‘भारतातील स्वतंत्र पत्रकारिता अखेरचे श्वास घेत आहे’

‘भारतातील स्वतंत्र पत्रकारिता अखेरचे श्वास घेत आहे’

प्रसिद्ध पत्रकार आणि टीव्ही अँकर रवीश कुमार यांच्या जीवनावर आधारित एका माहितीपटाच्या निमित्ताने..

उद्योगपती गौतम अदानी यांना ‘झेड’ सुरक्षा
‘अंबानी व संघाशी संबंधिताकडून ३०० कोटींची लाच’
नीता अंबानींना बीएचयूमध्ये विरोध

भारतात स्वतंत्रपणे बातमीदारी करणाऱ्यांसमोर उभ्या असणाऱ्या आव्हानांची कल्पना देणारा रवीश कुमार यांच्या जीवनावरील आधारित ‘व्हाइल वी वॉच्ड‘(While We Watched) हा माहितीपट आपल्याला अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. विनय शुक्ला यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. रवीश कुमार ज्या वृत्तवाहिनीमध्ये काम करतात त्या एनडीटीव्ही समूहात काम करणाऱ्या अनेकांना रोज जीवे मारण्याच्या धमक्या, या वाहिनीचे प्रक्षेपण रोखण्यासाठी हेतुपुरस्सर आणल्या जाणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि मानवनिर्मित आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. एनडीटीव्ही आजही या सगळ्या संकटांशी लढत लढत प्रामाणिक पत्रकारिता करण्याच्या प्रयत्न करते आहे. या वृत्तवाहिनीच्या हिंदी वाहिनीचा चेहरा असणाऱ्या रवीश कुमार यांच्यावर हा माहितीपट आधारित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. अलीकडेच या समूहाला अधिग्रहित करण्यासाठी केल्या गेलेल्या एका प्रयत्नामुळे ही वृत्तवाहिनी करीत असलेल्या पत्रकारितेसमोर एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे.

नवी दिल्लीच्या एका अपार्टमेंटमध्ये गुलाबी कपडे परिधान केलेली एक मुलगी तिच्या वडिलांसोबत खेळत आहे, तिचे वडील भारतातील प्रसारमाध्यमांमधील एक महत्त्वाचे पत्रकार आहेत. लहान टिपूला तिचे वडील रवीश कुमार यांना त्यांच्या फोनवर एक म्युझिक व्हिडिओ दाखवायचा आहे. पण तिच्या वडिलांना मात्र हे काही आवडले नाही. “त्यापेक्षा एखादं गाणं म्हणून दाखव, मला फोन बघणं आवडत नाही” असे ते म्हणाले. पण लहानग्या टिपूला मात्र तिच्या मनोरंजनासाठी तिच्या वडिलांचा फोनच हवा आहे त्यामुळे तो त्यांच्याकडून घेण्यासाठी ती झटापट करते. काही वेळ चाललेल्या या झटापटीमध्ये तिचाच शेवटी विजय होतो आणि ती तो फोन त्यांच्या हातातून घेण्यास यशस्वी होते. रवीश माघार घेतात आणि लहानगी टिपू फोनवर तो व्हिडिओ पाहण्यास सुरुवात करते.

मात्र व्हिडिओ सुरु झाल्याच्या काही सेकंदानंतरच कुणाचातरी कॉल येतो आणि व्हिडिओ थांबतो. रवीश तो कॉल कट करतात गाणे पुन्हा सुरु होते मात्र दुसऱ्याच सेकंदाला परत फोन आल्याने गाणे थांबते, कॉल करणारा काही माघार घ्यायला तयार नसतो…. रवीश यांच्या मुलीच्या चेहऱ्यावर असणारे निरागस हसू एव्हाना गायब झालेले असते. दुःख, भीती आणि भेदरलेल्या नजरेने लहानगी टिपू हातातला फोन बाजूला ठेवून आपल्या बापाच्या खांद्यावर डोके टेकवते. त्याक्षणी तिथे एक अनामिक शांततेतेने प्रवेश केलेला असतो, कुणीही काहीही बोलत नाही, कुणाला काही बोलायची गरजही नसते… कारण कुमार परिवाराला अशा कॉल्सची सवय झालेली असते. टिपूचे वडील भारतातील एक प्रमुख पत्रकार असल्याने त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारे असे कॉल्स मागील काही वर्षांपासून येतच असतात. त्यामुळे ज्या ज्या वेळी रवीश कुमार यांचा फोन वाजतो तेंव्हा त्यांच्या घरातील प्रत्येक जण विशेषकरून त्यांच्या पत्नी आणि मुलगी हातात असेल ते काम थांबवून आलेला कॉल उचलायचा की कट करायचा हे ठरवत असतात. भारतातील स्वतंत्र पत्रकारितेचा चेहरा असणाऱ्या रवीश कुमार यांच्या घरातील हे दृश्य त्यांच्या आयुष्यावर बनवलेल्या ‘व्हाइल वी वॉच्ड'(While We Watched) या माहितीपटामध्ये दाखवण्यात आलेले आहे. येत्या रविवारी म्हणजेच ११ सप्टेंबर २०२२ ला टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या माहितीपटाच्या प्रदर्शन होणार आहे.

एनडीटीव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक असणाऱ्या रवीश कुमार यांच्यावर या ९४ मिनिटांच्या माहितीपटाच्या निर्मिती करण्यात आलेली आहे. भारतातील काही निवडक स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या वृत्तवाहिन्यांमध्ये एनडीटीव्हीचा उल्लेख केला जातो. २०१८ ते २०२० च्या सुरुवातीपर्यंतचे रवीश कुमारांचे आयुष्य या माहितीपटात दाखवण्यात आलेले आहे. एखाद्या न्यूजरूम थ्रिलरसारखा हा माहितीपट बनवला गेला आहे. मात्र हा एक काल्पनिक थरारपट नसून भारतातील पत्रकारितेच्या भयानक वास्तवाचे हे दर्शन आहे पत्रकारितेच्या केविलवाण्या परिस्थितीसोबतच भारतातील लोकशाहीच्या गलितगात्र अवस्थेची कल्पनाही हा माहितीपट तुम्हाला देतो आहे. कुमार हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशातील हिंदू राष्ट्रवादी प्रशासनाचे सर्वात स्पष्ट आणि प्रखर टीकाकार आहेत. देशातील बहुतांश इतर वृत्तवाहिन्या सरकारच्या प्रवक्त्या म्हणून काम करत असताना रवीश कुमार मात्र वारंवार मोदी सरकारवर टीका करताना दिसून येतात. रवीश कुमार यांनीच सरकारचे मंडलिक होऊन काम करणाऱ्या अशा वृत्तवाहिन्यांना ‘गोदी मीडिया‘ हे नाव दिलेले आहे.

एनडीटीव्हीच्या हिंदी वृत्तवाहिनीचे ते प्रमुख वृत्तनिवेदक म्हणून काम करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर एनडीटीव्हीच्या इंग्लिश वृत्तवाहिनीपेक्षा हिंदी वृत्तवाहिनीला मिळणारा प्रतिसाद कमी असला तरीही १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सुमारे ४४ % लोकांची भाषा हिंदी असल्याने रवीश कुमार यांचा आवाज देशभरात ऐकला जातो आणि कदाचित यामुळे रवीश कुमार यांना नेहमी टीका आणि धमक्यांचा सामना करावा लागतो. मीडिया समीक्षक आणि न्यूजलँड्री या मीडिया मॉनिटरिंग साइटच्या कार्यकारी संपादक असणाऱ्या मनीषा पांडे म्हणतात की, “बहुतांश हिंदी वृत्तवाहिन्या या सरकारच्या बाजूने बातमीदारी करत आहेत. नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यात या वृत्तवाहिन्या अजिबात थकत नाहीत आणि आपल्या विखारी निवेदनामुळे देशातील मुसलमानांना लक्ष करून देशाचा धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र एनडीटीव्ही हिंदी अशाही परिस्थितीत सरकारला कठीण प्रश्न विचारण्याचे काम करत असते.“

त्यामुळेच मागील महिन्यात जेंव्हा जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणारे आणि मोदींचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने एनडीटीव्हीची मालकी मिळवण्याचा प्रयत्न केला तेंव्हा जगभरातील माध्यमांनी या घटनेची दखल घेतली आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात भूकंप झाला.

‘देशाचा शत्रू’ ठरवणाऱ्या मिम्सचे आक्रमण

एनडीटीव्ही हिंदी पाहणाऱ्या लाखो प्रेक्षकांना सवयीच्या झालेल्या रवीश कुमार यांच्या एका वाक्याने या माहितीपटाची सुरुवात होते. दाढी केलेला, पांढऱ्या केसांचा एक वृत्त निवेदक रोज एनडीटीव्हीवर “नमस्कार मैं रवीश कुमार” (नमस्कार मी रवीश कुमार) असे म्हणून आपल्या वृत्तनिवेदनाची सुरुवात करतो आणि या माहितीपटात दाखवण्यात आलेले पहिले दृश्यही नेमके तसेच आहे. हिंदी भाषेतील रवीश कुमारांच्या एका उत्तम संहितेला पार्श्वभूमीवर चालवले जाते आणि हा माहितीपट पुढे सरकतो. “जेव्हा तुम्हाला तुमचे सरकार ‘कम्युनिस्ट’ ठरवते आणि तुमच्यावर आक्रमण करू लागते त्यावेळीच तुम्हाला हे लक्षात घ्यायला हवे की तुमचे हक्क आता हिरावले जाणार आहेत.” रवीश कुमार हे तुम्हाला या दृश्यात सांगत असतात आणि अचानक तुमच्यासमोर सरकारला विरोध केल्याने तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशातील पत्रकार, कवी, कार्यकर्त्यांची छायाचित्रे दिसू लागतात.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यापासून सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीचा विरोध करणाऱ्या भारतीय समाजावर असे अनेक हल्ले करण्यात आलेले आहेत. मानवाधिकाराच्या रक्षणासाठी काम करणारे कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक यांना दडपशाही, देशद्रोह आणि दहशतवाद कायद्यांतर्गत अटक आणि दीर्घकाळ नजरकैदेचा सामना करावा लागला आहे. मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि माध्यमांनी भारत सरकाराच्या अनेक नीतींवर गंभीर टीका केलेली असूनही देशातील बहुतांश हिंदी माध्यमांनी मात्र नेहमी सरकारचेच गुणगान गाण्याचे काम केलेले दिसून येते. रवीश कुमार मात्र त्यांच्या गंभीर आणि प्रभावी संहितेमुळे सरकारचे समर्थक म्हणून उभ्या ठाकलेल्या माध्यमांच्या गर्दीत समाविष्ट झालेले नाहीत.

देशातील कार्यकर्ते, पत्रकार आणि इतरांच्या अटकेभोवती असणाऱ्या अपारदर्शकतेबाबत ते म्हणतात की, “गोदी मीडियाने या सगळ्या लोकांना अटकेच्या आधीच ‘देशद्रोही‘ म्हणून घोषित केलेले आहे.” माहितीपटात रवीश म्हणतात की, “तुमच्या मोबाईलवर तुम्हाला या कार्यकर्त्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या मिम्सचा महापूर आलेला दिसून येईल. हे सगळे लोक कशापद्धतीने ‘देशविरोधी कारवाया करत आहेत’ हे तुमच्या मनावर पुन्हा पुन्हा बिंबवले जाईल. तुमच्या मूलभूत समस्यांना बगल देऊन या प्रचाराला तुम्ही बळी पडलेले असाल आणि यामुळे विरोधाचे, टीकेचे सूर चिरडले जाऊन नेहमी एका अनामिक भीतीचे राज्य निर्माण करण्यात येईल.“

याचदरम्यान इतर माध्यमे आणि वाहिन्या भीती आणि तिरस्काराचे वातावरण प्रसारित करत असतील. सरकारचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी “आता तुम्ही शांत राहा! आता तुम्ही शांत रहा!” असे तुमच्यासमोर ओरडत असतात. या माहितीपटात या दृश्यामध्ये अर्णब गोस्वामी यांच्या कार्यक्रमाचा एक भाग दाखवण्यात आलेला आहे ज्यामध्ये अर्णब सोबत इतर सहा वक्ते टीव्हीस्क्रीनवर छोट्या छोट्या रकान्यात आपापली मते मांडत असतात आणि याच कार्यक्रमात एका विद्यार्थी कार्यकर्त्याला अर्णब गोस्वामी म्हणतात की, “कोणीतरी तुम्हाला देशद्रोही ठरवणे गरजेचे आहे आणि आज रात्री मी तुम्हाला ‘देशद्रोही’ ठरवत आहे.“

विश्वासाचे नाते निर्माण करून वैयक्तिक आयुष्यातील काही क्षण कॅमेऱ्यात कैद करणे

एकदा का देशद्रोही असे नामकरण केले गेले की देशभरातील हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रवादाच्या कथित रक्षकांकडून तुमच्यावर हल्ले सुरु करण्यात येतात. भारतात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षातर्फे करोडो ‘ट्रोल्स‘ चे सैन्य तयार केले जात आहे ज्यांना नरेंद्र मोदी ‘योद्धे‘ म्हणून संबोधतात. “भाजपवर टीका करणाऱ्या आणि भारतीय जनता पक्षाच्या हिटलिस्टवर असणाऱ्या पत्रकारांवर सोशल मीडिया आणि वेबसाईटच्या माध्यमातून तुटून पडण्याचे काम” या योद्धयांना देण्यात आलेले आहे असे मत पॅरिसमध्ये काम करणारी संस्था ‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ या स्वयंसेवी संस्थेने नोंदवले आहे.

कुमार परिवारावर चहुबाजूने होणाऱ्या हल्ल्याची कल्पना तुम्हाला ‘व्हाइल वी वॉच्ड’ (While We Watched) हा माहितीपट पाहिल्यानंतर येऊ शकते. कुमार दाम्पत्य अशा धमक्यांचा कशा पद्धतीने सामना करते याबाबत त्यांना विचारले असता दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक असणाऱ्या त्यांच्या पत्नी म्हणाल्या की , “आम्ही या धमक्यांबाबत घरी बोलण्याचे टाळतो” मात्र “आम्हाला कालांतराने कळले की यामुळे आमची मुलगी रात्री बेरात्री दचकून जागी होऊ लागली, आपल्या वडिलांना काहीतरी होईल अशी भीती तिला नेहमी वाटू लागली. ही भीती तिच्या अंतर्मनात रुजलेली आहे. त्यामुळे आम्हाला आता ते हाताळावे लागणार आहे.“

अशाप्रसंगी हा माहितीपट निर्मिती करणाऱ्यांना टीव्हीवरील एका प्रमुख वृत्तनिवेदकाच्या खाजगी आयुष्यातील क्षण अतिशय नाजूकपणे टिपावे लागतात. टोरोंटो येथील चित्रपट प्रदर्शनाच्या काही दिवस आधी चित्रपटाचे निर्माते शुक्ला ‘फ्रांस 24’ शी बोलताना सांगत होते की, “एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रवेश मिळवणे सोपे नसते, ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे आधी तुम्हाला विश्वास कमवावा लागतो.” शुक्ला यांनी सांगितले की, “मी रवीश आणि त्यांच्या कुटुंबासोबत जवळ जवळ दोन वर्षे घालवली आणि मी हळू हळू त्यांचा विश्वास कमविण्यात यशस्वी झालो विशेषतः लहानग्या टिपूचा विश्वास कमावणे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे होते कारण रवीश आणि त्यांच्या मुलीच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी क्षण चित्रित करणे थोडे विचित्र होते मी माझ्या तीन जणांच्या चमूसोबत ते काम केले. कॅमऱ्यावर न आलेल्या काही लोकांसोबतही एक विशेष नाते तयार करावे लागले आणि मी यात यशस्वी ठरलो.”

या माहितीपटात दाखविण्यात आलेली काही थरारक दृश्ये ही रवीश कुमार यांच्या घरी चित्रित केलेली नसून एनडीटीव्हीच्या ऑफिसमध्ये त्यांचे चित्रण करण्यात आलेले आहे. या माहितीपटात दाखवण्यात आलेले आहे की एका माध्यम संस्थेवर दबाव आणून कशापद्धतीने लोकशाहीची गळचेपी करण्यात येते. २०१७ मध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एनडीटीव्हीचे संस्थापक असणाऱ्या आणि पत्रकार म्हणून काम केलेल्या प्रणॉय आणि राधिका रॉय यांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. काही दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कर्जाच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आलेली होती. त्यानंतर या माध्यम संस्थेने कर्जाची परतफेड झाल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे जाहीर केली होती केली आणि “खोट्या आरोपांवर” आधारित “एकत्रित छळ” केला जात असल्याचा आरोप केला होता.

या छाप्याचा एनडीटीव्हीच्या संपादकीय पत्रकारितेशी कोणताही संबंध नसल्याचे सीबीआयने म्हटले होते. मात्र माध्यमातील तज्ज्ञांनी रशिया आणि टर्की मधील माध्यमांचा आवाज दाबण्यासाठी तेथील सरकारने केलेल्या कारवाईमध्ये आणि या सीबीआयच्या धाडींमध्ये साम्य असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. रशियन माध्यमतज्ज्ञ जिल डोहर्टी यांनी ‘द अटलांटिक’ या अमेरिकन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “कायदेशीर सापळे रचा, दहशतवादविरोधी कायद्याचा हवाला द्या आणि माध्यमांशी संबंधित संस्थांवर सरकारच्या संस्थांकडून कारवाई करा, त्यांची अविरत चौकशी करा आणि या कारवाईचा आणि राजकीय हेतूंचा काहीही संबंध नसल्याचे पुन्हा पुन्हा सांगा आणि असे करून या संस्थांना मारू नका मात्र अपंग करा हीच बहुतांश सत्ताधाऱ्यांची कार्यपद्धती असते.“

एखाद्या मनोवैज्ञानिक थरारपटाला साजेशा कथानकाप्रमाणे ‘व्हाइल वी वॉच्ड’ (While We Watched) हा माहितीपट तुमच्या डोळ्यासमोर उलगडत जातो. यामध्ये असेही एक दृश्य आहे ज्यात रवीश कुमार एका हिंदुत्वाच्या समर्थकाला एका मुस्लिम व्यक्तीला ‘लिंच’ केल्याप्रकरणी उघडे पाडत असतात आणि अचानक त्यांचे चॅनल बंद पडते. त्यानंतरची काही मिनिटे तिथे अतिशय तणावपूर्ण वातावरण निर्माण होते. तंत्रज्ञांची कुचंबणा होत असताना, कंपनीचे सीईओ वितरण विभागासोबतच्या बैठकीनंतर काय झाले याचे तपशीलवार विश्लेषण करण्याचे वचन देतात. ती कुमार यांना बातमी सांगत राहण्याचा आग्रह करते. मात्र असे करणे दिवसेंदिवस अवघड होत चालल्याचेही दाखवण्यात आले आहे कारण त्या कार्यालयात आहे ‘केक कापण्याचे’ कार्यक्रम वाढले आहेत.

‘केक कापण्याच्या दृश्यांचा’ मानसिक आणि आर्थिक आघात आणि त्याचा अर्थ

आर्थिक दबाव वाढू लागल्यावर, कुमार अनेकदा त्याच्या काचेच्या केबिनमधून कामावरून काढून टाकण्यात आलेल्या आणखी एका कर्मचाऱ्याच्या सन्मानार्थ केक कापण्यासाठी एकत्र आलेल्या सहकाऱ्यांमध्ये सामील होतात. कदाचित या वाढलेल्या केक कापण्याच्या कार्यक्रमांमुळेच शुक्ला यांना हा माहितीपट बनविण्याची प्रेरणा मिळाल्याचे शुक्ला सांगतात. २०१८ मध्ये या माहितीपटाच्या निर्मात्यांनी एनडीटीव्ही कार्यालयात एक किंवा दोन दिवस शूटिंग करू शकतो का? असे विचारण्यासाठी रवीश कुमार यांना कॉल केला आणि या माहितीपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. शुक्ल म्हणाले की, “चित्रकारणाच्या पहिल्याच दिवशी मी एका केक कापण्याच्या कार्यक्रमात सहभागी झालो. केक कापताना त्या कार्यालयात असणारी शांतता आणि वातावरणात पसरलेले नैराश्य मी अजूनही विसरू शकत नाही. आणि त्यामुळेच मला इथे काहीतरी घडत असल्याची जाणीव झाली आणि माझ्या माहितीपटामधून मी हीच भावना दर्शकांना दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.“

वारंवार टाकले जाणारे कर छापे, जाहिरातींचे घटलेले उत्पन्न आणि बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्याने एनडीटीव्हीची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच नाजूक होत चालली आहे. पण जेव्हा अदानी समूहाने गेल्या महिन्यात एनडीटीव्ही ताब्यात घेण्यासाठी कॉर्पोरेट छापा टाकला तेव्हा पत्रकारितेच्या वर्तुळात धोक्याची घंटा वाजली.

‘लोकशाहीवर हल्ला’

अदानी उद्योग समूहावर अनेकदा टीका करण्यात आलेली आहे विशेषतः तो समूह ज्या देशात खाणकाम करतो त्या ऑस्ट्रेलियामध्ये तर अदानी समूहावर प्रचंड टीका करण्यात येत आहे. या उद्योगसमूहाचे प्रमुख यांनी त्यांचे नरेंद्र मोदींशी कसलेही अधिकृत संबंध असल्याचा वेळोवेळी नकार दिला आहे मात्र अनेक आर्थिक विषयांवर पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी मागील ८ वर्षात कशा पद्धतीने या दोघांनी प्रगती केली आहे हे दाखवून दिले आहे. एनडीटीव्हीने आतापर्यंत तात्पुरत्या नियामक कलमाचा गैरफायदा घेऊन अदानी समूहाकडे होणारे शेअर्सचे हस्तांतरण रोखण्यात यश मिळवले आहे.परंतु कॉर्पोरेट वकिलांचे म्हणणे आहे की, केवळ काही दिवसांचा हा प्रश्न आहे आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत नरेंद्र मोदींचे मित्र असणारे अदानी या समूहाची मालकी मिळवण्यात यशस्वी होतील.

२०२४ मध्ये देशात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील जनमत भाजपकडे वळवण्याच्या योजनेचा हा एक भाग असू शकतो असे अनेकांचे म्हणणे आहे. एनडीटीव्हीच्या मालकीमध्ये होणारा हा बदल या माध्यम संस्थेच्या स्वातंत्र्यावर आणि बातमीदारीवर काय परिणाम करेल हे आत्ताच सांगता येणे कठीण असल्याचे न्यूज लाउंड्रीच्या पांडे म्हणाल्या. एका अब्जाधीश उद्योगपतीने आणखी एक भारतीय माध्यम समूह ताब्यात घेतल्याबद्दल त्यांना जराही आश्चर्य वाटलेले नाही. त्या म्हणाल्या की “एखादा उद्योगसमूह जेंव्हा एखादी माध्यमसंस्था विकत घेतो तेंव्हा ते नक्कीच पत्रकारितेच्या प्रेमापोटी झालेले नसते.“

एनडीटीव्हीचे मालक बदलल्याचा परिणाम भारतीय लोकशाहीवर होऊ शकतो असा अंदाज पांडे यांनी व्यक्त केला. “लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसते” असे त्या म्हणाल्या. “देशातील मतदारांना त्यांच्या योग्य प्रतिनिधींची निवड करण्यासाठी विश्वासू माध्यमांची गरज असते. त्यामुळे माहितीशी छेडछाड केल्यास तुम्ही सरळ सरळ लोकशाहीशी छेडछाड करत असल्याचा अर्थ काढला जाऊ शकतो.” अदानी उद्योगसमूहाने एनडीटीव्हीची मालकी मिळवल्याच्या बातम्या प्रसारित होताच रवीश कुमार यांच्या राजीनाम्याचीही बातमी लगेचच प्रसारित केली जाऊ लागली होती मात्र रवीश यांनी या बातम्यांना फेटाळून लावताना ट्विट केले की, “माझ्या राजीनाम्याच्या बातम्या या केवळ अफवा आहेत हे अगदी त्याच अफवेप्रमाणे आहे ज्यात म्हणले जाते की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला मुलाखत देण्याचे कबूल केले आहे.“

अनुवाद : आशय बबिता दिलीप येडगे

भाषांतरीत लेख ‘बाई माणूस’ वरून साभार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0