‘फॅमिली केअरटेकर’, पण…

‘फॅमिली केअरटेकर’, पण…

आज ८ मार्च जागतिक महिला दिवस.. स्त्रिया मोठ्या प्रमाणात नोकरीत, घरच्या शेतीत, कौटुंबिक धंद्यामध्ये, घरगुती उद्योगांमध्ये विनामोबदला श्रमिक म्हणून काम करतात. आता घरच्याच उद्योगांमध्ये मोबदल्यासाठी स्त्रियांचा सहभाग वाढला असला तरी घरगुती कामांची जबाबदारी ही अजूनही स्त्रीचीच मानली जाते.

चित्र - मिथिला जोशी

चित्र – मिथिला जोशी

कुठल्याही राष्ट्र, राज्याची विकास साधण्याची क्षमता मोजण्याचा एक प्रमुख मापदंड म्हणजे ते राष्ट्र, राज्य सर्व नागरिकांना आरोग्यदायी जीवन देऊ शकते का हा आहे. थोडक्यात आरोग्याला विकासाच्या संकल्पनेत खूप महत्त्व आहे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या केली की, “आरोग्य म्हणजे केवळ आजार आणि विकलांगतेचा भाव नाही तर आरोग्य म्हणजे संपूर्ण शारीरिक – मानसिक – सामाजिक स्वास्थ्याची स्थिती. “आता स्त्रियांच्या आरोग्याच्या गरजेची चर्चा करीत असताना दोन महत्त्वाचे मुद्दे समोर येतात की, स्त्रियांना आरोग्यसेवेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणे आणि दुसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांच्या आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याबाबतीत चिकित्सा करणे.

महिला दिनाच्या निमित्ताने आपण याच स्त्रियांच्या आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न अभ्यासणार आहोत. स्त्रियांचे आरोग्य हे फक्त त्यांच्या पुनरुत्पादक आरोग्याच्या भूमिकेतच मर्यादित ठेवणे योग्य आहे का? कारण स्त्रिया आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ हा गरोदरपणात आणि मुलाबाळांच्या संगोपनात घालवतात. त्या गरोदर असताना त्यांच्या आरोग्याकडे गांभीर्याने बघण्याचा दृष्टिकोन हाच नंतर त्या गरोदर नसताना त्यांच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण स्त्रियांना अशा काही रोगांना व आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते ज्यांचा संबंध त्यांच्या पुनरुत्पादक भूमिकेशी नसतो. सर्व क्षेत्रात यश मिळविणारी स्त्री घर, नोकरी, संसार या तिन्ही पातळ्यांवर जबाबदारी पेलत आहे. या जबाबदाऱ्या पेलताना त्यांची कसरत होत आहे. परंतु, या कसरतीमध्ये महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे आता दिसून येत आहे. बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन, नोकरीसाठी होणारी धावपळ, ताणतणाव, बैठे कामाच्या पद्धती, त्यामुळे खाण्याच्या चुकीच्या सवयी, वेळेचा अभाव असल्याने व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष यासारख्या विविध कारणांनी ‘फॅमिली केअरटेकर’ बनलेल्या महिलांचे आरोग्य दुर्लक्षित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पूर्वीच्या आणि आताच्या महिलांच्या जीवनपद्धतीत फरक पडला आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे महिलांमध्ये ‘हायपो थायरॉयडिझम’ची समस्या अधिक वाढते. महिलांमध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिनचे प्रमाण कमी जास्त होते. त्यामुळे ‘हायपो थायरॉयडिझम’चा आजार बळावतो. वजन वाढ होतेय. मानसिक ताणाखाली अनेकदा महिला राहत असल्याने हा आजार वाढण्यास मदत होते. धूम्रपान व मद्यसेवन करण्याचे त्यांच्यातील प्रमाण देखील वाढले आहे. या कारणांमुळेच महिलांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, थायरॉइडचे आजार, अनियमित मासिक पाळी, स्तनांसह गर्भाशयांच्या तोंडाचा कॅन्सर, हाडांचे आजारदेखील वाढल्याची निरीक्षणे स्त्रीरोगतज्ज्ञ नोंदवित आहेत. देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेला स्तनांचा कॅन्सर आता पहिल्या क्रमांकावर आहे. स्तनांचा कॅन्सर झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्या तक्रारी घेऊन येतात. त्यानंतर त्याचे निदान आणि उपचार करणे शक्य होत नाही.

स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याच्या गरजांचे प्रकटीकरण करता यावे यासाठी त्याबाबत अवकाश निर्माण केला जाणे महत्त्वाचे आहे. कारण स्त्रियांच्या आरोग्याला दुर्लक्षित करणारा कळीचा घटक म्हणजे पुरुषसत्ताक समाजव्यवस्था.  कुटुंब आणि स्वतःला स्त्रिया सुद्धा आपल्या आरोग्याच्या गरजा केवळ पुनरुत्पादक चौकटीतच बघतात. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्य संदर्भात स्त्रियांना आपल्या गरजांकडे पुनरुत्पादक चौकटीच्या पलीकडे तसेच आपल्या सामाजिक पारंपरिक साचेबंद भूमिकांच्या पलीकडे जाऊन बघण्यासाठी सक्षम करणे हे सर्वात महत्त्वाचे ठरते. आपण ढोबळमानाने स्त्री-पुरुषांच्या स्थितीची आरोग्याच्या चौकटीतून तुलना केली तर स्पष्ट दिसते की, स्त्रियांची स्थिती ही जास्त बिकट आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांचे आरोग्य सेवांचा वापर कमी करतात. बाह्यरुग्ण विभागातील सेवांचा वापर करणाऱ्या तीन पुरुष रुग्णांमागे एक स्त्री या सेवा वापरते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत ही संख्या पाच पुरुषामागे एक स्त्री इतकी आहे. कारण स्त्रिया पारंपरिक घरगुती उपचारांचाच उपयोग जास्त प्रमाणात करतात.

अजून सर्वात गंभीर समस्या म्हणजे भारतातील माता मृत्यूदर खूप जास्त आहे. बाळंतपण अत्यंत कष्टप्रद आणि कधीकधी धोकादायक प्रक्रिया असते. क्वचित प्रसंगी त्यात मुली आणि माता दोघेही दगावू शकतात. याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेक स्त्रिया लहान वयातच गरोदर होतात. तसेच ‘उशीरा लग्न झाल्याने महिलांना उशीरा आई होण्याची संधी मिळते. त्यामध्ये अनेकदा गुंतागुंत होते. म्हणून स्त्रियांच्या मृत्यूची प्रमुख कारणे गर्भपात, गर्भाची स्थिती व्यवस्थित नसणे इत्यादी कारणे ठरतात. तसेच गर्भधारणा झाल्यावर तिच्या शरीरात इतक्या रासायनिक घडामोडी घडत असतात की त्याचा परिणाम तिच्या मज्जासंस्थेवर होतो. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडणे, नैराश्य येते.

तिच्या रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होते आणि मग अशक्तपणा येतो. परंतु या बाळंतपणानंतर जर दिला काही अपघात झाला किंवा मोठा आजार झाला तसेच पुरेशी विश्रांती आणि सकस आहार मिळाला नाही. किंवा ती थोडया -थोड्या अंतरावर वरचेवर गरोदर राहिली तर तिला अकाली वृद्धत्व येते. गरीब देशातील कष्टकरी महिला म्हणूनच अकाली वृद्ध दिसायला लागतात. अनेक स्त्रिया या पहिल्याच बाळतपणानंतर शरीराने खिळखिळ्या होतात. पाठदुखीसारख्या काही व्याधी त्यांना कायमच्या चिकटतात. मुलाला अंगावर पाजण्यामुळे सुद्धा आईला थकवा येतो. स्त्रीच्या त्रासाचे व कमकुवतपणाचे मूळ तिच्या पोटात असते अशा अर्थाचा एक वाक्यप्रचार आहे व तो काही अंशी खराही आहे कारण स्त्रीच्या पुनरुउत्पादनाशी संबंधित अवयवांचे कार्य बिघडले की, तिला अनेक आजारांना तोंड द्यावे लागते.

माता म्हणून स्त्रियांच्या आरोग्य गरजा आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्त्रियांना श्रमिक म्हणून, उत्पादक व्यक्ती म्हणून कुठल्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे ते बघणे ही गरजेचे ठरते. स्त्रियांची कंबरदुखी, पाठदुखी यासारख्या तक्रारी ‘नेहमीच्याच’ व दुर्लक्षित बनतात. खरे तर कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या कामामुळे नाही, तर ‘अतिकाम’ हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. घरकामाच्या बरोबरीने स्त्रिया मोठ्या प्रमाणात नोकरीत, घरच्या शेतीत, कौटुंबिक धंद्यामध्ये, घरगुती उद्योगांमध्ये विनामोबदला श्रमिक म्हणून काम करतात. आता घरच्याच उद्योगांमध्ये मोबदल्यासाठी स्त्रियांचा सहभाग वाढला असला तरी घरगुती कामांची जबाबदारी ही अजूनही स्त्रीचीच मानली जाते. त्यामुळे या दुहेरी श्रमामुळे स्त्रिया शारीरिक दृष्ट्या थकतात. त्यात स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी शारीरिक आणि मानसिक असा दुहेरी त्रास सोसावा लागतो. वेळप्रसंगी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता नसणे त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा मुद्दा आजही दुर्लक्षितच आहे.

स्त्रिया आरोग्यसेवांचा कितपत अनुभव घेतात याकडे जरा खोलात जाऊन पाहिलं तर असंही चित्र दिसतं की, स्त्रिया काही आजाराच्या समस्या जाणवल्या की घरगुती उपचार करतात. जेव्हा एखादा आजार अगदी टोकाला जातो तेव्हाच ते डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतात. आरोग्याच्या छोट्या छोट्या तक्रारींकडे त्या दुर्लक्ष करतात. आता या मागील कारण वर्गीय स्तरांवरही अवलंबून असतात ती अशी की, सरकारी सेवांवरील नसलेल्या विश्वासामुळे खाजगी सेवांकडे वळायचे तर त्या महाग असतात त्यामुळे तेही टाळले जाते. आणखी अशी काही कारणे की अनेक वेळा आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. दवाखाने लांब असतात, सेवा उपलब्ध देणारे नीट लक्ष देत नाहीत, आरोग्य केंद्रात जायचे तर मजुरी बुडवून चालणार नाही आणि त्या पेशंटला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी कुटुंबातील आणखी एका व्यक्तीची मजुरी बुडते जे की परवडत नाही अशी अनेक कारणे असतात.

स्त्रीप्रजनन ते रजोनिवृत्ती या काळात स्त्रियांना बऱ्याच शारीरिक समस्या निर्माण होतात. जसे पीसीओडी, स्थूलता, उच्चरक्तदाब, मधुमेह, हाडे व सांध्याचे विकार, स्तनातील व गर्भाशयातील गाठी, स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर, मासिक पाळीच्या तक्रारी, अ‍ॅनिमिया, थायरॉइड, मानसिक तणाव, डिप्रेशन आदी. या व्याधींच्या कारणांमधील एक महत्त्वाचे कारण म्हणजे पोषणयुक्त आहाराचा अभाव. तसेच अजूनही बऱ्याच कुटुंबात पोषणाच्या बाबतीतही स्त्री-पुरुष मुलगा-मुलगी असे भेद करून सेवेचे आणि पोषणाचे वाटप केले जाते. कोणाचा कशावर हक्क आहे या बाबतीतली त्या त्या कुटुंबातील गृहीतके खूप महत्त्वाची ठरतात. बऱ्याच कुटुंबात अजूनही पुरुष व मुलांच्या आरोग्याची काळजी जास्त घेतली जाते. अनेक कुटुंबात मुली व स्त्रियांना अंडी मासे व मांस देण्यावर बंधने घातली जातात. परिणामी स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी प्रथिने व कमी अन्न मिळतं.

शारीरिक आरोग्याच्या पलीकडे जाऊन मानसिक आरोग्याकडे पाहिले तर तिथे ही स्त्रियांची कुचंबणाच दिसून येत. आधीच समाजातील दुय्यम स्थानामुळे स्त्रियांच्या वाट्याला काही असे अनुभव येतात आणि ते त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी अपायकारक ठरतात. जसं की हिंसा, नकोशी असलेली गर्भधारणा, प्रसूती, मासीक पाळीतील त्रास, मेनोपॉज इत्यादी टप्पे हे त्यांच्या मानसिक आरोग्याला बाधक ठरतात. मानसिक रोगांचे प्रमाण जरी स्त्री-पुरुषांमध्ये सारखेच असले तरी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणार्‍या स्त्रिया पुरुषांच्या मानाने कमीच आढळतात. मानसिक आरोग्य रुग्णालयातील रुग्णांच्या एका पाहणीत असे आढळून आले आहे की तेथे १८८० पुरुष व केवळ ७०२ स्त्रिया उपचारासाठी आल्या होत्या. यावरून स्पष्ट होते की मानसिक आरोग्य सेवांच्या उपलब्धतेसाठी व वापरामध्ये लक्षणीय लिंगभाव आधारित विषमता आहे. मानसिक रोग आतून बरे होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रेम, विश्वास, आपुलकी आणि आजूबाजूच्या लोकांचा आधार. दुर्दैवाने पुरुषसत्ताक समाजात ते ही स्त्रियांच्या वाट्याला येत नाही.

मोहिनी मंदाकिनी बालाजी जाधव, मुक्त पत्रकार आहेत,

COMMENTS