लखीमपूर ट्विटमुळे वरुण गांधींना भाजप कार्यकारिणीतून डच्चू?

लखीमपूर ट्विटमुळे वरुण गांधींना भाजप कार्यकारिणीतून डच्चू?

नवी दिल्ली: लखीमपूर खेरी येथे आंदोलकांविरोधात झालेल्या हिंसाचारावर टीकात्मक ट्विट्सची पोस्ट केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांना भाज

संस्कृत नसेल तर संगणक ‘क्रॅश’ – मंत्र्यांची मुक्ताफळे
भारताच्या भविष्यासाठी केजरीवाल पुन्हा निवडून यावेत
अन्यथा भाजपचा राजीनामा देईन – चंद्र कुमार बोस

नवी दिल्ली: लखीमपूर खेरी येथे आंदोलकांविरोधात झालेल्या हिंसाचारावर टीकात्मक ट्विट्सची पोस्ट केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरून काढून टाकण्यात आले आहे. सलग तीनवेळा भाजपतर्फे खासदार म्हणून निवडून आलेल्या वरुण यांच्यासोबत त्यांची आई तसेच भाजपनेत्या मनेका गांधी यांनाही राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढून टाकण्यात आले आहे. मनेकाही सलग पाच वेळा भाजपतर्फे खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत.

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीयमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलानेच आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातली असे दाखवणारे अनेक व्हिडिओ वरुण यांनी ट्विटरवर शेअर केले. रविवारी झालेल्या या घटनेत चार जण ठार तर अनेक जखमी झाले. यात भाजपचे दोन कार्यकर्ते तसेच अजय मिश्रा यांचा वाहनचालक व एक पत्रकारही मारले गेले.

वरुण गांधी शेतकरी आंदोलनाला सातत्याने पाठिंबा देत आहेत. लखीमपूर खेरी येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी उत्तरप्रदेश सरकारने संबंधितांना त्वरित अटक करावी अशी मागणीही ते करत होते. त्याचमुळे वरुण व मनेका यांची नावे गुरुवारी जाहीर झालेल्या ८० सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आली असावी, अशी शक्यता आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याबद्दलची ही दंडात्मक कारवाई समजली जात आहे. मात्र, भाजपमधील सूत्रांनी ही ‘नियमित कार्यवाही’ आहे असे सांगत ही शक्यता फेटाळून लावली आहे.

अर्थात, महत्त्वाच्या नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढून टाकण्यामागील कारण पुरेसे स्पष्ट आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे वरुण हे भाजपमधील एकमेव खासदार आहेत. ५ सप्टेंबरला मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या शेतकरी महापंचायतीलाही वरुण यांनी पाठिंबा दिला होता. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने त्वरित तोडगा काढावा असे आवाहनही वरुण वारंवार करत होते.

व्हीआयपी गाड्यांचा एक ताफा शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्दयपणे चिरडून टाकत आहे असे दाखवणारा व्हिडिओ वरुण यांनी नुकताच पोस्ट केला होता. ही शेतकऱ्यांची ‘हत्या’ आहे आणि व्हिडिओमध्ये पुरेसा पुरावा दिसत आहे, त्यामुळे जबाबदार व्यक्तींना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. “हत्या हा आंदोलकांना शांत करण्याचा मार्ग नव्हे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा उद्दामपणा व क्रौर्य शिरण्याच्या आत त्यांना न्याय मिळवून द्या,” असे आवाहनही वरुण यांनी केले होते.

या प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याची तसेच मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये भरपाई देण्याची मागणी वरुण यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून केली होती.

उत्तरप्रदेश सरकारने यापूर्वी कुटुंबियांना ४५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती. मात्र, अद्याप भाजप सरकारने यासंदर्भात एकालाही अटक केलेली नाही. केंद्रीयमंत्री अजय मिश्रा यांच्यावरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हिंसाचार झाला तेव्हा आपण किंवा आपला मुलगा आशीष घटनास्थळी नव्हतो, असा दावा मिश्रा यांनी केला आहे. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या गाड्यांपैकी एका गाडीत आशीष होता असे साक्षीदारांचे म्हणणे आहे.

वरुण आणि मनेका यांच्यासह आणखी दोन महत्त्वाच्या नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे. यातील एक म्हणजे हरयाणातील खासदार चौधरी बिरेंदर सिंग तर दुसरे सुब्रमणियन स्वामी आहेत. सिंग यांनीही कृषीकायद्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. स्वामी यांनी पिगॅसस प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: