पॉलिस्टरचे तिरंगे खिडक्यांवर फडकवून, देशभरात साजरा होत असताना, यातील नेहरूंचा अनुल्लेख ठळक जाणवत आहे. सर्व अधिकृत पत्रकांतून नेहरूंची नाव व प्रतिमा तर नाहीशी झालीच आहे.
१४ ऑगस्ट, १९४७ रोजी मध्यरात्री भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत जे भाषण दिले, ते इतिहासात कोरले गेले आहे. आजही ते वाचणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे करण्याचे सामर्थ्य त्या भाषणात आहे. “खूप पूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता आणि आता आपले वचन अगदी पूर्णपणे नव्हे, तरी लक्षणीय पद्धतीने, पूर्ण करण्याची वेळ आली आहे. मध्यरात्रीच्या ठोक्याला अवघे जग निद्राधीन असताना, भारत आणि त्याचे स्वातंत्र्य जिवंत होत आहे,” असे ते म्हणाले.
पंच्याहत्तर वर्षानंतर हा क्षण सरकारने अनिवार्य केलेल्या पद्धतीने, पॉलिस्टरचे तिरंगे खिडक्यांवर फडकवून, देशभरात साजरा होत असताना, यातील नेहरूंचा अनुल्लेख ठळक जाणवत आहे. सर्व अधिकृत पत्रकांतून नेहरूंची नाव व प्रतिमा तर नाहीशी झालीच आहे, एवढेच नाही तर त्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची कार्यालयेही प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) अंशत: सील केली आहेत.
एखादी व्यक्ती किती बिनमहत्त्वाची होती हे अधोरेखित करण्यासाठीच त्यांच्या वंशजांची ईडीतर्फे तासनतास चौकशी केली जात आहे, त्यांच्या नातवंडांना निदर्शने करताना ताब्यात घेतले जात आहे आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांची एक भलीमोठी तुकडी तैनात आहे.
नेहरू-गांधी आता महत्त्वाचे उरलेले नाहीत आणि त्यात जवाहरलाल नेहरूंना तर कोणीच विचारत नाही असे विधान नरेंद्र मोदी सरकारला यातून करायचे असेल, तर संघींच्या दृष्टीने तरी ते यात यशस्वी झाले आहे. नॅशनल हेराल्ड सील होणे आणि राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना दट्ट्या दाखवणे या कृती विकृत संघी इच्छांची पूर्तता करणाऱ्या आहेत. संघाच्या दंतकथा नेहरूंपासून सुरू होतात आणि ठामपणे ठसवल्या जातात, मग इतिहास काहीही असो. आणि त्यांच्यावर हल्ला चढवण्यासाठी मोदी सरकारच्या ईडी नावाच्या ब्रह्मास्त्राहून अधिक प्रभावी काय असू शकते! सरकार आणि भाजपाच्या शत्रूंना नामोहरम करण्यासाठी या अन्वेषणात्मक यंत्रणेचा वापर बेछूट सुरू आहे. महाराष्ट्रात संजय राऊत, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अशा विरोधकांवर ईडीचा बडगा उगारण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर गांधी कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले आहे. सीबीआय पिंजऱ्यातील पोपट असेल, पण ईडी, निदान सध्या तरी मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे आणि ते सरकारला अडचणीत आणणाऱ्यांवर वारंवार सोडले जात आहे.
‘स्मारक घोटाळा’ उघड करून तीन वर्षांपूर्वी ईडीने मायावती यांना शांत केले पण गांधींना शांत करणे तेवढे सोपे नाही याचा अनुभव मोदी सरकारला येत आहे. पोलिसांनी प्रियंका गांधी यांना घेराव घातलेला असतानाही त्या ‘जब जब मोदी डरता है, पुलीस को आगे करता है’ असे म्हणत होत्या. हे पुरेसे टोचणारे आहे. आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कोणत्याही कार्यक्रमाला गांधी कुटुंबियांना आमंत्रित केले जाणार नाही हे स्पष्ट आहे.
यादरम्यान, स्वातंत्र्यदिन दोन वेगवेगळ्या विषयवस्तूंपुरता मर्यादित करून ठेवण्यात आला आहे: एक म्हणजे पंतप्रधान आणि त्यांच्या साध्या पण लोकमान्यता मिळवलेल्या यशांची स्तुती करणे आणि दुसरा म्हणजे अक्षरश: झेंडे फडकावणे.
प्रत्येकाच्या घरावर झेंडा फडकला पाहिजे असे उपदेश केला जात आहे, जेणेकरून संपूर्ण राष्ट्र एक आहे हे कळावे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्यांना डीपी (डिसप्ले पिक्चर) म्हणून राष्ट्रध्वज लावण्यास सांगितले जात आहे. हा विशिष्ट डिजिटल डीपी किंवा अगदी मोदी यांची प्रेरणादायी वचनेही वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकतात. हे करण्यासाठी लोकेशन, संपर्क तपशील असे अनेक वैयक्तिक तपशील मागितले जात आहेत. इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनच्या अडव्होकसी ऑर्गनायझेशनने दिलेल्या इशाऱ्यानुसार हे गंभीर आहे.
अर्थातच #AzaadikaAmritMahotsav आणि आपली स्वत:ची देशभक्ती यांसाठी वैयक्तिक तपशील आणखी एका सरकारी यंत्रणेला देण्यात गैर काय असे आपल्याला वाटू शकते. याला विरोध करण्याची वेळ यापूर्वीच निघून गेली आहे.
अर्थात तरीही यात काही विसंगती आहेतच. मोदी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेने स्वातंत्र्ययुद्धात भागच घेतलेला नाही आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे अगदी अलीकडील काळापर्यंत त्यांनी तिरंग्याला मान्यताही दिली नव्हती. तिरंगा ध्वज उत्साहाने फडकवण्याचे आवाहन मोदी नागरिकांना करत आहेत, तर संघाने ५२ वर्षे तो का फडकावला नाही? संघाच्या दिग्गजांचा तीन रंगांवरच आक्षेप होता, कारण, यातून देशातील वैविध्याचे प्रतिनिधित्व केले जाते. संघाच्या मते राष्ट्रध्वजांमध्ये केवळ भगवा रंग असायला हवा, हिरव्या रंगाचा त्यांनी कायम द्वेष केला आहे.
मोदींच्या विविध प्रतिमांशिवाय या वेबसाइटवर रांगोळी स्पर्धेसारखे उपक्रम, ‘अनसंग हिरों’च्या कहाण्या आणि मोदी यांच्या प्रतिमा व उद्धृते (कोट्स) डाउनलोडिंगसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ हे गाणेही त्यात आहे. यात भारताने ७५ वर्षात साध्य केलेल्या बाबी नसून, योग, भलेमोठे पुतळे (शंकर आणि वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेकांचे), स्वच्छ भारत अभियान वगैरे गोष्टी आहे. समारोप अर्थातच वर्तमान पंतप्रधानांच्या प्रतिमेने करण्यात आला आहे. याची टेम्प्लेट मात्र ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चीच आहे, भूतकाळ कधीच विसरता येणार नाही, हे यातून स्पष्ट होते.
अर्थात या देशभक्तीच्या ज्वरामध्ये नेहरूंचा उल्लेखही दुरापास्त आहे, अगदी वेबसाइटवरही तो नाही. त्यांना सरळसरळ झटकून टाकण्यात आले आहे, जुन्या सोव्हिएट संघातील नेत्यांच्या प्रतिमा काढून टाकल्या जात होत्या त्याप्रमाणे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या मते, जवाहरलाल नेहरू कधी अस्तित्वातच नव्हते.
नेहरूंना कुलुपबंद करण्याची कृती लक्षात घेतली, तर राहुल-प्रियंका यांच्यावर केलेली कारवाई व सोनिया गांधी यांना जवळपास नजरकैदेत ठेवणे या सगळ्याची संगती सहज लागते. गांधींची उपस्थिती वर्तमान पंतप्रधानांसाठी गैरसोयीची आहे. मात्र, ते त्यांना बाहेर काढू शकत नाहीत. आणि नेहरूंबद्दल बोलायचे तर त्याच्या ‘नियतीशी करार केल्याचे सांगणाऱ्या’ भाषणाचा निनाद आजही घुमत आहे आणि तो भारतीयांना आणखी अनेक वर्षे, म्हणजेच अल्प स्मृतीमूल्य असलेल्या या अमृतमहोत्सवाच्या पलीकडेही, प्रेरित करत राहणार आहे.
COMMENTS