सावरकरांचे चरित्रकार संपत यांच्यावर साहित्यचोरीचे आरोप

सावरकरांचे चरित्रकार संपत यांच्यावर साहित्यचोरीचे आरोप

संपत यांच्या लेखातील सुमारे ५० टक्के भाग साहित्यचोरी शोधणाऱ्या सॉफ्टवेअरद्वारे पकडला गेला आहे आणि यातील सुमारे निम्मी चोरी बाखले व चतुर्वेदी यांच्या लेखांतून केलेली आहे.

बूट शोधणारी माणसं
बंगळुरू ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्यास सुप्रीम कोर्टाची मनाई
कुंभमेळ्याच्या गर्दीकडे मोदी सरकार, मीडियाचे सोयीस्कर दुर्लक्ष

हिंदुत्ववादी नेते विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र लिहिणाऱ्या विक्रम संपत यांच्यावर, अमेरिकास्थित तीन भारतीय इतिहासकारांनी, साहित्यचोरीचा आरोप केला आहे. संपत यांनी सावरकरांचे चरित्र दोन खंडांमध्ये लिहिले आहे.

संपत यांच्या २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांतील अनेक वाक्ये दोन लेखांमधून जशीच्या तशी उचललेली आहेत किंवा मूळ लेखकांना श्रेय न देता वापरलेली आहेत, असे जॉर्जटाउन विद्यापीठातील प्राध्यापक अनन्या चक्रवर्ती, सँटा क्लारा विद्यापीठातील प्राध्यापक रोहित चोप्रा आणि रटगर्स विद्यापीठातील ऑड्रे ट्रश्क यांनी, ब्रिटनमधील रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीच्या (आरएचएस) अध्यक्ष एमा ग्रिफिन यांच्या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. आरएचएसने नुकतेच संपत यांना सदस्यत्व दिले आहे.

यातील पहिला लेख युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील इतिहासकार विनायक चतुर्वेदी यांचा असून, ‘अ रिव्होल्युशनरीज बायोग्राफी: द केस ऑफ व्ही. डी. सावरकर’ असे त्याचे शीर्षक आहे. हा लेख २०१३ मध्ये पोस्टकलोनियल स्टडीज या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. दुसरा लेख कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक जानकी बाखले यांनी लिहिलेला आहे. ‘सावरकर (१८८३-१९६६), सेडिशन अँड सर्व्हायलन्स: द रुल ऑफ लॉ इन ए कलोनिअल सिच्युएशन’ या शीर्षकाचा हा लेख सोशल हिस्टरी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता.

संपत यांच्या चरित्रातील एक उतारा पॉल स्कॅफल यांच्या २०१२ मधील प्रबंधातून उचललेला आहे, असेही या तीन इतिहासकारांनी नमूद केले आहे. हे साहित्यचौर्य आहे, कॉपीराइट नियमांचे उल्लंघन आहे तसेच आरएचएसच्या आचारसंहितेचाही भंग आहे. त्यामुळे संपत यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संपत यांनी मात्र द वायर’ला केलेल्या ईमेलद्वारे हे सगळे आरोप फेटाळले आहेत आणि त्यांनी त्यांच्या कामाच्या सर्व संदर्भांचे श्रेय संबंधितांना दिले आहे, असा दावा केला आहे. या पत्रातील आरोप निंदनीय आहेत आणि याबद्दल द वायर’सह सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

द वायर’ने चतुर्वेदी आणि बाखले यांच्याशीही संपर्क करून, त्यांची प्रतिक्रिया मागितली. यापैकी बाखले यांचे उत्तर अद्याप आलेले नाही. चतुर्वेदी म्हणाले, “हे फारच निराशाजनक आहे. सावरकर ज्ञानाच्या निर्मितीबाबत उच्च नीतीमूल्ये मानत होते हे त्यांच्यावर काम करणाऱ्या सर्वांना माहीत आहे. वाचकांनी दोन्ही लेख शेजारीशेजारी ठेवून वाचावेत अशी विनंती मी करेन.”

चतुर्वेदी यांच्या लेखाची सुरुवात:

हिंदू राष्ट्रवादाचे बौद्धिक संस्थापक म्हणून, वि. दा. सावरकर विसाव्या शतकातील सर्वांत वादग्रस्त राजकीय विचारवंत ठरले. हिंदुत्वावरील त्यांच्या लेखनाने अनेकांचे लक्ष, अनेक दशके, वेधून घेतले आहे. भारतातील क्रांतिकारी विचारांच्या अन्वयार्थाचे मूळ पाश्चिमात्य मार्क्सवादी विचारात आहे, त्यामुळे सावरकर क्रांतिकारी होऊ शकत नव्हते किंवा क्रांतिकारी विचारांत त्यांचे योगदान नव्हते असे गृहीत धरले जाते. त्यांची क्रांतिकारी विचारांची समज ही मार्क्सवादी परंपरेतून नव्हे, तर इटालियन राजकीय विचारवंत जोसेप मॅझिनी यांच्या लेखनातून आलेली आहे.”

संपत यांच्या लेखाची सुरुवात:

ज्याला ‘हिंदू राष्ट्रवाद’ असे संबोधले जाते, त्या विचाराचे बौद्धिक शिखर व संस्थापक विनायक दामोदर सावरकर २०व्या शतकातील सर्वांत वादग्रस्त राजकीय विचारवंत म्हणून उदयाला आले. त्यांच्या हिंदुत्ववादी लेखनाबद्दल दीर्घकाळापासून आकर्षण आहे… आपण भारतीय क्रांतिकारी विचाराचे मूळ पाश्चिमात्य मार्क्सवादी परंपरेत आहे असा अन्वयार्थ आपण नेहमीच काढत आलो आहोत. म्हणूनच सावरकर क्रांतिकारक होते आणि क्रांतिकारी विचारधारेतही योगदान देत होते हे स्वीकारणे इतिहासकारांना कठीण जाते. सावरकरांचे प्रेरणास्थान, कार्ल मार्क्स व मार्क्सवादी विचारसरणीतील अन्य नेते नव्हे, तर इटलीतील राजकीय विचारवंत जोसेप मॅझिनी हे होते.”

संपत यांनी संदर्भसूचीत चतुर्वेदी यांच्या लेखाचा उल्लेख केला असला, तरीही हा मजकूर त्यांचे उद्धृत म्हणून दिलेला नाही. संपत यांच्या इंडिया फाउंडेशन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखातील वाक्प्रचार चतुर्वेदींच्या लेखातील वाक्प्रचारांप्रमाणेच आढळल्याचे इतिहासकारांनी आरएचएसला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

डॉ. संपत यांनी त्यांच्या लेखाचा संदर्भ दिला आहे पण त्यांचा मध्यवर्ती प्रबंध मोठ्या प्रमाणात चतुर्वेदी यांच्या आधीच्या लेखावरून उचललेला आहे याचे श्रेय ते देत नाहीत,” असे पत्रात म्हटले आहे.

कॉलेजमधील विद्यार्थी, साहित्यचौर्याच्या सॉफ्टवेअरमध्ये सापडू नये म्हणून, थोडे फेरफार करून मोठ्या लेखकांचे शब्द वापरतात तसाच प्रकार संपत यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संपत यांच्या लेखातील सुमारे ५० टक्के भाग साहित्यचौर्य शोधणाऱ्या सॉफ्टवेअरद्वारे पकडला गेला आहे आणि यातील सुमारे निम्मी चोरी बाखले व चतुर्वेदी यांच्या लेखांतून केलेली आहे, असेही पत्रात नमूद आहे. सावरकरांच्या चरित्रातील उचललेला भाग तपासला असता, डॉ. चतुर्वेदी यांच्यासारख्या प्रस्थापित विद्वानासोबतच आर. सी. मजुमदार यांच्यासारख्या दिवंगत इतिहासकारांच्या लेखातूनही संपत यांनी उचलेगिरी केल्याचे आढळले, असे इतिहासकारांनी म्हटले आहे. संपत यांनी दिवंगत पदवी विद्यार्थ्यांच्या लेखांतूनही उचलेगिरी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

चरित्राचा पहिला खंड आणि पॉल स्कॅफल यांनी २०१२ सालात सादर केलेल्या प्रबंधाची तुलना केली असता, अनेक परिच्छेद खूपच सारखे आढळल्याचे इतिहासकारांनी नमूद केले आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी पुस्तकातील व प्रबंधातील परिच्छेद दिलेही आहेत. डॉ. संपत यांनी या प्रबंधाचा संदर्भ एक पीएचडी डिझर्टेशन म्हणून चुकीच्या पद्धतीने दिला आहे. मात्र, श्री. स्कॅफल यांना श्रेय दिलेले नाही, असे इतिहासकारांनी नमूद केले आहे. नियमभंगाचे अनेक दाखले आपल्याकडे आहेत. मात्र, त्याचा केवळ नमुना सुरुवातीला आरएचएसकडे देत आहोत, असा इतिहासकारांचा दावा आहे. यावरून सोसायटीने संपत यांच्या सदस्यत्वाबद्दल फेरविचार करावा आणि त्यांचे काम चाळणीखाली घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे.

संपत यांनी आरोप फेटाळले

संपत यांनी मात्र या इतिहासकारांना साहित्यचौर्य व कॉपीराइट या संकल्पनाच कळलेल्या नाहीत, असा प्रत्यारोप करत त्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. इंडिया फाउंडेशन जर्नलमधील लेख हा अकॅडमिक स्वरूपाचा नव्हता, तर केवळ भाषणाचे ट्रान्स्क्रिप्ट होते असा त्यांचा दावा आहे. यात आपल्या लेखनासोबत अन्य अनेक लेखकांच्या लेखनाचा संदर्भ घेतला होता. इंडिया फाउंडेशनची वेबसाइट बघितली तरी विनायक चतुर्वेदी यांना श्रेय दिल्याचे लक्षात येईल, असे संपत यांनी द वायर’ला सांगितले.

स्कॅफल यांच्या प्रबंध व चरित्राचा पहिला खंड यांतील साम्याबाबत संपत म्हणाले की, स्कॅफल व आपण एकाच लेखकाच्या लेखाचा संदर्भ घेतल्यामुळे ते साम्य दिसत आहे.

संपत यांनी संदर्भसूचीत लेखांची नावे घातली आहेत पण विशिष्ट भागासाठी कोणालाही श्रेय दिलेले नाही, असा इतिहासकारांचा आरोप आहे.

काही तथ्ये तर सावरकर यांच्यावरील सर्व लेखांत समान असतील. साहित्यचौर्याचा आरोप होऊ नये म्हणून मी सावरकरांना मर्सिल्सऐवजी जर्मनीच्या नॉर्थ कोस्टजवळ असताना जहाजातून उडी मारायला लावू शकत नाही,” असे संपत म्हणाले.

बाखले यांच्या लेखातील मजकूर उचलल्याप्रकरणी संपत म्हणाले की, बाखले यांनी स्वत: आपल्या पुस्तकांचे परीक्षण २०१९ मध्ये केले होते आणि त्यांनी असे काही मत व्यक्त केलेले नाही. जर त्यांना यात चौर्य वाटले नाही, तर अन्य कोणी तसे म्हणण्याचा प्रश्नच नाही, अशा आशयाचे मत संपत यांनी व्यक्त केले. हा सगळा प्रकार केवळ आपल्या बदनामीच्या हेतूने केला जात आहे, असा आरोप संपत यांनी केला.

इतिहासकारांद्वारे आरोपांची पाठराखण

द वायर’ने संपत यांची प्रतिक्रिया तिन्ही इतिहासकारांना कळवली असता, त्यांनी आपल्या आरोपांचे समर्थन केले. ट्रस्क यांच्या मते विद्यापीठांमध्ये साहित्यचौर्याचे तीन मूलभूत प्रकार मानले जातात: स्रोताच्या भाषेतील मजकूर उद्धृत म्हणून न देता तसाच वापरणे, स्रोताला श्रेय न देता माहिती वापरणे आणि स्रोताच्या लेखनाचे शब्द बदलून आशय मूळ लेखनाच्या जवळचा राहील असे करणे.

चक्रवर्ती यांच्या मते, त्यांच्या विद्यापीठाच्या आचारसंहितेप्रमाणे डॉ. संपत यांचे काम साहित्यचौर्यात मोडते. एखाद्या व्यक्तीच्या लेखातील शब्द त्याला थेट श्रेय न देता वापरणे ही अत्यंत चुकीची पद्धत समजली जाते आणि डॉ. संपत यांच्या कामात हा प्रकार दिसून येतो. चक्रवर्ती यांनी, दिवंगत इतिहासकार आर. सी. मजुमदार यांच्या कामातील काही मजकूर शब्दश: वापरल्याचे आणखी एक उदाहरणही दिले.

चोप्रा यांचे उत्तरही असेच होते. हेतूत: न केलेले साहित्यचौर्यही साहित्यचौर्यच समजले जाते, असे ते म्हणाले. यूजीसीने  भारतीय विद्यापीठांसाठी दिलेल्या साहित्यचौर्याच्या निकषांनुसारही ते चौर्यच आहे, असेही चोप्रा यांनी नमूद केले आहे.

इंडिया फाउंडेशन जर्नलमधील लेख हे ट्रान्स्क्रिप्ट‘?

इंडिया फाउंडेशन जर्नलमधील लेख अकॅडमिक स्वरूपाचा नव्हता, तर हे केवळ एका भाषणाचे ट्रान्स्क्रिप्ट होते हा डॉ. संपत यांचा बचाव लंगडा आहे, असे मत चक्रवर्ती यांनी व्यक्त केले आहे. हे साहित्यचौर्याचा आरोपाला उत्तर होऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

विक्रम संपत यांनी स्वातंत्र्यलढ्याबद्दलच्या एका चर्चासत्रात हा लेख निबंध म्हणूनच वाचला होता, असे इंडिया फाउंडेशन जर्नलने म्हटले आहे. मात्र, हे भाषणाचे ट्रान्स्क्रिप्ट आहे या संपत यांच्या दाव्याला त्यातून पुष्टी मिळत नाही. या लेखात सात संदर्भ आणि १३ तळटिपा आहेत. या तळटिपा संपत यांनी भाषणात वाचून दाखवल्या असतील अशी शक्यता फार कमी आहे. तळटिपा जर नंतर जोडल्या गेल्या असतील, तर हा लेख निव्वळ ट्रान्स्क्रिप्ट आहे या संपत यांच्या दाव्याला सुरूंग लागतो.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0