झारखंड मुक्ती आघाडीकडून देणगीदार उघड

झारखंड मुक्ती आघाडीकडून देणगीदार उघड

नवी दिल्लीः इलेक्टोरल बाँडअंतर्गत आपल्या पक्षाला किती व्यक्तींकडून, संस्थांकडून आर्थिक निधी मिळाला याची माहिती सार्वजनिक करण्याचा निर्णय झारखंड मुक्ती आघाडीने घेतला, याची माहिती असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

झारखंड मुक्ती आघाडीला २०१९-२० या काळात इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून १ कोटी रु.चा निधी मिळाला असून हा निधी हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडने देणगी म्हणून दिला आहे.

हिंडाल्को ही आदित्य बिर्ला समुहातील एक साहाय्यक कंपनी असून झारखंडमधील मुरी येथे या कंपनीचा अल्युमिनियम शुद्धीकरण प्रकल्प आहे.

झारखंड मुक्ती आघाडीला हा आर्थिक निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोर्ट कम्पाउंड ब्रँचद्वारे जारी झालेल्या बाँड क्रमांक ‘AAACH1201R’ द्वारे मिळाला.

झारखंड मुक्ती आघाडीने एक कोटी रु. मिळाल्याची माहिती मात्र २०१९-२०च्या आपल्या लेखापरीक्षणात दिलेली नाही.

पण आपल्या पक्षाला इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून पैसे मिळाल्याची माहिती मात्र या पक्षाने निवडणूक आयोगाला दिली असल्याचे पक्षाचे महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी दिली. आम्ही हिंडाल्कोला देणगीची मिळाल्याची पावती दिली आहे व निवडणूक आयोगालाही तशी माहिती दिली होती. पण भाजपसारखे पक्ष त्यांना देणग्या कुठून मिळतात याची माहिती मात्र सार्वजनिक जाहीर करत नाहीत, असे ते म्हणाले.

२०१९-२० या काळात १९ राजकीय पक्षांना ३१२ कोटी ३७ लाख रुपये इलेक्ट्रोरल बाँडच्या माध्यमातून निवडणुकांच्या काळात देणगी म्हणून मिळाले होते. पण हे पैसे कुणी दिले याची माहिती गुलदस्त्यात आहे.

२०१९-२०मध्ये दोन राष्ट्रीय पक्ष व १७ प्रादेशिक पक्षांनी आपली संपत्ती जाहीर केली होती. ती ६१९ कोटी २८ लाख रु. इतकी होती.

यात सर्वाधिक उत्पन्न तृणमूल काँग्रेसचे १४३ कोटी ६७ लाख रु. इतके होते त्यानंतर तेलुगू देसम पक्षाचे ९१ कोटी ५३ लाख, बीजू जनता दलचे ९० कोटी ३५ लाख इतके होते.

मूळ बातमी

COMMENTS