तडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टा

तडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टा

परमेश्वराने सर्व ब्रह्मांड ऑक्सिजनने भरलेले असून तो ऑक्सिजन रुग्णाने घ्यावे. बाहेर सिलेंडर शोधण्यापेक्षा आपल्या आतला सिलेंडर म्हणजे दोन नाकपुड्या वापराव्यात. ते न वापरताच सिलेंडरची टंचाई अशी तक्रार केली जात असल्याचे बाबा रामदेव म्हणतात.

हिंदू आणि हिंदुत्व: रामदेवबाबांचा हास्यास्पद ‘विनोद’!
सुप्रीम कोर्टाकडूनही बाबा रामदेवांना समज
‘आध्यात्मिक’ वाहिन्यांचे अर्थकारण : भाग २

जालंधरः कोविड-१९ रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याच्या कारणावरून त्यांची थट्टा करणारे योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात इंडियन मेडिकल असो.चे (आयएमए) उपाध्यक्ष डॉ. नवज्योत सिंग दहिया यांनी शनिवारी जालंधर पोलिसांत तक्रार केली आहे. याच डॉ. दहिया यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीच  देशात कोरोनाची दुसरी लाट येण्यास कारणीभूत (सुपर स्प्रेडर) असल्याचे विधान केले होते.

शनिवारी आपली तक्रार दाखल करताना डॉ. दहिया यांनी बाबा रामदेव देशातील वैद्यकीय जगत व डॉक्टरांविरोधात गैरसमज पसरवत असून या मंडळींविरोधात अवमानकारक टिप्पण्या करत असल्याचाही आरोप केला आहे. अशा व्यक्तीवर महासाथरोग उल्लंघन कायद्याअंतर्गत कडक कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी पोलिस तक्रारीत केली आहे.

डॉ. दहिया यांनी बाबा रामदेव यांच्याबरोबर त्यांचे सहकारी व पतंजली उद्योगसमुहाचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

बाबा रामदेव यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियात पसरला असून या व्हीडिओत बाबा रामदेव कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात जाऊ नका असा सल्ला देत आहेत. परमेश्वराने सर्व ब्रह्मांड ऑक्सिजनने भरलेले असून तो ऑक्सिजन रुग्णाने घ्यावे. बाहेर सिलेंडर शोधण्यापेक्षा आपल्या आतला सिलेंडर म्हणजे दोन नाकपुड्या वापराव्यात. ते न वापरताच सिलेंडरची टंचाई अशी तक्रार केली जात असल्याचे बाबा रामदेव म्हणतात.

ज्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत असेल त्यांनी अनुलोम विलोम प्राणायम व कपालभाती प्राणायम करावा. ज्यांची ऑक्सिजनची पातळी ८० पर्यंत खाली आली होती, त्यांची पातळी भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम केल्याने ९८-१०० पर्यंत गेली होती, असाही दावा बाबा रामदेव यांनी केला. कोरोना रुग्णांना श्वास कसा घ्यावा हेच कळत नाहीत व ते ऑक्सिजनची कमतरता असल्याचे, बेड, रुग्णालये, स्मशाने कमी पडत असल्याचे नकारात्मक संदेश पसरवत असल्याची थट्टा बाबा रामदेव व्हिडिओत करताना दिसतात.

बाबा रामदेव यांचे असे कृत्य अत्यंत गंभीर असून ते कोविड महासाथ काळात सरकारने काढलेली मार्गदर्शक तत्वे, नियमावली व कायदे यांचा भंग करत असल्याचे डॉ. दहिया यांचे म्हणणे आहे.

समाजात अस्थिरता माजावी म्हणून डॉक्टर रुग्णांना इंजेक्शन देऊन मारत आहेत, त्या भीतीमुळे रुग्ण रुग्णालयात येत नसल्याने सरकारपुढे परिस्थिती गंभीर होत चालल्याचे बाबा रामदेव म्हणत असल्याचेही डॉ. दहिया यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ‘द वायर’शी बोलताना डॉ. दहिया यांनी बाबा रामदेव यांची वक्तव्ये ही भोंदूगिरीला समर्थन देणारी असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. देशातील डॉक्टर व आरोग्य सेवक प्राणपणाने कोविड-१९शी लढा देत आहेत, आजपर्यंत कोरोनाने ९०० हून डॉक्टर, आरोग्य सेवकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत पण बाबा रामदेव आरोग्य व्यवस्थेची थट्टा करत असल्याची तक्रार त्यांनी केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: