मी आणि गांधीजी – ६

मी आणि गांधीजी – ६

गांधी समजून घेताना - महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. काळाचा मोठा फरक असला तरी गांधीमुल्य कायम आहेत का? काळाच्या कसोटीवर गांधींचे विचार कसे उतरतात? एका तरुणाचा महात्मा गांधी यांच्याशी निरंतर संवाद सुरु आहे. खरेतर गांधींच्या बरोबर, हा संवाद कोणाचाही होऊ शकतो.

गांधीजी : भाई म्हणजे कोण रे?
मी : तुम्ही कुठे ऐकला हा शब्द?
गांधीजी : सिनेमाचं पोस्टर बघितलं. मॉलमध्ये.
मी: वेट…तुम्ही चक्क मॉलमध्ये गेला होतात?
गांधीजी : फिरायला गेलो होतो. मधे एक भलंमोठं प्रकरण दिसलं. सहज आत गेलो. गंमत म्हणून.
मी : ओके. कसं वाटलं मग?
गांधीजी : चकचकीत सगळं. केवढी दुकानं. हॉटेल्स. आणि काय काय…खरं सांगू का? मला दडपणच आलं.
मी : हं. स्वाभाविक आहे.
गांधीजी : किमती खूप होत्या. अरे, बाराशे रूपयांचा शर्ट बघितला मी तिथे!
मी : हं…मॉल ही गोष्ट तुमच्यासाठी नाही.
गांधीजी : हो. मला असं वाटलं की आपली मिनिमलिस्टिक जीवनशैली आता जुनी झाली. आता मॅक्सिमलिस्टिक जगणं चालू आहे..
मी : करेक्ट! आज बहुतेकदा मिनिमलिस्टिक जगणं निवडीने नाही, नाईलाजाने होतं.
गांधीजी : हं… बरं असो. मी निघतो आता. सायकलची चेन सारखी पडतेय. जरा बघायला हवं.
मी : काय हो…
गांधीजी : काय?
मी : तुम्ही तुमचं आयुष्य निवडीने घडवलं असावं असं वाटतं. नाईलाजाने नाही.
गांधीजी : हो. बऱ्याच अंशी. का?
मी : निवड करताना किंवा केल्यावर कधी पश्चात्ताप झाला का?
गांधीजी : नाही.
मी :कसं काय?
गांधीजी : सोपं आहे. जगणंच मिनिमलिस्टिक…
मी : त्यामुळे अपेक्षाभंग, पश्चात्ताप…सगळंच मिनिमलिस्टिक
गांधीजी : करेक्ट…
मी : पण मग आयुष्य मोनोटोनस होतं त्याचं काय?
गांधीजी : ते तर मॅक्सिमलिस्टिक जगण्यातही होतं.
मी : असं काही नाही. त्यात क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो.
गांधीजी : मिनिमलिस्टिक जगण्यात क्रिएटिव्हिटी नसते असं कुणी सांगितलं तुला? शर्ट विकत घेण्यात क्रिएटिव्हिटी आहे की आपला शर्ट आपण शिवण्यात?
मी : हां, ते बरोबर आहे. पण…
गांधीजी : पण ते बोअरिंग होतं… बरोबर?
मी : हं…
गांधीजी : म्हणजे असं बघ की काम मनावर केलं पाहिजे. मिनिमलिस्टिक जगणं हा त्याचा एक मार्ग आहे. पण गंमत अशी की जास्त काम मॉलवर होतंय. मनावर नाही.
मी : सो दॅट्स युवर कम्प्लेंट…
गांधीजी : कन्सर्न….कम्प्लेंट करणं तुझं डिपार्टमेंट आहे.
मी : बोललात…!
गांधीजी : अरे, क्वचित मीही जगणं मॅक्सिमाइज करतो.

३४

गांधीजी : हा एक शब्द कळला नाही नीट…
मी : कुठला?
गांधीजी : फुरोगामी.
मी ; तुम्ही काय वाचताय? आणि कशाला?
गांधीजी : लेख आहे एक. इ-मेलवर फॉरवर्ड केलाय एकाने.
मी : बरं.
गांधीजी : नुसतं बरं काय? शब्दाचा अर्थ सांग की…
मी : अहो ‘पुरोगामी’ शब्दाचं विडंबन आहे ते.
गांधीजी : अच्छा. पण त्यातून काही अर्थ निघत नाही. विडंबनसुद्धा अर्थवाही असावं ना…
मी : जाऊ द्या हो. तुम्ही कशाला विचार करताय? लेख वाचून तुम्हांला लेखकाची भूमिका कळली असेलच. मग झालं…
गांधीजी : हो. भूमिका कळली. त्याच्या म्हणण्यात आकांडतांडव खूप होतं. पण थोडं तथ्यही होतं.
मी : झालं! आता तुम्हीसुद्धा त्यांची बाजू घ्या.
गांधीजी : बाजू? अरे बाजू कुठे घेतली? मी इतकंच म्हटलं की त्यात थोडं तथ्य होतं….तू एकदमच अस्वस्थ झालास.
मी : अस्वस्थ होणारच. अहो, इथे या राइट विंगवाल्यांनी उच्छाद मांडलाय. मीडियासुद्धा कब्जात आहे त्यांच्या. लाज आणतात हे लोक पत्रकारितेला. खोटं तर इतकं पसरवतात…त्यात त्यांची काय चूक म्हणा? खुद्द आपले पंतप्रधानच खोटं बोलतात अनेकदा. आणि त्यात तुम्ही तथ्य वगैरेची भानगड काढताय.
गांधीजी : म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मला तथ्य दिसलं तरी ते मी नाकारावं?
मी : नाकारू नका. पण हे जे काय चाललंय राइट विंगचं त्याचं काय?
गांधीजी : ते वाईटच आहे. आणि अधिक वाईट हे की जे अंधपणे समर्थन देतायत त्यांनाही त्यात चूक वाटत नाही. राष्ट्रवादाचा तर बाजार मांडला गेलाय. राष्ट्रवादाच्या नावाखाली सगळ्या मूलभूत प्रश्नांची चर्चा थांबवली जातेय. एक अत्यंत चुकीची मानसिकता तयार केली जातीय आणि लोक त्याला बळी पडतायत.
मी : हे पटतंय ना तुम्हाला?
गांधीजी : एक प्रश्न.
मी : काय?
गांधीजी : ‘पटणं’ म्हणजे काय रे?
मी : तुम्ही आता फिलॉसॉफीत घुसू नका हां.
गांधीजी : अरे, फिलॉसॉफीत घुसायला लागत नाही. आपण फिलॉसॉफीतच जगत असतो…तू सांग तर.
मी : ‘पटणं’ म्हणजे एखादा मुद्दा योग्य वाटणं.
गांधीजी : म्हणजे तो मुद्दा योग्य ‘असणं’ असं नव्हे. की तेही?
मी : अं… ते दृष्टीकोनावर अवलंबून आहे.
गांधीजी : म्हणजे ‘जे योग्य आहे’ तेदेखील दृष्टीकोनानुसार, बाजूनुसार बदलतं असं म्हणता येईल?
मी : असं असू नये खरं तर. पण तसं आहे खरं…
गांधीजी : म्हणजेच ‘बाजू’ हे झालं ‘परसीव्हड’ सत्य.
मी : हं.
गांधीजी : मग जे ‘खरं सत्य’ आहे ते कुठे असेल?
मी : वा! हा चांगला प्रश्न आहे. ‘खरं सत्य’ हे तर थोरच आहे.
गांधीजी : ठीक. पण सत्य असेल कुठे?
मी : ते…ते विखुरलेलं असेल?
गांधीजी : बरोबर.
मी : तुम्हाला काय म्हणायचंय?
गांधीजी : मला इतकंच म्हणायचं आहे की सत्य बाजूनिरपेक्ष असतं.
मी : अहो, ते सगळं ठीक आहे. पण बाजू घ्यायला नको का? विशिष्ट परिस्थितीत ते करावंच लागतं. नाहीतर चुकीची बाजू डोक्यावर बसेल.
गांधीजी : बरोबर. ते करावंच. मात्र बाजू घेऊन जे केलं जातं त्याचं ‘भांडण’ होतं हेदेखील लक्षात ठेवावं.
मी : मग करायचं काय?
गांधीजी : पॉप्युलर भाषेत सांगू?
मी : कुठल्याही भाषेत सांगा!
गांधीजी : बाजू घेतल्यावर जो होतो तो हेटफुल स्ट्राइक. त्यामुळे तो करू नये.
मी : मग?
गांधीजी : सत्य घेतल्यावर होतो तो लॉजिकल स्ट्राइक…
मी : तो करावा…
गांधीजी : राइट.
मी : अहो पण ‘लॉजिक’ देखील आता सापेक्ष झालंय. त्याचं काय?
गांधीजी : लॉजिक कसं सापेक्ष होईल अरे?
मी : झालंय. तुम्हांला बघायचंय?
गांधीजी : हो.
मी : मग तीन एक तासांनी या पोस्टवरच्या कमेंट्स बघायला या.

३५

गांधीजी : काय? चिंतन चाललंय वाटतं?

मी : विचार करतोय जरा.

गांधीजी : कसला?

मी : ग्रेटनेस म्हणजे काय? ग्रेटनेस कशाला म्हणायचं?

गांधीजी : इंटरेस्टिंग.

मी : तुम्हाला काय वाटतं हो? तुम्ही तर ग्रेट वगैरे आहात.

गांधीजी : म्हणजे हा प्रश्न आहे की खेचाखेची आहे?

मी : प्रश्न. विथ अ डॅश ऑफ खेचाखेची.

गांधीजी : बरं… मला वाटतं की योग्य जगणं कसं असावं याचा विचार करता येणं आणि त्याकरता प्रयत्न करणं.

मी : हं.

गांधीजी : पटलेलं दिसत नाही.

मी : उत्तर थोडं क्लिशेड वाटलं.

गांधीजी : वाटलं की आहे?

मी : आहे, आहे.

गांधीजी : बरं, मग तुझं उत्तर काय?

मी : माझं असं म्हणणं आहे की ग्रेटनेस असं काहीच नाही.

गांधीजी : बरं, का?

मी : कारण सर्व काही भौतिक आहे. देअर इज नथिंग मेटाफिजिकल. एव्हरीथिंग इज फिजिकल.

गांधीजी : हं. विचारसुद्धा?

मी : हो. विचार म्हणजे काय? मेंदूत घडणारी विशिष्ट रासायनिक प्रक्रिया.

गांधीजी : ओके. म्हणजे सर्व काही भौतिक-रासायानिक नियमांनुसार, भौतिक-रासायनिक प्रक्रियेने घडतं तर त्यात ‘माझं’ असं काय आहे…बरोबर?

मी : करेक्ट!

गांधीजी : प्रश्न चांगला आहे. पण मग या प्रक्रिया घडवतं कोण?

मी : तो प्रतिसाद आहे. विशिष्ट परिस्थितीला दिलेला.

गांधीजी : हं…म्हणजे आइन्स्टाइन ग्रेट नव्हता तर त्याच्या मेंदूत चालणाऱ्या प्रक्रियेचा तो वाहक होता असं म्हणायचं का?

मी : अं…हो.

गांधीजी : पण मग आइन्स्टाइनसारख्या किंवा त्याच्या जवळच्या परिस्थितीत इतरही लोक असतील. मग प्रतिसाद म्हणून त्यांच्या मेंदूत अशी प्रक्रिया का नाही घडली?

मी : हा चांगला प्रश्न आहे.

गांधीजी : उत्तर?

मी : अवघड आहे. पण त्यांच्या मेंदूत अशी प्रक्रिया घडली नाही म्हणून ते नॉन-ग्रेट कसे?

गांधीजी : अरे, त्यांना नॉन-ग्रेट कोण म्हणतंय? आइन्स्टाइन ग्रेट होता एवढंच म्हटलं जातंय.

मी : हं. पण तरी एक अंडरकरंट असतोच… तुलनेचा. काही ग्रेट तर काही नॉन-ग्रेट आहेत असा.

गांधीजी : तुला असं नाही वाटतं की तू जरा जास्त कीस पाडतोयस?

मी : हे असं आहे! मी इथे खोलात शिरायला बघतोय तर तुम्हाला कीस दिसतोय.

गांधीजी : माय अपॉलॉजीज…मला असं म्हणायचंय की काही ‘बॉर्न आऊट ऑफ इमोशन’ अशा संकल्पना असतात. कदाचित काही लेबल्स असतात. त्यावर इतका विचार करण्याची गरज नाही.

मी : हं. पण गडबड अशी आहे की कधीकधी कुणालाही ग्रेट म्हटलं जातं.

गांधीजी : पण मग तो म्हणणाऱ्याच्या मेंदूतील रासायनिक प्रक्रियेचा परिणाम नाही का?

मी : बरोबर ना. तुम्हीही आता मी म्हणतोय त्याच बाजूला येताय. ग्रेटनेस हा ‘ठरवला’ जातो. तो ‘असतो’च असं नाही.

गांधीजी : बरं…काय रे, लोक समजतात तितका काही मी ग्रेट वगैरे नाही असं तुला म्हणायचं आहे का?

मी : ते तपासता येईल की.

गांधीजी : बरं, मग तू का नाही तपासत?

मी : मोठंच काम होईल ते. बरेच पॅरामीटर्स लावावे लागतील. कंपॅरिटिव्ह स्टडी करावा लागेल….

गांधीजी : म्हणजे कष्ट आले. त्यापेक्षा नेटफ्लिक्स बघणं सोपं आहे. काय?

मी : तुम्ही चान्स सोडू नका.

गांधीजी : तू काहीही म्हण, पण मी ग्रेट आहेच काही बाबतीत.

उत्पल व. बा., हे लेखक आणि संपादक आहेत.

क्रमशः

COMMENTS