मी आणि गांधीजी – ८

मी आणि गांधीजी – ८

गांधी समजून घेताना - महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. काळाचा मोठा फरक असला तरी गांधीमुल्य कायम आहेत का? काळाच्या कसोटीवर गांधींचे विचार कसे उतरतात? एका तरुणाचा महात्मा गांधी यांच्याशी निरंतर संवाद सुरु आहे. खरेतर गांधींच्या बरोबर, हा संवाद कोणाचाही होऊ शकतो.

राष्ट्रपती म्हणालेः मी ५ लाखातले ५० टक्के कर भरतो
फेसबुक – भाजप यांचं साटंलोटं
‘जेंडर जस्टिस’चे तत्त्व जपण्याची क्षमता न्यायाधीशांमध्ये आहे का?

३८

मी : काहीही, म्हणजे काहीही…काहीही चाललंय.

गांधीजी : काय झालं आता?

मी : अहो, हा माझा शाळेपासूनचा मित्र आहे.

गांधीजी : बरं मग?

मी : आणि आता हा शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट करतो की अर्णब गोस्वामी कसा भारी पत्रकार आहे वगैरे…

गांधीजी : बरं मग?

मी : अहो बरं मग काय? अर्णब गोस्वामी पत्रकारितेला लाज आणणारा मनुष्य आहे…

गांधीजी : बरं मग…

मी : पुन्हा बरं मग??

गांधीजी : अरे ऐकून तर घे… मी असं म्हणत होतो की बरं मग तू त्याच्याशी बोललास का तुला काय वाटतंय त्याबद्दल?

मी : नाही…बोलून काय होणार? परिस्थिती अशी आहे की कुणाला काही ऐकायचंच नाहीये… आणि भलतेच विनोदी तर्क देत बसतात हो.

गांधीजी : म्हणजे मग तू गप्प बसलास तर…

मी : हो… सध्या तोच मार्ग बरा वाटतो.

गांधीजी : शब्दांविषयी तुझं काय मत आहे?

मी : हा काय प्रश्न आहे?

गांधीजी : सांग तर.

मी : शब्द म्हणजे…शब्द आपण वापरतो बोलण्यासाठी. मनातलं सांगण्यासाठी.

गांधीजी : पण ते सगळं काही व्यवस्थित पोचवतात का?

मी : वा! ‘जो भी मैं कहना चाहूँ, बरबाद करे अल्फाज मेरे’ आठवलं. इर्शाद कामिल. वा! वा!

गांधीजी : जागे व्हा…जागे व्हा.

मी : हो, झालो.

गांधीजी : बरबादीचं कारण काय असावं?

मी : काय?

गांधीजी : विस्तृतता नाही हे असू शकेल?

मी : अर्णब गोस्वामी पत्रकारितेला काळिमा आहे हे सांगायला विस्तृतता कशाला हवीय?

गांधीजी : मित्रा, तुला बदल हवाय की नको?

मी : हवाय..

गांधीजी : मग तो एका वाक्याच्या प्रतिक्रियेतून होईल असं तुला खरंच वाटतं? झालेला गुंता मला मान्यच आहे. व्हॅल्यू सिस्टीम तुझ्या भाषेत ‘गंडलीय’, आजचे सत्ताधारी, त्यांचे भान हरवलेले समर्थक आणि पत्रकार यांच्याशी व्हॅल्यूजच्या बेसिसवर मतभेद व्हावेत असं पुष्कळ आहे. पण प्रश्न असा की करायचं काय?

मी : धिस इज अ मिलियन डॉलर क्वेश्चन….

गांधीजी :  अरे, तुझा शाळेतला मित्र आहे ना? मग त्याच्याशी बोल ना सविस्तर आजच्या पत्रकारितेविषयी. तुला काय खटकतंय त्याच्याविषयी.

मी : त्याने काही फरक पडणार नाही. सगळं ऐकूनही तो पुन्हा अर्णब गोस्वामीकडेच जाणार आहे.

गांधीजी : मग हे कुणाचं फेल्युअर असेल?

मी : कुणाचं म्हणजे? त्याचं…

गांधीजी : कसं काय? फेल व्हायला मुळात तो काही करतच नाहीये. त्याचं ठीकच चाललंय.

मी : म्हणजे फेल्युअर माझं आहे?

गांधीजी : अर्थात! कारण बदल तुला हवाय. तुला जाणवतंय की काहीतरी बेसिक चुकतंय पण ते तू त्याला पटवून देऊ शकत नाहीयेस.

मी : हं…पण काही बेसिक्स कळू नयेत एखाद्याला?

गांधीजी : खरंय. माझाही तुला हाच प्रश्न आहे.

३९

गांधीजी : मला कधीकधी असं वाटतं की आपण फेल गेलो.

मी : अरे वा! वेलकम टू द क्लब…मला तर असं नेहमीच वाटतं!

गांधीजी : _______

मी : ओह, तुम्ही सिरीयसली बोलताय!

गांधीजी : हो.

मी : का हो, काय झालं? मदन मोहनचं गाणं लावू का एखादं? गेल्या वेळी तुम्हाला आवडलं होतं. गाणं ऐकत बोलू. गाण्यामुळे माहौल तयार होतो एकदम.

गांधीजी : नको. राहू दे.

मी : बरं, पण काय झालं ते तर सांगा.

गांधीजी : अरे, कुठल्या विचारांनी आणि ध्येयांनी प्रेरित होऊन आम्ही एवढा लढा दिला… संघटना उभारल्या. आणि आता हे काय?

मी : हे काय म्हणजे?

गांधीजी : अरे काय म्हणजे काय? तुला दिसत नाही की काय काय चाललंय ते? लोक एकमेकांच्या उरावर बसायचे बाकी आहेत फक्त.

मी : हां…अहो त्याला वैचारिक मतभेद म्हणतात. टीव्हीवर चर्चेचे कार्यक्रम घेणाऱ्यांना जसं पत्रकार म्हणताय तसंच आहे हे.

गांधीजी : मला कळत नाही…इतका राग आणि द्वेष कसा काय आला रे लोकांमध्ये? तूसुद्धा बघ किती कडवटपणे बोलतोयस…

मी : याचं एक उत्तर मार्क झकरबर्गकडे आहे.

गांधीजी : हं. पण ते निमित्त झालं ना. मुळात प्रश्न वृत्तीचा आहे.

मी : बरोब्बर! फुल मार्क्स टू यू!  आता तुम्हाला बहुधा आवडणार नाही, पण एक सांगतो.

गांधीजी : सांग की.

मी : माणूस हा मुळातच हलकट प्राणी आहे अहो. तुम्ही जे म्हणता ना अहिंसा, सत्य, प्रेम वगैरे ते फार कष्ट करून शिकावं लागतं हो. ते काय असं घेऊन येत नाही माणूस. आणि मग माणसाच्या आयुष्यात आपलं कुटुंब, आपली आळी, आपली पेठ, आपलं गाव, आपलं राज्य, आपला देश, आपली भाषा, आपला धर्म, आपली जात, आपला पक्ष, आपली विचारधारा, आपले नायक, आपले मित्र, आपले शत्रू असलं काय काय येत जातं. माणसाचं माकड करायला अजून काय हवंय?

गांधीजी : तू आधी ठरव.

मी : काय?

गांधीजी : माणूस मुळात हलकट आहे की माकड आहे? कारण माझ्या माहितीप्रमाणे माकड हलकट नसतं. आणि हलकट जो कुणी असेल तो माकड नसावा.

मी : वा! तुमचा मूड परतल्याचा आनंद आहे.

गांधीजी : हं…माणसामध्ये विकार असतात आणि त्यांना खतपाणी मिळत जातं हे तुझं म्हणणं बरोबरच आहे, पण तो विकारांच्या पुढे जाण्यासाठी सक्षम आहे.

मी : तुम्हाला एक सांगू का, तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. निवांत राहा. ज्या काय मारामाऱ्या व्हायच्या आहेत, जे काय व्हायचं ते होऊन जाऊ दे.

गांधीजी : तुला हे परवडू शकतं. मला कसं परवडेल?

मी : न परवडायला काय झालं? तुम्ही महात्मापणाचं वगैरे फार ओझं घेऊ नका बरं. तसंही तुमचं फॉलोइंग आता कमी झालंय. फेसबुक-ट्विटरवर वगैरे येऊन दोन वाक्यात शंभर वर्षं जुन्या विषयाचं विश्लेषण करू शकलात किंवा बेस्ट म्हणजे एक बाजू घेऊ शकलात तरच फॉलोअर्स मिळण्याची आशा आहे.

गांधीजी : ओझं महात्मापणाचं नाही रे. ती लोकांनी दिलेली पदवी आहे नुसती.

मी : मग?

गांधीजी : ओझं मनुष्यत्वाचं आहे. माणूसपणाचं. ज्या ओझ्यामुळे, खरं तर प्रेरणेमुळे – मी काम करत आलो, निर्णय घेत आलो…ते हे ओझं आहे.

मी : हं….मग अवघड आहे तुमचं.

गांधीजी : मग…काय करू म्हणतोस?

मी : तुम्ही सर्टिफाईड देशभक्त किंवा सर्टिफाईड विद्वान वगैरे का नाही होत? ते ओझं पेलता येतं. हे मनुष्यत्व वगैरे पेलणं अवघड आहे.

गांधीजी : पण ते आवश्यक आहे. शिवाय तिथे एक फायदाही आहे.

मी : कोणता?

गांधीजी : इथे माकड होण्यापासून वाचण्याची शक्यता जास्त दिसते.

४०

गांधीजी : मेधा पाटकरांनी उपोषण सोडलं ना रे?

मी : हो, सोडलं. लेखी आश्वासनानंतर.

गांधीजी : चांगलं झालं.

मी : हो, पण हे सगळं एकूण उदास आणि काहीसं निराश करणारं आहे.

गांधीजी : काय?

मी : हेच…डेव्हलपमेंट पॉलिसी, डेव्हलपमेंट मॉडेल, विस्थापितांचे वर्षांनुवर्षांचे लढे, गव्हर्नन्स फेल्युअर…

गांधीजी : व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट?

मी : म्हणजे?

गांधीजी : म्हणजे केंद्रीकृत गव्हर्नन्स, केंद्रीकृत विकास आणि अनरेस्ट्रिक्टेड कंझमशनच्या मॉडेलकडून आणखी वेगळी अपेक्षा काय असणार?

मी : तेही आहेच. आणि शिवाय गंमत बघा. लोक मेधा पाटकरांनासुद्धा नावं ठेवतात. म्हणजे अर्थातच क्रिटिकल इव्हॅल्यूएशन काही नाही. नुसती शेरेबाजी…

गांधीजी : हं. दाभोळकरांचा तर खून केला लोकांनी.

मी : हो. म्हणजे प्रश्न असा पडतो की हे सगळं काय आहे? हे जे ‘लोक’ आहेत ते कशाचे बनले आहेत नेमके?

गांधीजी : हं…पण काय रे, तू तरी कशाचा बनला आहेस?

मी : व्हॉट डू यू मीन?

गांधीजी : आय मीन लोक विस्थापित झाले, कुणी कार्यकर्ते मारले गेले तरी तुझं रूटीन सुरू असतंच की. तू थोडंच नेटफ्लिक्स बघणं थांबवतोस?

मी : तुम्ही कसलीही काय तुलना करताय? नेटफ्लिक्स वगैरेचा काय संबंध इथे?

गांधीजी : ट्रायिंग टू बी डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट. बट ऑन अ सीरियस नोट, नेटफ्लिक्सचा संबंध केंद्रीकृत विकास, अनरेस्ट्रिक्टेड कंझमशन वगैरेंशी नाही असं तुला वाटतं?

मी : आहे असं तुम्हाला वाटतं?

गांधीजी : हो. पण त्यावर नंतर सविस्तर चर्चा करू.

मी : बरं. तर माझा मुद्दा हा की मी जनआंदोलनांना समजून घेतोय. त्यात जमेल तसा भाग घेतोय. मला आस्था आहे त्याबद्दल. आंदोलनं आणि गव्हर्नन्स या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि दोन्हीची चिकित्सा व्हावी असं वाटतं मला. यातूनच कदाचित विकेंद्रीकरणाचा मार्ग सोपा होईल.

गांधीजी : ते अर्थातच योग्य. स्वागतार्ह. तू विकेंद्रीकरण हा शब्द वापरल्यानंही भरून आलं मला. माझा मुद्दा हा की रिअ‍ॅलिटी, सेन्स ऑफ रिअ‍ॅलिटी आणि सेंटिमेंट्स या तीन गोष्टींमध्ये गल्लत करू नये. त्यांच्या सीमारेषा ओळखाव्यात.

मी : हे मान्यच आहे.

गांधीजी : आणखी एक.

मी : काय?

गांधीजी : डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट होत जा अधूनमधून.

मी : त्याने काय होईल?

गांधीजी : अरे डेव्हिलला पूर्णपणे नाहीसं करता येईलसं वाटत नाही.

मी : मग?

गांधीजी : पण त्याला शांत करता येऊ शकतं…

मी : म्हणून डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट व्हायचं?

गांधीजी : राइट…

मी : हं, मी बघतोय काही दिवस…तुम्ही श्रूडली वागता हां कधीकधी…

गांधीजी : चला, तुझाही गैरसमज दूर झाला तर…

मी : कसला?

गांधीजी : हाच की मी अगदी भोळा-भाबडा आहे, मला व्यवहार कळत नाही वगैरे

मी : हं…

गांधीजी : आता तुला म्हणून सांगतो.

मी : काय?

गांधीजी : मी अव्यवहार्यपणे का वागतो माहितीय?

मी : का?

गांधीजी : कारण मुळात मला व्यवहार कळून चुकलाय.

४१

मी : जे सहसा, सदैव, विनाअट, विनाकारण आनंदी असतात ते मूर्ख असण्याची शक्यता अधिक असते हा सिद्धांत तुम्हाला कसा वाटतो?

गांधीजी : सिद्धांत?

मी : थिअरी हो थिअरी.

गांधीजी : हो, ते कळलं. पण असा सिद्धांत मांडण्याचं कारण?

मी : माझा ना एक मित्र आहे जुना.

गांधीजी : वाटलंच मला.

मी : काय?

गांधीजी : काही नाही, बोल तू.

मी : हा मित्र जामच पॉझिटिव्ह आहे हो.

गांधीजी : मग यात वाईट काय आहे?

मी : अहो, पॉझिटिव्ह असावं माणसाने, पण आपण ज्या बोटीतून चाललोय, त्या बोटीत पाणी शिरतंय हे कळल्यावरसुद्धा सगळं कसं आलबेल आहे असं म्हणणाऱ्याचं काय करणार?

गांधीजी : मला वाटतं हा प्रश्न तसा दुय्यम आहे.

मी : म्हणजे?

गांधीजी : बोटीतलं पाणी काढणं आधी महत्त्वाचं आहे. दॅट शुड बी द प्रायॉरिटी.

मी : अहो ते माहितीय मला. मी लोकांच्या अ‍ॅटिटयूडबद्दल बोलतोय.

गांधीजी : हं. म्हणजे लोकांचा अ‍ॅटिटयूड आणि त्याने तुला होणारा त्रास…

मी : त्रास समजा बाजूला ठेवा, पण असं बघा की लोक अशा वृत्तीमुळे सापळ्यात अडकू शकतात.

गांधीजी : म्हणजे कसं?

मी : म्हणजे लोक बहकतात. त्यांना राजकारणी लोक घोळात घेतात. सगळं छान चाललंय, धोका फक्त पाकिस्तानचा आहे अशी एक श्रद्धा अनेक लोकांच्या मनात निर्माण करून द्यायला आजचे राजकारणी यशस्वी ठरलेत ना.

गांधीजी : पण मग हे पॉझिटिव्ह कुठाय?

मी : सगळं छान चाललंय हे पॉझिटिव्ह नाही?

गांधीजी : पण पाकिस्तानचा धोका आहे ना? ती निगेटिव्हिटी नाही का?

मी : हो..पण…म्हणजे तुम्हांला काय म्हणायचंय?

गांधीजी : म्हणजे राजकारणी दोन्हीचा वापर करतातच. आजचे सत्ताधारी विशेष आहेत कारण त्यांच्यात प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे आणि ती इतरांच्यात रूजवण्याचे जे विविध मार्ग आहेत त्यातला एक निगेटिव्हिटी हादेखील आहे. म्हणजे जवाहरलाल, काँग्रेस यांचा द्वेष किंवा मुस्लिम, ख्रिश्चन, पाकिस्तान यांची भीती वगैरे.

मी : हो ना, पण मग हे वाईट आहे ना.

गांधीजी : आहे.

मी : मग?

गांधीजी : मग काय?

मी : अहो, मग काय काय? त्यावर काहीतरी करायला हवं ना?

गांधीजी : तुम्ही करताच आहात की.

मी : काय करतोय आम्ही?

गांधीजी : भांडताय की सोशल मीडियावर आणि इतरत्र.

मी : म्हणजे भांडायला नको? विरोध करायला नको?

गांधीजी :  विरोध करायला हवा. पण तो भांडूनच करता येतो का?

मी : हे काय आता? मग कसा करणार विरोध?

गांधीजी : प्रेमाने विरोध केल्यास किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर माणसाविषयी प्रेम ठेवून त्याला विरोध केल्यास बदलाची शक्यता वाढते कारण माणसातला विवेक जागवायला इतर कशाहीपेक्षा प्रेम अधिक उपयुक्त असतं या सिद्धांताबद्दल तुझं काय मत आहे?

मी : तुमचं अवघड आहे.

गांधीजी : अरे, उलट हे सोपं आहे.

मी : असेल. पण ते जमत नाही.

गांधीजी : मग बोटीचं अवघड आहे.

उत्पल व. बा., हे लेखक आणि संपादक आहेत.

समाप्त 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: