भारत हे करोनाचे पुढील केंद्रस्थान : डॉ. लक्ष्मीनारायण

भारत हे करोनाचे पुढील केंद्रस्थान : डॉ. लक्ष्मीनारायण

करोनाची लागण झालेल्यांची प्रत्यक्षातील संख्या आपल्या अंदाजाहून १२ पट अधिक आहे, असे ब्रिटनने स्वीकारले आहे आणि भारतातही हीच परिस्थिती असू शकते.

भारतात करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या  वाढत असतानाच, भारत हे करोना विषाणूचे पुढील केंद्रस्थान ठरू शकते, अशी शक्यता वॉशिंग्टनस्थित ‘सेंटर फॉर डिसीझ डायनॅमिक्स, इकोनॉमिक्स अँड पॉलिसी’चे संचालक तसेच प्रिन्सटन विद्यापीठातील लेक्चरर डॉ. रामानन लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केली आहे.

२० टक्के ते ६० टक्के लोकसंख्येला करोना विषाणूची लागण होऊ शकते हा अमेरिकेने स्वत:बाबत व्यक्त केलेला अंदाज भारतात लागू केला, तर ६० टक्के भारतीयांना म्हणजेच ७० ते ८० कोटी लोकांना करोना विषाणूची लागण होऊ शकते, अशी शक्यता लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केली. मात्र, यातील बहुसंख्य लोकांमध्ये विषाणूचे सौम्य परिणाम दिसतील, थोड्या लोकांमध्ये हा आजार तीव्र स्वरूप घेईल आणि फार थोड्या लोकांना यामुळे प्राण गमवावे लागतील, असे ते म्हणाले.

‘द वायर’ला दिलेल्या एक्स्लुजिव मुलाखतीमध्ये (ही संपूर्ण मुलाखत द वायरच्या वेबसाइटवर आहे) डॉ. लक्ष्मीनारायण म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. भारतात सध्या १३० जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, १४ जण यातून बरे झाले आहेत आणि तिघांचा मृत्यू झाला आहे ही माहिती अविश्वसनीय होती.

करोनाची लागण झालेल्यांची प्रत्यक्षातील संख्या आपल्या अंदाजाहून १२ पट अधिक आहे, असे  ब्रिटनने स्वीकारले आहे आणि भारतातही हीच परिस्थिती असू शकते, असे लक्ष्मीनारायण म्हणाले. याचा अर्थ भारतात निदान न झालेल्या १५०० हून अधिक केसेस आहेत. आपले आकारमान व लोकसंख्येची घनता बघता भारतात १०,००० किंवा त्याहून अधिक निदान न झालेले करोनाग्रस्त रुग्ण असले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारत सध्या या साथीच्या दुसऱ्या टप्प्यात आहे या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या भूमिकेशी आपण सहमत नाही. भारतात ही साथ दोन किंवा तीन आठवड्यांपूर्वीच तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेली असावी, असेही डॉ. लक्ष्मीनारायण म्हणाले. उर्वरित जगाचा अनुभव आणि सर्वोत्तम शास्त्रीय मॉडेलिंग प्रोजेक्शन्सच्या आधारावर आपण हे बोलत आहोत, असे ते म्हणाले. शाळा, कॉलेज, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद करण्यासारखी पावले सरकारने उचलली आहेत. साथ तिसऱ्या टप्प्यात आहे याची सरकारलाही कल्पना आहे हे यातून स्पष्ट होेते. सरकार हे कदाचित चांगल्या हेतूने करत असावे, असेही ते म्हणाले.

भारताने चाचण्या घेण्याचे प्रमाण बरेच वाढवणे गरजेचे आहे. दररोज १०,००० जणांच्या चाचण्या झाल्या पाहिजेत, असे मत डॉ. लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केले. आयसीएमआरने १७ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात एकूण ११,५०० जणांचीच चाचणी घेण्यात आली आहे.

अर्थात कोणतीही लक्षणे न जाणवणाऱ्या लोकांची ते केवळ करोनाप्रभावित देशांतून आले आहेत म्हणून किंवा करोनाग्रस्तांच्या संपर्कात आले आहेत म्हणून चाचणी केली जाणार नाही या आयसीएमआरच्या धोरणाशी डॉ. लक्ष्मीनारायण यांनी सहमती दर्शवली. त्याऐवजी खोकला, सर्दी, ताप किंवा श्वसनास त्रास अशी लक्षणे ज्यांच्यात दिसत आहेत, त्यांची चाचणी करणे अत्यावश्यक आहे. अशा लोकांनी कोठेही प्रवास केलेला नसला किंवा ते करोनाग्रस्तांच्या संपर्कात आले नसले तरीही त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला करोना विषाणूशी निगडित लक्षणे दाखवणारे आणि सामान्य ऋतूमानानुसार होणाऱ्या सर्दी-खोकला-तापाच्या रुग्णांमधील फरक कळणारच नाही.

भारत सरकारने परदेशांतून येणाऱ्या लोकांबाबत दक्षतेने पावले उचलली तसेच शाळा-कॉलेज-थिएटर्स बंद करण्यासारखे निर्णय प्रगल्भतेने घेतले आहेत. मात्र, चाचण्या घेतल्या जाण्याचे प्रमाण १.३ अब्ज लोकसंख्येच्या देशासाठी खूपच कमी आहे, असे डॉ. लक्ष्मीनारायण म्हणाले. सुमारे ४० लाख ते ८० लाख रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज भासू शकते हे लक्षात घेऊन भारताने तातडीने आयसीयू उपकरणे, व्हेंटिलेटर्स आणि विविध औषधे आयात करण्याची गरज आहे.

सामान्य लोकांनी स्वत:च्या संरक्षणासाठी कोणते उपाय केले पाहिजेत याबद्दल डॉ. लक्ष्मीनारायण म्हणाले की, ज्यांना सर्दी किंवा खोकला किंवा ताप किंवा श्वसनास त्रास होत असेल त्यांनी त्वरित घरी थांबावे व किमान आठवडाभर घरातच राहावे. चार दिवसांहून अधिक काळ लक्षणे कायम राहिल्यास चाचणी करवून घ्यावी. ही लक्षणे जाणवल्यानंतर तातडीने चाचणी करवून घेण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

लक्षणे दिसणाऱ्यांचे त्यांच्या घरातच विलगीकरण करण्यात आले, तर अन्य कुटुंबियांनी काही सामान्य प्रतिबंधात्मक उपाय करावेत. मात्र, याचा अर्थ ते करोनाग्रस्ताला जेवण द्यायलाही त्याच्या खोलीत जाऊ शकत नाहीत असा नाही. या व्यक्तींची जेवणाची ताटे कुटुंबातील अन्य सदस्य घासू शकतात, त्यांचे कपडे धुऊ शकतात आणि त्यांनी ग्लोव्ह्ज वगैरे घालण्याचीही गरज नाही. फक्त वारंवार आणि व्यवस्थित हात धुणे महत्त्वाचे आहे. दिवसातून चार ते पाच वेळा हात धुणे पुरेसे आहे, असेही डॉ. लक्ष्मीनारायण यांनी स्पष्ट केले.

मास्क घालण्याची अजिबात गरज नाही. उलट लोकांनी मास्क घालू नये. आवश्यकता नसताना मास्क घालणाऱ्या लोकांमुळे त्यांची खरी गरज ज्यांना आहे त्या वैद्यकीय आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना मास्कचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे करोनाची लागण न झालेल्यांनी मास्क घालूच नये, असे ते म्हणाले.

गोमूत्र पिणे किंवा शेणाच्या गवऱ्यांनी अंघोळ करणे यामुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळता येतो याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे डॉ. लक्ष्मीनारायण यांनी स्पष्ट केले. यासाठी सुचवल्या जाणाऱ्या होमिओपॅथीच्या औषधांनाही कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मूळ लेख

COMMENTS