ट्रम्प यांच्या भेटीआधी संरक्षणविषयक करार पूर्ण करण्याचा प्रयत्न

ट्रम्प यांच्या भेटीआधी संरक्षणविषयक करार पूर्ण करण्याचा प्रयत्न

अमेरिकेने भारताला इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टिमची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे, जिची अंदाजे किंमत १.९ अब्ज डॉलर आहे.

आता ‘व्हीआरडीई’ महाराष्ट्रातून हलवणार ?
संरक्षण खात्याकडून उपकरणांच्या आयातीस बंदी
खराब संरक्षण उत्पादने – ९६० कोटींचे नुकसान

नवी दिल्ली:अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्यांदाच भारत भेटीसाठी येत आहेत. त्यांच्या भेटीपूर्वी भारतीय जलसेनासंरक्षण क्षेत्रातील लॉकहीड मार्टिन या अमेरिकन कंपनीकडून खरेदी करणार असलेल्या २.६ अब्ज डॉलर किंमतीच्या हेलिकॉप्टरच्या बॅचसहित अनेक मोठे संरक्षण करार पूर्ण करण्याचा प्रयत्न दोन्ही देश करत आहेत.

अधिकृत सूत्रांनी सांगितल्यानुसार भारत अमेरिकेकडून खरेदी करणार असलेल्या १.८६ अब्ज डॉलर किंमतीच्या क्षेपणास्त्र प्रणालीबद्दलच्या वाटाघाटीही संपवण्यासाठी बोलणी सुरू आहेत.

ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या स्वागताची तयारी भारतात सुरू असताना, अमेरिकन कंपनी बोईंगने निर्देशित केले आहे की त्यांची एफ-१५ईएक्स लढाऊ जेट भारतीय हवाई दलाला देण्यासाठीच्या प्रस्तावावर ते विचार करत आहेत.

कंपनीने अगोदरच अमेरिकन प्राधिकरणांकडून या संभाव्य निर्यातीसाठीचा परवाना मागितला आहे. आयएएफला ११४ लढाऊ जेटच्या विक्रीचा हा प्रस्ताव आहे, व त्यांची किंमत १८ अब्ज डॉलर असेल.

सरकार आणि उद्योगातील सूत्रांनी सांगितले की दोन्ही देश एक २.६ अब्ज डॉलर किंमतीचा करारही पूर्ण करण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये अमेरिका भारताला २४ मल्टी रोल एमएच-६०आर सीहॉक मेरिटाईम हेलिकॉप्टर्स पुरवेल.

मंत्रीमंडळाची सुरक्षाविषयक समितीपुढच्या काही दिवसात याला मंजुरी देण्याची शक्यता आहे.

“आम्ही लवकरात लवकर हा करार अंतिम करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे सूत्रांनी सांगितले.

अमेरिकेने सीहॉक हेलिकॉप्टरची भारताला विक्री करण्याच्या प्रस्तावाला मागच्या वर्षी एप्रिलमध्ये मंजुरी दिली. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय नौदलाच्या पृष्ठभागीय युद्धातील आणि पाणबुडीविरोधी युद्धातील क्षमतांमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे.

हे चॉपर पाणबुड्यांवर हल्ले करण्याच्या दृष्टीने आरेखित करण्यात आले आहे. हा ताफा ब्रिटिश सी किंग हेलिकॉप्टरच्या जुन्या झालेल्या ताफ्याची जागा घेईल.

ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी, अमेरिकेने भारताला इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टिमची (IADWS) विक्री करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली. याची अंदाजे किंमत १.९ अब्ज डॉलर आहे.

ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन काँग्रेसला भारताला IADWS ची विक्री करण्याबाबतच्या त्यांच्या निर्णयाबाबत कळवले. अधिकाऱ्यांच्या मते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भारत भेटीच्या दरम्यान दोन्ही बाजू कराराची निश्चिती करतील.

भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानच्या संरक्षण आणि सुरक्षा संबंध मागील सहा वर्षांत बळकट झाले आहेत. द्विपक्षीय संरक्षण व्यापाराने २०१९ मध्ये १८ अब्ज डॉलरचा पल्ला गाठला, ज्यामधून दोन्ही बाजूंमधील संरक्षण सहकार्यात वाढ झाल्याचे दिसून येते.

दोन्ही बाजू २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांच्या भेटीच्या दरम्यान संरक्षण संबंध आणखी सघन करण्याची घोषणा करू शकतात.

दोन्ही देशांमधील संरक्षण उत्पादनामधील खाजगी क्षेत्राच्या दरम्यान संयुक्त प्रकल्प आणि सहकार्यात वाढ करण्यासाठीही दोन्ही बाजू प्रयत्नशील आहेत.

जून २०१६ मध्ये, अमेरिकेने भारताला “प्रमुख संरक्षण भागीदारा”चा दर्जा दिला. भारताबरोबरचा संरक्षण व्यापार आणि तंत्रज्ञानाचे सामायिकीकरण हे त्यांच्या इतर सर्वात जवळच्या सहकारी आणि भागीदारांप्रमाणेच असतील हे यातून निर्देशित केले गेले.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: