मी आणि गांधीजी – ३

मी आणि गांधीजी – ३

गांधी समजून घेताना - महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. काळाचा मोठा फरक असला तरी गांधीमुल्य कायम आहेत का? काळाच्या कसोटीवर गांधींचे विचार कसे उतरतात? एका तरुणाचा महात्मा गांधी यांच्याशी निरंतर संवाद सुरु आहे. खरेतर गांधींच्या बरोबर, हा संवाद कोणाचाही होऊ शकतो.

‘काश्मीर धोरणावर टीका केली म्हणून व्हिसा नाकारला’
यावत्चंद्रदिवाकरौ
आमार कोलकाता – भाग २

१४

मी : वा! हेच बघायचं बाकी होतं…
गांधीजी : काय झालं?
मी : सुनील तटकरेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे?
गांधीजी : मला ना कधीकधी तुझं फार म्हणजे फार हसू येतं.
मी : का?
गांधीजी : कारण अजूनही अशा बातम्यांनी तुला धक्का वगैरे बसतो.

१५

गांधीजी : गुजरातमध्ये निवडणूक वगैरे आहे का रे?
मी : हो
गांधीजी : तरीच…गडबड दिसते बरीच. सभा, भाषणं, आरोप, प्रत्यारोप आणि काय काय…
मी : तुम्ही जाणार का?
गांधीजी : मी? माझं तिथे काय काम?
मी : असं कसं? तुम्ही तर सगळ्यांनाच हवे असता.
गांधीजी : हो. पण भांडताना मी नको असतो. भांडण झाल्यावर मलमपट्टीच्या वेळी हवा असतो.

१६

मी : तसं नाही, तसं नाही. तुम्हाला एक तरी कारण द्यावंच लागेल.
गांधीजी : असं आहे होय. म्हणजे अकाऊंट डी-अ‍ॅक्टिव्हेट करताना कारण देणं बंधनकारक आहे.
मी : हो.
गांधीजी : बरं. मग लिहितो. ‘आय विश टू डी-अ‍ॅक्टिव्हेट बिकॉज आय विश टू डी-अ‍ॅक्टिव्हेट’…काय?
मी : चालेल.
गांधीजी : चला, झालं.
मी ; मग आता काय?
गांधीजी : म्हणजे?
मी : म्हणजे फेसबुक बंद केलंत ना, मग आता काय?
गांधीजी : तुझा हा प्रश्न डिस्टर्बिंगली भेदक आहे.
मी : म्हणजे?
गांधीजी : म्हणजे फेसबुक जीवन व्यापून उरलंय असं काहीतरी सूचित होतंय तुझ्या प्रश्नातून
मी : तसं नाही हो. मला असं म्हणायचंय की आता काही प्लॅन्स आहेत का…
गांधीजी : अजूनही भेदकच आहे प्रश्न. म्हणजे एक पोकळी वगैरे निर्माण झालीय, जगण्याचा एक आधार निखळलाय, आता काय करणार असं काहीतरी तुला विचारायचंय असं वाटतंय.
मी : अहो नाही.
गांधीजी : मग तुला काय विचारायचंय?
मी : मला असं विचारायचं होतं की आता, म्हणजे पुढे…
गांधीजी : काय?
मी : तुमचं बरोबर आहे. प्रश्न भेदक आहे. आय सरेंडर.
गांधीजी : असू दे अरे… त्याची गरज नाही. फक्त यानिमित्ताने एक लक्षात घेशील.
मी : काय?
गांधीजी : आपण हत्यारं वापरायची असतात….
मी : हत्यारांनी आपल्याला वापरायचं नसतं.
गांधीजी : बरोबर! खारीक खाणार का?
मी : नको.
गांधीजी : बरं.

१७

मी : बिस्मार्क करेक्ट बोललाय.
गांधीजी : काय?
मी : मनुष्य जेव्हा एखादी गोष्ट तत्त्वतः मान्य करतो तेव्हा ती अमलात आणण्यात त्याला काडीचाही रस नसतो
गांधीजी : हं…असं होतं खरं.
मी : आणि लोक तुम्हाला नावं का ठेवतात माहितीय?
गांधीजी : का?
मी : कारण तुम्हाला तत्त्व अमलात आणण्यात रस असतो.

१८

गांधीजी : काय रे, हे ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ काय प्रकरण आहे?
मी : टीव्ही मालिका आहे. म्हणजे होती. आत्ता का आठवली तुम्हाला?
गांधीजी : अरे एक लेख वाचत होतो एका साईटवर. त्यात उल्लेख होता. तू पाहिली आहेस का?
मी : नाही. सध्या मराठी मालिका बघत नाही. ‘सध्या’ हा शब्द महत्त्वाचा आहे.
गांधीजी : का?
मी : वाईट असतात.
गांधीजी : अरे? बरं…
मी : म्हणजे लग्नाच्या मंडपातून मालिका बाहेर आल्या आणि इतर विषयांकडे वळल्या की बघेन. उदाहरणार्थ ‘एका घटस्फोटाची आनंदी गोष्ट’, ‘चाळिशीतल्या जोडप्याची खरी गोष्ट’, ‘लग्नाच्या पर्यायाची गोष्ट’, ‘जिवंत माणसं, जिवंत प्रश्न’, ‘एका खेड्याची वास्तव गोष्ट’, अशा मालिका आल्या तर बघेन.
गांधीजी : बरं, बरं. फारच कडकड होतेय तुझी.
मी : हो. सध्या तेवढंच चांगलं जमतंय.
गांधीजी : ‘सध्या’ हा शब्द महत्त्वाचा आहे ना?
मी : हो..
गांधीजी : गुड!

१९

मी : मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का…
गांधीजी : काय होतंय? बरा आहेस ना?
मी : काही व्हायला कशाला हवं? गालिबची प्रसिद्ध रचना आहे. हजारों ख्वाहिशें ऐसी, के हर ख्वाहिश पे दम निकले…
गांधीजी : गालिब म्हणजे तो उर्दू शायरच ना?
मी : हो.
गांधीजी : मला कधी जमलंच नाही रे शायरी वगैरे ऐकायला…
मी : हं..
गांधीजी : पण काय रे…प्रेम म्हणून जे काही आहे ते जरा ओव्हररेटेड आहे असं नाही वाटत तुला?
मी : अजिबात नाही.
गांधीजी : हं…मला वाटतं बुवा तसं. शेवटी सगळ्या तृष्णाच की…
मी : असं कसं म्हणता? प्रेम ही एक सुंदर आणि श्रेष्ठ अनुभूती आहे. ती माणसाला उन्नत करते.
गांधीजी : हो. पण तरी त्यात ‘ताबा’ आहेच. मग भौतिक आकांक्षा आणि प्रेम यात फरक कसा?
मी : म्हणजे?
गांधीजी : म्हणजे असं बघ की एखाद्याला स्वतःचा मोठा बंगला बांधायचाय किंवा खूप आवडीची एखादी महागडी कार घ्यायचीय. तर त्याची ती इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि एखाद्या व्यक्तीचं प्रेम मिळावं म्हणूनची इच्छा यात फरक काय?
मी : कमाल करता! फरक आहे की…भौतिक इच्छांच्या पूर्ततेसाठी माणूस कुठल्याही थराला जातो. ते वाईट आहे.
गांधीजी : बरोबर. पण मग प्रेमाची इच्छा पूर्ण व्हावी, प्रेम मिळावं म्हणून जर माणूस बिथरला, कुठल्याही थराला गेला किंवा अगदी विव्हळत बसला तर त्याला काय म्हणायचं?
मी : तुम्ही डेंजर आहात जरा.
गांधीजी : छे! अरे एकदम जाणवलं ते बोललो…माझं चुकतही असेल. मी डिबेट करतोय फक्त…कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी.
मी : कन्सेप्च्युअल क्लॅरिटी डेंजरच असते सहसा…
गांधीजी : अरे! तू एकदम उदास वगैरे नको होऊस बाबा. म्हण बरं ते गाणं. गाणं म्हणावंच माणसाने.
मी : बरं म्हणतो.
गांधीजी : खजूर खाणार का?
मी : नको.
गांधीजी : बरं.

२०

गांधीजी : काय…सिनेमा वाटतं?
मी : हो.
गांधीजी : कुठला सिनेमा आहे रे हा?
मी : गँग्ज ऑफ वासेपूर.
गांधीजी : बरं, बरं. गमतीशीर नाव आहे. मारामारी दिसते बरीच.
मी : हो. पण सिनेमा खतरनाक आहे.
गांधीजी : खतरनाक?
मी : आय मीन चांगला आहे. पण तुम्हाला नाही आवडणार.
गांधीजी : का बरं?
मी : तुमची तशी प्रकृती नाही. म्हणजे गँग्जमधल्या मारामाऱ्या, हिंसा हे सगळं तुम्हाला कसं आवडणार?
गांधीजी : अच्छा.
मी : बंद करू का?
गांधीजी : नको, नको. तू बघ. मी बसतो आत सूत कातत.
मी : तुमची मला कमाल वाटते यार.
गांधीजी : कसली कमाल?
मी : तुम्हाला अजून सूत कातावसं वाटतं?
गांधीजी : हो.
मी : कंटाळा नाही येत?
गांधीजी : अरे कंटाळा येतोच माणसाला. मलाही येतो कधीकधी. पण सूत काढण्यात मला आनंद मिळतो. बहुधा तुला सिनेमा बघताना मिळतो तसाच.
मी : हं. पण नैराश्य नाही येत? .
गांधीजी : कशामुळे?
मी : आजूबाजूला जे घडतंय त्याच्यामुळे? आपण पुरे पडत नाही असं नाही वाटत?
गांधीजी : नाही बुवा.
मी : कसं काय?
गांधीजी : कारण मी सूत काततोच आहे.

२१

गांधीजी : काय रे, बिप्लव देव म्हणजे कोण?
मी : जाऊ द्या हो. आपल्याला काय करायचंय?
गांधीजी : अरे! बरं, मग कर्नाटकात कुणीतरी म्हणालं की हातापायाला बांधून लोकांना घेऊन या मतदानाला म्हणून…
मी : जाऊ द्या हो ते.
गांधीजी : आणि खुद्द आपले पंतप्रधान कुत्र्यांकडून देशभक्ती शिका वगैरे म्हणाले. काय भाषा रे ही? आणि तीही पंतप्रधानपदावरील व्यक्तीकडून?
मी: सोडा हो ते.
गांधीजी : हे भाजप आयटी सेलवाले काहीतरी खोटंनाटं पसरवतात असं वाचतोय.
मी: अहो, आपल्याला काय करायचंय…
गांधीजी : अरे रीतसर पैसे घेऊन लोक काम करतात असं उघडकीस आलंय म्हणे. एक पुस्तकही प्रसिद्ध झालंय यावर.
मी : अहो, पुस्तक काय, कोणीही छापून देतं. जाऊ दे ते.
गांधीजी : अरे, असं कसं… सगळंच कसं जाऊ दे?
मी : तुम्ही ओल्ड फॅशन्ड आहात.
गांधीजी : म्हणजे काय आता?
मी : अहो विकासाच्या वाटेवर काटे पसरताय तुम्ही. आपल्याला विकास हवा की नको?
गांधीजी : अरे पण…
मी : विकास हवा की नको?
गांधीजी : मी काय म्हणतो…
मी : तुम्ही काही म्हणू नका. फक्त विकास हवा की नको ते सांगा आधी.
गांधीजी : नाही, विकास समजा ठीक आहे…पण…
मी : असं गुळमुळीत बोलायचं नाही. खणखणीत उत्तर द्या. विकास हवा की नको?
गांधीजी : हवा, हवा.
मी : शाब्बास! आता तुम्ही समकालात आलात.
गांधीजी : अच्छा. हे असं आहे होय.
मी : मग? तुम्हाला काय वाटलं? जया अंगी विकासाची तळमळ, तया यातना कठीण….चहा घेणार?
गांधीजी : तुला नाही कस म्हणणार? घेऊया.

उत्पल व. बा., हे लेखक आणि संपादक आहेत.

क्रमशः

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: