पाकिस्तानने कोरोना कसा नियंत्रित केला?

पाकिस्तानने कोरोना कसा नियंत्रित केला?

आज पाकिस्तानात केवळ ८,८०३ पॉझिटिव्ह रुग्ण शिल्लक राहिले आहेत. चीननंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानमधला रिकव्हरी रेट आहे.

कोरोना व भारताचे बदलले जाणारे अर्थकारण : भाग २
सर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे!
सीरमने सर्व आरोप फेटाळले

पाकिस्तान या आपल्या शेजारी आणि परंपरागत शत्रू राष्ट्रात कोरोना कशा पद्धतीने नियंत्रणात आणला जात आहे. हा आजचा कुतुहलाचा प्रश्न आहे. आजच्या घडीला भारतात जगात सर्वाधिक वेगाने कोरोना पसरत आहे. (२६ ऑगस्टला दिवसात कोरोनाचे ७५,७६० नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.) भारत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत जगात सध्या दुसऱ्या स्थानी आहे. एकूण रुग्ण संख्येत भारत तिसऱ्या स्थानी तर एकूण मृत्युसंख्येत भारत जगात चौथ्या स्थानी आहे. अशावेळी आपला शेजारी पाकिस्तान हा देश कोरोना नियंत्रणात आणण्यात वेगाने यशस्वी होत आहे.

आज पाकिस्तानात केवळ ८,८०३ पॉझिटिव्ह रुग्ण शिल्लक राहिले आहेत. जगात चीन नंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान मधला रिकव्हरी रेट आहे. २४ मार्चला भारतात ज्यावेळी संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला त्यावेळी देशात केवळ ५७६ कोरोना रुग्ण होते. तर त्याचवेळी पाकिस्तानात कोरोनाची संख्या २००० च्या आसपास होती. आपल्या सारखा संपूर्ण लॉकडाऊन पाकिस्तानने कधीही घोषित केला नाही. किंबहुना असा संपूर्ण लॉकडाऊन पाकिस्तान करू शकत नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था नाजूक आहे. याची झळ पाकिस्तानातील सर्वसामान्य गरीब वर्गाला खूप बसेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेपुढे येऊन स्पष्ट केले होते. पाकिस्तानने भारतासारखे आपल्या जनतेला कोरोना योद्ध्याचे व देशवासीयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी टाळी वाजविणे, थाळी वाजविणे, शंख वाजविणे, दिवा लावणे, टॉर्च लावणे, रुग्णालयावर हवाई दलामार्फत पुष्पवर्षाव करणे यातले काहीच केले नव्हते.

पाकिस्तान हे घटनात्मक दृष्ट्या इस्लामला मानणारे राष्ट्र असूनही कोरोनासाठी राष्ट्रव्यापी नमाज अदा करण्याचे आव्हान तेथील पंतप्रधान यांनी केले नाही. जगात सर्वाधिक खराब आणि निकृष्ट दर्जाची आरोग्य संरचना पाकिस्तानात अस्तित्वात आहे. WHO आणि हेल्थ एक्स्पर्ट यांच्या सल्ला असूनही पाकिस्तानात बहुतांश लोक मास्क वापरीत नव्हते. तरीही पाकिस्तानने कोरोना कसा नियंत्रणात आणला हे आपणाला पाहावे लागेल. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पाकिस्तान कोरोना बाबतची खोटी आकडेवारी तर देत नसेल ना? याचीही आपणाला खात्री करावी लागेल.

पाकिस्तानच्या  ‘दि नेशनल कमांड एंड कंट्रोल सेंटर’च्या निगराणीखाली पाकिस्तान या कोरोना संकटाला कसा समोर गेला हे आपणाला समजुन घ्यावे लागेल.

‘दि नॅशनल कमांड अँड कंट्रोल सेंटर’ची स्थापना पाकिस्तान सरकारने कोरोना संकट आल्यानंतर केलेली आहे. या संस्थेच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात एकूण २,९४,६३८ रुग्ण कोरोना बाधित झालेले आहेत. त्यापैकी २,७९,५६१ रुग्ण कोरोना मुक्त करण्यात पाकिस्तानला यश आले आहे. कोरोनामुळे पाकिस्तानात ६,२७४ मृत्यू झालेले आहेत. तर सध्या केवळ पाकिस्तानात ८८०३ पॉझिटिव्ह रुग्ण शिल्लक राहिले आहेत. एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी तीन टक्के पेक्षा कमी रुग्ण आता पॉझिटिव्ह आहेत.

पाकिस्तानच्या या परिस्थितीत सुधारणा ही मुख्यता ‘ड्रग रेग्युलेटरी एजेन्सी’ कडून मान्यता दिलेल्या चीनने पुरविलेल्या कोरोना व्हॅक्सीन च्या वापरानंतर आली आहे. जुलै महिन्यात पाकिस्तानात कोरोना हा खूप वेगाने पसरत होता. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते. मात्र चीनच्या मदतीनंतर परिस्थितीत सुधारणा झाली आणि आज पाकिस्तानात कोरोना संकट कमी झाले आहे. डेली डेथ मीटर नुसार पाकिस्तानात जुलैमध्ये सरासरी आठवड्यात ६०० ते ८०० लोक कोरोनाने मृत्यू पावत होते. त्यांची संख्या सध्या आठवड्याला १० पेक्षा कमी आहे. यामुळे पाकिस्तानात सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. पाकिस्तान सरकारने आर्थिक आणि व्यावसायिक सर्व गोष्टी पुन्हा पूर्ण जोमाने सुरू केल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालये पाकिस्तानात आता पूर्ववत सुरू होत आहेत. पाकिस्तानला चीनचे साहाय्य आणि हवामानातील बदलाने सुद्धा खूप मदत केली. हवामानातील काही बदलामुळे हवेतील आर्द्रता ८६ डिग्रीपर्यंत पोहोचली तर तापमान ४५ डिग्रीपर्यंत गेले. हेल्थ एक्स्पर्टच्या नुसार हवामानातील या बदलामुळे लोकांत हर्ड इम्युनिटीचा स्थानिक प्रकार पाकिस्तानात तयार झाला त्यामुळे कोरोनात मोठी घट झाली. एक कारण असेही हेल्थ एक्स्पर्ट सांगतात की विट्यामिन डी आणि सूर्यप्रकाश या काळात हवामानाच्या बदलामुळे लोकाना मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने एक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शनपासून शरीराचे संरक्षण होते. भारतात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कडक लॉकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडले नाहीत याचा फायदा यामुळे भारतीयांना झाला नाही. पाकिस्तानात या काळात सामान्य लोकांनी उत्तम स्वयंशिस्तही पाळली. याचा सकारात्मक परिणाम झाला.

समाजसेवी अभय बंग यांनी कोरोना काळात महात्मा गांधी या संकटास कसे सामोरे गेले असते यावर एक लेख लिहिला आहे. ज्यात त्यांनी महात्मा गांधी यांनी या संकटात नऊ प्रमुख गोष्टी केल्या असत्या असे सांगून त्या बाबींचे विश्लेषण केले आहे. या नऊ पैकी समाजात निर्भयता आणि सामाजिक ऐक्य राखण्याचे दोन मुद्दे पाकिस्तानने कसोशीने पाळले. आपल्या सारखा संपूर्ण लॉकडाऊन पाकिस्तानने कधीही घोषित केला नाही. त्यामुळे समाजात कोरोनाचे व्यापक भय पसरले नाही. सरकारनेही समाज भयग्रस्त होणार नाही याकडे लक्ष दिले. भारतात मात्र संपूर्ण लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी मीडिया आणि सरकारने लॉकडाऊनच्या यशस्वितेसाठी संपूर्ण शक्ती खर्च केल्याने समाज भयग्रस्त झाला. कोरोनावरून भारतात जसा तब्लिगीमुळे एका समुदायाला लक्ष करण्याचा प्रयत्न मीडियाने केला तसा पाकिस्तानमध्ये होऊ न देण्याची दक्षता पाकिस्तान सरकारने घेतली आणि कोरोना विरोधात सामाजिक ऐक्य ठेवण्यात पाकिस्तानला यश आले.

या दोन बाबीमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था अगोदर पासून अडचणीत असली तरी पूर्णपणे संकटात आली नाही. कोरोनाच्या या संकटकाळात या म. गांधीच्या दोन गोष्टीचे पालन तरी पाकिस्तानने केले होते हे निश्चित आहे. हे एक आंतरराष्ट्रीय संकट आहे त्याचा एकजुटीने मुकाबला केला पाहिजे याचे भान पाकिस्तान सरकारने ठेवले होते. यावेळी भारताशी सहकार्यासाठीही पाकिस्तान पुढे आला होता हे विशेष, मात्र भारत सरकारच्या परराष्ट्र सचिवाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेइतके आमचे कोरोना राहत पॅकेज आहे असे म्हणत पाकिस्तानची जाहीर टिंगल केली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशातील कोरोना संकट मुकाबल्यासाठी पुढाकार घेऊन बैठक घेतली होती. त्या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान उपस्थित नव्हते. त्यावेळीही पाकिस्तानच्या प्रतिनिधीने संकट काळातही या बैठकीवेळी काश्मीर प्रश्न उपस्थित केला होता हे विसरून चालणार नाही.

पाकिस्तानातील कोरोना साथ चीनची मदत आणि हवामानातील बदल यामुळे मुख्यता आटोक्यात आला आहे. चीन हा आज लडाखमध्ये भारतीय भूमीत अतिक्रमण करीत आहे. त्याचवेळी हाच चीन पाकिस्तानला त्यांच्याकडची व्हॅक्सीन पुरवून आणि अन्य मदत करून कोरोना संकटातून बाहेर काढत आहे. याचवेळी भारतात सर्वाधिक वेगाने कोरोना पसरत आहे. जर आपले हे दोन्ही शेजारी शत्रू देश या संकटसमयी एकत्र येऊन भारतीय सीमेवर आगळीक करू लागले तर भारताला तिहेरी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(छायाचित्र – डॉन साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: