शंकराच्या पिंडीवर बसलेला विंचू

शंकराच्या पिंडीवर बसलेला विंचू

धर्माधारित राजकारण हे नागरिकांचे कल्याण, आर्थिक समानता, सामाजिक न्याय, स्त्रीपुरुष समानता अशा राजकीय ध्येयांना दुय्यम स्थानावर लोटते. या प्रक्रियेत प्रत्येक समाजगटातील उच्चवर्गीयांच्या वर्चस्ववादाला बळकटी मिळते. त्यांना केवळ होयबांच्या शिस्तबद्ध कवायती हव्या असतात. त्यामुळे स्वतःचे मत व्यक्त करणारी, स्वेच्छेने वागणारी व्यक्ती याऐवजी नागरिकांचे अस्तित्व केवळ 'अनुयायी' एवढेच राहते.

जनमताची भाषा (लेखमालेतील भाग १)
मुख्यमंत्र्यांसह ९ मंत्र्यांनी थकवले पाणी बिल
उ. प्रदेशात काँग्रेस ४० टक्के तिकिटे महिलांना देणार

मंदिराचा थंडगार शांत, गाभारा असावा, आत शंकराची देखणी पिंड असावी पण त्या पिंडीवर विंचू बसलेला असावा! अशा वेळेस त्याला तिथून काढावे तर लागते आणि अन्य कुठल्या साधनांनी मारावे म्हटले तरी पंचाईत असते. अशी गत धार्मिकता आणि धर्मांधता यांच्यात फरक करताना होते.

आपला देश धार्मिकांचा आहे. इथले हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन रोजची पूजा/प्रार्थना करतात. उपासतापास, ग्रंथवाचन, व्रतवैकल्ये हे सगळ्याच धर्मीयांचे चालू असते. मात्र, ही सगळी धार्मिक माणसे कट्टर किंवा धर्मांध असतात असे नाही. ही माणसे आपण बरे आणि आपले जगणे बरे या प्रकारे जगत असतात. ते दुसर्‍याला अकारण त्रास देत नाहीत, आणि केवळ कुणी अन्य धर्माचे किंवा जातीचे आहेत, म्हणून त्यांचे वाईट व्हावे असे यांना मुळीच वाटत नसते. स्वतःच्या धर्माचे गुणगान येता-जाता करावेसे त्यांना वाटत नाही. आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ असा त्यांचा कधीही दावा नसतो. अन्य धर्म आणि धर्मीय यांच्याप्रती या धार्मिकांच्या मनात  तुच्छताभावही नसतो.

खरे म्हणजे, भारत पूर्वापार असाच होता.

सातव्या शतकात मुहम्मद बिन कासिम सिंधमध्ये आला आणि त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. परंतु वेगळ्या धर्माचा माणूस इथे आला आहे आणि त्याने तिथल्या राजाला पदच्युत करून स्वतःचे राज्य स्थापन केले आहे, अशी गंधवार्ताही अन्य संस्थानांतील राजांना नव्हती. मुळात त्या काळात ‘एक देश’  ही जाणीवच नव्हती. कारण कुणाचाच एकछत्री अंमल नव्हता. आधुनिक भारतीय राष्ट्रवादाचा जन्म ब्रिटिश काळात ‘इंडिया’ म्हणून झाला.

भारतात अनेक छोटीमोठी राज्ये होती. म्हणजे, अगदी इंग्रज सोडून गेले तेव्हा तर या छोट्या मोठ्या संस्थांनांची संख्या ५६५ होती. मुळात युरोपिय लोकांनी संपूर्ण भारतीय उपखंडाला ‘इंडिया’ अशी ओळख दिली. आपण जेव्हा म्हणतो की, आम्ही कधी कुणावर आक्रमण केले नाही, परकीयांनीच आमच्यावर आक्रमण केले. तेव्हा आपल्या मनात १९४७ नंतरचा भारत असतो. परंतु त्याआधी या विशाल भूप्रदेशातले वेगवेगळे राजे एकमेकांशी लढत होते, एकमेकांवर आक्रमण करत होते आणि शत्रूकडील मौल्यवान वस्तू लुटून आणत होते.

ब्रिटिशांनी नामाभिधान केलेल्या ‘इंडिया’च्या सगळ्या भूभागाचा नकाशा आणि सर्वेक्षण इंग्रजांनी १७५७ साली प्लासीची लढाई जिंकल्यावर, बंगाल त्यांच्या हाती आल्यानंतर केले. कारण त्यांना इथल्या लोकांकडून करवसुली करायची होती, तसेच इथे अंमल बसवण्यासाठी लष्करी हालचाली करायच्या होत्या. मेजर जेम्स रेनेल या बंगालच्या पहिल्या सर्व्हेयर जनरलनी (१७६७-१७७७) भारताचे पहिले सर्वेक्षण आणि पहिला नकाशा बनवला. बंगालनंतर एतद्देशीय राजांच्या लढायांमध्ये इंग्रजही त्यातल्या एकाची बाजू घेऊ लागले.

१७८९ मध्ये टिपू सुलतानशी झालेल्या युद्धात इंग्रजांचे मित्र सैन्य म्हणून मराठे आणि हैदराबादचा निजाम लढले होते. परंतु हळूहळू सगळा देश ब्रिटिशांच्या ताब्यात आला आणि संस्थानिक मंडळी ब्रिटिशांचे मांडलिक म्हणून वावरू लागली. त्यानंतर ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या १८५७ च्या सशस्त्र उठावात हिंदू-मुस्लिम एकत्रितपणे लढले. अर्थात या लढ्यात एतद्देशीय जिंकले नसले, तरी ब्रिटिशांच्या एक गोष्ट चांगली लक्षात आली की, या देशातील संपत्ती आपल्या देशात लुटून न्यायची असेल, तर इथले राज्य बळकट केले पाहिजे आणि त्यासाठी इथल्या लोकांमध्ये दुही पेरली पाहिजे. तोवर भारतात आलेले परकीय (म्हणजे हुण, कुशाण, अरब/ मध्य आशियाई मुस्लिम ) हे या देशाला मायभूमी समजून इथेच राहिले होते. त्यांनी मूळ देशाशी संबंध तोडून इथली संपत्ती याच देशात ठेवली होती. ते आपल्या मूळ देशात ती संपत्ती पाठवत नव्हते. ब्रिटिश आणि त्यांच्या आधीचे परकीय यांच्यात हा मोठा फरक होता.

ब्रिटिशांनी आपली सत्ता बळकट करण्याच्या हेतूने १८५७ नंतर धार्मिक कट्टरतावादाचं राजकीय तत्वज्ञान केलं. सर्वप्रथम, त्यांनी १८८१ मध्ये इथल्या  लोकांची जनगणना केली. त्यात धर्माचा रकाना टाकला. लोकांना स्वतःचा धर्म नोंदवायला लावला. अशा प्रकारे,  धार्मिक/जातीय ओळख आणि एकमेकांशी स्पर्धा करणारा धार्मिक कट्टरतावाद यांची रुजवात करून ब्रिटिशांनी त्याला खतपाणी घातलं. भारतीय उपखंडाचा प्रदेश धार्मिक तर सदैव होताच. परंतु आपल्या धर्माची जाणीव, स्वतःची धार्मिक ओळख या सगळ्या आधुनिक जाणिवा आहेत. त्या १८८१ नंतर इंग्रजांच्या सक्रिय उत्तेजनामुळे तयार झालेल्या आहेत. ब्रिटिशांची पकड या देशावर बसण्यापूर्वी येथील समाजगटांमधील फरक अस्पष्ट होते. लोकांच्या धार्मिक निष्ठा आणि त्यासोबत जात, प्रदेश, भाषा, विविध देवांची पूजा, व्यवसायाचे स्वरूप आणि त्याच्या मागण्या अशा बर्‍याच घटकांच्या आधाराने समाजगट बनले होते.

‘हिंदू’ या शब्दाला भौगोलिक ध्वन्यर्थ होता. म्हणजे सिंधू नदीच्या दक्षिण आणि पूर्व बाजूला राहाणारे ते सगळे हिंदू असा त्या शब्दाचा अर्थ होता. या अंधुक सीमारेषायुक्त समाजाच्या विविध गटांच्या निष्ठाही सामायिक होत्या. म्हणूनच तर सतराव्या शतकात  शिवाजी महाराजांचे वडील शाहू महाराज कधी आदिलशाहीत तर कधी कुतुबशाहीत नोकरी करायला जात होते. आणि औरंगजेब दक्षिणेत मराठ्यांवर चालून आला तेव्हा त्याच्या सैन्यातले ८५ टक्के सैनिक हिंदू होते. शिवाजी महाराजांकडेही इब्राहिम गारदी नोकरीला होता. धार्मिक ओळख त्या काळात महत्त्वाची नव्हतीच. परंतु ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अनेक समाजगटांची वेगवेगळी नोंद निर्माण केली. त्यामुळे त्यांना धर्माच्या आधारावर माणसांना झुंजवणे सोपे गेले.

याबरोबरच इंग्रजांना नको असलेले काही परिणामही घडत होते.  इथला राज्यशकट हाकण्यासाठी ब्रिटिशांनीच भारतात स्थापन केलेल्या शाळांत आणि आधुनिक विद्यापीठांत इथले लोक शिकू लागले. तर काहींनी खुद्द ब्रिटनमध्ये जाऊनच शिक्षण घेतले. बाहेरचे जग पाहिलेले हे लोक इंग्रजांच्या गुलामीविरुद्ध जागृत झाले आणि त्यांनी भारताच्या विविधतेतील समान धागा ओळखून ठरवले की सर्व भारतीय एकच आहेत;  मग त्यांचा धर्म, जात, लिंग, प्रदेश, भाषा आणि अन्य व्यक्तिगत ओळख काहीही असो! हा दृष्टिकोन स्वीकारल्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीने भारतीय प्रदेशात राहाणार्‍या सर्व लोकांना आश्वस्त केले की, ही चळवळ सर्वसमावेशक असणार आहे. आणि सर्वांना समान नागरिकत्व आणि सर्व नागरी स्वातंत्र्ये, आणि समान प्रतिष्ठा मिळणार आहे. सर्वांना बंधुतेने एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध उभी राहाणारी स्वातंत्र्य चळवळ मोडून काढण्यासाठीच ब्रिटिशांनी वेगवेगळ्या धर्मांतील कट्टरतावाद्यांना फूस दिली आणि भडकावले. धर्मांध संघर्षांना पडद्याआडून साथ देत त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीस दुर्बल करण्याचे काम केले.

आपल्याला हे माहीत आहे की, उपद्रवी लोक समाजात नेहमीच तुलनेने कमी असतात. परंतु जेव्हा त्यांना सत्तेची साथ मिळते तेव्हा त्यांचे उपद्रवमूल्य खूप वाढते. स्वातंत्र्य चळवळीस दुर्बल करण्यासाठी ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम अलगतेस बळ मिळेल, कारभारात अधिक वाटा मिळण्यासाठी या देशातील हिंदु-मुसलमान एकमेकांशी स्पर्धा करतील, अशी धोरणे आखली. म्हणजे भारतीय राष्ट्रवादी चळवळीच्या इच्छेनुसार हा संघर्ष इंग्रजांशी होऊ नये तर तो भारतीयांचाच एकमेकांशी व्हावा.

खान अब्दुल गफार खान यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, काँग्रेसच्या चळवळीत खोडा घालण्यासाठीच ब्रिटिशांनी कट्टर मुस्लिमांना हाताशी धरून मुस्लिम लीगची निर्मिती केली. सरहद्द प्रांतातला इंग्रजांचा जुलुम सहन न झाल्यामुळे खानसाहेब मुस्लिम लीगची मदत मागायला गेले तेव्हा लीगच्या नेत्यांनी त्यांना सरळच सांगितलं की इंग्रजांविरुद्ध लढायला आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. सरतेशवटी खान अब्दुल गफार खान यांनी इंग्रजांशी लढणार्‍या कॉंग्रेसशी युती केली. हा इतिहास आहे. हे हिंदू आणि मुस्लिम कट्टर नेते एकमेकांशी वैर ठेवून असले तरी व्यक्तिशः ब्रिटिशांना पाठिंबा देणारे असतील, अशी चोख व्यवस्थाच ब्रिटिशांनी १९०५ची बंगालची फाळणी, स्वतंत्र मतदारसंघ, १९३२चे कम्युनल अवॉर्ड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट, १९३५ या सगळ्या खेळ्या अत्यंत धूर्तपणे खेळून केली होती. कारण त्यांना भारतीय राष्ट्रवादी चळवळीस दुर्बल बनवायचे होते आणि जातीयवादी धार्मिक नेत्यांना जोपासायचे होते.

संपूर्ण देश इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात गांधींच्या नेतृत्वाखाली एकत्र येत असताना धार्मिक कट्टर राष्ट्रवाद्यांनी मात्र दोन समाजांतील शत्रुत्व तापवण्यासाठी भावनिक मुद्द्यांना भरपूर चेतवले. प्रतिस्पर्धी धर्माचे ‘सगळे लोक असेच असतात’ असे म्हणून सरसकटीकरण केले. एकमेकांच्या पवित्र प्रतिकांवर आणि श्रद्धांवर हल्ले केले. त्यांच्या मनात ‘दुसर्‍या’ धर्माच्या समाजाविषयी भीती रुजवली, आणि अशा प्रकारे  स्वातंत्र्य चळवळीवर धार्मिक हिंसेचे व्रण उठवले.

एखादा माणूस धार्मिक असेल पण म्हणून तो कट्टरही असेल असे नसते हे जसे खरे आहे तसेच याच्या उलटही.  म्हणजे, एखादा माणूस कट्टर असतो पण धार्मिक नसतो हेही खरेच असते. धार्मिक कट्टरतावादाचा खर्‍याखुर्‍या धर्माशी काही संबंध नसतो. उलट,  ही एक राजकीय विचारसरणी असून धार्मिक चालीरीतींचे पालन आणि कर्मकांड याच्या पलीकडे जाऊन ती त्या त्या धार्मिक गटांना चिरेबंद करण्याचा प्रयत्न करते, ज्या योगे त्या नेत्यांचे स्वतःचे सत्तामार्ग मोकळे होतील. धार्मिक कट्टरतावादी राजकारण केवळ आपल्याच धर्माचे हितसंबंध सगळीकडे जपले जावेत, सार्वजनिक स्थळांवर आपल्या समाजगटाचा आणि आपल्याच सार्वजनिक कार्यक्रमांचा (मिरवणुका, सण, धार्मिक प्रथांचे पालन इ.) ताबा असावा असा आग्रह धरते.

धार्मिक दंगे आपोआप होत नाहीत. रचले-घडवले जातात आणि ते घडवून आणणार्‍या लोकांचे निवडणुका जिंकण्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे हेतू त्यामागे असतात. त्यासाठीच धार्मिक जाणिवेचे संगोपन केले जाते. इतरांना दूर लोटणार्‍या  धार्मिक ओळखी अधिक प्रखर बनवल्या जातात. धार्मिक कट्टरतावाद फोफावण्यासाठी द्वेषयुक्त मोहिमा, दंगे, अन्य समाजांच्या लोकांवर शारीरिक हल्ले, त्यांची मालमत्ता-घरे- उपजीविका-संस्था यांची नासधूस करणे या शस्त्रास्त्रांचा आधार लागतो. दुसर्‍या गटाचे लोक आपले उपजीविकेचे स्त्रोत काढून घेतील, त्यांची लोकसंख्या आपल्याहून जास्त होईल अशी भीती घातली जाते. किंवा मग त्या संपूर्ण समाजाचे लोक  हिंसक आहेत, दहशतवादी, नालायक, मागास, असंस्कृत, देशद्रोही आहेत इ. कलंक लावून सरसकटीकरण केले जाते.

विद्वेषी वृत्तीस उत्तेजन दिल्याने अन्य धर्मांबद्दल अनुदारता निर्माण होते. त्यामुळे जे नागरिक पूर्वी शांततापूर्ण सहजीवन जगत असतात, प्रादेशिक प्रथा, संस्कृती, परंपरा यांचे  मिश्र वस्तीच्या मोहल्ल्यांत आचरण करत असतात त्यांची धर्मांध-कट्टरतावादी धर्तीवर ‘घेट्टो’मध्ये (स्वतंत्र वस्त्यांमध्ये) पुनर्रचना होऊ लागते. मग नागरिकांना आपला समाजगट हा अन्य धार्मिक गटांपेक्षा मुळापासूनच वेगळा आहे असे भासू लागते. खरे तर उदारमतवादी दृष्टिकोन सांगतो की इथले सर्व लोक या देशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीच्या रंगीत माळेतले मणी आहेत. त्यांना आपापला धर्म पाळण्याचा आणि संस्कृती अनुसरण्याचा  पर्याय मोकळा आहे. तसे करताना त्यांच्या राजकीय अथवा अन्य कुठल्याही हितसंबंधांवर गदा येत नाही. परंतु या उदारमतवादी दृष्टिकोनासच धर्मांध कट्टरतावादाचा विरोध असतो.

धार्मिक कट्टरतावादी विचारसरणी – मग ती कुठल्याही रंगाची असो – लोकशाही तत्वाच्या विरुद्धच असते कारण ती सर्व नागरिकांना समान लेखत नाही. चांगली धोरणे आणि चांगला कारभार यांच्या आधारावर उभ्या असलेल्या राजकीय बहुसंख्याकत्वाला ती पाठिंबा देत नाही. ती स्वतःचे धर्मांध रूप दिसू नये म्हणून राष्ट्रवादाचा बुरखा पांघरून येत असली तरी तिला नागरिकांच्या ऐहिक जीवनातील सुख-समाधानाशी, त्यांच्या प्रगतीशी काहीएक देणे-घेणे नसते. म्हणूनच तर इराक, सीरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान असे धर्माधारित देश मागास  राहिले आहेत आणि धर्म या गोष्टीस वैयक्तिक स्तरावर ठेवणारे लोकशाही देश प्रगत झाले आहेत.

आज जे सरकार आपल्या देशावर राज्य करते आहे त्याच्या मातृसंस्थेने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कधीच भाग घेतला नव्हता. उलट तेव्हा ते ब्रिटिशांच्या बाजूने होते. हिंदू-मुस्लिम दोन्हीकडील कट्टरतावाद्यांना हाताशी धरून देशाची धार्मिक आधारावर फाळणी ब्रिटिशांनी केली आणि तरीही हेच लोक महात्मा गांधी- नेहरू- पटेलांवर फाळणी केली म्हणून आगपाखड करत असतात, हे विशेष!

धर्माधारित राजकारण हे नागरिकांचे कल्याण, आर्थिक समानता, सामाजिक न्याय, स्त्रीपुरुष समानता अशा राजकीय ध्येयांना दुय्यम स्थानावर लोटते. या प्रक्रियेत प्रत्येक समाजगटातील उच्चवर्गीयांच्या वर्चस्ववादाला बळकटी मिळते. त्यांना केवळ होयबांच्या शिस्तबद्ध कवायती हव्या असतात. त्यामुळे स्वतःचे मत व्यक्त करणारी, स्वेच्छेने वागणारी व्यक्ती याऐवजी नागरिकांचे अस्तित्व केवळ ‘अनुयायी’ एवढेच राहते. सत्तेतील वर्चस्ववादी लोक हातातली सत्तायंत्रणा वापरून, कठोर कायदे करतात, न्यायव्यवस्थेच्या बाहेरच परस्पर हत्या आणि शिक्षा करून विरोधात उठणारे आवाज दाबतात. तसे करण्यासाठी ते कसलीही जबाबदारी न घेणार्‍या संघटना आणि अचानक हल्लाबोल करणारे खास गट यांचा वापर करतात.

स्वातंत्र्य चळवळीत दिलेले वचन पूर्ण करून तेव्हाच्या सरकारने या देशात लोकशाही आणली, कुठलाही भेदभाव न बाळगणारी राज्यघटना दिली. म्हणूनच धर्मवादी पक्षांना महात्मा गांधींचा राग आहे,  नेहरूंचा द्वेष वाटतो. आजच्या सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात ‘सबका साथ, सबका विकास’ असे वचन दिले होते. पेट्रोल ३५ रुपये करू, परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाला पंधरा लाख देऊ, दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ अशी काय काय वचने दिली होती. त्यातली काहीच पुरी झालेली नाहीत. ठराविकच लोकांचा विकास खूप झाला हे आपल्याला दिसून येतेच आहे. मात्र ते राममंदिराचे वचन नक्कीच पूर्ण करतील कारण ते त्यांच्या राजकीय अजेंड्यासाठी महत्त्वाचे आहे.

या पार्श्वभूमीवर आपण भारतीयांनी धार्मिकता आणि धर्मांधता यातला फरक ओळखला पाहिजे आणि शंकराच्या पिंडीवरल्या विंचवाला दूर केले पाहिजे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0