हिंदुत्व शिकवू नये; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना प्रत्युत्तर

हिंदुत्व शिकवू नये; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना प्रत्युत्तर

मुंबईः महाविकास आघाडी सरकारने बार उघडलेत मग अजून मंदिरे बंद का, या राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलेल्या प्रश्नाव

ग्रेटा थनबर्गच्या टुलकिटवर गुन्हा
महेंद्र सिंग धोनीः कप्तान ते यशस्वी व्यवस्थापक
प्रिया रामाणी, सीता आणि अहिल्या

मुंबईः महाविकास आघाडी सरकारने बार उघडलेत मग अजून मंदिरे बंद का, या राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलेल्या प्रश्नावरून मंगळवारी राज्याचे राजकारण पुन्हा घुसळून गेले. या दोघांमधील वाद राष्ट्रवादी काँग्रेसने थेट पंतप्रधान मोदींपर्यंत गेला.

मंगळवारी राज्यातील मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करावीत म्हणून भाजपने राज्यात आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घटनात्मक पदावर बसलेल्या कोश्यारी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना मंदिरे खुली करण्यास सांगणारे पत्र लिहिल्यानंतर राजकारण पेटले.

राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, असे सांगत, ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तीच भूमिका आता घेतली का, असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला. त्याचबरोबर बार, रेस्तराँ आणि समुद्र किनारे खुले होतात. पण, दुसरीकडे देव- देवतांना मात्र लॉकडाऊनमध्ये राहावं लागत आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला होता.

दुपारी हे पत्र मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही असे खरमरीत उत्तर दिले.

तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहून राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना असे पत्र लिहून राज्यघटनेची चौकट मोडल्याचे मत त्यात व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रातील मजकूर खालीलप्रमाणेः

माननीय राज्यपालमहोदय , महाराष्ट्र राज्य यांसी –

जय महाराष्ट्र,

महोदय आपले दिनांक १२/१०/२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी ‘ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.
महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही .
Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?
मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.
आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तीनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र .
आपला नम्र –
उद्धव ठाकरे.

पवारांचा आक्षेप

राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यातल्या वादावर शरद पवार यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात परखड मत व्यक्त करताना राज्यपालांची भाषा त्यांच्या पदाला शोभत नाही. त्यांनी मुख्यमंत्र्याने लिहिलेल्या पत्रातील भाषेचा प्रयोगही योग्य वाटत नाही. राज्यात धार्मिक स्थळे उघडली नाहीत म्हणून सेक्युलर ठरवून अवहेलना करणार का, असा सवाल उपस्थित केला.

राज्यपालांनी राज्यातील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, मुंबईतील प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवता येणे अशक्य आहे. सरकार टप्याटप्प्याने धार्मिक स्थळे उघडण्याचा प्रयत्न करत आहे, असे पवारांनी पत्रात लिहिले आहे.

राज्यघटनेच्या सरनाम्यात सेक्युलर शब्दाचा समावेश आहे, राज्यपालांनी याकडे दुर्लक्ष करत घटनेची चौकट ओलांडली आहे. हे पत्र राज्यपालांचे वाटत नसून एखाद्या नेत्याचे वाटत असल्याचीही टीका पवारांनी या पत्रात केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: