निसर्ग माझा, मी निसर्गाची!

निसर्ग माझा, मी निसर्गाची!

निसर्ग जिथे तिथे आहे. तो वेगळा शोधावा लागत नाही फक्त त्यासाठी एक वेगळी दृष्टी लागते. जी लोकं म्हणतात, “मला निसर्ग आवडतो. मला निसर्गात जायला आवडतं.” त्यांना याचा विसर पडत असावा की ते निसर्गातच आहेत. निसर्गात वेगळं जावं लागत नाही. तो ‘इथे आणि आत्ता’ आहे.

पक्ष्यांच्या आवाजाची किमया
गुपित महाधनेशाचे
लॉकडाऊनमधला छंद : स्थानिक निसर्ग-निरीक्षण

घरात लहान मुलं, झाडं, पाळीव प्राणी असले की मोठ्या माणसांना एक वळण असतं. शिस्त असते. ते इकडे तिकडे भरकटत नाहीत. नित्यनेमाने वेळापत्रक पाळावंच लागतं. एकदा का आयुष्याला वेळापत्रक असलं की बाहेर कोविड आहे का अजून काही आहे, याने फरकच पडत नाही. आपण आपल्याच मस्तीत आयुष्य सुंदर करत राहतो. स्वतःला शिस्त लावायची असेल तर निसर्गाचा एक छोटा तुकडा आपण आपल्या घरात आणायला हवा, जसं आपण शोभेच्या वस्तू उत्साहाने आणून ठेवतो घरात तसंच. फक्त हा निसर्गाचा भाग शोभेच्या वस्तूंइतका अलिप्त राहत नाही. तो आपल्यात मिसळून जातो. आपल्याला बदलवून टाकतो आणि आपल्याही नकळत आपण त्याचा भाग होऊन जातो.

२२ मार्च २०२०. सगळ्यांनाच हा दिवस चांगलाच लक्षात असेल. त्या दिवशी आपण बाल्कनीत, टेरेसवर जाऊन टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, जनता कर्फ्यू पाळला. त्याच दिवशी रात्री आमचा अतिशय जवळचा मित्र अर्जुन, वयाच्या ५७ व्या वर्षीच, हृदयाच्या दुखण्याने गेल्याचं त्याच्या बायकोनं कळवलं. त्याच्या आधीचे दोन महिने त्याचं आजारपण चालूच होतं. पण तो बरा होत होता. त्यामुळे त्याचं असं अचानक जाणं मन पोळून गेलं. करोनाचे वारे वाहू लागले होते पण मृत्यूचं थैमान सुरू झालं नव्हतं. त्यामुळं गर्दीवरची बंधनं सुरू झाली होती. ह्या भल्या माणसाच्या अंत्यविधीला वीसच जण जाऊ शकणार होते. आम्ही त्या वीसातले. तिथून परततानाच संचारबंदीची बातमी आली. आणि रातोरात लॉकडाऊन सुरू झालं. मन ‘डिनायल मोड’ मध्येच होतं. आमच्या मनात तर दोन डिनायल सुरू होते. अर्जुनचं असं जाणं आम्हा कोणालाच मान्य नव्हतं आणि लॉकडाऊन तर अजिबातच शक्य कोटीतली गोष्ट वाटत नव्हती.

करोना काळाची सुरुवातच आम्हाला अशी कातर करून गेली होती. अर्जुन आणि आमच्या मैत्रीतला मुख्य दुवा होता ते म्हणजे आमचं निसर्गप्रेम, निसर्ग निरीक्षण प्रेम, बागकामाचं वेड, सेंद्रिय, नैसर्गिक शेतीचं स्वप्न. अशा वेड्या लोकांच्या एकमेकांना भेटी तरी काय असणार? झाडं! आमच्या सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावरच्या टेरेसवर गेल्या सात वर्षांत ड्रममध्ये लावलेल्या झाडांपैकी अनेक झाडं त्यानंच दिलेली होती. माणूस गेलं तरी अनेक वस्तू, गोष्टींमधून त्याच्या आठवणी ताज्या राहतात. झाडांमधून तर आठवणी नुसत्या राहत नाहीत तर त्या वाढतात. रोज पाणी घालून तुम्ही त्या वाढवता. फुलं आली की त्याही बहरतात. फळं आली की मन भरून येतं. फळं तोडताना झाडाला इजा होऊ नये म्हणून आपसूक प्रयत्न होतात. असं अन्न संयमानं खाल्लं जातं. शहरामध्ये सहजी उपलब्ध होत असलेल्या अन्नाची विसरली गेलेली किंमत लक्षात येते. उष्टं-खरकटं, भाज्या-फळांचा काडी कचरा कंपोस्टींगच्या ड्रममध्ये टाकताना संदीप खरेच्या, “मातीत माती मिसळत जगू…” या ओळी आठवतात. आणि त्याच परत एकदा करोनाने ओढवलेल्या एकटेपणाकडे घेऊन जातात आणि तो सहन करण्याची ताकदही देतात.

गावात राहून नैसर्गिक शेती करण्याचं माझं स्वप्न काही कारणांनी लांबणीवर टाकावं लागणार असं खूप वर्षांपूर्वी जेव्हा मला दिसत होतं, तेव्हा मी स्वतःला विचारत होते की निसर्गाशी सुसंवाद साधत राहायचं असेल तर कोणासाठीही उपलब्ध असलेला साधा सरळ मार्ग काय? उत्तर आलं. अन्न! अन्न तयार करणे, प्रत्यक्ष उगवणे, त्याच्यावरच्या प्रक्रिया आणि सरतेशेवटी स्वयंपाक आणि अजून एक राहिलंच, प्रत्यक्ष जेवण आणि आता मात्र अगदी शेवटची पायरी, कंपोस्टींग. त्यावेळी लक्षात आलेलं हे सत्य आता ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म!’ यात दिसतं. आधीच्या आणि नंतरच्या सगळ्या पायर्‍या गाळल्या तरीही उदर भरणाची पायरी टाळणं कोणालाही शक्य होत नाही. उपवास हा नियम नसून अपवाद असतो. अन्न जसं आपल्या पूर्ण प्राणालाच अन्न देतं तसं ते आपल्या ज्ञानेंद्रियांनाही देतं. दृश्य, वास, स्पर्श, चव आपल्याला आपल्यातलं जिवंत माणूस जाणवून देत राहतं. खरंतर अन्नासंदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या कृती वर लिहिल्या त्या करताना निर्माण होणारे निरनिराळे आवाजही तितकेच महत्त्वाचे. शेतात गेलो तर, पाखरांची किलबिल, शेतकर्‍यांचे हाकारे, कीटकांची गुणगुण, उंदरांची कुरकुर, फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये गेलो तर मशिनचे आवाज, आणि स्वयंपाकघरात गेलो तर तर विचारायलाच नको, फोडणीचं सूंSSSS, खलबत्त्याची घण घण, किसणीची खसखस, लायटरची टिकटिक, भांड्यांची किणकिण (अर्थात, कोणावर रागावून आदळआपट करत नसलात तर!), ऊतू आलेल्या दूधाचा सापाच्या फुत्कारासारखा येणारा आवाज, त्यातलीच वेगळी जात भरीत्याच्या वांग्याची, अंतरात्म्याला थंड करत जाणारा पाण्याचा घुट्ग़्हुट, सुपातल्या धान्याची, शेंगदाण्याची धाप धाप…

हे न संपणारं आहे. पण मुख्य मुद्दा आहे की निसर्ग जिथे तिथे आहे. तो वेगळा शोधावा लागत नाही फक्त त्यासाठी एक वेगळी दृष्टी लागते. जी लोकं म्हणतात, “मला निसर्ग आवडतो. मला निसर्गात जायला आवडतं.” त्यांना याचा विसर पडत असावा की ते निसर्गातच आहेत. निसर्गात वेगळं जावं लागत नाही. तो ‘इथे आणि आत्ता’ आहे. प्रश्न फक्त मी ‘इथे आणि आत्ता’ आहे का, हा आहे. आणि तसं जर तुम्ही असलात की ‘मी निसर्गाची/चा आणि निसर्ग माझा’ ही स्थिती निर्माण व्हायला क्षणही पुरतो. अर्थातच, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ मला कळतो. आपल्या घरातून उठून इतर कुठेतरी जाण्याची गरज अगदी आदिमानवापासून चालत आलेली आहे. तेव्हा तर त्याचं एकाच जागी असं पक्कं घरंच नव्हतं. आजूबाजूची संसाधनं संपू लागली की दर काही काळाने आजूबाजूचा परीसर बदलणं क्रमप्राप्तच होतं. पण पुढे शेती, कुंभारकाम आणि धातूचं काम वाढता वाढता एके जागी राहणारा माणूस, देवाला भेटायला जंगलातल्या देवरायांमध्ये जाणारा माणूस प्रवासाची साधनं आणि निमित्तच शोधू लागला. आणि शेवटी आजच्या घडीला, “मला प्रवास करायला आवडतो. मला नव्या जागा धुंडाळायला आवडतात.” या सत्यापर्यंत पोहोचला. नाविन्याची ओढ, गरज नाकारता येत नाहीच. पण गरज असेल तर ती लांबणीवर टाकून रोजच्याच जागी नाविन्य निर्माण करता येतं. ‘मायक्रोग्रीन’ हा असाच ‘…रोज नया इतिहास रचाएंगे…’ मधला प्रकार! खूप कमी संसाधनांमध्ये खूप आनंद देऊन जाणारा! आणि फक्त आनंदच नाही तर पोषण मूल्यही देणारा प्रकार!

नव्याने उगवून यायला फक्त एक बी लागतं जिवंत,

जे तुमच्या आमच्याही नकळत असतं स्वतःला जपत,

तेच बी अंकुरताना पाहिलं की जीवालाही उधाण येतं,

आकाश पृथ्वी एका प्राणाच्या आत येतं.

तुमच्याजवळ असेल ती बी असेल त्या मातीत पेरा. आता पाणी घालण्यापलिकडे काहीच करू नका, फक्त आनंद लुटा. Sitting quietly, doing nothing, spring comes and the grass grows by itself. – Zen Proverb

गवत उगवून आलं म्हणून कधी कधी तण म्हणून काढून टाकावं लागत असलं, तरीही नेहेमीच तशी गरज नसते. गवतालाही सुंदर फुलं येतात जी आपल्याला इंदिरा संतांनी, वर्ड्सवर्थ यांनी उदाहरणांसकट दाखवून दिली आहेत. मग आम्हा पामरांची झोळी का रिकामी?

संदीप खरे म्हणतात ‘मन तळ्यात, मळ्यात, जाईच्या कळ्यांत… मन नाजुकशी मोती माळ, …’

एकाच वेळी निसर्गात असलेलं माझं मन, आणि माझ्या मनात असलेला निसर्ग, माझ्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्न करून टाकतं. नातेसंबंध फुलवून टाकतं. केलेल्या कामाचं फळ आपोआप मिळतं. अजून काय हवं या छोट्या जीवाला?

प्रीती पुष्पा-प्रकाश, शिक्षण आणि पर्यावरण या विषयांत लेखन करतात.

NatureNotes

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0