‘होममेड’ : लॉकडाऊनचा वेगळा दस्तावेज

‘होममेड’ : लॉकडाऊनचा वेगळा दस्तावेज

‘नेटफ्लिक्स’वरील ‘होममेड’ (Homemade) ही शॉर्ट फिल्मची मालिका कोरोनाच्या महासाथीमुळे घरात अडकून पडलेल्या माणसाच्या मनात त्याच्या अस्तित्वाबाबत चिंतनाची बीजे पेरते.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सिमेंट बॅरिकेड, काटेरी कुंपण, खंदक
रोजगार सहभाग दरातील घसरणीकडे दुर्लक्ष करणे घातक!
‘आर्यनने कट रचल्याचा एनसीबीकडे पुरावा नाही’

कोरोनाच्या महासाथीमुळे मार्च महिन्यात अचानक जग थिजल्यासारखे झाले. जगण्यासाठी लॉकडाऊन हा नवा पर्याय माणसाला स्वीकारायला लागला. बंदिस्त जगण्याचे कठीण आव्हान माणसासमोर उभं राहिलं. अचानक एक मोठी स्तब्धता, शांतता, पोकळी निर्माण झाली. यामुळे माणूस नावाचा प्राणी पार हडबडून- गडबडून गेला. पर्यावरणापासून ते शरीर- मनावर, कौटुंबिक- सामाजिक- आर्थिक अशा अनेक स्तरावर बदल, परिणाम दिसायला लागले. चराचर सृष्टीतील ही फार मोठी घटना होती. काही जणांसाठी हा काळ खूप अवघड होता तर काहीना सारं सामसूम झालं असलं तरी या सामसुमीमध्ये रितेपण न जाणवता एक पूर्ण भरलेपण जाणवले..

‘आहे अनंत निळे आकाश

आणि अनंत आहे तारे;

ठाऊक सारे

चौकटींत परीं माझ्या खिडकीच्या

कोंदलेले हे चौकोनी आकाश,

आणि त्यांतले चारपांच तारे

मजला प्यारे..’
– अनंत काणेकर

दुर्गाबाई भागवत यांनी आजारपणामुळे वाट्याला आलेल्या बंदीवासाला सृजनात्मक प्रतिसाद दिला होता. खोलीतल्या खिडकीतून दिसणाऱ्या निसर्गाचे बदल टिपत, त्यांनी ‘ऋतुरंग’ नावाचे अप्रतिम पुस्तक लिहिले.

‘नेटफ्लिक्स’ने अशाच स्वरूपाचा एक वेगळा प्रयोग लॉकडाऊनच्या काळात केला. ‘लॉकडाऊन’ हा विषय घेऊन १७ मान्यवर कलावंतांवर शॉर्टफिल्म बनविण्याची जबाबदारी सोपवली. ‘होममेड’ (Homemade) या नावाची शॉर्टफिल्मची मालिका ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाली.

४ ते ११ मिनिटांच्या या फिल्म मनोरंजनाचा हेतू न ठेवता, वेगळ्या स्वरूपाची माहिती आपल्या समोर मांडतात. काही जणांनी स्मार्टफोन वापरून तर काहींनी नेहमीच्या रीतसर पद्धतीने या शॉर्टफिल्म्स बनवल्या आहेत. अर्थात लॉकडाऊनचे सर्व नियम- अटी पाळून. यामुळे सादरीकरणात काही मर्यादा आलेल्या असल्या तरी विषयातील विविधता मात्र जागरूकपणे जपली आहे. मर्यादित जागेत, घरच्या लोकांना मदतीने, सहभागाने काल्पनिक कथानक घेऊन केलेला हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. फक्त थोडा खटकणारा मुद्दा असा आहे की सहभागी सर्व लोकं सुस्थितीतले असल्यामुळे, यात दिसणारे जग, प्रश्न, प्रतिसाद हा त्याच स्वरूपाचा आहे. असे असले तरी याद्वारे एकंदरीत परिस्थितीच्या बाबत प्रेक्षकांच्या मनात चिंतनाचे बीज पेरण्याची ताकद या शॉर्ट फिल्ममध्ये नक्कीच आहे. लॉकडाऊनबद्दलचा एक प्रकारचा दस्तऐवज म्हणायला हवा. विचारवंत जॉन ग्रियर्सन यांचे एक वाक्य इथे एकदम समर्पक आहे. ‘क्रिएटिव्ह ट्रीटमेंट टू ॲकच्युॲलिटी’.

‘होममेड’मधील पहिली फिल्म आहे ती लॅज ली या फ्रेंच पटकथाकार आणि दिग्दर्शकाची. यांच्या ‘ले मिझरेबलस्’ या चित्रपटाला २०१९च्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये ज्युरी अवॉर्ड मिळाले असून, ऑस्करसाठी नामांकन झाले होते. ‘होममेड’मधील त्यांची सहा मिनिटांची ही फिल्म फ्रान्सच्या एका गावातली आहे. शिक्षण घेणाऱ्या एका तरुणांचा लॉकडाऊनमधील थोडा दिनक्रमाचा भाग सुरवातीला दिसतो. काही वेळानंतर तो मुलगा विरंगुळा म्हणून ड्रोन आकाशात सोडतो आणि बाहेरील जगाचे दर्शन होते. ड्रोन एका लांबलचक मोठ्या चाळी वजा इमारतीसमोर येतो. त्यातील अधिकतर खिडक्या-दारे बंद किंवा पडदे ओढलेले आहेत. उघड्या खिडक्यातून, गच्चीतून तेथील काही दृश्ये आपल्याला दिसतात. खिडकीतून इकडे तिकडे बघणारा तरुण, मुलांचा अभ्यास घेणारे वडील, शांतपणे उभी मध्यमवयीन बाई, गच्चीवर वेळ घालवणारी मुलं, जाता जाता दिसते नवरा बायकोला करत असलेली मारहाण. ही दृश्ये अगदी काही सेकंदासाठी आणि सहजरित्या दिसतात. नंतर कॅमेरा बाजारपेठेत फिरतो. जीवनावश्यक गोष्टी घ्यायला लागलेली रांग. त्यातही अधिक प्रमाणात स्त्रिया दिसतात. रस्त्यावरील तुरळक रहदारी. ड्रोन उंच जातो. स्काय व्ह्यूने दिसते गावभर पसलेली एक भीषण शांतता. दिसलेल्या आणि न दिसलेल्या अनेक गोष्टी सहा मिनिटांच्या कालावधीत बरेच काही सांगून जातात. शेवटी पडद्यावर अक्षरे उमटतात.

हा काळ (सद्यस्थिती) कोणासाठी फार अवघड आहे?

ही फिल्म जणू पुढील फिल्मची प्रस्तावना आहे.

जास्त चर्चा ‘पेनेलोपी’ या शॉर्ट फिल्मची झाली. एका अकल्पित संसर्गाने पृथ्वीचा ताबा घेतला आहे. त्यामुळे अत्यंत कमी लोक जगात उरले आहेत. एका सुनसान झालेल्या जागेत एक माणूस राहतो आहे. घरातील रेडिओद्वारा मिळणाऱ्या माहितीमुळे आपल्याला या सर्व भीषण परिस्थितीचे आकलन होते. या विचित्र संसर्गाचा प्रभाव पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर झाला असतो, त्यामुळे ग्रहमाला देखील विस्कळीत झाली असते. चंद्र ३९० पटीने पृथ्वीच्या जवळ आलेला आहे. तापमानातील बदल, चुंबकीय शक्तीतील अस्थिरता, भौतिक रचना या सर्वाची झालेली उलथापालथ आणि माणसाची तगून राहण्याची धडपड हे सारं निव्वळ कथानकाच्या पार्श्वभूमीचा भाग आहे. त्यातून एक वेगळी कथा आपल्यासमोर येते. जोडीदाराच्या विरह दुःखातून आलेल्या एकाकीपणातून त्या माणसाचे झाडासोबत भाव साहचर्य जडले गेले आहे. गुरुत्वाकर्षणाचा एक वेगळा परिणाम इथे दाखविला आहे. त्यातील शेवटी येणाऱ्या गाण्याच्या ओळी संपूर्ण कथानकाला वेगळा आयाम देऊन जातात. काळाच्या पुढे भाष्य करणाऱ्या या फिल्ममधून जगाच्या बरबादीबद्दलची एक वेगळी शक्यता वर्तवली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना निद्रानाशाचा विकार जडला. या विषयांवरील क्रिस्टन वर्ट या हॉलिवूड अभिनेत्रीने केलेली शॉर्ट फिल्म अंतर्याम भेदून जाते. सर्वत्र नांदणारी उदास शांततेमुळे देखील झोप उडते. आणि शांतता मेंदूत मात्र मोठा कोलाहल माजवते. निद्रानाशामुळे शरीर- मनावर होत असलेल्या परिणामाच्या भावप्रक्रिया क्लोजअपच्या साह्याने अतिशय प्रभावरीत्या दाखविले आहे. क्रिस्टनचा जिवंत अभिनय आपल्याला अस्वस्थ करतो.

दुसऱ्या एका फिल्ममध्ये एक आई आपल्या मुलाला कवितेद्वारा सध्याच्या परिस्थितीमुळे जरी त्याच्या बालपणावर खोल परिणाम होत असला तरी या गोष्टीकडे विधायक दृष्टीने बघायला हवे. हा अवघड काळ तू स्वतः अनुभवतो आहे. त्याचा व्रण आयुष्यभर राहणार असला तरी त्याकडे बघून तुम्ही अधिक सक्षम होणार आहात, अशी त्याची मनोभूमिका तयार करते.

गुरिंदर चड्ढा यांनी लॉकडाऊनच्या बिकट कालावधीला संधीचे रूप देऊन, मुलांना जो वेळ त्या आधी देऊ शकत नव्हत्या, तो वेळ मुलांना, घरासाठी देत एक चांगली वातावरणनिर्मिती केली आहे. परदेशात राहून भारतीय मूल्यांची रुजवण आपल्या मुलांमध्ये निर्माण करण्याकडे त्यांचा असलेला कल त्यांनी दाखविला आहे.

एका इरसाल माणसाची मजेशीर कथा हलकेफुलके वातावरणनिर्मिती करते. हा माणूस हॉस्पिटलमध्ये भरती झालेला आहे. आपल्या देखरेख करणाऱ्या नर्सच्या मदतीने आपल्या एकेकाळच्या प्रेयसीशी तो व्हिडीओ कॉन्फरन्सवरून संपर्क साधतो. तिच्यावर आपलं अजूनही कसे अमाप प्रेम आहे, हे पटवून सांगतानाचे खुशखुशीत, गंमतीदार संभाषण आहे.

जॉनी मा या दिग्दर्शकाच्या फिल्ममध्ये लॉकडाऊनच्या आधी तीव्र मतभेद झालेल्यामुळे नायकाची आई निघून गेलेली असते. १५ मे रोजी ‘मदर्स डे’च्या दिवशी नायकाला आपल्या आईची आठवण येते. तो आपल्या आईला न जमणारी, त्याच्या आजीची खास पारंपरिक डम्पलिंग रेसिपी बनवतो. आपल्या ‘नव्या कुटुंबा’सोबत तो ‘मदर्स डे’ साजरा करताना आपल्या दुरावलेल्या आईवरील असलेले प्रेम व्यक्त करतो.

एकटेपणाला कोण कसा प्रतिसाद देईल हे सांगणे फार अवघड आहे. एका शॉर्ट फिल्ममधला नायक लॉकडाऊनमधील रटाळ दिनक्रमाला व एकटेपणामुळे अगतिक आणि कमालीचा बैचेन झालेला असतो. सतत ‘There is something wrong with me’, हे गाणं म्हणत असतो. आपल्याच विविध प्रतिमा निर्माण करून त्यांना ‘सोबती’ म्हणून समजतो. स्वतः केलेली स्वतःची आगळी – वेगळी संगत अंतर्मुख करते.

एका विभक्त झालेल्या जोडप्याला लॉकडाऊनमुळे एका घरात राहण्याची वेळ येते. ते एका छताखाली असून एकमेकांसाठी पूर्ण अनोळखी असल्यासारखे असतात. जसे ते इतरांबरोबर चॅटिंगने संवाद साधत असतात तसेच ते दोघे एकमेकांशी टेक्स्ट्ने बोलत असतात.

एका फिल्ममध्ये क्वीन एलिझाबेथ आणि पोप ही दोघे रोम येथे तिथल्या सीमा बंद होण्याच्या आधी भेटतात. एकटेपणा आपल्यासाठी कसा नवा नाही, या विषयी तत्वज्ञानिक संवाद एकमेकांशी करत असतात.

एक मुलगी आपल्या वडिलांच्या ऑफिसमध्ये अडकून पडलेली असतांना तिच्या जवळच्या खेळण्याबरोबर एक काल्पनिक जग निर्माण करते आणि त्याच वेळी ती तिकडून बाहेर पडायचा प्रयत्न करत असते. एक वेगळी धडपड ऑफिसच्या एका रुममधली दाखवली आहे.

संगीताचा बाज वापरून एक स्त्री सद्य परिस्थिती ही मानवाच्या उत्क्रांतीचा एक टप्पा आहे का? असा विचार मांडते.

एक लहान मुलगी क्वारंन्टाइन काळात स्वतःचा वेळ कसा घालवते यावर एक फिल्म आहे.

दोन स्त्रियां मुलांबरोबर समुद्रावर वेळ घालवायला आल्या असताना त्यांना एक बेशुद्ध पडलेली अनोळखी व्यक्ती दिसते. त्या व्यक्तीला त्या घरी घेऊन येतात. त्यानंतरच्या घडामोडी रहस्यमय पद्धतीने मांडल्या आहेत.

समारोपाची फिल्म ही दृष्टिकोणाबद्दलचा दृष्टिकोण यावर भाष्य करते. लॉस एंजेलिस शहराचा फेरफटका एका सायकस्वार मुलीच्या मार्फत आपण करतो. मागे सूत्रधाराचे विवेचन ऐकायला येते. सुत्रधाराला हे जागतिक पर्यटनाचे केंद्र असलेले हे शहर आता एखादा भुतासारखे भासतंय. दृष्टिकोणानुसार गोष्टी कशा बदलत जातात, याबद्दलची थेअरी आपल्यासमोर मांडली जाते. त्यात एक उदाहरण दिले आहे मुंगीचे.

मुंगी तिला जाणवत असलेल्या जगात मुक्त संचार करत असते. ती स्वतःला कधीच छोटं व हतबल समजत नाही. अचानक काही संकट आले किंवा मोठा बदल झाला तरी मुंगी घाबरून न जाता त्या परिस्थितीतून बाहेर पडून परत कार्यरत होते. ती भीतीला स्वतःवर कधीच वर्चस्व गाजवू देत नाही. ती समूहाने, एकमेकांच्या सहकार्याने राहाते. आपल्याला देखील समूहाने, सहकार्याने जगणे सोयीचे वाटते. त्याच कारण एक अनामिक भीती आपल्याला सतत वाटत असते. त्या भीतीच्या अवती- भवती आपल्या जगण्याची रचना करत असतो. भीती नैसर्गिक आहे. त्यामुळे ती आपल्याला कामाला लावते. आपल्याला आखीव-रेखीव जगायला आवडतं कारण त्यात योजनाचे नियंत्रण आपल्यावर असते. कधी कधी योजनेतील नियंत्रणाला बाजूला सारून आपल्या हाती नियंत्रण घ्यायला आवडते. ज्याप्रमाणे आता या सायकलस्वार मुलीचे तिच्या सायकलवर नियंत्रण आहे. ते तिला आवडत आहे. पण हे थोड्या वेळासाठी आहे. मुलगी फेरफटका मारून परत घरी निघाली आहे. ती परत रचनेच्या नियंत्रणाकडेच जाणार आहे. आपण रचनेच्या नियंत्रणाखाली नित्यक्रमाने जगण्याचे आधीन झालो आहोत. आपल्या जगण्यातील ही साचेबद्धता जर काढून घेतली तर काय होईल? असाच साचा सध्या काढल्या गेल्यामुळे आपण काही गमावलं आहे का कमावलं आहे ?

‘होममेड’ लॉकडाऊनमधील काळाचा जमाखर्च आपल्यासमोर मांडते. मांडायची पद्धत वेगळी असली तरी उत्तर हे शोधायला हवे. आणि मिळालेल्या उत्तराचा ताळा करून बघायला देखील काय हरकत आहे?

या निमित्ताने आपल्यालाही विचार करायला हवा आपण काही गमावलं आहे का कमावलं आहे याचा !

देवयानी पेठकर, या शॉर्ट फिल्म दिग्दर्शक व निर्मात्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0