‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची प्रतिबंधात्मक चाचणी घ्यावी’

‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची प्रतिबंधात्मक चाचणी घ्यावी’

कोरोनाच्या साथीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाययोजनांविषयी ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी केलेली बातचीत लेख स्वरुपात.

‘लॉकडाउनमुळे २०-२५टक्केच संसर्ग रोखला जाईल’
मान्यवरांच्या राज्यसरकारला सूचना
भारतामध्ये होऊ शकतात पाऊण कोटी मृत्यू
सध्या काही दिवसांत म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्या मानाने बरे होणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि मृत्यूची संख्या वेगाने वाढत आहे.
अगोदर आपण पहिले, की परदेशांतून आलेल्या लोकांमध्येच कोरोनाचा प्रसार होता, किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये होता. हा पहिला टप्पा होता. त्यांच्या संपर्कात आलेले रुग्ण वाढत गेले. हा दुसरा टप्पा होता. आता असे रुग्ण वाढत आहेत, की ज्यांचा कोणाशीही संपर्क आला नव्हता. म्हणजे संपर्काचा शोध लागत नाही. याला आपण कम्युनिटी ट्रान्समीशन म्हणतो. हा तिसरा टप्पा आहे. त्यामुळे भारतात, महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आहोत, असे म्हणता येईल. आता आपण जर व्यवस्थित काळजी घेतली नाही, योग्य नियंत्रण केले नाही, सर्वांनी नीट नियम पाळले नाहीत, तर परिस्थिती भयंकर होईल.
सरकारने जरी तिसरा टप्पा जाहीर केला नसला, तरी त्याची कल्पना सर्वांना आहे, म्हणूनच पहिला लॉकडाऊन संपल्यावर त्याची मुदत अजून पुढे ३ मे पर्यंत वाढविण्यात आली. याची अनेक राज्यांना कल्पना असल्याने, वेगवेगळ्या राज्यांनी अगोदरच लॉकडाऊनची मुदत वाढविली होती.
दुसरा टप्प्यातील उपाययोजना खूप महत्त्वाच्या असतात. त्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने खूप काम केले. मात्र आता तिसऱ्या टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत, तर हा टप्पा लवकर संपविणे गरजेचे आहे. त्यासाठी खूप कडक उपाययोजना कराव्या लागतात.
जगाच्या इतिहासामध्ये हा विषाणू नवा असला तरी इतर वैद्यकीय इतिहास पाहता, काही पावले उचलावी लागतात. त्यामध्ये त्वरीत निदान होणे आवश्यक आहे. इन्फेक्शन झाल्याझाल्याच निदान झाले, तर ही साथ आटोक्यात येऊ शकेल. त्यासाठी टेस्टसची संख्या वेगाने वाढवली पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण कोरीया. त्यांनी टेस्ट्सची संख्या वाढवली आणि १५ दिवसांमध्ये रुग्ण वाढीचा दर निम्म्यावर आणला. त्यांनी दर १० लाख लोकांमध्ये ५ हजार २०० लोकांचे निदान केले. भारतामध्ये हे प्रमाण ७०० ते ८०० इतके आहे. मुंबईमध्ये हे प्रमाण १५०० पर्यंत गेले आहे. दिल्लीमध्ये हे प्रमाण ८०० इतके आहे. बाकीच्या ठिकाणी हे प्रमाण नगण्य आहे. टेस्ट्स किट्स वेगाने वाढवले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, की टेस्ट करणाऱ्या प्रयोग शाळांची संख्या एकवरून २२० पर्यंत वाढविली आहे. मात्र भारतासारख्या विस्तृत देशामध्ये या सुविधा अधिक प्रमाणात हव्यात. निदान करणाऱ्या सुविधा वाढविल्या पाहिजेत.
दुसरा भाग म्हणजे प्रतिबंधक उपाय. आज अजूनतरी कोरोनासाठी प्रतिबंधक उपाय नाहीत. हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची आशा जगभरामध्ये लागून राहिली आहे. की जे अजून फारसे सिद्ध झालेले नाही. भारताने अमेरिकेलाही ते निर्यात केले. मग जर भारतामध्ये खरोखरीच एवढा साठा असेल, तर भारतातील सर्व नागरिकांना प्रतिबंधक उपाय म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन द्यायला काही हरकत नाही. त्याचे काही वेगळे परिणाम लक्षात घेऊन आणि कोणाला देऊ नये, हे लक्षात घेऊन, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन द्यावे. १५ वर्षाखालच्या मुलांना किंवा ज्यांना लिव्हर आणि किडनीचा त्रास आहे, त्यांना देऊ नये, हे वगळता इतरांमध्ये याचा उपयोग होतोय का हे पहायला हरकत नाही. असे समजूयात की एक मोठी ट्रायल होईल. ज्यातून निघालेले निष्कर्ष जगासमोर ठेवता येतील.
आता सध्या तरी वैयक्तिक स्वच्छता, हात धुणे, मास्क वापरणे, घराच्या बाहेर न पडणे, सोशल डीस्टसिंग याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. हे सांगणे खूप सोपे आहे, पण आज भारतामध्ये काही फुट अंतर ठेवणे अवघड आहे. कारण झोपडपट्टी आणि निम्न आर्थिक स्तरातील लोकांची घरे तेव्हढी मोठी नाहीत. छोट्या घरात आठ ते दहा माणसे राहत असतात. त्याचाही विचार करावा लागेल. सध्या शाळा बंद आहेत, तर तिथे अशा व्यवस्था होऊ शकतात.
अनेकांकडे मास्क नाहीत. सर्वांना कापडी मास्क मोफत उपलब्ध करून द्यायला हवेत. सर्वांनी मास्क वापरावेत, असा नियम सरकारने केला आहे. पण प्रत्यक्षात मास्क मिळत नाहीयेत आणि त्यांच्या किमती पाहता, ते पुरविण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. धान्य ज्याप्रमाणे कमी दारात किंवा मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे, त्याप्रमाणे मास्क दिले पाहिजेत.
लोकांनी स्वतःहून टेस्ट कराव्यात का?
कडक ताप, श्वास घ्यायला त्रास, सर्दी आणि खोकला अशी एखाद्याला जर लक्षणे असतील, तर त्यांनी आपापल्या डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करून घ्यायला हवी.
मात्र ज्या लोकांना मधुमेह, हृदय रोग किंवा कर्क रोग आहे, अशा लोकांनी तर थोडी जरी शंका आली तरी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करून घ्यावी. मात्र एखाद्याला स्वतःला जर टेस्ट करून घ्यायची असेल, तर त्याला टेस्ट करवून घ्यायची मुभा हवी. खाजगी प्रयोगशाळेत टेस्ट आता होऊ लागल्या आहेत पण त्यासाठी डॉक्टरांची चिट्ठी लागते, तो नियम काढून टाकायला हवा.
‘आयएमए’तर्फे कोरोना संदर्भात सध्या कसे काम सुरू आहे?
आम्ही नुकतेच महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांना भेटलो. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन राज्य सरकार बरोबर पूर्ण काम करेल, असे आम्ही त्यांना सांगितले. आमच्याकडे अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहेत. संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ आहेत. यांचा उपयोग कसा करून घेता येईल, यावर चर्चा केली. सरकारकडे जी साधने कमी पडतात, त्या ठिकाणी आम्ही मदत करीत आहोत.
यामध्ये कोरोना रुग्णालयात आवश्यकता भासल्यास आमचे डॉक्टर काम करतील. ‘आयएमए’तर्फे महाराष्ट्रात काही खास कम्युनिटी क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. ज्यामध्ये रुग्णांना तपासून त्यांची लक्षणे बघून त्यांना, कोरोना रुग्णालयात पाठवायचे का याचा निर्णय केला जातो. तसेच ग्रामीण भागामध्ये ‘रक्षक’ क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. तिथेही रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. दुसरे काही आजार आहेत, का याचीही तपासणी केली जाते. कारण सध्या डेंग्यूचीही साथ सुरू आहे. किंवा उन्हाळ्याचे इतर आजार झाले आहेत, का हे पाहून उपचार केले जात आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अनेक रुग्ण दवाखान्यात येऊ शकत नाहीत. अशा रुग्णांसाठी आम्ही मोबाईल क्लिनिक सुरू केले आहेत. ज्यामध्ये ‘डॉक्टर तुमच्या दारी’ ही योजना राबविण्यात येत आहे.
या साथीमध्ये अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाल्यास त्याला 1 कोटी रुपयांची मदत मिळावी, अशी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे. डॉक्टरांवर हल्ल्याच्या संदर्भात जो कायदा आहे, त्याची कडक अंमलबजावणी करावी आणि त्यामध्ये ७ वर्षाची शिक्षा करावी आणि तो गुन्हा अजामीनपात्र करावा, अशी आम्ही मागणी केली आहे. एखाद्या डॉक्टरपासून उपचार करताना इतरांना कोरोना झाल्यास त्याला कायदेशीर संरक्षण मिळावे, अशीही मागणी केली आहे. त्याला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0