चलीये बात करते है!

चलीये बात करते है!

इरफानला ओळखण्यासाठी चित्रपटसृष्टीने अनेक वर्षं घेतली आणि ही ओळख पटल्यानंतरही त्याच्याकडे मोठाल्या प्रोडक्शन हाउसेसच्या कामांची रेलचेल होती असं नाही. २००२ सालानंतर म्हणजे ‘हासील’ आणि ‘मकबूल’ हे चित्रपट आल्यानंतर ही परिस्थिती बदलली.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
‘९ मे रोजी रशिया युक्रेनशी युद्धाची घोषणा करेल’
सीएएविरोधात मध्य प्रदेश विधानसभेत प्रस्ताव मंजूर

काही मृत्यूलेख लिहिण्याची वेळ आली कधी येऊच नये असं वाटत असतं. हा त्यापैकीच एक. या जगाने बघितलेल्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेला इरफान खान दुर्धर विकाराशी झगडतोय हे आपल्याला माहीत होतं. तो खूप आजारी आहे हेही आपल्याला माहीत होतंच. तरीही तो या सगळ्यातून बाहेर येईल असं आपल्याला वाटत होतं. तो आपल्याला सोडून कसा जाऊ शकतो? आपली आयुष्यं खोलवर समृद्ध करणारा हा अफाट प्रतिभेचा माणूस असं कसं करू शकतो?

बुधवारी सकाळी वयाच्या ५३व्या वर्षी इरफानने या जगाचा निरोप घेतला. हा असामान्य प्रतिभेचा अभिनेता त्याच्या भूमिकेत पूर्णपणे विरघळून जायचा, कोणताही मागमूस मागे न ठेवता. पण तो तेवढं करून थांबायचा नाही. तो रूपेरी पडद्यावरून खाली उतरून आपल्याबरोबर आपल्या घरीही यायचा. आपल्या हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात घरटं करून राहायचा आणि अवचित बाहेर येऊन गप्पा मारायचा.

झाकोळलेल्या डोळ्यांनी हसत म्हणायचा : ‘चलीये बात करते है’.

श्याम बेनेगलांच्या ‘भारत एक खोज’ नावाच्या टीव्ही मालिकेत त्याचं पहिलंवहिलं निसटतं दर्शन झालं, तेव्हाच लक्षात आलं होतं की हा कोणीतरी विशेष आहे. मग ‘बनेगी अपनी बात’, ‘चंद्रकांता’, ‘बेस्टसेलर्स’ यांसारख्या मालिकांचा तो अविभाज्य भाग झाला खरा पण त्याचं मन खरं सिनेमातच होतं. आणि ३०-३२ वर्षांच्या कालखंडात त्याने एकापाठोपाठ एक अविस्मरणीय भूमिका केल्या. आसिफ कपाडियाच्या ‘द वॉरियर’पासून ते शुजित सरकारच्या ‘पिकू’पर्यंत त्याने कधीच आपल्याला निराश केलं नाही. हे शब्द  खूप भावनांनी ओथंबलेले वाटतील कदाचित पण वाटू देत. कारण, त्याच्या स्पर्शाने नेहमीच सगळं काही अधिक चांगलं भासलं. मग तो त्याचा स्पर्श अगदी नाममात्र का असेना.

इरफानच्या भल्यामोठ्या कारकिर्दीच्या माझ्या मनातल्या आलेखात चार भूमिका नेहमीच वर उसळून येतात : तिगमांशू धुलियाच्या ‘हासिल’मध्ये त्याने साकारलेला अलाहबादचा स्थानिक विद्यार्थी नेता; विशाल भारद्वाजच्या ‘मकबूल’मधला लहरी गँगस्टर; मीरा नायरच्या ‘नेमसेक’मधला न्यू यॉर्कमध्ये स्वत:ची जागा निर्माण करू पाहणारा बंगाली भद्रलोक; आणि अनूप सिंगच्या ‘किस्सा’मधला मिळवू शकत नाही त्याची इच्छा बाळगणारा एक माणूस.

या सगळ्या भूमिकांत प्रशिक्षित अभिनेत्याची ‘कौशल्यं’ तर एकवटली आहेतच पण ते तेवढंच नाही. त्यात एक खोल सहअनुभूती आहे, उदंड चैतन्य आहे आणि निष्कलंक बुद्धिमत्ता आहे. ही निष्कलंक बुद्धिमत्ता तर त्याच्या प्रत्येक कृतीत दिसून आली.

हे चित्र डोळ्यापुढे आणा. एक पुरुष आणि बाई बाकावर बसून बोलतात. ते पूर्वीही भेटले आहेत, लग्नाच्या दृष्टीने. पण आता तो दुसऱ्याच कोणाशी तरी लग्न करतोय पण तेवढा आनंदात नाहीये. ती जेवढा निरिच्छतेचा आव आणतेय, तेवढी नाहीये. त्यांच्यात काहीतरी खदखदतंय, त्याला वाट करून देण्याचा प्रयत्न ते करताहेत.

मॉण्टी शेवटी थेट विचारतोच, “तू मला नकार का दिलास? प्रामाणिकपणे सांग.”

“तू चुकीच्या जागी बघत होतास,” श्रृती सांगते. तो आश्चर्यचकीत.

“मी ३५ वर्षांचा आहे. म्हणजे ३८ आहे पण ३५ सांगतो. और मैने आज तक किसी लडकी को ठीक से टच नही किया, और तुम इतनी खुबसुरत हो, तुम्हारी बॉडी इतनी अच्छी है, नजर उधर चली गयी तो गलत क्या किया?”

चित्रपटांतली काही दृश्य अविस्मरणीय असतात. अनुराग बसूच्या ‘लाइफ इन अ.. मेट्रो’तलं (२००७) हे दृश्य असंच आहे. एका पुरुषात आणि स्त्रीत उभं राहू पाहणारं काहीतरी उलगडणारा. हा प्रसंग कशाचीतरी सुरुवात आहे. कोवळ्या वयातल्या प्रणयात अडकलेल्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत प्रौढत्वाकडे झुकलेल्या या जोडीने आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणलं होतं. हा सिक्वेन्स बघताना अजूनही ते येतं. कोंकोणा सेनशर्मा कुठेही कमी नसली, तरी बॉलिवूडने तोपर्यंत कधीच न बघितलेल्या या दृश्याचा मानकरी इरफानच होता. एरवी काहीसा अश्लाघ्य होऊ शकलेला हा सिक्वेन्स त्याने केवळ अभिनयाच्या जोरावर मनमोकळा, आणि प्रामाणिक केला होता.

त्याने सगळं काही केलं. म्हणजे बॉलिवूडने त्याला जी जी संधी दिली ती ती त्याने घेतली. या उंच, प्रचंड आवाका असलेल्या, लक्षवेधी डोळ्यांच्या माणसाचं रूपांतर कशातही होऊ शकत होतं. तो वर उडू शकत होता, खाली रांगू शकत होता, उत्कट होऊ शकत होता, वैचित्र्य दाखवू शकत होता. तो धोकादायकही वाटू शकत होता आणि वेडपटही. आत्तापर्यंत कधी बघितलं नाही असं उत्कट प्रेम तो दाखवू शकत होता. इरफानला ओळखण्यासाठी चित्रपटसृष्टीने अनेक वर्षं घेतली आणि ही ओळख पटल्यानंतरही त्याच्याकडे मोठाल्या प्रोडक्शन हाउसेसच्या कामांची रेलचेल होती असं नाही. २००२ सालानंतर म्हणजे ‘हासील’ आणि ‘मकबूल’ हे चित्रपट आल्यानंतर ही परिस्थिती बदलली.

तिगमांशु धुलिया आणि विशाल भारद्वाजसारख्या इरफानच्या एनएसडीतल्या मित्रांनी बॉलिवूडने आत्तापर्यंत दुर्लक्षिलेल्या हिंदी पट्ट्याच्या आपल्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला. इरफान आणि तिगमांशु धुलिया किंवा विशाल भारद्वाज यांचं एकत्र येणं एखाद्या संगमासारखं होतं. (इरफान त्याच्या बायकोला सुतपा सिकदरलाही प्रथम एनएसडीतच भेटला. या दोघांच्या लग्नाला २५ वर्षं झाली आहेत आणि त्यांना दोन मुलंही आहेत). यातून हिंदी सिनेमाला नवीन भाषा, नवा दमदार चेहरा मिळाला. याची दखल महेश भट्टसारख्या जुन्या दिग्दर्शकांनी घेतली. दुसऱ्या बाजूला जाऊन गुन्हेगारी जगताच्या, ओबडधोबड कथा सांगण्याची आणि अपरिचित रस्ते तुडवण्याची संधी भट्ट यांच्या प्रोडक्शन हाउसने इरफानला दिली. त्याने रोहित शेट्टीच्या ‘सण्डे’सारख्या निर्बुद्ध कॉमेडीज ज्या जोमाने उचलल्या, त्याच उत्कटतेने हलवून टाकणाऱ्या कथांमध्ये (‘पानसिंग तोमर’) जीव ओतला.

इरफान एनएसडीत तिगमांशु धुलियाला दोन वर्षं सीनियर होता. इरफानच्या बॅचने मॅक्झिम गॉर्कीचं ‘लोअर डेप्थ्स’ केलं तेव्हा धुलियाने त्याचं काम प्रथम पाहिलं. आपण बरोबर काम करायचं हे धुलियाने तेव्हाच ठरवलं होतं. शेखर कपूरने ‘बँडिट क्वीन’मध्ये इरफानला घ्यावं म्हणून कास्टिंग डायरेक्टर म्हणून त्याने खूप प्रयत्न केले. या चित्रपटात मनोज बाजपेयी, सौरभ शुक्ला, निर्मल पांडेय, गजराज राव आणि सीमा बिस्वास यांसारखे रंगभूमीवरचे प्रतिभावंत होते. मात्र, शेखर कपूरच्या डोक्यात काही वेगळ्या कल्पना होत्या. त्यामुळे इरफानला चित्रपटसृष्टीच्या नजरेत भरण्यासाठी आणखी वाट बघावी लागली. दरम्यानच्या काळात, आसिफ कपाडियाच्या ‘द वॉरियर’ने इरफानचं मनौधैर्य टिकवून ठेवलं होतं. सुरुवातीला दिलेल्या मुलाखतींपैकी एकीत तो म्हणाला होता की, या चित्रपटाने त्याचं आयुष्य बदललं. पडद्यावर संवाद साधण्यासाठी डोळ्यांचा वापर कसा करायचा हे या जवळपास मूक योद्ध्याच्या भूमिकेतून तो शिकला.

त्यानंतर दोन वर्षांनी धुलियाने ‘हासिल’ (२००३) या चित्रपटातून चमकदार पदार्पण केलं आणि याच चित्रपटाने इरफानला एक अभिनेता म्हणून मान्यता मिळवून दिली. इरफानच्या व्यक्तिमत्वाचा कणन््कण रणविजय सिंग या व्यक्तिरेखेत विरघळून गेला होता. फर्डे इंग्लिश बोलणाऱ्यांना एका बाजूने तुच्छ लेखणारा तर दुसऱ्या बाजूने आपण असे होऊ शकत नाही हे समजून त्यांचा हेवा करणारा रणविजय सिंग. १९७०च्या दशकात मागे राहून गेलेली विद्यार्थी व जातीय राजकारणाची ओबडधोबक कथा ‘हासील’ने पुन्हा वर आणली. एकेकाळी महान समजल्या जाणाऱ्या पण आता चिरे ढासळलेल्या उत्तर भारतातील विद्यापीठात आकार घेणारी, तरुणाईच्या ऊर्जेने व हिंसेच्या क्रौर्याने पेटलेली, कधीही व कुठेही घडू शकणारी कथा आणि तिला प्राचीनता आणि आधुनिकतेची अनोखी सरमिसळ असलेल्या शहराची पार्श्वभूमी. धुलियाने इरफानला शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी अलाहबादला सोडले आणि हे शहर, तिथले रस्ते, लोक आणि वृत्तींमध्ये स्वत:ला बुडवून घेण्यासाठी वेळ दिला. इरफानची बलस्थानं ‘हासिल’मध्ये उठून दिसली. आशुतोष राणासोबतचे त्याचे काही सिक्वेन्सेस अप्रतिम आहेत.

पुढच्याच वर्षी विशाल भारद्वाजचा ‘मकबूल’ (२००४) आला. शेक्सपीअरच्या मॅकबेथ नाटकाच्या या आधुनिक अवतारात गुन्हेगारी जग, ओतप्रोत भावना आणि विश्वासघातांच्या कल्लोळात इरफान उत्तम अभिनेत्यांच्या गर्दीत उठून दिसला. निष्ठा व महत्त्वाकांक्षेच्या द्विधेत फसलेला माणूस त्याने जिवंत केला.

‘मकबूल’च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये प्रथमच प्रौढांचा बेलगाम रोमान्स खऱ्या अर्थाने दाखवला गेला. चेतवणारा रोमान्स दाखवण्याचं विशाल भारद्वाजचं कौशल्य वादातीतच आहे. मात्र, इरफानने साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये त्याचं प्रेयसीशी वागणं वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते कधी सरळ आहे, कधी वाकडं. कधी भाबडं आहे तर कधी बनेल. पण ते नेहमीच वैशिष्ट्य ठरलं आहे. तिगमांशु धुलियाच्या ‘साहेब बिवी और गँगस्टर रिटर्न्स’मध्ये (२०१३) याचा एक वेगळाच अविष्कार आपण बघितला आहे. शिवाय धुलियाच्या ‘पानसिंग तोमर’मधल्या (२०१३) सैनिकाचं डाकूत झालेलं रूपांतर दाखवणाऱ्या भूमिकेला तर कोणत्याही परिस्थितीत अढळपद आहेच.

देशासाठी पदकं जिंकणाऱ्या क्रीडापटूपासून ते न्याय आणि सुडाच्या शोधात चंबळचं खोरं हादरवणाऱ्या डाकूपर्यंतच्या प्रवासाचा रस्ता इरफान ज्या पद्धतीने चालला आहे, ते केवळ अविस्मरणीय आहे. आणि त्याचा तो अमरत्व प्राप्त झालेला संवाद : “बीहाड में तो बागी होते है, डॅकॉइट मिलते है पार्लमेंट में.”

इरफान अर्थातच बॉलिवूडपुरता मर्यादित नव्हता. तो खऱ्या अर्थाने सीमा ओलांडणारा भारतीय अभिनेता होता. ‘दार्जिलिंग लिमिटेड’, ‘स्लमडॉग मिल्येनिअर’, ‘लाइफ ऑफ पाय’ अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. तरीही त्याचा जीव भारतातच होता. यातील कोणत्याच आंतरराष्ट्रीय चित्रपटाला इरफानच्या क्षमता खऱ्या अर्थाने दाखवता आल्या नाहीत.

इरफानने केवळ सर्वार्थाने श्रेष्ठ चित्रपटच केले असंही नाही. ‘रोग’सारख्या (२००५) चित्रपटातली त्याची भूमिका दखलपात्र आहे. ‘संडे’मधील (२००८) अभिनेता होण्याचं स्वप्न बाळगणारी व्यक्तिरेखा विसरणं कठीणच आहे.

शॅमेलिऑनसारखे रंग बदलता येणं ही चांगल्या अभिनेत्याची खूण आहे. उगाच लक्ष वेधण्याचा प्रयत्न न करता आपली भूमिका निभावणं इरफानला सहज जमलं. यात कुठेही त्याचा अहंकार आडवा आला नाही.

१९८८ मध्ये आलेल्या मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’मध्ये तो ओझरता दिसला होता. एनएसडीमध्ये त्याला बघून मीरा नायर यांनी त्याला भूमिका देऊ केली आणि त्याने ती लगेच स्वीकारलीही. नंतर काही तांत्रिक कारणांमुळे इरफानला यातून वगळणं त्यांना भाग पाडलं पण ती कसर मीरा नायर यांनी २००६ मध्ये आलेल्या ‘द नेमसेक’मधून भरून काढली.

झुंपा लाहिरी यांच्या ‘द नेमसेक’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटामुळे इरफानला सीमापार यश लाभलं. १९५०च्या दशकातला बंगाली जंटलमन रंगवणं हे मोठं आव्हान होतं पण त्याने अक्सेंटपासून ते हावभावांपर्यंत प्रत्येक बारकाव्यानिशी ते पेललं. बायकोचा निरोप हलवताना डोकं हलवण्याची सूक्ष्म लकब तर अफलातून होती. तबूनेही उत्तम अभिनय केला होता पण इरफानमध्ये ज्या प्रकारे बंगालीपणा खोलवर मुरला होता, तेवढा तो तबूमध्ये नव्हता.

“मी अशोक गांगुलीसाठी कास्टिंग करत होते तेव्हा माझी पहिली व एकमेव पसंती इरफानला होती. त्याची व्यक्तिरेखा झुम्पाच्या वडिलांवर बेतलेली आहे. त्याने त्यांच्यासोबत काही वेळ घालवला आणि मग तो ज्या प्रकारे त्या व्यक्तिरेखेत शिरला त्याला तोड नाही,” असे मीरा नायर सांगतात.

इरफानला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून देणारा आणखी एक चित्रपट म्हणजे रितेश बात्राचा ‘लंचबॉक्स’ (२०१२). यात त्याने एका मध्यमवयीन विधुराची व्यक्तिरेखा रंगवली होती. दुसऱ्याच कोणासाठी असलेला लंचबॉक्स चुकीने त्याच्याकडे पोहोचतो आणि त्यातून काही वेगळाच बंध तयार होतो.

खरं तर त्याने केलेल्या कसदार भूमिका खूपच आहेत. अनुप सिंगच्या ‘किस्सा’मधील प्रमुख व्यक्तिरेखाही अत्यंत वेगळी, सुंदर विकसित झालेली आहे. कोणत्याही अभिनेत्याला ती निभावणं सुदैवच वाटावं अशी. फाळणीनंतरच्या भारतात घडणारी ही एक वातावरणाचा गंध ठासून भरलेली काहीशी लहरी कथा. भारतातून आलेला एक जमीनमालक. त्याला लागलेली मुलाची अर्थात वारसाची आस, मुलीच जन्माला घालणाऱ्या पत्नीशी असलेले त्याचे संबंध आणि त्याचं चौथं व अखेरचं अपत्य. या अपत्याला मुलगा म्हणण्याचा आग्रह तो धरतो. पुरुषप्रधान संस्कृतीवर, लिंगभेदावर भाष्य करणारी ही कथा इरफान, रसिका दुगल आणि तिलोत्तमा शोम यांनी जिवंत केली आहे.

इरफानने फारसं काय केलं नसेल, तर सरधोपट, सरळसोट चित्रपट. त्याला मिळालेला सगळ्यात सरधोपट सिनेमा प्रियदर्शनचा ‘बिल्लू’ (२००९) होता. त्यात तो शाहरुख खानचा लहानपणीचा भूला-बिसरा मित्र होता. हा त्याचा सगळ्यात प्रभावहीन सिनेमा असेल. खरं तर यात सुपरस्टार विरुद्ध सुपरअॅक्टर असा सामना होता पण चित्रपट साफ आपटला. हा चित्रपट यशस्वी ठरला असता, तर इरफानच्या कारकिर्दीचा आलेख वेगळ्या उंचीवर गेला असता का? माहीत नाही.

इरफानच्या अभिनयाचा प्रकाश प्रत्येक वेगळ्या भूमिकेसोबत अधिकाधिक चमकदार होत गेला, हे मात्र आपल्याला माहीत आहे. शुजित सरकारच्या ‘पिकू’मध्ये (२०१५) त्याने साकारलेली व्यक्तिरेखा हा आणखी एक मैलाचा दगड. हा चित्रपटही तो नेहमीप्रमाणे अधिक चांगला करतो. तनुजा चंद्राच्या ‘करीब करीब सिंगल’ (२०१७) या चित्रपटातही इरफानचा प्रियकर आनंदाचा शिडकावा करणारा आहे. आणि तेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे. तो आपल्याला चित्रपट बघत राहायला भाग पाडतो. कमकुवत संहिता तो सहन करण्याजोगी करतो. ‘मदारी’मधली त्याची व्यक्तिरेखा म्हणते, “कपडेलत्ते, शकलसूरत सब सवासौ करोड जैसी है, कैसे ढुंडोगे मुझे?”

हा त्या व्यक्तिरेखेला पडलेला प्रश्न असू शकतो पण इरफानला हा प्रश्न पडण्याची गरज नाही. आपण त्याला कुठूनही शोधून काढू शकतो आणि आपल्या जवळ ठेवू शकतो. हृदयाच्या कोपऱ्यात.

मग कधीतरी तो आपल्या हृदयाच्या कोपऱ्यातून वर येतो आणि गप्पा सुरू करतो. त्याच्या नेहमीच्या स्टाइलने : ‘चलीये, बात करते है.’

लौकिकार्थाने इरफान आपल्यात असो किंवा नसो, या गप्पा मात्र कधीच संपणार नाहीत.

(ज्येष्ठ पत्रकार शुभ्रा गुप्ता यांच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या Inimitable Irrfanअन्य लेखाचा स्वैर अनुवाद)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: