इंटरनेट: संस्थळांचे आगमन

इंटरनेट: संस्थळांचे आगमन

चोवीस तास उपलब्ध असलेले इंटरनेट आणि संस्थळे यांच्या वापर करुन बहुसंख्य बँका, वीजवितरण, टेलिफोन अथवा मोबाईल सारख्या सेवादात्या कंपन्या तसंच मोठ्या व्यावसायिक, प्रशासनिक आस्थापनांनी आपापल्या संस्थळांमार्फ प्रत्यक्ष जगण्यातील व्यवहारांना इंटरनेटची खिडकी उघडून दिली.

बाय बाय टाईपरायटर
केल्याने नियोजन, संगणकमैत्री…
संगणकानां सर्व्हरोऽहम्

संगणकाने दस्त आणि म्हणून पुस्तके सहज प्रती बनवता येतील अशा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करुन दिल्यामुळॆ शैक्षणिक क्षेत्रात संदर्भग्रंथ, रिसर्च पेपर्स यांची देवाणघेवाण सोपी झाली होतीच. अभ्यासक्रमाला उपयुक्त असलेल्या एका विद्यार्थ्याकडे अथवा संशोधकाकडे असलेल्या ई-बुक ची एक प्रत दुसर्‍याकडे चुटकीसरशी पोचू लागली, ती ही मूळ प्रत तशीच राखून. इंटरनेटच्या आगमनानंतर ‘फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल’ (FTP) च्या माध्यमातून ही प्रत देश-कालाच्या सीमा ओलांडून एका संगणकावरुन दुसर्‍या संगणकापर्यंत सहज पोचू लागली. याचा विद्यार्थी, अभ्यासक अथवा वाचक यांना फायदा झाला असला तरी प्रकाशकांना यातून मोठेच नुकसान सहन करावे लागते. एका व्यक्तीने विकत घेतलेली अशी ई-बुक्स अनेक प्रतींच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोचतात, ज्यातून अनेक संभाव्य ग्राहक कमी होतात. हे टाळण्यासाठी तिला वाचनमात्र करण्याबरोबरच एखाद्या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून एकाच ग्राहकाला वाचता येईल यासाठी  DRM (Digital right management) तंत्राचा वापर सुरू झाला. पण हा असे अधिकार राखण्यासाठी बनवली जाणारी प्रणालीही संगणकीकृतच असल्याने तिची तोडही त्यावर बनवली जाऊ लागली. इंटरनेट सर्व्हरच्या माध्यमातून अशी माहिती एकाच ठिकाणी ठेवून, संगणकावरील लॉगिन-पासवर्ड च्या धर्तीवर इथेही ग्राहकाला इंटरनेटच्या माध्यमातून फक्त वाचता येईल, त्याच्या संगणकावर उतरवून घेता येणार नाही अशी सोय करण्याचा पर्याय समोर आला.  यातून ग्राहक अनधिकृतरित्या त्या पुस्तकाच्या प्रती बनवून इतरांना देण्याची शक्यता नाहीशी झाली.

ज्याप्रमाणे  किंवा त्यासारख्या प्रणालींच्या सहाय्याने वैयक्तिक संगणकावरील दस्त वाचता अथवा दुरुस्त करणे शक्य होते, त्याच धर्तीवर अशा प्रकाशकांच्या अथवा माहिती संकलित करुन तिचा अधिकार करणार्‍यांच्या सर्व्हरवरील ही माहिती वाचता यावी यासाठी ’वेब ब्राउजर’ (web browser) या बहुगुणी प्रणालीचा जन्म झाला. (‘मायक्रोसॉफ्ट’चा इंटरनेट एक्स्प्लोरर, मोझिला फायरफॉक्स,  गुगलचा क्रोम, सफारी, ओपेरा हे सध्या प्रचलित असलेले काही ब्राउजर्स.) निव्वळ डिजिटल प्रत एका संगणकाकडून दुसर्‍याकडे हस्तांतरित करणार्‍या ‘FTP’च्या जोडीला आता HTTP (Hyper-Text Transfer Protocol ) हा नवा साचा, नवा प्रोटोकॉल अस्तित्वात आला. यातून सर्व्हरवर ठेवलेली माहिती ग्राहकाच्या संगणकावर आल्यानंतर तीची प्रत स्थानिक संगणकावर तयार न करता थेट ब्राउजरच्या माध्यमातून ग्राहकाला वाचण्यासाठी पडद्यावर दाखवली जाऊ लागली. यात निव्वळ माहिती सर्व्हरकडून येत असली तरी ग्राहकाला हव्या त्या प्रकारे त्याच्या संगणकावर मांडून दाखवण्याचे काम ब्राउजरने आपल्या शिरी घेतले.

ई-बुक्स आणि ब्राउजरच्या माध्यमातून दिसणार्‍या माहिती संकलनात एक महत्वाचा फरक आहे. तो असा, की ई-बुकची प्रत्येक वापरकर्त्याकडील प्रत तंतोतंत सारखी असते तर ब्राउजरच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहक माहिती तीच ठेवून फक्त मांडणी आपल्या सोयीनुसार – काही प्रमाणात – बदलून घेऊ शकतो.  त्यासाठी एचटीटीपी प्रोटोकॉल ही माहिती माहिती-चौकटींच्या – ब्लॉक्सच्या – स्वरुपात पाठवतो. आवश्यकतेनुसार या चौकटींच्या परस्परसंबंधांची किंवा त्यांना संगणकावर दर्शवताना अपेक्षित आराखड्याची अतिरिक्त माहितीही तो पुरवतो (तिला मेटा-डेटा किंवा डेटा-बद्दलचा डेटा असे म्हणतात) . मग पुढचे काम स्थानिक ब्राउजरकडे सोपवून दिलेले असते. ही माहिती आणि माहितीबद्दलची माहिती पुरवणार्‍या सर्व्हरला ’वेब-सर्व्हर’ आणि ही सारी संकलित माहिती पुरवणार्‍या प्रणालीला ’वेब-साईट’ असे म्हटले जाऊ लागले. मराठीमध्ये वेब-साईट ला ’संस्थळ’ असे म्हटले जाते.

या संकल्पनेचा फायदा घेत अनेक शैक्षणिक संस्थांनी, विद्यापीठांनी, संशोधक-नियतकालिकांनी इतकेच नव्हे तर विविध ज्ञानकोषांनीही आपापल्या ज्ञान आणि माहितीच्या कोषाला संस्थळांच्या रूपात इंटरनेटच्या जगात आणले. विविध विद्यापीठांमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम, त्यासाठी आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ अथवा संशोधन, वगैरे माहिती विद्यापीठाच्या संस्थळावरच मिळू लागली. अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍यांना आवश्यक ती सर्व माहितीही या संस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली. जगभरातून कुणीही विद्यार्थी ती घरबसल्या पाहून आवश्यक ती पावले उचलू शकतो. एनसायक्लोपीडिआ ब्रिटानिका, ऑक्सफर्ड डिक्शनरी सारखे यापूर्वी छापील माध्यमांतून उपलब्ध असणारे ज्ञानकोष आता इंटरनेटच्या माध्यमातून चोवीस तास उपलब्ध झाले. इतकेच नव्हे तर एक पाऊल पुढे टाकत ’विकीपीडिया’ सारख्या माहिती-कोषाने त्या क्षेत्रात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली. असे माहिती-संकलन ही नेमलेल्या तज्ज्ञांऐवजी सामान्य माणसालाही त्यात भर घालता येऊ लागली. त्यातील चुका अन्य कुणी तज्ज्ञ दुरुस्त करुन ते अधिकाधिक निर्दोष करत नेऊ लागला. राजकीय लोकशाहीप्रमाणेच या लोकशाहीचा  गैरवापरही लवकरच सुरु झाला. आपल्या सोयीचा इतिहास, माहिती प्रसारित करण्यासाठी तिचा वापर करणार्‍यांचे कोंडाळे तिथे जमू लागले. त्यामुळे अशी लोकशाहीवादी माहिती निर्दोष, प्रामाणिक राखणे दिवसेंदिवस अधिक जिकीरीचे होत चालले असले, तरी एक चांगला पर्याय या निमित्ताने उपलब्ध झाला हे नाकारता येणार नाही.

संगतीच्या दृष्टीने हा प्रवाह शैक्षणिक, अभ्यासकांसाठीच उपयुक्त दिसत असला तरी संस्थळाची संकल्पना जरी माहिती-प्रसारणावर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी निर्माण झाली असली तरी तिची व्यापक उपयुक्तता माणसाने लवकरच ओळखली आणि संस्थळांचा वापर अनेक क्षेत्रात, अनेक प्रकारे होऊ लागला.  संगणकावर दस्त, ध्वनि, चित्र आणि चलच्चित्र अशा चारही प्रकारच्या माहितीची निर्मिती, दुरुस्ती आणि वापर शक्य असल्याने आणि हे सारे संगणकावर अखेरीस एकाच भाषेत (०/१ च्या द्विमान पद्धतीच्या) साठवले अथवा प्रसारित केले जात असल्याने जे पुस्तकांबाबत अथवा माहितीबाबत शक्य आहे तेच इतर प्रकारच्या माहितीबाबत शक्य होते हे ओघाने आलेच. त्यामुळॆ निव्वळ पुस्तकांपुरते अथवा माहितीपुरते मर्यादित न राहत फोटो, संगीत, चित्रपट आदी माहितीचे आदानप्रदान करणार्‍या वेबसाईटस च्या माध्यमातून चोवीस तास मनोरंजन सेवा इंटरनेटच्या माध्यमातून सुरु झाल्या. संस्थळांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिलेल्या संगीत ध्वनिमुद्रण असो, लघुपट असो की चित्रपट सेवांचे वैशिष्ट्य असे की हे सारे चोवीस तास उपलब्ध असते. ग्राहकाला हवे तेव्हा तो त्यांचा आस्वाद घेऊ शकतो. टेलेविजन चॅनेल्सवर, चित्रपट किंवा नाट्यगृहातून कोणत्या वेळी काय पाहायला मिळेल याचे नियोजन- ती सेवा वैयक्तिक नसल्याने- ग्राहकाच्या हाती नसते. संगणकाने मनोरंजन ’वैयक्तिक’ पातळीवर आणले तसे संस्थळ-सेवांनी वैयक्तिक मनोरंजनालाही स्थानिक असण्याची गरज नाहीशी केली. अशा ध्वनिमुद्रणांची, लघुपटांची, चित्रपटांची संगणक-प्रत ग्राहकाच्या स्वत:च्या संगणकावर असण्याची गरज उरली नाही. यामुळॆ साठवणुकीची मर्यादा नाहीशी झाली. अशा सेवा देणार्‍या असंख्य संस्थळांच्या उपलब्धतेमुळे हवे ते मिळण्याची शक्यताही बरीच वाढली.

टेलिविजन आणि त्यापूर्वी रेडिओच्या माध्यमातून प्रसारित केल्या जाणार्‍या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये श्रोते अथवा प्रेक्षक आपल्या आवडीचे गाणॆ, कार्यक्रम अथवा चित्रपट प्रसारित करण्याची विनंती करत असत. मग अनेकांनी केलेल्या अशा ’फर्माईशीं’ची दखल घेऊन रेडिओ-केंद्र अथवा टेलिविजन चॅनेल तो कार्यक्रम प्रसारित करत. अर्थात इथे पुन्हा बहुमताचे आणि प्रताधिकार वगैरेंचे मुद्दे असल्याने हे होईलच याची खात्री देता येत नसे. उलट दिशेने अशा फर्माईशींच्या आधारेच चालणारे ’बिनाका गीतमाला’ अथवा ’छायागीत’ यांच्यासारखे कार्यक्रम प्रसारित केले जाऊ लागले. त्यायोगे गाण्यांच्या, चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज श्रोत्यांना अथवा प्रेक्षकांना मिळू लागला तर तेव्हा ती संज्ञा प्रचलित नसली तरी ’टीआरपी’ अधिक असलेलाच कार्यक्रम प्रसारित केल्याने रेडिओ-केंद्राची अथवा चॅनेलला प्रेक्षक बांधून राहू लागला… हवे तेव्हा, हवे ते पाहा अथवा ऐका’ची घोषणा करत संस्थळाधारित मनोरंजन सुरु झाल्यापासून रेडिओ आणि चॅनेल्स यांच्या या फर्माईशीवर आधारित नियोजनाला ब्रेक लागला.  आज ज्याला टीआरपी म्हटले जाते, तो कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर मोजला जातो. थोडक्यात टीआरपी हे मागणी नव्हे तर केवळ वापराचे मोजमाप आहे. आता अमेजन प्राईम, नेटफ्लिस्क, हुलु आदी संस्थळाधारित सेवांनी मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित करणार्‍या चॅनेल्सचा वाटा बळकावण्यास सुरुवात केली आहे.

माहिती-कोष असोत, संगीत ऐकवणार्‍या सेवा असोत की विविध मोबाईल-टेलेकॉम कंपन्यांसह अमेजन, नेटफ्लिक्स आदि चलच्चित्र-सेवा असोत; यांत केवळ एकतर्फी वापराची सोय आहे. एक बाजू सेवादात्याची तर दुसरी ग्राहकाची अशी स्पष्ट विभागणी दिसते. पूर्वी बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये विविध प्रकारच्या सेवा देणार्‍या खिडक्या असत. यात दोन व्यक्ती या खिडक्यांच्या माध्यमातून देवाणघेवाण करत असत, कागदपत्रांचे आदानप्रदान, पैसे देऊन देणे चुकते करणे, बँक खात्यातून पैसे काढणे अशी दुहेरी वाहतून या खिडक्यांमधून होत असे. आज जरी खिडक्यांची जागा खुल्या काउंटर्सनी घेतली असली तरी सेवा देणारा हा केवळ त्या व्यवस्थेचा प्रतिनिधी म्हणूनच कार्य करतो. पोस्ट/बँकेच्या वतीने ती व्यक्ती व्यवहार करत असली तरी व्यवहार व्यवस्था आणि सेवा घेणारा यांच्यात होत असतो. असाच व्यवहार, अशी दुहेरी वाहतूक संस्थळामार्फतही शक्य झाली तर अशा सेवादात्या खिडक्यांऐवजी संस्थळच अशा व्यवहाराची आभासी खिडकी म्हणून काम करु शकणार होती.

’इंटरनेट’च्या माध्यमातून वरून ईमेल सारखी ’दुहेरी वाहतूक’ सेवा आधीच वापरात होती. ईमेल’ची देवाणघेवाण ज्याप्रमाणॆ दोन व्यक्तींच्या ईमेल-ओळखीमार्फत होते तशी वेबसाईट्स अथवा संस्थळांवरील माहितीचे आदानप्रदान त्या संस्थळाचा सर्व्हर आणि ग्राहकाचा संगणक यांच्यामध्ये होत असते. या दोनही संगणकांना परस्परओळखीसाठी विशिष्ट क्रमांकांची (आयपी अड्रेस आणि/किंवा संगणकाचा मशीन क्र.) सोय असतेच. त्यामुळे हीच संकल्पना वापरून संस्थळांवर उपलब्ध करुन देण्यात काहीच अडचण नव्हती. त्यामुळॆ चोवीस तास उपलब्ध असलेले इंटरनेट आणि संस्थळे यांच्या वापर करुन बहुसंख्य बँका, वीजवितरण, टेलिफोन अथवा मोबाईल सारख्या सेवादात्या कंपन्या तसंच मोठ्या व्यावसायिक, प्रशासनिक आस्थापनांनी आपापल्या संस्थळांमार्फ प्रत्यक्ष जगण्यातील व्यवहारांना इंटरनेटची खिडकी उघडून दिली.

डॉ. मंदार काळे,संख्याशास्त्रज्ञ व संगणकतज्ज्ञ आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: