५ लाख आयसीयू बेड, दीड लाख डॉक्टर, २ लाख नर्सची गरज

५ लाख आयसीयू बेड, दीड लाख डॉक्टर, २ लाख नर्सची गरज

पुणेः कोविड-१९च्या महासाथीचा समर्थपणे मुकाबला करायचा असेल व सध्याच्या संकटावर मात करायची असेल तर भारताला सध्याच्या क्षमतेपेक्षा अजून पाच लाखाहून अधिक

लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याचे संकेत
उ. प्रदेशात २० नागरिकांना दोन वेगळ्या लसी
‘गर्दी टाळण्यासाठी राष्ट्रीय व्यापक धोरण हवे’

पुणेः कोविड-१९च्या महासाथीचा समर्थपणे मुकाबला करायचा असेल व सध्याच्या संकटावर मात करायची असेल तर भारताला सध्याच्या क्षमतेपेक्षा अजून पाच लाखाहून अधिक आयसीयू बेड, २ लाख नर्स व दीड लाख डॉक्टरांची गरज आहे, असे मत जगप्रसिद्ध शल्यविशारद डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. देशात सध्याच्या घडीला ७५ हजार ते ९० हजार दरम्यान आयसीयू बेड असून हे सर्व बेड कोरोना रुग्णांनी व्यापून गेले आहेत. सध्या कोविडची दुसरी लाटही अत्युच्च बिंदूवर पोहचलेली नाही व देशात रोज साडे तीन लाखाहून अधिक रुग्णांची दररोज भर पडत आहे. हा आकडा ५ लाखांवरही पोहचू शकतो. हे मोठे आव्हान पेलायचे असेल तर दीड लाख डॉक्टर, २ लाख नर्स व ५ लाखाहून अधिक आयसीयू बेड लागतील असे डॉ. शेट्टी म्हणाले. पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यालयाच्या एका कार्यक्रमात ते ऑनलाइन माध्यमातून बोलत होते.

डॉ. शेट्टी म्हणाले, देशातल्या मीडियामध्ये सध्या ऑक्सिजन व आयसीयू बेडची कमतरता यावरच बातम्या येत आहेत. या बातम्या ऐकून, पाहून अनेक रात्र मी बैचेन आहे, रुग्णांना ऑक्सिजन व आयसीयू बेड मिळत नसल्याने त्यांचे मृत्यू होत आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे. देशात सध्या रोज १५ ते २० लाख जणांना कोरोनाची लागण होत आहे. सांख्यिकीनुसार ५ टक्के रुग्णांना वयानुरुप आयसीयू बेडची गरज लागते व प्रत्येक रुग्ण सरासरी १० दिवस आयसीयू बेडवर उपचार घेत असतो. अशा परिस्थितीत आपण विचार केल्यानंतर लक्षात येते की आपल्याला अजून ५ लाख अतिरिक्त आयसीयू बेडची येत्या काही आठवड्यात गरज भासणार आहे. असे डॉ. शेट्टी म्हणाले.

आयसीयू बेड हे रुग्णांना बरे करत नाहीत तर त्यांच्या सोबत असणारे नर्स, अन्य आरोग्य कर्मचारी व डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असतात. त्यामुळे यांची संख्याही लाखोत आपल्याला लागेल असे डॉ. शेट्टी म्हणाले.

भारतात कोविड पसरत गेला तेव्हा देशात ७८ टक्के वैद्यकीय कर्मचार्यांची कमतरता होती. त्यामुळे आता कोविडचे महाभयंकर संपुष्टात आणायचे असेल तर येत्या वर्षभरात आपल्याला सुमारे दोन लाख नर्स, दीड लाख डॉक्टरांची गरज लागेल. ही महासाथ अजून ४-५ महिने अशीच उग्र स्वरुपात राहील. त्यानंतर आपल्याला तिसर्या लाटेसाठी सज्ज राहावे लागेल, असा सावध इशारा डॉ. शेट्टी यांनी दिला.

काही पर्याय सुचवले

या ऑनलाइन सत्रात डॉ. शेट्टी यांनी मनुष्यबळ कमतरतेवर काही पर्याय सुचवले. ते म्हणाले, सध्या देशात २ लाख २० हजार नर्स शेवटच्या वर्षांत शिकत आहेत. त्यांना या कामी आणल्यास मोठी मदत होऊ शकते. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इंडियन नर्सिंग कौन्सिलची चर्चा करून पदवीच्या अखेरच्या वर्षांत असलेल्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ आयसीयू वॉर्डमध्ये एक वर्षांसाठी कार्यरत ठेवल्यास मदत होईल. या विद्यार्थ्यांना त्यानंतर पदवी द्यावी अशी सूचना डॉ. शेट्टी यांनी केली.

कोविडची लढाई केवळ डॉक्टर व आरोग्य सेवक किंवा सीमेवरचा जवान जिंकू शकणार नाही तर त्यासाठी देशातील मोठ्या प्रमाणातील तरुण वर्गाला हाताशी घेतले पाहिजे. या तरुण वर्गाचे लसीकरण झाल्यानंतर ते स्वतः कोविड-१९चा मुकाबला करतील आणि रुग्णांनाही मदत करतील, असे डॉ. शेट्टी म्हणाले.

डॉक्टरांच्या कमतरतेबद्दल डॉ. शेट्टी म्हणाले, देशात सुमारे १ लाख ३० हजार तरुण डॉक्टर असून ते कोविड-१९ आयसीयूत नाहीत तर ते ‘नीट’ परीक्षेची तयार करत आहेत. ‘नीट’ परीक्षेच्या जागा केवळ ३५ हजार असून या परीक्षा लगेचच ऑनलाइन घेऊन त्यांचे निकाल लवकर लावून हा वर्ग कोविड-१९ निर्मूलनासाठी वापरला जाऊ शकतो. या ३५ हजार डॉक्टरांव्यतिरिक्त अन्य १ लाख मेडिकल उमेदवारांना पीजी सीट मिळणार नाही. त्यांना कोविड-१९ सेवेत रुजू करून घेतल्यास पुढच्या वर्षी त्यांना नीटची परीक्षा देण्याची संधी द्यावी असा पर्यायही डॉ. शेट्टी यांनी सूचवला.

या व्यतिरिक्त २५ हजार डॉक्टरांचे पदव्युत्तर प्रशिक्षण झाले आहे पण त्यांनी परीक्षा दिलेली नाही. या डॉक्टरांना त्यांच्या परीक्षा ऐवजी कोविड आयसीयूत सामावून घेतल्यास आरोग्य व्यवस्थेला मोठा हातभार लागेल. तसेच देशात ९० हजार ते १ लाख डॉक्टर हे परदेशी विद्यापीठातून शिक्षण घेत आहे. त्यांनी या घडीला ‘नीट’ची परीक्षा दिली नसेल. अशांपैकी हुशार २० हजार डॉक्टरांची निवड केल्यास त्यांचीही मदत होऊ शकते. या डॉक्टरांनी एक वर्ष सेवा केल्यास त्यांची कायमस्वरुपी नोंदणी करता येऊ शकते.

हे आपण करू शकलो तर आपण वर्षभरात कोविड महासाथीवर मात देऊ शकतो. अन्यथा परिस्थिती अधिक चिंताजनक होईल असे डॉ. शेट्टी म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0