काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा यूएन प्रमुखांचा प्रस्ताव भारताने नाकारला

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा यूएन प्रमुखांचा प्रस्ताव भारताने नाकारला

काश्मीर प्रश्नाच्या बाबतीत भारत आणि पाकिस्तानने “लष्करी कारवाया आणि विरोधी वक्तव्ये” या दोन्ही गोष्टी कमी करून जास्तीत जास्त संयम बाळगण्याची गरज आहे असे गुटेरेस म्हणाले.

नवी दिल्ली:संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँतोनिओ गुटेरेस यांच्या काश्मीरप्रश्नी मध्यस्थीच्या प्रस्तावाला रविवारी भारताने साफ नकार दिला आणि पाकिस्तानने “बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीने” व्यापलेला प्रदेश त्यांना सोडायला लावणे हा खरा प्रश्न असल्याचे म्हटले.

काश्मीरमधील परिस्थितीबद्दल आपल्याला चिंता वाटते आणि हा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न सोडवण्यासाठी ते भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास तयार आहेत असे इस्लामाबाद येथे बोलताना गुटेरेस म्हणाले होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने हे उत्तर दिले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. यूएनचे महासचिव पाकिस्तानला भारताच्या विरोधातील सीमेपलिकडचा दहशतवाद थांबवण्यासाठी विश्वसनीय पावले उचलायला सांगतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

“भारताची भूमिका बदललेली नाही. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. पाकिस्तानने “बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीने” व्यापलेला प्रदेश त्यांना सोडायला लावणे हा खरा प्रश्न असून त्याला संबोधित करण्याची गरज आहे,” असे कुमार म्हणाले.

“त्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर त्यावर द्विपक्षीय चर्चा होईल. कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीची यामध्ये गरज नाही,” असे ते म्हणाले.

गुटेरेस हे सध्या चार दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत.

मूळ लेख

COMMENTS