नवी दिल्ली : भारत-चीनदरम्यानच्या सीमाप्रश्नात आपण मध्यस्थीस तयार असल्याचे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केले. दोन्ही देशांनी सी
नवी दिल्ली : भारत-चीनदरम्यानच्या सीमाप्रश्नात आपण मध्यस्थीस तयार असल्याचे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केले. दोन्ही देशांनी सीमाप्रश्नावरून संयम साधावा यासाठी अमेरिका प्रयत्न करत असून सीमावाद ताणू नये, अशी अमेरिकेची इच्छा आहे आणि दोन्ही देशांशी अमेरिकेने संपर्क साधला असून मध्यस्थीस तयार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
लडाखच्या पूर्वेकडे चीनच्या लष्कराच्या हालचाली वाढल्यानंतर मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संपूर्ण भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख व संरक्षणमंत्र्यांसोबत एक तातडीची बैठक घेतली होती. या बैठकीत चीनच्या लडाखमधील हालचाली संदर्भात माहिती लष्करप्रमुखांनी मोदींना दिली.
गेले २० दिवस चीन व भारतदरम्यान सीमेवर तणाव आहे. लडाखबरोबरच भारताने उत्तर सिक्कीम, उत्तराखंड व अरुणाचल प्रदेशात सीमेवर सैन्य तैनात केले असून भारत संयम दाखवेल असे चीनला सांगण्यात आले होते.
पँगओंग त्सो लेक भाग व गलवान व्हॅलीतील दरबुक-शायोक-दौलत बेग ओल्डी भागातील रस्त्यांवरून चीन-भारतमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
गेल्या ५ मे रोजी लडाखमध्ये सुमारे २५० चिनी सैन्य भारतीय सैन्याच्या तुकडीपुढे आले व दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यावरून तणाव वाढला होता. या हाणामारीत दोन्ही बाजूचे सुमारे १००हून अधिक सैनिक जखमी झाले होते. चीनचा आरोप आहे की, भारतीय सैन्याकडून पँगओंग त्सो लेक परिसरात रस्ता बांधला जात असून तो अनधिकृत आहे.
या पूर्वी ऑगस्ट २०१९मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान वादात आपण मध्यस्थीची भूमिका बजावण्यासाठी तयार असल्याचे विधान केले होते. त्या अगोदर जुलै २०१९मध्ये त्यांनी व्हाइट हाउसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काश्मीर प्रश्नात अमेरिकेने लक्ष घालावे अशी विनंती नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केली होती असा दावा केला होता. या विधानामुळे भारतात राजकीय गदारोळ उडाला होता. त्यानंतर भारताने असा काही प्रस्ताव मोदींनी ट्रम्प यांच्या पुढे ठेवला नसल्याचे स्पष्ट केले होते.
नंतर काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय प्रश्न असल्याची आपली भूमिका आहे, असेही विधान मोदी सरकारने केले होते.
मूळ बातमी
COMMENTS