युक्रेन संघर्ष संपणार कसा? – हेन्री किसिंजर

युक्रेन संघर्ष संपणार कसा? – हेन्री किसिंजर

पुतीन यांचे म्हणणे काहीही असो, लष्करी कारवाईचे धोरण म्हणजे आणखी एक शीतयुद्ध ओढवून घेणे आहे हे त्यांनी लक्षात घेतलेच पाहिजे.

युक्रेनबद्दल सार्वजनिक स्तरावर जी चर्चा चालली आहे, त्यात केवळ संघर्षाचीच भाषा आहे. मात्र, आपण नेमके कोठे जात आहोत, याची आपल्याला कल्पना आहे का? माझ्या आयुष्यात मी चार युद्धे बघितली आहेत. ही सगळी युद्धे सुरू झाली होती प्रचंड उन्मादात आणि जनतेच्या पाठिंब्याने. मात्र, ही सगळी युद्धे कशी थांबवावी हे मात्र आम्हाला माहीत नव्हते. त्यातील तीन युद्धांमधून तर आम्ही एकतर्फी अंग काढून घेतले होते. कोणत्याही धोरणाची कसोटी ते थांबते कसे यावरून होते, सुरू कसे झाले होते, यावरून नाही.

युक्रेनचा मुद्दा बहुतांशी शक्तिप्रदर्शनासारखा मांडला गेला: युक्रेन पौर्वात्य देशांना सामील होते की पाश्चिमात्य देशांना सामील होते हाच मुद्दा होता. मात्र, युक्रेनला जर टिकून राहायचे असेल आणि जोमाने वाढायचे असेल, तर त्या राष्ट्राने कोणाच्या तरी बाजूने किंवा कोणाच्या तरी विरोधात उभे राहून चालणार नाही. या राष्ट्राने पाश्चिमात्य आणि पौर्वात्य राष्ट्रांमधील पूल होणे आवश्यक आहे.

युक्रेनवर बळजबरीने अंकित राष्ट्राचा दर्जा लादण्याचा प्रयत्न करणे आणि त्यायोगे पुन्हा एकदा आपल्या सीमा विस्तारून घेणे यामुळे आपण स्वत:च्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी, युरोप व अमेरिकेशी असलेल्या संबंधांत तणाव निर्माण करण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती करत आहोत, हे रशियाला मान्य करावेच लागेल.

त्याचबरोबर रशियासाठी युक्रेन हे कधीही केवळ एक परराष्ट्र असू शकत नाही हे पाश्चिमात्य जगताने समजून घेतलेच पाहिजे. रशियाच्या इतिहासाची सुरुवात ‘किवान-रस’ या नावापासून झाली आहे. रशियाचा धर्म येथूनच सर्वत्र पसरला. युक्रेन अनेक शतके रशियाचा भाग होता आणि या दोन राष्ट्रांचे इतिहास एकमेकांत गुंतलेले आहेत. रशियाच्या स्वातंत्र्यासाठी लढल्या गेलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या लढाया युक्रेनच्या भूमीवर लढल्या गेल्या आहेत. याची सुरुवात १७०९ सालातील पोल्टावाच्या लढाईपासून झाली होती. भूमध्यसागरीय प्रदेशात आपल्या शक्तीचे प्रदर्शन घडवण्यासाठी रशियाने ज्या ब्लॅक सी फ्लीटचा साधन म्हणून वापर केला, त्याचा तळ क्रिमियातील सेव्हास्टोपोलमध्ये आहे आणि तो दीर्घकाळासाठी भाडेपट्टीवर घेतलेला आहे. अलेक्झांद्र सोल्झेनित्सिन आणि जोसेफ ब्रोड्स्की यांच्यासारख्या विरोधकांनीही युक्रेन हा रशियाच्या इतिहासाचा, किंबहुना रशियाचा, अविभाज्य भाग आहे असे मत आग्रहाने मांडले होते.

युरोपीय संघाचेसुस्त प्रशासन आणि युक्रेनचे युरोपशी असलेल्या नातेसंबंधांबाबत वाटाघाटी करताना देशांतर्गत राजकारणातील धोरणात्मक घटकांना दिले गेलेले गौण स्थान यामुळेच या वाटाघाटींचे रूपांतर संकटात झाले आहे हे युरोपीय संघाने लक्षात घेतलेच पाहिजे. परराष्ट्र धोरण ही प्राधान्यक्रम प्रस्थापित करण्याची कला आहे.

युक्रेनमधील जनता हा निर्णायक घटक आहे. ही जनता जटील इतिहास आणि बहुभाषिक रचना असलेल्या देशात राहते. १९३९ मध्ये स्टॅलिन आणि हिटलर यांनी जिंकलेले भाग वाटून घेतले, तेव्हा युक्रेनचा पश्चिमेकडील भाग सोव्हिएट संघात समाविष्ट करण्यात आला होता. ६० टक्के रशियन लोकसंख्या असलेला क्रिमिया युक्रेनला भाग झाला १९५४ मध्ये. जन्माने युक्रेनियन असलेले सोव्हिएट रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव यांनी, रशियाच्या कोसाक्सबरोबर झालेल्या कराराच्या ३००व्या स्मरणवर्षानिमित्त, क्रिमिया युक्रेनला बक्षीस म्हणून दिला होता. पश्चिमेकडील भागात बहुतांशी कॅथलिक लोकसंख्या आहे; तर पूर्व भाग बहुतांशी ऑर्थोडक्स (पुराणमतवादी) रशियन आहे. पश्चिमेकडील भागात युक्रेनियन भाषा बोलली जाते, तर पूर्व भागाची भाषा प्रामुख्याने रशियन आहे. युक्रेनच्या एका भागाने दुसऱ्या भागावर वर्चस्व गाजवण्याचा कोणत्याही प्रयत्नाची परिणती अखेरीस नागरीयुद्ध किंवा विभाजनात होते, असा पॅटर्न दिसून येतो. युक्रेनकडे पूर्व-पश्चिम संघर्षाचा एक भाग म्हणून बघितले गेल्यामुळे, रशिया आणि पाश्चिमात्य जगाला, विशेषत: रशिया व युरोपला, एका सहकार्यात्मक आंतरराष्ट्रीय प्रणालीत आणण्याची शक्यता, अनेक दशकांपासून हुलकावणी देत राहिली आहे.

युक्रेन केवळ २३ वर्षे स्वतंत्र राहिला आहे; १४व्या शतकापासून हा भाग कोणत्या तरी परक्या सत्तेखाली आहे. साहजिकच युक्रेनमधील नेत्यांना तडजोडीची कला अवगत नाही, त्यांच्याकडे ऐतिहासिक दृष्टिकोन नाही. देशाच्या हटवाटी भागावर आपली इच्छा लादण्याचे प्रयत्न युक्रेनमधील राजकारण्यांच्या कोणत्या ना कोणत्या गटाने कायम केले आहेत आणि स्वातंत्र्योत्तर युक्रेनमधील समस्यांची मुळे याच राजकारणात आहेत हे स्पष्टपणे दिसत आहे. व्हिक्टोर यानुकोव्युच आणि त्यांच्या प्रमुख राजकीय विरोध युलिया तायमोशेंको यांच्यातील संघर्षाचे तात्पर्य हेच आहे. हे दोघे युक्रेनच्या दोन भागांचे प्रतिनिधित्व करतात आणि सत्ता वाटून घेण्यास अजिबात तयार नाहीत. युक्रेनचे दोन भाग एकमेकांबरोबर सहकार्याने राहावे याचा मार्ग शोधणारे धोरण या परिस्थितीत चातुर्याचे ठरेल. आपण समेटासाठी प्रयत्न केले पाहिजेत, एका भागाने दुसऱ्यावर वर्चस्व गाजवू नये हे बघितले पाहिजे.

रशिया व पाश्चिमात्य राष्ट्रांनी आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे युक्रेनमधील विविध गटांनी या तत्त्वावर कधीच काम केले नाही. यातील प्रत्येकाने परिस्थिती आणखी बिघडवण्यात हातभार लावला आहे. रशियाला स्वत:ला एकटे पाडून घेतल्याशिवाय लष्करी उपाय करता येणार नाही. विशेषत: स्वत: रशियाच्या अनेक सीमांवर सध्या नाजूक परिस्थिती आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी व्लादिमीर पुतीन यांना राक्षसाच्या स्वरूपात उभे करणे हे धोरण असू शकत नाही, किंबहुना, कोणतेही धोरण नसल्याने ते केले जात आहे.

पुतीन यांचे म्हणणे काहीही असो, लष्करी कारवाईचे धोरण म्हणजे आणखी एक शीतयुद्ध ओढवून घेणे आहे हे त्यांनी लक्षात घेतलेच पाहिजे. अमेरिकेबाबत बोलायचे तर, अमेरिकेने रशियाला, वॉशिंग्टनने प्रस्थापित केलेली आचारसंहिता न पाळणाऱ्या हट्टी मुलासारखे वागवणे, टाळले पाहिजे. पुतीन हे, रशियाच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर, गांभीर्याने व्यूहरचना करणारे नेते आहेत. अमेरिकी मूल्ये व मानसशास्त्र समजून घेण्यात ते पारंगत नाहीत किंवा रशियाचा इतिहास व मानसशास्त्र समजून घेण्याची कला अमेरिकी धोरणकर्त्यांनाही अवगत नाही.

सर्व बाजूंच्या नेत्यांनी, पवित्रा घेण्याची स्पर्धा लावणे सोडून, आपल्या जागी परत येऊन निष्पत्तीचे परीक्षण केले पाहिजे. सर्व बाजूंची मूल्ये व सुरक्षाविषयक हित लक्षात घेऊन एका अनुकूल निष्पत्तीची माझी कल्पना पुढीलप्रमाणे आहे:

  • आपले आर्थिक व राजकीय संबंध मुक्तपणे निवडण्याचा हक्क युक्रेनला असला पाहिजे.
  • युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता नाही, ही भूमिका मी गेल्या सात वर्षांपासून मांडत आहे.
  • आपल्या जनतेने व्यक्त केलेल्या इच्छेशी अनुकूल असे कोणतेही सरकार स्थापन करण्यास युक्रेन स्वतंत्र असले पाहिजे. त्यानंतर चतुर युक्रेनियन लोक त्यांच्या देशातील विविध भागांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी धोरण निश्चित करू शकतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी फिनलंडने घेतली त्या प्रकारची भूमिका घेऊ शकतात. या कल्पनेत त्यांच्या संपूर्ण स्वातंत्र्याविषयी कोणतीही साशंकता राहणार नाही आणि हे राष्ट्र पाश्चिमात्य राष्ट्रांशी बहुतेक क्षेत्रांत सहकार्य करू शकेल, मात्र, रशियाशी कोणत्याही प्रकारे संस्थात्मक शत्रुत्व टाळेल.
  • रशियाने क्रीमिया आपल्या सीमेला जोडून घेणे, सध्याच्या जागतिक रचनेतील, नियमांमध्ये बसणारे नाही. मात्र, क्रीमियाच्या युक्रेनशी असलेल्या संबंधांमधील कडवटपणा कमी करणे शक्य आहे. यासाठी रशियाने युक्रेनचे क्रीमियावरील सार्वभौमत्व मान्य केले पाहिजे. युक्रेनने क्रीमियाची निवडणुकांमधील स्वायत्तता, आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत, दृढ केली पाहिजे. सेव्हास्टोपोलमधील ब्लॅक सी फ्लीटच्या दर्जाबाबतच्या संदिग्धताही या प्रक्रियेत दूर केल्या जाव्यात.

ही तत्त्वे आहेत, घालून दिलेले नियम नव्हेत. यातील सर्व तत्त्वे सर्व पक्षांना रुचणार नाहीत, हे या या भागाशी परिचित असलेल्या लोकांच्या सहज लक्षात येईल. यातून पूर्णपणे समाधानापर्यंत पोहोचणे शक्य नसले, तरी असमाधानामध्ये समतोल साधणे शक्य आहे. या तुलनात्मक घटकांच्या आधारे काही उपाय काढणे शक्य झाले नाही, तर संघर्षाच्या दिशेने वाटचाल जलद गतीने होईल. ही वेळही लवकरच येईल.

हेन्री किसिंजर. हे १९७३ ते १९७७ या काळात अमेरिकेत सेक्रेटरी ऑफ स्टेट होते. हा लेख यापूर्वी ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

COMMENTS