‘पूर्व युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी कठीण परिस्थितीत’

‘पूर्व युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी कठीण परिस्थितीत’

मुंबई : रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनच्या पश्चिम भागात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी देशात परतल्यानंतर आपले अनुभव सांगितले आणि पूर्व युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मदतीची याचना केली.

रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून युक्रेनमध्ये अडकलेल्या १८२ भारतीयांना घेऊन एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान मंगळवारी सकाळी मुंबईत पोहोचले.

त्यापैकी एक, निशी मलकानी हिने मुंबई विमानतळावर पत्रकारांना सांगितले, की ती पश्चिम युक्रेनमधील एका विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे, जिथे परिस्थिती तुलनेने चांगली आहे.

तीने सांगितले, “आम्ही अनेक दिवस आमच्या हॉस्टेलमध्ये लपून बसलो आणि मग पश्चिम सीमेवर पोहोचलो. युक्रेनच्या पूर्वेकडील भागातील शैक्षणिक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना रस्त्यावरून बाहेर पडणे अत्यंत कठीण असल्याने भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.”

“त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत,” असे ती म्हणाली.

युक्रेनमधील गेल्या काही दिवसांच्या अनुभवाबाबत विचारले असता ती म्हणाली, “आयुष्यात अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे मला वाटले नव्हते. विद्यापीठ प्रशासनाने आम्हाला चार दिवस वसतिगृहात राहण्यास सांगितले होते.”

मलकानी म्हणाली, “आम्ही पश्चिम सीमेजवळ होतो, त्यामुळे शेजारील देश रोमानियापर्यंत पोहोचू शकलो. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी बाकीचे काम केले आणि आम्ही घरी परतू शकलो.

तिने दावा केला की गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विद्यापीठाच्या परिसरात ‘काही दहशतवादी’ होते, परंतु त्यांनी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान केले नाही.

मंगळवारी युक्रेनहून परतलेल्या पूर्वा पाटील या विद्यार्थिनीने सुखरूप परतल्यानंतर देवाचे आभार मानले.

तिने सांगितले, की ती पश्चिम युक्रेनमधील एका संस्थेत शिकत होती. ती म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते, देवाच्या दयेमुळे मी सुखरूप घरी परतू शकले. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.”

तिने सांगितले की भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षित परत येण्यासाठी खूप मदत केली.

पाटील म्हणाली, “प्रथम आम्हाला वसतिगृहात राहण्यास सांगितले आणि नंतर आम्ही बंकरमध्ये आश्रय घेतला. तिथे बऱ्यापैकी थंडी होती, तापमान दोन अंश सेल्सिअसच्या आसपास होते. रोमानियन सीमेवर जाण्यासाठी आम्हाला सुमारे १० किमी चालावे लागले.

मुंबई विमानतळावर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, “आज १८२ विद्यार्थी मुंबईत परतले आहेत. केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत चालवलेले हे पाचवे उड्डाण होते.”

युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर, भारत २७ फेब्रुवारीपासून युद्धग्रस्त देशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना रोमानिया आणि हंगेरीमार्गे घरी आणत आहे. रोमानिया आणि हंगेरी हे युक्रेनचे शेजारी देश आहेत.

COMMENTS