जागतिक भूक निर्देशांक : ११७ देशांमध्ये भारत १०२ वा

जागतिक भूक निर्देशांक : ११७ देशांमध्ये भारत १०२ वा

भारतातील भूक परिस्थिती ‘गंभीर’ असल्याचे म्हटले गेले आहे. भारताच्या तुलनेत बांगलादेश आणि नेपाळ या शेजाऱ्यांची परिस्थिती बरीच चांगली आहे. भारताच्या १०२ व्या क्रमांकाचा अर्थ असा की केवळ १५ देश भारतापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये आहेत.

२०१९ च्या जागतिक भूक निर्देशांकानुसार भारताला भुकेची पातळी ‘गंभीर’ असलेला देश म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

भुकेच्या तीव्रतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक ११७ देशांमध्ये १०२ वा आहे. सर्वाधिक भुकेची समस्या असणारा, ११७ व्या क्रमांकावरील देश सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक हा आहे.

जागतिक भूक निर्देशांक जगभरातील भूक आणि कुपोषणाच्या पातळ्या मोजतो. या निर्देशांकासाठीचे चार घटक आहेत कुपोषण, लहान मुलांची वाढ खुंटणे, मुलांच्या अवयवांची झीज आणि बालमृत्यू.

जागतिक पातळीवर भूक कमी झाली आहे आणि जागतिक निर्देशक ‘गंभीर’ पासून ‘मध्यम ते गंभीर’च्या सीमारेषेपर्यंत पोहोचला आहे. दारिद्र्याची पातळी १९९९ ते २०१५ दरम्यान कमी झाल्यामुळे हे घडले आहे.

भारताची लोकसंख्या प्रचंड आहे, आणि तिथली परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे हा जागतिक निर्देशांक मोठ्या प्रमाणात खाली आला आहे. भारतात मुलांमध्ये अवयवांची झीज होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २०.८% आहे. मुलांची वाढ खुंटण्याचे प्रमाण ३७.९% आहे.

मागच्या काही वर्षांमध्ये भारताच्या कामगिरीत थोडी थोडी सुधारणा झाली असली तरीही हे यश साजरे करण्यासारखे नाही.

अहवालात स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख आहे, मात्र ते महत्त्वाचे असले तरीही फारसे यशस्वी न ठरल्याचे म्हटले आहे. अजूनही उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य आणि मुलांची वाढ व विकास यांच्यावर विपरित परिणाम होतो.

भारताच्या तुलनेत बांगलादेश आणि नेपाळ या शेजाऱ्यांची परिस्थिती बरीच चांगली आहे. भारताच्या १०२ व्या क्रमांकाचा अर्थ असा की केवळ पंधरा देश भारतापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये आहेत. यापैकी बहुतांश आफ्रिकन देश आहेत.हे पंधरा देश आहेत- सिएरा लिओन, युगांडा, जिबोटी, काँगो, सुदान, अफगाणिस्तान, झिंबाब्वे, तिमोर-लेस्टे, हैती, लायबेरिया, झांबिया, मादागास्कर, चाड, येमेन आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक.

वेगवेगळ्या वर्षांच्या कामगिरीचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे, की२०१६ सालच्या अहवालानंतर गुणांकन बदलले आहे.

केवळ ११७ देशांचा या निर्देशांकात समावेश करण्यात आला आहे. पंधरा देशांचा डेटा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही, मात्र यापैकी काही कमी उत्पन्न असलेले देश असल्यामुळे त्यांच्या भूक पातळ्याही लक्षणीय प्रमाणात तीव्र असतील अशी शक्यता आहे.

COMMENTS