‘ब्ल्यू गर्ल, ब्ल्यू गर्ल’, ‘फिफा थँक्यू’

‘ब्ल्यू गर्ल, ब्ल्यू गर्ल’, ‘फिफा थँक्यू’

४० वर्षांनंतर इराणच्या महिलांनी पाहिला फुटबॉल सामना.

तेहरान : इराणमध्ये १९७९ मध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर महिलांना फुटबॉल सामने पाहण्यास बंदी घातली होती. ती बंदी अखेर गुरुवारी ४० वर्षांनी उठली. राजधानी तेहरानच्या आझादी स्टेडियममध्ये सुमारे साडेतीन हजार महिलांनी इराण विरुद्ध कंबोडिया असा फिफा वर्ल्ड कप फुटबॉलचा पात्रता सामना पाहिला आणि या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला.

१९७९मध्ये इराणमधील झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर पुरुषांचे खेळ पाहण्यास महिलांना बंदी घालण्यात आली होती. या बंदीवरून गेली चार दशके इराणच्या समाजात खदखद होती. विशेषत: इस्लामिक क्रांतीनंतर जन्मास आलेल्या पिढीमध्ये फुटबॉलचे विशेष आकर्षण असल्याने या बंदीच्या विरोधात अधूनमधून आवाज उठत असे.

गेल्या महिन्यात सहर खोदयारी या फुटबॉलप्रेमी इराणी महिलेने एक फुटबॉल सामना पाहण्यासाठी पुरुषाचा वेष परिधान केला. पण पोलिसांनी तिला अटक केली. या अटकेचा विरोध म्हणून सहरने स्वत:ला जाळून घेतले. या घटनेनंतर इराणमध्ये महिलांना फुटबॉल सामने पाहण्याचे स्वातंत्र्य असावे यावर नागरी चळवळी झाल्या. फिफाने या घटनेची दखल घेत तेहरानमध्ये आपले एक प्रतिनिधी मंडळ पाठवले व महिलांना फुटबॉल सामन्याचा आस्वाद, आनंद लुटता यावा म्हणून मैदानातच त्यांच्यासाठी विशेष आसन व्यवस्था निश्चित केली.

गुरुवारी जेव्हा इराण व कंबोडियाचे संघ एकमेकांसमोर भिडले तेव्हा संपूर्ण स्टेडियम सुमारे साडेतीन हजार महिलांनी डोक्यावर घेतले. आपल्या संघाला या महिला प्रोत्साहन देत होत्या. शेकडो इराणी झेंडे, फलकांनी स्टेडियममध्ये ऊर्जा आली होती.

ज्या सेहरने आपल्या अटकेविरोधात जाळून घेतले तिच्या स्मृतींना या महिला अभिवादन करत होत्या. सेहरला इराणमध्ये ‘ब्ल्यू गर्ल’ असे म्हटले जाते. स्टेडियममध्ये हजारो महिलांच्या तोंडी ‘ब्ल्यू गर्ल, ब्ल्यू गर्ल’ आणि ‘फिफा थँक्यू’, अशा आरोळ्या होत्या.

बलाढ्य इराणपुढे कंबोडियाचा संघ फारच दुबळा ठरला. हा सामना इराणने १४ -० असा सहज जिंकला.

मूळ बातमी

COMMENTS