‘हिरव्या देवाची जत्रा’

‘हिरव्या देवाची जत्रा’

दुर्गम आदिवासी भागातल्या लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी त्यांच्या आहारात इतर अन्न घटकांसोबत रानभाज्यांचा समावेश प्रयत्नपूर्वक वाढायला हवा. यासाठी 'हिरव्या देवाची जत्रा' या कार्यक्रमातून लोकांना रानभाज्यांचं महत्व पटवून देण्याचं काम साथी, पुणे ही संस्था करत आहे. त्याच उद्देशानं जुन्नर तालुक्यातल्या चावंड गावात भरलेल्या या हिरव्या देवाच्या जत्रेविषयी....

‘व्यंगचित्र दुनियेतला अमिताभ’
हिंदीः राष्ट्रभाषा की संपर्कभाषा?
“छत और आसमां” – एका असामान्य प्रेमाची कथा…

‘हे चिंचार्ट बरं का…एकदम कडू झार(जहर) पण पित्त झालंय, मळमळ थांबत नाही, अशा वेळेला या चिंचर्ट्याची भाजी खायची. मळमळ थांबतेच. तोंडात बोटं घालून पित्त पाडायची गरज न्हाई.  हा काठमाठ आणि लालमाठ खाल्लं की पोट साफ हुनारच. उंबराची कच्ची फळं तर गरोदर बाईनं खावीच. तिची गर्भाची पिशवीची ताकद वाढतेय. सारखं बाळ पडायला लागलं की हेच द्यायचं तिला. डाक्तरची पण गरज नाय लागणार.’ एखादी सुरकुतलेली आजी तिच्या खोल गेलेल्या गालात हसत हसत सांगते.

‘हा बघा चायाचा भार, काठमाठ, ही रुईची भाजी, फांगुळनीचा पाला, चित्रूक, कुरडू, भोकर, अमरकंद, हिरडा, आवळा, उंबर, चिंचार्ट ही  भारंग्याची फुलं आणि ही भारंग्याची भाजी. भारंग्याच्या फुलांची भाजी सर्दी कफ झालेल्याला देयाची.  एखादी मावशी एकेक भाजीवर बोट ठेवून रानभाज्या, फळभाज्यांचं आपलं ज्ञान वाढवत असते तेव्हा एखादी आजी तोंड बारीक करून ‘आजकाल पोरींना लई कटाळा. एकतर चार सहा महिनेच असतात या रानभाज्या पण  तेवढं ही कुणी खाईना’, असं म्हणत तक्रारीचा सूर लावते.

आजीकडे दुर्लक्ष करेस्तोवर गावातल्या एकेकजणी पोराबाळांसह छान तयार होऊन येताना दिसतात. सोबत हातात एकेक पदार्थ.. त्यात एखादी सातआठ महिन्यांपूर्वी लग्न झालेली उत्साही नवखी सून असते. तिच्या लग्नाची गोष्ट सांगता सांगता तिनं बनवलेल्या रानअळूच्या वड्याविषयी सांगते.  हा अळू खाजवत नाही, बाजारातल्या अळूपेक्षा वेगळाय म्हणत चवीला एखाददोन ती ‘ऑफर’देखील करते.  कुणीतरी लगेच ही पण बघा राखाळू पानांची अळूवडी असं म्हणत समोर धरते. चिचूरडीच्या चटणीची चव चाखेपर्यंत एखादी वहिनी ही कोरळची भाजी आपट्याच्या` पानासारखी दिसते आणि ही त्याची शिजवलेली भाजी असं दोन्ही आपल्याला दाखवते. या सगळ्या हिरव्या साजेसोबत रंगबेरंगी धान्य-कडधान्य, अंडी, मासे आणि खेकडेसुद्धा असतात.

हा सगळा प्रेक्षणीय माहोल जुन्नर तालुक्यातल्या चावंड गावात भरलेल्या ‘हिरव्या देवाच्या जत्रे’चा होता. स्थानिक बाया आपल्या भागात येणाऱ्या रानभाज्या आणि त्यांच्या उपयोगाविषयी भरभरून बोलत होत्या. त्यासाठी भल्या सकाळी उठून त्यांनी त्या भाज्या डोंगरमाथ्यावरून शोधून आणल्या होत्या. या रानभाज्यांचे व पदार्थांचे प्रदर्शन या वेळी मांडण्यात आले होते. त्यांच्याकडे पिढीजात अन उपजत ज्ञान होतं मात्र त्याचं प्रतिबिंब त्यांच्या आहारात पुरेसं का नसतं हा मुद्दाच अधोरेखित करण्यासाठी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पोषण माह, स्ट्रेंदनिंग कम्युनिटी ॲक्शन फॉर न्युट्रीशन प्रक्रियेंतर्गत जिल्हा परिषद पुणे, आय.सी.डी.एस. विभाग, आरोग्य विभाग, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाऊंडेशन आणि साथी संस्था पुणे यांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. स्थानिक देवी-देवतांची जत्रा ज्याप्रमाणे साजरी होते, त्याच धर्तीवर हिरव्या देवाला अर्थात निसर्गाला, दुर्गम डोंगर दऱ्यांच्या कुशीत फुललेल्या रानभाज्यांना, देवाचे स्थान देणारी ही जत्रा आहे. या उत्सवातून निसर्गाशी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. या संवादातून रानभाज्यांचे पोषणातील महत्व आदिवासी समुदायामध्ये पुन्हा निर्माण व्हावे याकरता ‘हिरव्या देवाची जत्रा’ संकल्पना विकसित करण्यात आली आहे. लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यातील एक महत्त्वाचा अन्नघटक म्हणून रानभाज्यांचे महत्व आहे. हे तत्व जत्रेच्या माध्यमातून होणाऱ्या संवादातून लोकांच्या मनात रुजावे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. ही जत्रा इथवरच थांबत नाही तर  रानभाज्यांच्या संवर्धनासाठी परसबागेच्या माध्यमातून एक पाऊल पुढे देखील टाकते.

या जत्रेतून भाषणाच्या स्वरूपाला फाटा देत बायका मुलींसोबत गप्पा, गाणी, प्रात्यक्षिक आणि सहभागातून पोषणाची माहिती आणि महत्त्व सांगण्यात आलं. यासाठी तीन वर्तुळं आखलेली होती. प्रथिनं- स्निग्ध पदार्थ; कर्बोदके, , जीवनसत्त्वे आणि क्षार  यांची वर्गवारी करण्याचा अनुभव बायकांनी घेतला. शेंगदाणा स्निग्ध की प्रथिने, ताक कुठल्या वर्तुळात जाणार, फुटाणे कडधान्यात मोडणार की कशात अशा चर्चा करत बायका एकेक वर्तुळ भाज्या/पदार्थांनी भरत होत्या.  वर्गवारीत मोडणाऱ्या सगळ्या भाज्या, अन्नघटक आपल्याकडे आहेत याची त्यांना कार्यकर्ते जाणीव करून देत होते. लोकांच्याही हे लक्षात आले की आपल्या पंचक्रोषित हे सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. या नव्या माहितीनं हरखून गेलेल्या आणि आपसांत कुजबुज करणाऱ्या नवमाता दिसत होत्या.

यावेळी गप्पा आणि गाण्यांच्या माध्यमातून विविध रानभाज्यांचे आहारातील महत्व सांगण्याचं काम शैलेश डिखळे, श्रीपाद कोंडे, स्वप्निल व्यवहारे यांनी केले.  त्यातून ते सांगत होते, कमी वजनाचे बालक जन्माला येवू द्यायचे नसेल तर रानभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश हवा. फक्त गरोदरपणातच नव्हे तर स्त्रियांना मासिक पाळी, गर्भपात, बाळंतपण ते मेनोपॉज अशा विविध शारीरिक टप्प्यांतून जावं लागतं, शिवाय घरकाम-शेतकाम, कुटुंबीय मुलांचं संगोपन या जबाबदाऱ्याही पार कराव्या लागतात. अशावेळी तिचं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक आहेत त्यामुळं नेहमीच जेवणात रानभाज्यांचा समावेश असावा.

‘प्रत्येक पालकाला आपल्या बालकाची पोषण श्रेणी समजायला पाहिजे,’ असं मुलांच्या पोषक आहाराविषयी आशा असणाऱ्या कार्यकर्त्या पुष्पाताई, प्रकाश भाऊ आणि अंगणवाडी सेविका कमलताई सांगू लागल्या तशा एका आजीनं अनुभव सांगितला, ‘लेकीनं गरोदरपणात गोळ्या खाल्ल्या नाहीत. मुल जन्माला आलं तेव्हा ते फक्त एक किलोचं होतं. आज मुल अडीज वर्षांचं झालंय. त्याला आशाताईनी सांगितलं तसं डाळभात, अंडी, चमचाभर तेल, हिरवीभाजी असं सगळं नीट खाऊ घालायला लागले. आधी मागितलं की द्यायचो. पण आता ठरवून तीन चार वेळा भरवू लागलो. त्यामुळं त्याचं वजन चांगलं झालंय.’

यावेळी मोड आलेल्या कडधान्याची पौष्टिक भेळ आणि गहू, उडीद, तांदूळ गुळाची खीर प्रत्यक्ष करण्यात आली. ती पालक व मुले सर्वांना खाऊ घालण्यात आली. गप्पा आणि गाण्यांच्या माध्यमातून विविध रानभाज्यांचे आहारातील महत्व सांगण्याचं काम शैलेश डिखळे, श्रीपाद कोंडे, स्वप्निल व्यवहारे यांनी केले.

अंडी खेकड्याची ओटी

गरोदर मातेच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम सर्वच समाजात केला जातो. नारळ आणि फळाने ओटी भरण्याची साधारण पद्धत असते. मात्र केवळ फळच नव्हे तर तिच्या एकूण रोजच्या जेवणातच चौरस आहार असायला हवा हा संवाद साधण्यासाठी आगळीवेगळी पोषणाची ओटी घेऊन कार्यकर्ते आले होते. त्यांनी गावातल्या एका गरोदर मातेची विविध रानभाज्या, कडधान्ये, अंडी, फळे, खेकडा अशा स्थानिक उपलब्ध असणाऱ्या पदार्थांनी ओटी भरली. गावातील गरोदर मातेचे चांगले पोषण होण्यासाठी व सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी तिच्या आहारात सर्व पोषणमूल्य असावीत हे संवादातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0