अवैज्ञानिक उद्योगात ‘आयआयटी’ही!

अवैज्ञानिक उद्योगात ‘आयआयटी’ही!

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) खरगपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या २०२२ च्या कॅलेंडर मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. वरवर प्राचीन भारतातील ज्

ग्रामपंचायत निवडणूक: शिवसेना फायद्यात!
महाराष्ट्राच्या सत्तेचा चौकोन
सुशांतचा मृत्यू भाजपला प्रचाराचा विषय का वाटतो?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) खरगपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या २०२२ च्या कॅलेंडर मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. वरवर प्राचीन भारतातील ज्ञान-विज्ञान परंपरा साजऱ्या करण्याचा या कॅलेंडरचा उद्देश दिसत असला तरी सध्याच्या केंद्रीय सत्तेमधील राजवटीच्या राजकीय विचारधारेची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी संशोधनात्मक पुरावे असलेल्या इतिहासाची तोडफोड करणे हेच या कॅलेंडरचे मूलभूत उद्दिष्ट स्पष्टपणे दिसते.

ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध झालेले आर्यांचे भारतीय उपखंडावरील आक्रमण हे खोटे असून आर्य हे इथलेच होते तसेच वैदिक संस्कृती ही आर्यानी बाहेरून आणली नव्हती तर तिचा जन्म इथेच झाला होता असे दावे या कॅलेंडरमध्ये आहेत. हे एवढ्यापुरतेच थांबले नाही तर वैदिक संस्कृती आणि हडप्पा-मोहंजोदडो संस्कृती या दोन्ही एकमेकांना पूरक असल्याचे अतिशयोक्तीपूर्ण दावे पण रेटून करण्यात आले आहेत. ऐतिहासिक पुराव्यांनी हे सिद्ध झालेले आहे, की आर्य हे मध्य आशियातून येऊन येथील स्थानिक द्रविडीयन लोकांवर वैदिक संस्कृती थोपवून त्यांच्यावर राज्य करू लागले. पण हे ऐतिहासिक सत्य उलथून लावण्याचा स्पष्ट प्रयत्न या कॅलेंडरमध्ये दिसतो. त्याचबरोबर वेदांची निर्मिती करणारे आणि संस्कृत भाषेची पायाभरणी करणारे हे बाहेरून आक्रमण करणारे आर्यन नव्हते तर या देशात राहणारेच आर्य होते असा अवैज्ञानिक दावा या कॅलेंडरमधील प्रमुख विचारसूत्र आहे. या कॅलेंडरच्या सिद्धांतानुसार मुस्लिम आणि ख्रिश्चन हे बाहेरून आलेल्या आक्रमक संस्कृती आहेत. त्याचबरोबर या सिद्धांतानुसार आदिवासी या देशाचे मूलनिवासी नसून ते फक्त वनवासी आहेत.

केंद्रातील भाजप सरकार विविध धोरणात्मक प्रयत्नांतून आणि संघ परिवारातील संस्थांच्या साहाय्याने शिक्षण आणि त्यातून पुढील पिढ्यांची विचारशक्ती कुंठित करण्याचा, बदलण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर कोणतेही वैज्ञानिक विश्लेषण न देता, हे सर्व प्रचारकी थाटात सांगितले जात आहे.

देशातील एक उत्कृष्ट तांत्रिक ज्ञान देणारी संस्था यामध्ये सामील आहे, हे धक्कादायक आहे. देशातील विविध विद्यापीठांची अगोदरच विविध मार्गानी अधोगती होत असताना ज्या संस्था आधीपासून स्वायत्त होत्या, त्यांनी सुद्धा अशी शरणागती पत्करल्याने ज्ञानाच्या क्षेत्रातील ही अधोगती शैक्षणिक क्षेत्रासाठी धोक्याची घंटा समजली पाहिजे.

१८ पानांच्या या कॅलेंडरमध्ये १२ प्रकारचे “पुरावे” दिले गेले आहेत. ते खरे तर एक प्रकारचे सिद्ध न झालेले ‘दावे’ आहेत. मुखपृष्ठावर ‘Recovery of the foundations of the Indian Knowledge Systems’ असं शीर्षक देण्यात आलं आहे आणि इथेच कॅलेंडरची तीन मुख्य आकर्षणे दिली आहेत. ती आहेत : वेदांचे रहस्य, सिंधु खोऱ्यातील संस्कृतीचे पुन:आकलन आणि आर्य आक्रमणाचे मिथक खोडून काढताना…

आयआयटी खरगपूरमध्ये १८ डिसेंबर रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी  Centre of Excellence for Indian Knowledge Systems (IKS) चे उद्घाटन केले होते. हे कॅलेंडर या केंद्राला समर्पित आहे आणि याच ‘आयआयटी’मध्ये असलेल्या Nehru Museum of Science & Technology (NMST) आणि IKS यांच्या संयुक्त प्रयत्नातून याची निर्मिती झाली आहे.

IKS ची स्थापना ही जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठातील बुद्धिजीवीना एकत्र आणून एक एकात्मिक ज्ञानाची पायाभरणी करण्यासाठी केला गेला आहे. यामध्ये संस्कृत, सांख्य, गणित-भूमिती, रसायन, आयुर्वेद, ज्योतिर्विद्या, प्रकृतीविद्या, नंदनतत्त्व, वास्तु-विद्या, न्याय-शास्त्र, शिल्प शास्त्र आणि नाट्य शास्त्र इत्यादी क्षेत्रातील दिग्गज काम करतील असे सांगण्यात आले होते.

या विषयावरील पुरातत्त्वीय पुराव्यावरून आणि मानवी उत्क्रांतीमध्ये भूमिका बजावलेल्या गुणसुत्रीय इतिहासाच्या अभ्यासावरून असे दिसून येते, की प्राचीन काळी दक्षिण-पूर्व युरोप (किंवा सायबेरिया) मधून मुख्य युरोपामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्याचे स्थलांतर झाले. ई. स. पूर्व काळात तिसऱ्या सहस्त्रकात झालेल्या या मोठ्या स्थलांतरामुळे इंडो-युरोपियन भाषा विस्तारल्या असं म्हणण्यात येतं. याच प्रमाणे दक्षिण आशियामध्ये आलेल्या लोकांचे खरे पूर्वज हे म्हणजे या दक्षिण-पूर्व युरोपमधून (मध्य-आशियाच्या नजीकच्या प्रदेशातून) आलेले लोकच होते. त्यामुळे संस्कृत भाषेच्या प्रवासाचा हा एक महत्त्वपूर्ण धागा आहे, जो हे कॅलेंडर अवैज्ञानिक पद्धतीने खोडून काढून, नवीन इतिहास लिहिण्यासाठी सामाजिक एकमत बनवण्यासाठी जणू काही काम करत आहे, असं नोम चॉमस्की यांच्या “manufacturing consent” या संकल्पनेचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते. यासाठीचे महत्त्वाचे संशोधन मध्य आशिया, इराण, अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियातील व विशेषता: भारतातील व्यक्तींचे गुणसुत्र (DNA) तपासून व्यापक स्तरावर केले गेले आहे.

अलीकडेच ऑगस्ट महिन्यात जेव्हा ज्येष्ठ इतिहासकार इरफान हबिब यांचा ९० वा जन्मदिवस साजरा होत होता, तेव्हा अर्वाचीन भारताच्या इतिहासाचे तज्ज्ञ असलेल्या रोमिला थापर यांनी जे विधान केले ते इथे सांगितले पाहिजे. त्या म्हणाल्या होत्या, “सध्याच्या हिंदूत्ववादी सत्ताधीशांना आर्य इथेच जन्मले हा सिद्धांत रूढ करणे जास्त सोयीचे आहे. त्यांची विचारधारा पुढे रेटण्यासाठी हे त्यांना हवं आहे. यामध्ये ऐतिहासिक सत्य वैज्ञानिक दृष्ट्या वेगळे असेल तरी त्यांना त्याची पर्वा नाही.”

कॅलेंडर मधील विविध पाने पुढीलप्रमाणे :

१) जानेवारी २०२२: भारताचे आध्यात्मिक / पवित्र विश्व

२) फेब्रुवारी: पुनर्जन्म आणि स्वस्तिक चिन्ह – हे तर पूर्णपणे वैज्ञानिक तार्किकतेच्या विरोधात आहे.

३)  मार्च : भारतीय वेदांनी विकसित केलेली योगा आणि क्षेम पद्धती. यात बुद्धाच्या प्रतिमेचा वापर आर्यन आक्रमणाला नकार देणाऱ्या तर्काच्या समर्थनासाठी चुकीच्या संदर्भात करण्यात आला आहे.

४) एप्रिल :  Non Linear Flow & Changes – वेदांचा दाखला देऊन नैसर्गिक शास्त्रीय ऋतूमानातील बदल हे त्या काळी लोकांना माहीत होते आणि त्यामुळे आर्य बाहेरून आल्याचे सिद्ध होत नाही असं यात म्हटलं आहे.

५) स्वामी विवेकानानंदाच्या एका भाषणाचा / लेखाचा संदर्भ देऊन वर्णव्यवस्थेचे समर्थन करण्यात आले. (Intermediate Evidence)

६) मे : Sacred Feminine The Matrix – याद्वारे देवीसूक्त आणि मातृसुक्त यांचा हवाला देऊन भारत-माता कशी असेल, याचे भाकीत वेदांमध्ये केल्याची कल्पना केली आहे.

७) जून : Unicorn The Eka Sringa Rishi

८) जुलै : Column of Cosmic Light & Aeons of Time – यामध्ये शिवा हा द्रविड लोकांचे दैवत असल्याचे जे वैदिक काळाच्या आधीपासूनच सत्य होते ते कसे खोटे आहे असा दावा केला आहे.

९) ऑगस्ट – Cosmic Symmetry : The Septuplet Chord

१०) Final Evidence : यामध्ये योगी अरविंद यांच्या भाषणाचा संदर्भ दिला आहे.

११) सप्टेंबर: Why was Aryan invasion myth forged – यामध्ये वसाहतवादी शक्तींनी भारतीय आणि युरोपीय भाषांतील साम्यस्थळे शोधून आर्यन बाहेरून आल्याचा खोटा सिद्धांत रचल्याचा आरोप केला आहे.

१२) ऑक्टोबर : Equivalence in Semantics and Semiotics – यामध्ये भाषांतील साधर्म्यातून युरोपियन-भारतीय संस्कृती मधील दिसणारे साम्य खोडून काढणारे वर्णन केले आहे.

१३) नोव्हेम्बर : Aggression, Imperialism and Invasion – यामध्ये मॅक्स म्युलर, आर्थर गोबिनेव आणि ह्यूस्टन स्टीवर्ट चेंबर्लेन या तत्त्वज्ञांनी आर्य समुदायाची श्रेष्ठतेबद्दल कशी मांडणी केली आणि त्यातून आर्य आक्रमणाच्या सिद्धांताचा जन्म झाला असावा अशी कल्पना केली आहे.

१४)  डिसेम्बर २०२२ : Aryan Fallacy & The Two World Wars – यामध्ये आर्यवंशश्रेष्ठत्त्वाच्या आधारावर हिटलरने आपले राज्य स्थापन केल्याचा उल्लेख आहे. या पानावर एक गंभीर आरोप आहे, की “आर्यन आक्रमण सिद्धांतामुळे दोन महायुद्धे झाली आणि १२ कोटीपेक्षा अधिक लोक यात मृत्युमुखी पडले”.

१५) या ठिकाणी पाश्चात्य संस्कृतींचे अवमूल्यन कसे झाले यावर तात्त्विक चर्चा करणारी पुस्तकांची मुखपृष्ठे दाखवली आहेत. तसेच आर्यन आक्रमण सिद्धांताला खोटे दाखवणारे तसेच भारतीय इतिहासाचे अति-गौरवीकरण करणाऱ्या पुस्तकांची यादी दिली आहे.

१६) शेवटच्या पानावर स्वामी विवेकानंद यांनी पौर्वात्य संस्कृतींचा परत एकदा उदय होऊन जगभरात त्यांचा उत्कर्ष होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. या प्रतीकात्मक अर्थाच्या वक्तव्याचा चुकीच्या संदर्भात इथे वापर केला गेला आहे.

या मांडणीचा शेवट करताना अलीकडेच प्रा. डॉ. गणेश देवी यांनी लिहिलेल्या लेखाचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी इतिहासाची तोडफोड करणाऱ्या आणि आक्रमक हिंदूत्वाची मांडणी करणाऱ्या  सध्याच्या राजकीय सत्तेच्या मानसिकतेबद्दल सांगितले आहे. ते म्हणतात, “आक्रमक मिलिटरी प्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही प्रचलित असलेल्या इतिहास लिखाणाच्या सर्व वैज्ञानिक पद्धती बाजूला सारून स्वतःची एक सिद्ध न झालेली अशी इतिहास वाचनाची पद्धती रूढ करण्यात मग्न आहे. यामुळे ऐतिहासिक (अ)सत्याचे एकदम रानटी पद्धतीने उद्घोषण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. जेव्हा आयआयटी खरगपूरने २०२२ चे जे कॅलेंडर प्रसिद्ध केले त्यावरून ही इतिहास पद्धत अलीकडे प्रकर्षाने पाहायला मिळाली. या कॅलेंडरद्वारे ‘प्राचीन भारतीय ज्ञान व्यवस्थेचे पायाभूत स्वरूप’ पुन्हा जागृत करण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगितले गेले. वरवर हे ऐकायला छान वाटते. पण यातून प्राचीन भारतीय इतिहासाबद्दल अवैज्ञानिक पद्धतीने सादरीकरण केले जाते. दोन अगदी वेगवेगळ्या सिद्धांताची यामध्ये जोडणी केली गेली आहे. एका सिद्धांतामध्ये संस्कृत भाषेच्या उगमाबद्दल खोटे दावे केले गेले आहेत. दुसरा तर्कहीन सिद्धांत हा सिंधू नदी संस्कृतीबद्दल होता. सर्व प्रागैतिहासिक आणि भाषाशास्त्रीय पुरावे असं सांगतात की वेदांच्या आधी भारतात संस्कृत भाषा नव्हती. त्यामुळे सिंधू संस्कृतीचा संस्कृतशी काहीही संबंध नाही. हा काळ संस्कृत भारतात येण्याच्या पाच लाख वर्षे आधीचा होता. हे कॅलेंडर हिटलरचा लोकशाही पद्धतीने निवडून आल्याचा उल्लेख करायचं सुद्धा विसरत नाही, हे विशेष. या कॅलेंडरचा असा दावा आहे  की वैदिक संस्कृती / जीवनपद्धती ही भारतीय संस्कृतीची सुरुवातीची प्राथमिक अवस्था होती. इतिहासाचे बनावट वर्णन करणारे हे सिद्धांत आणि धर्माचा सैनिकीकरणाच्या अंगाने जाणारे आक्रमक हिंदुत्त्व हे भारतीय विचार परंपरांच्या विरोधातील आहे. या परंपरेत बुद्ध, बसवेश्वर, कबीर आणि गांधी, आंबेडकर, चार्वाक हे सर्व सामील आहेत. त्यापलीकडे जाऊन जर मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचे शिरकाण करणे हे हिंदुत्त्वाचा भाग असले तरी ते देशाचा कायदा आणि संविधानाच्या विरोधात आहे.”

अवैज्ञानिक तर्क, शास्त्रीय संशोधनामध्ये सिद्ध न झालेले दावे आणि राजकीय विचारधारेला सोयीस्कर अशी इतिहासाची एकांगी मांडणी करण्याच्या उद्देशाने या कॅलेंडरची निर्मिती झाली आहे हे यावरून उघड होते. भारतातील सर्वोच्च तांत्रिक संस्थापैकी एक असलेल्या आयआयटीचे अवमूल्यन होत असल्याचे पाहून वाईट वाटते. त्यांची घसरण रोखण्यासाठी यासारख्या संविधान विरोधी प्रकाशनांचा अकादमीक, सांस्कृतिक, संशोधन, राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, बौद्धिक अशा सर्व क्षेत्रातून एक आवाजात आणि दबावाला, अतार्किक झुंडशाहीला बळी न पडता विरोध केला पाहिजे.

राहुल माने विज्ञान-तंत्रज्ञान विषयावर लिहिणारे पत्रकार असून, ‘इंडियन अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस’चे ‘एस. रामशेषन विज्ञान लेखन’ फेलो आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0