शहीद जवानांकडे शस्त्रे नव्हतीः काही कुटुंबियांचा खुलासा

शहीद जवानांकडे शस्त्रे नव्हतीः काही कुटुंबियांचा खुलासा

नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यात गेल्या महिन्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत भारतीय सैनिकांकडे कोणतेही शस्त्र नव्हते. या भारतीय सैन

व्हॉट्सअपवरील चिनी मृत सैनिकांची नावे टाइम्स नाऊवर
एनएसजी गटात चीनची पुन्हा अडवणूक
प्रसार भारती म्हणतेय, पीटीआय देशद्रोही

नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यात गेल्या महिन्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत भारतीय सैनिकांकडे कोणतेही शस्त्र नव्हते. या भारतीय सैनिकांना एका निमुळत्या कड्यावर चीनच्या सैन्याने चोहोबाजूंनी घेरले होते अशी माहिती या परिसरात तैनात असलेल्या दोन सैनिकांनी व या घटनेत शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांकडून रॉयटर्सला मिळाली आहे.

एका भारतीय सैनिकाचा लोखंडी खिळे असलेल्या काठीने गळा चिरण्यात आला, असे या सैनिकाच्या वडिलांनी रॉयटर्सला सांगितले. काही भारतीय सैनिक अत्यंत शीत अशा गलवान नदीच्या पाण्यात पडले व तेथे त्यांचा मृत्यू झाला, असे एका शहीद सैनिकाच्या नातेवाईकांनी सांगितले.

या हाणामारीत २० भारतीय जवानांचा मृत्यू झाला तर हे सर्व सैनिक १६ बिहार रेजिमेंटचे होते.

रॉयटर्सने १३ शहीद जवानांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि त्यातील ५ सैनिकांच्या मृत्यूचे निदान कशामुळे झाले यासाठी त्यांनी मृत्यूचा दाखला मागितला.

नंतर रॉयटर्सने शहीद सैनिकांचे मृतदेह ठेवलेल्या लडाखमधील लष्करी रुग्णालयाशी संपर्क साधला. पण रुग्णालय प्रशासनाने सैनिकांचा मृत्यू कशाने झाला हे सांगण्यास नकार दिला. शहीद जवानांच्या मृत्यूचा दाखला त्यांच्या शवासह त्यांच्या कुटुंबियांना पाठवल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

रॉयटर्सने या हाणामारीत प्रत्यक्ष सामील नसलेले पण ही घटना अनुभवलेल्या दोन सैनिकांशी संपर्क साधला. या सैनिकांनी लष्करी नियमानुसार आपली नावे गुप्त ठेवली तसेच त्यांच्या कुटुंबियांनीही नावे सांगण्यास नकार दिला.

रॉयटर्सने भारतीय संरक्षण मंत्रालयाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला पण या खात्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यानंतर रॉयटर्सने चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला. अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर अखेरीस चीनच्या प्रवक्त्याने गलवान खोर्यातील तणावाला भारत जबाबदार असल्याची प्रतिक्रिया दिली.

‘जेव्हा चीनचे अधिकार व सैनिक भारतीय सैन्याशी वाटाघाटी करत होते, तेव्हा अचानकपणे भारतीय सैनिकांनी संतप्त होऊन आमच्यावर हल्ले केले. या घटनेतील सत्य व असत्य अगदीच स्पष्ट आहे. चीनवर या संदर्भात कोणतीही जबाबदारी येत नाही’, असे चीनच्या प्रवक्त्याने सांगितले.

चीननेही भारतीय आक्रमणाचा पुरावा दिलेला नाही. त्याचबरोबर चीनच्या संरक्षण खात्यानेही रॉयटर्सला प्रतिक्रिया दिलेली नाही.

गळे आवळून ठार मारले

रॉयटर्सला मिळालेल्या माहितीनुसार तीन भारतीय सैनिकांच्या गळ्यानजीकच्या रक्तवाहिन्यांवर प्रचंड दाब देऊन त्यांना ठार मारले गेले. तर दोन जवानांच्या डोक्यात अणुकुचीदार शस्त्राने हल्ला करून त्यांना मारण्यात आले. या सर्व जवानांच्या गळ्यावर व कपाळावर मारहाण केल्याच्या निशाण्याही सापडल्याचे या पाच जवानांच्या मृत्यूच्या दाखल्यावरून रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

चिनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारीत शस्त्र नसल्याने हातात येईल त्या वस्तूने रॉड, दांडके प्रसंगी हातही वापरून भारतीय सैनिकांनी प्रतिकार केला असे एका सरकारी प्रवक्त्याने दिल्लीत सांगितले.

चीनने कोणतेही कारण न देता आमच्यावर हल्ला केला असे भारताचे म्हणणे आहे पण त्या संदर्भात सर्व माहिती सरकारने जाहीर केलेली नाही.

चीनचे ४० सैनिक मारल्याचा दावा भारतीय मंत्र्याकडून झाला होता पण हा दावा चीनने फेटाळला. चीन दुतावासाच्या वेबसाइटवरही अशीच माहिती देण्यात आली आहे. भारतीय सैनिकांनी अचानकपणे हल्ला केला त्यातून हाणामारी झाली व दोन्ही बाजूचेही नुकसान झाल्याचे सन वाइडोंग यांचे म्हणणे आहे.

भारत सरकारच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला सांगितले की, गलवान खोर्यातील वादग्रस्त भागात चीनच्या सैनिकांनी केलेले बांधकाम पाडले आहे की नाही, हे पाहण्यासाठी बिहार रेजिमेंटच्या कमांडिंग ऑफिसरनी पॅट्रोल पॉइंट १४ वर गस्त केली असता भारतीय सैनिकांवर चीनच्या सैनिकांनी अचानकपणे हल्ला केला. यावेळी चीनच्या सैनिकांच्या हातात लोखंडी रॉड होते व खिळे असलेल्या लाकडी काठ्या होत्या. त्यांच्या साहाय्याने हल्ले सुरू झाले.

नदीत मृतदेह आढळले

गलवानची घटना घडल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निःशस्त्र भारतीय जवानांना ठार मारण्याचे धाडस चीनने केलेच कसे असा सवाल उपस्थित करत आपल्या जवानांना विनाशस्त्र शहीद होण्यासाठी का पाठवण्यात आले असा सवाल केला होता. त्यांनी सरकारने या संदर्भात खुलासा करावा अशीही मागणी केली होती.

या घटनेत शहीद झालेले बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू यांच्यासोबत असलेल्या एका सैनिकाच्या कुटुंबियांनी सांगितले की, भारतीय सैनिकांकडे गस्त घालताना शस्त्र नव्हते. एका तंबूवरून वाद निर्माण होऊन आपल्या सैनिकांचा सामना चीनच्या एका सैनिक गटाशी झाला.

पण या संदर्भात रॉयटर्स अधिक विस्तृत माहिती देऊ शकलेला नाही. पण भारत सरकारच्या प्रवत्याने सांगितले की भारताच्या हद्दीत असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनने बांधलेले तंबू व टेहळणी बुरुज भारताने जमीनदोस्त केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर चीनचे सैनिक जमा झाले आणि त्यांनी भारतीय सैनिकांवर जबर दगडफेक करण्यास सुरूवात केली व नंतर धारदार शस्त्रास्त्रांनी हल्ला केला.

या अचानक झालेल्या हल्लानंतर भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. पण त्यांना आपले कमांडिंग ऑफिसर दिसले नाहीत. नंतर काही काळानंतर पुन्हा चीनचे सैनिक जमा झाले आणि त्यांनी हल्ला करण्यास सुरूवात केली असे चार जवानांच्या कुटुंबियांनी सांगितले.

भारताच्या सैनिकांची संख्या चीनच्या तुलनेत कमी होती. त्यामुळे हल्ला सुरू झाल्यानंतर रेडिओ मेसेजद्वारे अधिक कुमक पाठवण्यासाठी लडाखच्या हेडक्वॉटर्सशी संपर्क साधण्यात आला.

या तीन भारतीय कुटुंबियांनी सांगितले की, गलवान नदीच्या पात्रात काही भारतीय सैनिकांना ढकलण्यात आले व तेथेही मारामारी सुरू होती.

भारत सरकारनेही गलवान नदीच्या पात्रात काही सैनिकांचे मृतदेह आढळून आले होते व त्यांचे मृतदेह दुसर्या दिवशी सकाळी ताब्यात घेण्यात आल्याची कबुली दिली. काही जवानांचा मृत्यू हायपोथर्मियाने झाल्याचेही सरकारने सांगितले.

रॉयटर्स

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0