इच्छाधारी विश्लेषकांच्या भाऊगर्दीत…

इच्छाधारी विश्लेषकांच्या भाऊगर्दीत…

यावेळी प्रथमच सात टप्प्यात निवडणूक घेतली गेल्यानं मतदानाच्या प्रक्रियेचा कालावधी वाढला आणि त्यामुळे राजकीय आभाळात अंदाजांची पंतंगबाजी चालू ठेवायला दीर्घकाळ मिळाला. सगळ्यांनाच आपल्या पांडित्याचा भ्रम कायम ठेवायचा असतो; माध्यमांची, त्या त्या विश्लेषकाची आणि प्रेक्षकांचीही ती गरज असते. तरीही इच्छाधारी विश्लेषणाकडून आपण वास्तववादी विश्लेषणाकडे इंचं इंच का होईना पण सरकायला हवे.

दिल्लीत काँग्रेसचा आत्मघात की भाजपविरोधी खेळी?
‘रफालवरील निकाल चौकशीचे सूतोवाच करणारा’
जागतिक तापमानवाढ आणि फॅसिझमचा फास
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

एक्झिट पोल आल्यावर सगळ्या चर्चा साहजिकच त्याभोवती फिरत आहेत, परंतु गेले जवळपास चार ते पाच महिने सगळीकडेच राजकीय चर्चांना बहर आला होता. अंतिम निकाल येण्याआधी त्यावर थोडे मंथन केलं पाहिजे. देशात विविध राजकीय मतांची माणसं असणं हे सुदृढ लोकशाहीचं लक्षणच आहे, त्यामुळे मतामतांचा गलबला असेल तर तो नैसर्गिकच आहे. शेकडो चॅनेल्स, शेकडो संकेतस्थळे, हजारो वृत्तपत्रे, लाखो फेसबुकर्स, लाखो ट्विटर्स आणि करोडो व्हाट्सॅपयुजर्स असल्यावर तर हा धुरळा जास्तच उडणार आहे. प्रत्येक लोकसभा निवडणूक, प्रत्येक विधानसभा निवडणूक ही कुणाच्या ना कुणाच्या दृष्टीने कळीची असतेच. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या आधी राजकीय विश्लेषक न चुकता ‘यावेळची निवडणूक किती महत्वाची आहे’, असे सांगत असतात तसे ते यावेळीही सांगत आले आहेत. कारण असे सांगितल्याशिवाय, पुढे तो जे काही सांगणार आहे, त्याचं महत्व अधोरिखित होत नाही.

त्याचप्रमाणे २३ तारखेला काय होईल याबाबतचे अंदाज, त्याची विश्लेषणे सांगण्याचीही नेहमींप्रमाणे लाट आलेली होतीच. २०१४च्या तुलनेत समाजमाध्यमांनी आता अधिक हातपाय पसरलेले आहेत, सर्वच राजकीय पक्षही दरम्यानच्या काळात या नव्या माध्यमाशी परिचित झाले, त्यामुळे तर चर्चा, अंदाज, एकेमकांना खोडून काढणे, झोडून काढणे याला पूर आलेला होता. पण या अंदाजांना आधार काय असतो?

यावेळी प्रथमच सात टप्प्यात निवडणूक घेतली गेल्यानं मतदानाच्या प्रक्रियेचा कालावधी वाढला आणि त्यामुळे राजकीय आभाळात अंदाजांची पंतंगबाजी चालू ठेवायला दीर्घकाळ मिळाला. आता तर एक्झिट पोल बाहेर आले आहेत, त्यांचा आधार घेऊन २३ तारखेपर्यंत मोठमोठ्या आकारांचे पतंग आपण सगळेच उडवत राहणार आहोत. अधिकृतपणे मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यास बंदी असल्याने वैयक्तीक पातळीवर, छोट्या छोट्या गटांच्या पातळीवर अथवा एखाद्या खाजगी संस्थेचा हवाला देत अपेक्षित निकाल आणि संभाव्य गठबंधनांच्या शक्यता सोशल मीडियावर गेले दोन महिने इकडून तिकडे विहरत होत्या. त्यात भाजपला १२० पासून तर ३०० पर्यंत जागा देण्यात आलेल्या होत्या तर काँग्रेसला ८० पासून तर १८० पर्यंत जागा दिल्या जात होत्या. भाजपचा पराभव अथवा मोठा विजय या दोन्हीची कारणमीमांसा करता येते, परंतु काँग्रेसच्या खासदारांची संख्या किमान दुपटीने अथवा अधिक वाढण्याची कारणे मात्र कोणालाच नीट देता येत नव्हती.

थोडक्यात, आपल्याकडील  समाजमान्य, माध्यममान्य राजकीय पंडीत, पत्रपंडीत, पॅनेलपंडीत यांच्या तर्कांना आधार कमी आणि स्व-इच्छेचा रेटा जास्त असतो. क्रिकेटचे सामने जेंव्हा रेडीओवर ऐकले  जात होते तेंव्हा, एखाद्या गोलंदाजाने अपील केले आणि अंपायरने ते फेटाळले तर शैलीदार हिंदी समालोचक सुशील दोशी म्हणायचेगेंदबाजने अपील जरुर की, पर उस अपीलमे उत्साह ज्यादा और विश्वास कम था… अगली गेंद… तर आपले राजकीय विश्लेषकही साधारणतः असेच असतात. कारण, काय होणार आहे, याचा अंदाज येणं कठीण असतं आणि ते साहजिक असतं. परंतु सगळ्यांनाच आपल्या पांडित्याचा भ्रम कायम ठेवायचा असतो, माध्यमांची, त्या त्या विश्लेषकाची  आणि प्रेक्षकांचीही ती गरज असते.

राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते जर आपल्या पक्षाच्या विजयाचा दावा करत असतील, सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त करत असतील तर ते साहजिकच म्हटले पाहिजे. त्यांनी जर ‘आमच्या पक्षाचा पराभव होणार आहे’, असं सांगितलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्ची होईल. त्यांना स्वतःलाही लढण्याचं बळ राहणार नाही. शिवाय ‘काही तरी चमत्कार होईल, आपण योग्य मार्गानं चाललो आहोत, आपल्याला नक्कीच विजय मिळेल’, या आशेवरच तर हजारो उमेदवार रिंगणात असतात. त्या त्या क्षणी वाटणारा हा विश्वास हेच तर राजकीय चिवटपणाचे लक्षण असते. परंतु ज्यांची निवडणुकीत थेट आर्थिक अथवा मानसिक गुंतवणूक नसते, त्यांचे सगळे अंदाज भावनिक गुंतवणुकीवर आधारलेले असतात. ज्याला इंग्रजीत आपण विशफुल थिंकिग (म्हणजे आपल्याला जे व्हायला हवं आहे, तेच होणार आहे अशी खात्री व्यक्त करणं) म्हणतो, तसे ते असतात.

लेख लिहिणारे, छापणारे, चर्चेत सहभागी होणारे, चर्चांचे सूत्रसंचालन करणारे, चॅनेल चालवणारे आणि सोशल माध्यमातील विविध व्यासपीठांवर व्यक्त होणारे या सगळ्यांचीच राजकीय मते काय आहेत, राजकीय कल काय आहे हे आपल्याला साधारण माहिती असतं. त्यामुळे त्यांचे राजकीय अंदाज काय असतील याची कल्पनाही आपण करु शकतो. खरे तर राजकारणात नसलेले, निवडणुकीतील जय-पराजयाचा ज्यांच्या आयुष्यावर लगोलग काहीही मोठा परिणाम होणार नाही अशा व्यक्तींनी, अभ्यासकांनी, आपल्याला जे व्हायला हवे आहे ते होणार नाही असे दिसत असेल तर ते सांगितले पाहिजे. एखादी व्यक्ती भाजपची पाठराखी असेल आणि भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता असेल तर त्या व्यक्तीला तसे सांगता आले पाहिजे (इथे उदाहरण देताना, मी भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता विचारात घेतली याचे कारणही तेच आहे… माझी इच्छा!) पण तसे होताना आधीही कधी दिसले नाही आणि आताही दिसत नाही.

अमुक एखाद्या व्यक्तीला ज्या पक्षाच्या विजयाची शक्यता अधिक दिसते, तो त्या पक्षाचा पाठीराखा आहे अस समजावे, हे सांगण्याचीही गरज नाही, तसे आपण समजतोच किंवा गृहितच धरतो. याचे एक कारण असेही आहे की, आपलं मत वाया जाऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. वस्तूतः पराभूत उमेदवाराला पडलेले मतही एकप्रकारे विजयी उमेदवारावर वचक ठेवण्यासाठी आणि पर्यायाने लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठीच उपयोगी असते. परंतु पराभूताला पडलेले मत वाया गेले, असा आपला गैरसमज असतो आणि म्हणून, ज्याला मत दिले तोच विजयी होण्याची शक्यता आपण बोलून दाखवतो.

विश्लेषणांची सर्वात मोठी गंमत तर विजयानंतरच असते. कालपर्यंत आपण काय म्हटले होते हे विसरून सगळे राजकीय पंडित, पत्रपंडित, पॅनेलपंडित निकालांवर अधिकारानं बोलू लागतात. जो पक्ष हरला आहे त्याने आपल्या पराभवाचे चिंतन करावे, जनतेला गृहित धरू नये वगैरे उपदेश करू लागतात. हरलेला पक्ष निवडणुकीआधी जर सत्ताधारी असेल तर त्याला जनतेने योग्य धडा शिकवला आहे, असा निकाल पंडितमंडळी देऊन टाकतात. सत्तेत आलेल्या पक्षाने आता लोकांच्या हिताची कामे करावीत आणि जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवावा, असे सांगायलाही ते विसरत नाहीत. म्हणजे ‘चित भी मेरी, पट भी मेरी..’

मतदानानंतर मतांच्या शक्यता-अशक्यतांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करणार्‍यांना इंग्रजीमध्ये सेफॉलोजिस्ट (psephologist) म्हणतात. ग्रीक निवडणुकांमध्ये गोटयांचा वापर करत असत त्यावरून (psephos म्हणजे गोट्या ) हा शब्द तयार झाला आहे. गणित, संख्याशास्त्र आणि विकसित तंत्रद्यान यांच्या सहाय्याने अंदाजांची सापेक्षता कमी होणे शक्य असते जरी अचूक नसू शकले तरी !  एखाद्या नेत्याची जूनी रेकॉर्डेड वक्तव्ये, व्हीडीओ क्लिप्स दाखवून त्याला जाब विचारला जातो तसेच राजकीय पंडित, पत्रपंडित, पॅनेलपंडित यांच्याबाबतही करायला हवे. याचा अर्थ त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे असे नव्हे, तर आधी व्यक्त केलेल्या अंदाजात नेमके काय आणि कुठे चुकले याचा जाहीर उच्चार व्हावा यासाठी ते केले पाहिजे. वृत्तपत्रे, वाहिन्या, संकेतस्थळे, फेसबुक प्रवक्ते या सगळ्यांच्या बाबतीत अशा निकालोत्तर कबुलीजबाबाची प्रक्रिया झाली पाहिजे. अंदाज चुकण्यात काहीच वावगे नाही. आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम, सहानुभूती आहे, ज्यांची विचारसरणी आपल्याला जवळची वाटते त्यांचाच विजय होईल अशी इच्छा करण्यातही काही वावगे नाही. परंतु सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना एका जबाबदारीची, अभ्यासाची आणि तथ्याधारित तर्क मांडण्याची शिस्त जर आपल्या सार्वजनिक राजकीय वर्तनाला लागायची असेल तर आपल्याला हा विचार केला पाहिजे. परिपक्व लोकशाहीत केवळ नेतेच नव्हे तर लोकही परिपक्व होणे गरजेचे आहे. इच्छाधारी विश्लेषणाकडून आपण वास्तववादी विश्लेषणाकडे इंचं इंच का होईना पण सरकायला हवे.

(टिप – अर्थातच हे सर्वसाधारण प्रवृत्तीवर लिहिलेले आहे. नियम सिद्ध करण्यापुरते काही अपवाद याला असू शकतात)

अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0