हिंदुत्ववादी नेता धनंजय देसाईचे, सुटकेनंतर लगेच जामिनाच्या अटींचे उल्लंघन!

हिंदुत्ववादी नेता धनंजय देसाईचे, सुटकेनंतर लगेच जामिनाच्या अटींचे उल्लंघन!

२०१४ च्या मोहसीन शेख खून प्रकरणातील मुख्य आरोपी धनंजय देसाई याची ९ फेब्रुवारी रोजी जामिनावर सुटका झाली.

अंटार्क्टिकातही कोविडचा संसर्ग; वन्यजीवनाला धोका
चारधाम यात्रा रद्द; उत्तराखंड हायकोर्टाचा निर्णय
मंत्र्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश द्यावेतः हायकोर्टात मागणी

मुंबई: हिंदू राष्ट्र सेनेचा (एचआरएस) नेता धनंजय देसाई याची जामिनावर सुटका करण्याचा आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाने जामिनासाठी कडक अटी घातल्या आहेत. आयटी इंजिनियर मोहसीन शेख याच्या साडेचार वर्षांपूर्वीच्या खुनाच्या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या देसाई याला खटला संपेपर्यंत कोणत्याही स्वरूपातील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यास आणि कोणत्याही संघटनांचे, विशेषतः एचआरएसचे संचालन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती साधना जाधव यांनी देसाईला जामीन मंजूर करताना असे नमूद केले आहे, की: “अर्जदार हिंदू राष्ट्र सेना किंवा अन्य कोणत्याही संघटनेद्वारे आयोजित किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही सार्वजनिक/ राजकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारे सामील होणार नाही.”

तथापि, ९ फेब्रुवारी रोजी येरवडा तुरुंगातून त्याची सुटका झाल्यानंतर लगेच या आदेशाचे उल्लंघन केले गेले.

येरवडा सेंट्रल जेल पासून पौड गावातील त्याच्या घरी जाणारा रस्ता मोठ्या संख्येने कार आणि बाईक घेऊन आलेल्या त्याच्या समर्थकांनी जवळजवळ एक तास अडवून ठेवला होता. हे सर्व समर्थक सर्व काळ “जय श्री राम” अशा घोषणा देत होते.

https://www.facebook.com/kalambolikar143/videos/1489694947831574/?t=0

एचआरएसचे सदस्य इतके उत्तेजित झालेले होते की त्यांनी रस्त्यावर फटाक्यांचे आवाज करत, भगवे झेंडे फडकवत मिरवणूक काढली. देसाई सार्वजनिक सभेत काहीही बोलला नाही, मात्र त्याच्या समर्थकांनी “जय हिंदू राष्ट्र”च्या घोषणांनी त्याचे अस्तित्व जाणवून दिले.

त्याच्या समर्थकांनी ही मिरवणूक समाजमाध्यमांमधूनही प्रसारित केली. असे करण्यालाही उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायमूर्ती जाधव यांनी जामिनाच्या प्राथमिक अटी म्हणून देसाईला खालील गोष्टींची हमी देण्यास भाग पाडले आहे.

“मी (देसाई) खटला समाप्त होईपर्यंत व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इ. सारख्या कोणत्याही समाजमाध्यमांवर कोणत्याही प्रकारे, कोणत्याही संघटनेसाठी कोणतीही भाषणे किंवा मुलाखती किंवा बाईट प्रसिद्ध/प्रसारित करणार नाही.”

https://www.facebook.com/vinod.jawalkar.16/videos/1172120282957575/?t=0

https://www.facebook.com/1835493950026312/videos/806668863003032/?t=0

मोहसीनचा लहान भाऊ मुबीन याने द वायरला सांगितले की देसाई खून आणि दंगलीतील आरोपी असूनही त्याला आणि त्याच्या समर्थकांना ज्या प्रकारे सार्वजनिकरित्या शक्तिप्रदर्शन करू दिले ते धक्कादायक आहे. “न्यायालयाने स्पष्टपणे मनाई करूनही खुनाच्या आरोपीला असे रस्त्यावर भव्य प्रदर्शन करू दिले जाते, त्याला आणि त्याच्या समर्थकांना अशी चिथावणीखोर मिरवणूक काढू दिली जाते हे हताश करणारे आहे,” सोलापूरहून फोनवर द वायरशी बोलताना तो म्हणाला.

देसाईच्या सुटकेनंतर लगेच येरवडा पोलिसांनी त्याच्यावर आणि त्याच्या समर्थकांवर दंगल करणे आणि बेकायदेशीरपणे एकत्र जमणे यासाठीच्या अनेक अजामीनपात्र कलमांखाली आरोप दाखल केले, पण अजूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ज्या हडपसर पोलिस स्टेशनमध्ये शेखच्या खुनाचा तपास करण्यात आला होता, तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी घटनेला दुजोरा दिला. “त्याच्या सुटकेनंतर लगेच त्याची माणसे येरवडा जेलच्या बाहेर जमा झाली आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. देसाईसकट सहभागी असणाऱ्या सर्वांवर दंगल करणे आणि बेकायदेशीर जमाव जमवण्यासाठी भारतीय दंडसंहितेतील इतर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला,” लोंढे म्हणाले.

पोलिस जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दाद मागतील का याबाबत मात्र त्यांनी टिप्पणी केली नाही. “तो निर्णय पोलिस कमिशनर पातळीवर घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

२ जून २०१४ रोजी झालेल्या शेखच्या हत्येमागचा सूत्रधार म्हणून एका लहान गटाचा नेता असलेल्या देसाईचे नाव पुढे आले. शेखचा भाऊ, मुबीन हा प्रकरणी तक्रारदार आणि महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याच्या सांगण्यानुसार तो आणि मोहसीन तसेच इतर काही मित्र हडपसर येथील एका मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी गेले असताना मशिदीच्या बाहेर माणसांचा एक मोठा जमाव जमा झाला. या लोकांनी देसाईच्या आदेशावरून हल्ला केला असे आरोपपत्रामध्ये नमूद केले आहे.

मोहसीन आणि रियाज यांचा पठाणी शर्ट आणि डोक्यावरची टोपी यामुळे त्यांची धार्मिक ओळख स्पष्ट होत होती. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या छोट्या रस्त्यांवरून मोहसीन आणि रियाजचा पाठलाग करत हॉकी स्टिकने त्यांना मारले. रियाज पळून जाऊ शकला, मात्र एका हल्लेखोराने सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारल्याने मोहसीनचा बळी गेला.

मोहसीन शेख

मोहसीनचा एकतीस वर्षांचा लहान भाऊ मुबीन हा सोलापूर या त्यांच्या मूळ गावी एका खाजगी फर्ममध्ये नोकरी करतो. तो म्हणाला, आमच्या कुटुंबावर एकामागोमाग एक संकटे कोसळत आहेत. कुटुंबातील तरुण मुलगा असा जमावाच्या द्वेषाला बळी पडल्याच्या धक्क्यातून सावरणे कठीण आहे.

“त्या दिवशी आमच्या कुटुंबातला मुलगाच फक्त गेला नाही तर कुटुंबाचा आनंदाचा ठेवाच आम्ही गमावला. भाई (मोहसीन) आमच्या कुटुंबासाठी आशेचा किरण होता. तो अतिशय हुशार होता आणि त्याच्या कुटुंबावर त्याचे अत्यंत प्रेम होते. आम्ही मोठे होऊन आर्थिक भार उचलायला लागल्यानंतर आमचे पालक, विशेषतः आमचे वडील आता आयुष्य थोडे आरामदायी होईल अशी आशा करत होते,” मुबीन म्हणाला.

शेखचे वडील मोहम्मद सादिक यांचे दीर्घ हृदयविकाराने डिसेंबरमध्ये निधन झाले.

आता जवळजवळ पाच वर्षे झाली आहेत परंतु खटल्यामध्ये फारशी प्रगती नाही. अटक झालेल्या २१ आरोपींपैकी देसाईंसकट १९ जण आता जामिनावर बाहेर आहेत. सादिक यांच्या आग्रहामुळे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या केसवर नियुक्त केले होते. परंतु निकम हे कोणतेही स्पष्ट कारण न देता केसमधून बाहेर पडले. २०१७ मध्ये देसाईने सुटकेकरिता दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयाने सुनावणीला स्थगिती दिली.

शेख यांच्या वतीने न्यायालयात लढणारे मानव अधिकार कार्यकर्ता अझर तांबोळी म्हणाले त्याचा मृत्यू नेमका २०१४ मध्ये भाजप सरकार बनत असतानाच झाला आणि हे सरकार पडत नाही तोपर्यंत न्याय मिळण्याची कोणतीही आशा नाही. “या खटल्यातल्या घडामोडी पहा. सरकारी पक्षाला मोहसीनला न्याय मिळवून देण्यामध्ये स्वारस्यच नाही असे दिसते. देसाई ही जामिनावर सुटणारी १९ व्यक्ती आहे. त्याआधी १८ हल्लेखोर असेच सुटले आहेत. खटल्याची सुनावणी होण्याबाबत शासनाने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत,” तांबोळी म्हणतात. ते या प्रकरणातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतात आणि जामिनापासून ते एफआयआर रद्द करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक अर्जाचा न्यायालयामध्ये विरोध करतात.

तांबोळी म्हणाले की ते आणि शेख कुटुंबियांना देसाईने उच्च न्यायालयात जामिनाकरिता अर्ज केल्याचे माहित नव्हते. “आरोपींकडून कोणताही अर्ज आला की आम्ही त्याबाबत हस्तक्षेप करत असतो. पण हा अर्ज देसाईच्या वकिलांनी गुपचूप केला आणि सरकारी पक्षानेही आम्हाला त्याबाबत काहीच सांगितले नाही. जामीन दिला गेल्यानंतरच आम्हाला त्याबाबत समजले,” ते म्हणाले.

याच न्यायालयाने २०१६ मध्ये त्याने “मुस्लिमांविरुद्ध धार्मिक आधारावर युद्ध छेडण्याचे आवाहन केले होते” असे कारण देऊन देसाईला जामीन नाकारला होता.

“१९.१.२०१४ रोजी, परवानगी नाकारलेली असतानाही हिंदू राष्ट्र सेनेने जाहीर सभा घेतली आणि या अर्जदाराने त्यामध्ये भाषण दिले. त्या भाषणात त्याने मुस्लिमांच्या विरोधात हिंदूंमध्ये द्वेषाची भावना निर्माण केली. त्याची भाषा केवळ हिंसकच नव्हती तर अर्जदाराने घटनाबाह्य भाषण केले होते. सदर भाषण लिखित स्वरूपात आरोपपत्राचा भाग आहे. लोकांना धार्मिक आधारावर मुस्लिमांविरुद्ध युद्ध छेडण्याचे आवाहन करण्यात आले होते. समाजातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात होता,” असे २०१६ मध्ये न्यायमूर्ती जाधव यांनी नमूद केले होते.

तांबोळी म्हणाले की त्याच न्यायालयाने तीन वर्षांनंतर जामीन मंजूर करणे हे धक्कादायक आहे. “आणि देसाई मुक्त झाल्यानंतर लगेच सांप्रदायिक विखार भडकवणाऱ्या तशाच हिंसक कार्यक्रमात सहभागी होतो, ज्याबाबत न्यायालयाने २०१६ मध्ये चिंता व्यक्त केली होती. ही खेदजनक घटना आहे.”

मोहसीनच्या मृत्यूनंतर लगेच, त्याच्या कुटुंबाने चव्हाण यांची भेट घेतली होती. मुबीन दावा करतो की त्यांनी त्याला सरकारी नोकरीचे आश्वासन दिले होते. सोलापूरमधील स्थानिक आमदारानेही कुटुंबाला आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते. “मी शक्य त्या सर्व राजकीय नेत्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना शेकडो पत्रे लिहिली आहेत.  आम्हाला ना नोकरीची संधी मिळाली ना आर्थिक मदत. ही लढाई लढतच माझ्या वडिलांचाही मृत्यू झाला. आणि माझी आई तेव्हापासून सतत आजारी असते,” मुबीनने द वायरला सांगितले.

त्याने पुढे सांगितले की तो त्याच्या वकिलांचा सल्ला घेऊन देसाईच्या सुटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा विचार करत आहे. तो म्हणतो,“तुरुंगात राहूनही त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नसल्याचे दिसते. ज्या क्षणी त्याची सुटका झाली, त्याच क्षणी त्याने लोकांच्यात द्वेष पसरवण्याचे तेच उद्योग पुन्हा चालू केले. आम्ही हे सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस आणून देऊ.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0