुद्ध व्यक्त करतो. महागाई, आरक्षण,बेरोजगारी, अनारोग्य यांचे कारण मुस्लिम ठरविले जातात. त्यांना स्पर्धक मानले जाते. त्यांच्या राष्ट्रीय निष्ठेलाच संशयग्रस्त करत त्यांचे नागरी अधिकार पायदळी तुडविले जातात. दलित, आदिवासी आणि ईशान्य भारतीयांबाबतही हेच केले जाते. ही परजमातीवरील सुड्भावाची प्रक्रिया वास्तवात स्वजमातीय अभिजनांवर असायला हवी होती. पण, सूडभाव परजमातीवर पितृसत्ता आणि ब्राह्मणी राष्ट्रवाद वापरत प्रक्षेपित केला जातो. परजमातीप्रती असलेला सूडभाव, असुरक्षेची भावना हिंदत्वाचा फॅसिझम दैनंदिन कार्यक्रमपत्रिकेने अधिक दाहक करतो. त्यात उत्सवप्रियता, व्रतवैकल्ये, युवा मंडळांच्या स्पर्धा, सण, युद्धज्वर,स्थानिक जमातीय तणाव यांचा वापर करत मिडिया, आय.पी.एल., पोर्नोग्राफी, ऑनलाईन बेटिंग, सोशल मिडिया यांची जोड दिली जाते. हिंदूंना जातीय संघर्षाचा विसर पडतो. राष्ट्र आणि राष्ट्राचे आभासी दुश्मन- त्याच्यापासून रक्षण करणारा हिंदूसम्राट- त्याचे व्यापारी बॉस- त्याची जागतिक रणनीती आणि मास्टरस्ट्रोक्स- त्यासाठी (देशासाठी आणि देव-धर्मासाठीसुद्धा) खस्ता खाण्याची तयारी हिंदू अगतिकतेला ‘भक्त’ बनवते. भक्तांना तिरंगा प्रत्येक घरावर हवासा वाटतो. पण दलित शालेय विद्यार्थ्याचा खून शिक्षकानेच केलेला दिसत नाही. त्यांना पाकिस्तानला धडा शिकवायचा असतो. परंतु, काश्मिरी नागरिकांचे मन जिंकणे त्यांना ठाऊक नसते. बऱ्याचदा ते ठरवूनसुद्धा मोहल्ल्यातील जुन्या मित्रांशी संवाद करायला जाऊ शकत नाहीत. कारण, भक्तांवर स्वकुटुंबातील स्त्रियांच्या इज्जतीला आभासी धोका म्हणून मुस्लिमप्रतिमा बिंबविण्यात येतात्त. त्यांना गावात येणाऱ्या शहीद सैनिकाच्या शवात फक्त मुस्लिम शत्रू दिसतो. मात्र, स्थानिक मुस्लिमांचे देशाच्या जी.डी.पी. मधील योगदान आणि स्वस्तातील श्रम, असुरक्षा दिसू दिली जात नाही. भक्त गोरक्षक बनतात. मात्र, आशियाचा सर्वात मोठा कत्तलखाना एका हिंदूचा असल्याचे त्यांना माहितच पडू दिले जात नाही.
उद्धव ठाकरेंचा पद सोडतांना झालेला सोहळा आणि एकनाथ शिंदेंचे ‘खरा हिंदू-खरा शिवसैनिक’ म्हणून आगमन या दोन्हीही हिंदुत्वकेंद्री-सत्ताकारणात्मक बाबी हिंदूंना कमी-अधिक प्रमाणात भक्त बनवून ठेवतात. ‘मोदींचा पर्याय योगी’ ही राजकीय खेळीही हिंदुत्व फॅसिझमची मर्यादा अधिक स्पष्ट करते. हा फॅसिझम विकासवादी तर नाहीच. शिवाय ज्ञानव्यवहारावरील जातीय निर्बंधांची मानसिकता-आणि ज्ञानव्यवहारही अशास्त्रीय-अवैज्ञानिक-सनातनी-जातपितृसत्ताक असा असल्याने हिंदुत्ववादी फॅसिझमकडे ज्ञानी राजकीय नेतृत्व नाही. चांगले अर्थतज्ज्ञ, परराष्ट्र संबंधांचे जाणकार, राजकीय कूटनीतीज्ञ, इतिहासकार, शास्त्रज्ञ,संशोधक तसेच साहित्यिक, कलाकार, अभिनेते, पर्यावरणतज्ज्ञ यांची वानवा आहे. कारण, हिंदुत्ववादी फॅसिझमच्या प्रभुत्वाचे लक्ष्यकेंद्रच मूलतः मुठभर उच्चजातीय अभिजनकेंद्री आहे. त्याला युरोपमधील फॅसिझमप्रमाणे राष्ट्रनिर्माण,औद्योगिक विकास, साम्राज्यवाद, सुदृढ नागरिक यात अजिबात रस नाही. परिणामी, हिंदुत्ववादी फॅसिझमची भांडवली प्रगती अदानी-अंबानीकेंद्री राहते. त्यात कलाकार आणि साहित्यिक भीतीग्रस्त राहतात. आणि बॉलीवूडसह सर्वच कलाप्रकार, क्रीडा, सैन्य दले, नागरी आरोग्य यांना हानी पोहचते. विकास होतो, तो मात्र शोषणाच्या प्रक्रियेचा आणि मुठभर अभिजनांचा. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला हिंदुत्ववादी फॅसिझमने उध्वस्त केले आहे. भक्तांची राजकीय कोंडी व भारत राष्ट्राचे जागतिक स्थान या बाबी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर येणाऱ्या काळात अत्यधिक संवेदनशील असतील, यात शंका नाही !
इनायत परदेशी, टाटा सामाजिक विज्ञान संशोधन संस्थेत सहायक संशोधक म्हणून कार्यरत होते.
*संदर्भ :
१.सत्यशोधक दिनकरराव जवळकर, देशाचे दुश्मन, सुमेध प्रकाशन, पुणे, पुनर्मुद्रण, ऑक्टोबर २००५
२.वंशसंहाराचेराजकारण, दुसरीआवृत्ती, ६डिसेंबर,२००६,मा.फु.आ. कोओर्डीनेशनकमिटी, महाराष्ट्र
३.. महाले, कु.ल.; मनूचा मासा,लोकवाण्गमय गृह प्रकाशन, मुंबई, १९८०
४.Ambedkar B. R. AnnihilationofCaste, originally published in May, 1936, Columbia University Centre For New Media Teaching and Learning (Booklet)
५.Brass, Paul R.; Language,Religion and Politics in North India, 1st Published in India, Vikas Publishing House PVT. LTD., Kanpur, 1975
६.Rege, Sharmila; Understanding popular Culture : Satyashodhak and Ganesh Mela in Maharashtra, Sociological Bulletin, Vol. 49, No.2, September, 2000
७.Deshpande, Haima; Sena-Congress ‘Friendship’ Goes Back 50 Years: Story of Helping Each Other Grow In Mumbai, The Print, 14th November, 2019
८. JaffrelotChrostophe, Who Mainstreamed BJP ? The Indian Express, July 22, 2015
९.The Indian Express, 30th November,2018, Mumbai
१०. लोकसत्ता, ८जून, २०२२, मुंबई
११. The Times of India, 13th May, 1991, Delhi
COMMENTS