इम्रान –मोदी समोरासमोर, पण संवाद टाळला

इम्रान –मोदी समोरासमोर, पण संवाद टाळला

मोदी व इम्रान खान समोरासमोर बसले असले तरी त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळले व शिखर परिषदेच्या चर्चेत भाग घेतला अशी माहिती पत्रकारांना मिळाली.

मगरमच्छके आंसू …
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात नेहरूंचा ‘ठळकपणे अनुल्लेख’
प्रचारकी ‘नमो टीव्ही’

कझाकस्तानची राजधानी बिशेक येथे नुकतीच ‘शांघाय कोऑपरेशन ऑगर्नायझेशन’ (एससीओ) देशांची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सत्तेत दुसऱ्यांदा आल्यानंतर मोदींची अशा आंतरराष्ट्रीय बैठकीतील पहिली उपस्थिती होती. त्याच बरोबर मोदी व इम्रान खान समोरासमोर येण्याची या वर्षातील ही पहिलीच घटना होती.

भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण असल्याने हे दोन नेते एकमेकांच्या समोर आले तर कसे वागतील, त्यांच्यामध्ये काय चर्चा होतील. द्विपक्षीय चर्चेला सुरूवात होण्यासाठी दोन्ही देशांचे राजनयिक अधिकारी काही मार्ग काढतील का,  असे अनेक प्रश्न होते. त्या अगोदर बिशेकला पोहचण्यासाठी भारताने पंतप्रधान मोदींच्या विशेष विमानाला पाकिस्तानची हवाई हद्द वापरू द्यावी, विनंती केली होती. त्या विनंतीला पाकिस्तानने होकार दिला होता पण नंतर भारताने हा मुद्दा सोडून ओमानमार्गे कझाकीस्तानला पोहचण्याचा निर्णय घेतला.

गेल्या शुक्रवारी एससीओ नेत्यांची बैठक सुरू झाली. ही बैठक दोन दिवस सुमारे नऊ तास बंद दरवाज्याआड सुरू होती. यामध्ये इम्रान व मोदी यांच्यात बोलणी झाली का? झाली असल्यास किती मिनिटे हे दोन नेते बोलले हे प्रश्न दोन्ही देशांच्या प्रसारमाध्यमांची उत्सुकता चाळवत होते. अखेर इस्लामाबादमध्ये पोहचल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी पत्रकारांना दोन दिवसातल्या नऊ तासात बंद दरवाज्याआड काय झाले याची माहिती दिली. ते म्हणाले, ‘माझ्याकडे स्टॉप वॉच नाही पण दोन्ही नेते जेव्हा एकमेकांच्या समोर आले तेव्हा त्यांनी हँडशेक करून अभिवादन केले. इम्रान खान यांनी मोदींच्या लोकसभा निवडणुकांतील विजयाबद्दल अभिनंदन केले व काही किरकोळ विषयांवर चर्चा केली.’

कुरेशींनी जे काही सांगितले तशाच आशयाची माहिती भारतीय पत्रकारांना काही सूत्रांकडून मिळाली. मोदी व इम्रान खान समोरासमोर बसले असले तरी त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळले व शिखर परिषदेच्या चर्चेत भाग घेतला अशी माहिती पत्रकारांना मिळाली. या बैठकीत भारत-पाकिस्तानदरम्यान काहीच संवाद न झाल्याने या बैठकीच्या वृत्तांतात अतिरेक करणे टाळा, असेही भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांनी पत्रकारांना बजावले.

वास्तविक शिखर परिषदेत द्विपक्षीय चर्चेला फारसा वाव नसतो व तेथे आपापसातल्या मतभेदांची सविस्तर चर्चा करू नये असा एक शिष्टाचार असतो. त्यामुळे भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी या परिषदेत क्षेत्रीय प्रश्नांवर आपली मते व्यक्त केली.

पाकिस्तानशी चर्चा करण्याबाबत भारताच्या काही अटी आहेत, त्या अटी पाकिस्तानला मान्य झाल्यानंतर उभय देशांमधील चर्चेला सुरूवात होऊ शकते, इतके चित्र स्पष्ट आहे. आणि ही कोंडी कुणी फोडायची हा कळीचा मुद्दा आहे.

एससीओच्या बैठकीत मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. एससीओ सदस्यांनी सामूहिकपणे दहशतवादाचा नि:पात करावा अशी मागणी त्यांनी केली. ‘दहशतवादमुक्त समाज’ ही काळाची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी तेथे केले. इम्रान खान यांनी काश्मीरचा उल्लेख न करता सरकारपुरस्कृत दहशतवादाचा निषेध केला.

दोन्ही नेत्यांची ही विधाने लक्षात घेता भारत-पाकिस्तानदरम्यान चर्चेला अजूनही पोषक वातावरण निर्माण झालेले दिसत नाही. २०१७मध्ये एससीओच्या बैठकीत त्यावेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ होते. मोदींनी काही मिनिटे शरीफ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी शरीफ यांच्या कुटुंबाची ख्याली खुशालीही विचारली होती. पण आता पाकिस्तानमधील सत्ता बदलली आहे, त्याने राजकीय नेपथ्यही  बदलले आहे व आंतरराष्ट्रीय परिस्थितीही बदलली आहे.

मूळ बातमी 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: