लॉकडाऊनमधला छंद : स्थानिक निसर्ग-निरीक्षण

लॉकडाऊनमधला छंद : स्थानिक निसर्ग-निरीक्षण

निसर्गात रमणाऱ्या माझ्यासारख्यांना  खिडकीपाशी, बाल्कनीत, गच्चीमध्ये वेगळे विश्व दिसू लागले. आजूबाजूच्या झाडांच्यात पक्षी-निरीक्षण करणं हा दिवसातला महत्त्वाचा भाग बनायला लागला.

न्यायाधीश मृत्यू: सीबीआय अहवालावर सुप्रीम कोर्टाची टीका
यूएस ओपनः दिग्गजांची अनुपस्थिती; तरुण तुर्कांना संधी
मालदीव: बेकायदा करारांमध्ये भारतीय उद्योजकांचा सहभाग?

२०२० हे जगासाठी एक अविस्मरणीय वर्ष होतं. मानवाला माहिती नसलेल्या कोविड-१९च्या महासाथीमुळे जवळपास प्रत्येक देशामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. दुकानं, ऑफिस, प्रवास, सगळं तडकाफडकी बंद करण्यात आले. महानगरात, शहरात, निमशहरात रोजगारासाठी आलेले लाखो श्रमिक, कामगार, मजूर जागोजागी अडकले. हॉस्टेलमधे राहणार्या विद्यार्थ्यांना काही महाविद्यालयांनी ताबडतोब घरी पाठवून दिलं. पण बरेच विद्यार्थी घरी जाऊ शकले नाहीत. अचानक सगळं काम ऑनलाइन झालं आणि हे नवीन तंत्रज्ञान शिकण्याची धडपड प्रत्येकाला करावी लागली. अशा परिस्थितीत बाहेरचं आणि घरचं काम सांभाळण्याची कसरत चालू झाली आणि स्वतःसाठी वेळ मिळणं अवघड होत गेलं. एरवी कंटाळ आला की लगेच बाहेर जाण्याची, फिरून यायची सवय झाली होती, पण आता घरच्या घरी काही उद्योग करणं भाग झालं होतं.

माझ्यासारख्या पी.एचडीच्या विद्यार्थ्यांना वेगळ्याच प्रकारच्या अडचणी आल्या. माझे फिल्डवर्क सिक्कीमला असते. लॉकडाउनमुळे लांबचा प्रवास, तिथले प्रयोग, संकलन इत्यादी शक्यच नव्हतं. लॅबमध्ये जाणं पण शक्य नव्हतं. पी.एचडीला नुकतीच सुरूवात केल्यामुळे प्रोजेक्ट नीटसा ठरला नव्हता. पुरेसा डेटा मिळाला नव्हता. अशावेळी पी.एचडी. पूर्ण होणं ही एक धुसर कल्पना वाटायला लागली.

सुरूवातीचे काही दिवस ऑनलाइन कामं करायचे नवीन प्रकार कळायला लागले. पण निसर्गात रमणाऱ्या माझ्यासारख्यांना  खिडकीपाशी, बाल्कनीत, गच्चीमध्ये वेगळे विश्व दिसू लागले. आजूबाजूच्या झाडांच्यात पक्षी-निरीक्षण करणं हा दिवसातला महत्त्वाचा भाग बनायला लागला. वाहन नसल्यामुळे पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकण्याची पटकन सवय लागली. घरबसल्या एवढे पक्षी बघायला मिळायचे आणि त्यामुळे वेळ जायला मदत व्हायची. २१ दिवसांचा प्रश्न आहे; असं वाटलं की दिवस पटकन निघून जातील.

पण कोविड-१९ चार दिवसांचा पाहून नव्हता. ही संसर्ग वेगाने पसरल्याने लॉकडाउन लोकडोवन वाढवण्यात आला. त्यामुळे तर फिल्डवर्कला जाणं शक्यच नव्हतं. पण काम तर करायला लागणारच होतं. एकीकडे प्रवास नसल्यामुळे बरं वाटत होतं कारण देशभरात कोविडमुळे बरेच त्रास सहन करायला लागत होते. अशावेळी फिल्डवर्कचं प्राधान्य कमी झालं. पण आपलं काम असून राहिल्यामुळे पुढे पी.एचडीचं काय होणार हा पण एक मोठा प्रश्न समोर होता . अशावेळी खिडकीतल्या पक्षीनिरीक्षणाची खूप मदत झाली. एकदा मी आणि माझी मैत्रिण बाल्कनीमधे असताना समोरच्या गच्चीवर एक घार बसलेली दिसली. तिने नुकतीच शिकार केली होती आणि पंज्याखाली कुठलातरी पक्षी दाबून धरला होता. शेजारी अजून एक घार होती आणि चोची मारून शिकार चोरण्याचा प्रयत्न करत होती. माझ्या मैत्रिणीने लगेच तिचा कॅमेरा काढला आणि त्यांच्यावर नेमून धरला. झूम करून शिकार एक कबूतर आहे असं कळलं. त्याच्या आजूबाजूला उडत असलेल्या माश्या पण स्पष्ट दिसत होत्या. एरवी असे शिकारीचे दृश्य आपण डॉक्युमेंट्रीमधे बघतो, पण हे प्रत्यक्षात बघायला मिळणं ह्यात वेगळाच थरार होता.

कधीतरी कॅम्पसमधे जायला मिळायचं. गर्दी नसल्यामुळे एक छान शांतता असायची. एकदा कॅम्पसमध्ये टर्मिनेलिया नावाचे झाड फुलांनी बहरलेलं दिसलं. त्यावर कित्येक प्रकारचे कीटक होते. माश्या, फुलपाखरं आणि बराच काही. त्याच्यापाशी सहजच अर्धा-एक तास गेला आणि भरपूर फोटो काढायला मिळाले. कितीतरी दिवसांनी घराबाहेरचं असे दृश्य पाहायला मिळालं आणि हा एक अविस्मरणीय अनुभव होता.

एकीकडे पी.एच.डी.च्या कामासाठी माझं बंगळुरुमधेच एक प्रयोग करायचा असं ठरलं. त्यासाठी हॉस्टेलहून १५ कि.मी. लांब एका फुलपाखरू-उद्यानामधे जायचं होतं. पहिल्या दिवशी तिथे जाऊन इतकं बरं वाटलं. मोकळी जागा, आजूबाजूला फक्त झाडं आणि रिकामे रस्ते. इतक्या महिन्यात पहिल्यांदाच बाहेर जाऊन मास्क काढणं शक्य झालं होतं. मोकळेपणाने श्वास घेता आला. कुठे काय बघावे ह्याला अंतच नव्हता. ही माझ्यासाठी एक महत्त्वाची कामाची जागा तर होतीच, पण स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी पण गरजेची होती. तिथे प्रयोग संपवून एक लांब चक्कर मारल्याशिवाय मी परत नाही जायचे. त्यामुळे पुढचे काही आठवडे काम करण्यात एक वेगळाच उत्साह आला आणि मनःशांतीचा खरा अर्थ कळला.

कोविड-१९ची साथ काही वेगळेच अनुभव देऊन गेली. त्याच्या पसरण्याचा वेगापुढे आपल्याला सामोरं जाणं अवघड गेलं. अशा वेळी निसर्गरम्य जागी जाण्याने मानसिक स्वास्थ्य सांभाळायला खूप मदत झाली. रोज जरी जाता आलं नाही तरी ते झाडांफुलांमध्ये घालवलेले काही तास पुढचे बरेच दिवस पुरायचे आणि तिथे जाणं हा एक खूप मोठा प्रेरणास्रोत होता. घरापासून लांब असून, आपल्या मित्र-परिवाराला फक्त ऑनलाइन बघून जो क्षीण यायचा त्याला सामोरं जायची वेगळीच ताकद मिळायची. त्यामुळे मागची दोन वर्ष चांगल्या-वाईट बऱ्याच गोष्टी झाल्या असल्या तरी हे असे अनुभव आयुष्यभर लक्षात राहतील.

कोविडने हे पण शिकवलं की माणूस हा घरी चार भिंतींमधे बसून राहण्यासाठी बनलेला नाही. या वर्षीच्या पावसाळ्यात लोक बेभानपणे बाहेर ह्याच कारणाने पडली. कारण त्यांना एवढ्या वेळ घरी बसून बाहेर जाण्याचं, निसर्गात फिरण्याचं महत्त्व कळलं होतं. त्यामुळे आपल्याला हे पण लक्षात घ्यायला हवा की अशा जागा आपण जपल्या पाहिजेत. आपण हवामान बदलाबद्दल वाचत असतो. त्यामुळे पूर येणं, भूस्खलन होणं, वणवा पेटणं इत्यादी नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे.

थेंबाथेंबाने घडा भरतो, तसं आपण झाडं-वन-नद्या-समुद्र वाचवण्याचे प्रयत्न सतत चालू ठेवले पाहिजेत. त्यानेच आपण खऱ्या अर्थाने ह्या पृथ्वीचे जबाबदार नागरिक बनू.

गौरी घारपुरे, या फुले व कीडे यांच्यावर बंगळुरूत पी.एचडी संशोधन करत आहेत.

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.

NatureNotes

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: