इंडिया विरुद्ध भारत

इंडिया विरुद्ध भारत

एकीकडे चंगळवादी वृत्तीने मदमस्त झालेला इंडिया आणि अजूनही विकास व समाधान यापासून कोसो दूर असलेला भारत या दोन्हीमध्ये दरी वाढतच जाणार आहे

मोदींच्या पीक विमा योजनेअंतर्गत प्रिमियममध्ये ३४८% ची वाढ, संरक्षित शेतक-यांची संख्या मात्र स्थिरच
२०१७च्या कर्जमाफी नंतरही महाराष्ट्रात ४५०० शेतकर्‍यांच्या आत्महत्या
झीरो बजेट नैसर्गिक शेतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

कृषी कायदा रद्द करण्याचा मागणीवरून मंगळवारी झालेल्या भारत बंदला देशातील शहरी भागात नगण्य तर निमशहरी आणि ग्रामीण भागात तुफान प्रतिसाद मिळाल्याने भविष्यात देशात विविध समस्या आणि प्रश्न यावरून इंडिया विरुद्ध भारत अशा दोन गटात संघर्ष पाहावयास मिळणार हे स्पष्ट होत आहे.

अगदी महाराष्ट्रमधील ताजे उदाहरण म्हणून नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत काही शहरी भागाचा अपवाद वगळता ग्रामीण तसेच निमशहरी भागात वाढलेला मताचा टक्का हा सत्ताधारी पक्षाविरुद्ध रोष व्यक्त करणारा ठरला आहे. नेमके हेच या शेतकरी आंदोलनातून व्यक्त होत आहे.

तंत्रज्ञान आणि पैसा या मग्रुरीमध्ये सूज आलेल्या शहरी भागातील सो कॉल्ड पांढरपेशा समाजात आजही शेती आणि शेतकरी याबाबत प्रचंड गैरसमज आहेत. ज्यांनी उभ्या आयुष्यात कधी मातीला पाय लावला नाही अथवा शेती पाहिली नाही अशा काही स्वतःला बुद्धीजीवी समजणाऱ्या व्यक्ती कोणताही आचार विचार न करता शेतकरी आणि शेती तसेच त्यांच्या रास्त मागण्या याची समाज माध्यमातून खिल्ली उडवत आहेत. अगदी शेतकरी प्राप्तिकर भरतो का? असे काही बालिश आणि निर्बुद्ध प्रश्न विचारण्यात या वर्गाची मजल गेली आहे. पैशाच्या जोरावर आपण काहीही खरेदी करू शकतो असा दर्प असलेल्या या वर्गाला वास्तवाची जाणीव अजिबात नाही. तर दुसरीकडे शहरात राहणारा पण त्याची नाळ गावाकडे असणारा असा वर्ग मात्र शेतकऱ्यांना मनापासून पाठिंबा देत आहे.

प्रगती आणि विकास या चाकावर असलेल्या या देशाची ही दोन चाके भारत आणि इंडिया या दोन रुळावरून जात आहे. औद्योगिक क्रांती झाली आणि त्यातून मग कामगार वर्ग उदयास आला. हा वर्गही पिळवणूक आणि त्रास यामध्ये भरडून निघाला. पण हे दोन्ही रूळ समांतर नसल्याने ही गाडी अधेमधे हेलकावे खाते.
जगात कृषीप्रधान देश म्हणून ख्यातकीर्त असलेल्या भारताच्या शेतकऱ्यांची अवस्था मात्र दिवसेंदिवस दयनीय होत आहे.

शेतकरी अपार मेहनत करून आपल्या काळ्या मातीत अन्नधान्य पिकवतो. पण हे उत्पादन घेताना त्याची चांगलीच कुतरओढ होते. प्रत्यक्ष गुंतवणूक आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पनाचे व्यस्त प्रमाण यामुळे हा बळीराजा दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. त्याच्या मालाला किमान हमी भावही मिळत नाही. त्यामुळे तो केवळ नावालाच राजा राहिला आहे. दुसरीकडे खिशात पैसा असलेला वर्ग हा याच शेतकऱ्यांना पिकविलेल्या उत्पादनाला जादा पैसे देताना नाके मुरडतात. पण त्याचवेळी पिझ्झा आणि बर्गर यावर मनसोक्त खर्च करत असतात.

दूध, भाज्या अशा वस्तूचे दर वाढले की शहरी भागातून त्याला जोरदार विरोध होतो. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नसल्याचे त्यांना माहीत नसते. त्यामुळेच मंगळवारच्या भारत बंदमध्ये शहरी आणि ग्रामीण असे सरळ सरळ दोन भाग पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकीकडे चंगळवादी वृत्तीने मदमस्त झालेला इंडिया आणि अजूनही विकास व समाधान यापासून कोसो दूर असलेला भारत या दोन्हीमध्ये दरी वाढतच जाणार आहे हे निश्चित.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: